Saturday, July 25, 2009

प्लॅस्टिकच्या भस्मासुराला रोखा

आजकाल सगळीकडे प्लॅस्टिक हा शब्द ऐकू यऊ लागला आहे. सुमारे दीडशे वर्षापूर्वी माणसाने ‘प्लॅस्टिक’ या अधातूची निर्मिती केली व शंभर वर्षापूर्वी प्लॅस्टिकने माणसाच्या जीवनात प्रवेश केला. आपल्या घरात नजर टाकली तर स्वयंपाकघरापासून दिवाणखान्यापर्यंत सगळीकडे प्लॅस्टिकच्या वस्तू दिसतील. जणू काही आज प्लॅस्टिक हे आपल्या जीवनाचे अविभाग्य अंग बनले आहे.
परंतु इतर अनेक शोधांप्रमाणे प्लॅस्टिकचा शोधही दुधारी ठरू लागला आहे. आपले जीवन प्लॅस्टिकवर इतके अवलंबून आहे की, त्याचा वापर कमी करणे कठीण होऊन बसले आहे. प्लॅस्टिकच्या अमर्याद वापरामुळे व त्यातून निर्माण होणाऱ्या अविघटनशील कचऱ्यामुळे निर्माण होणाऱ्या धोक्यांची जाणीव पर्यावरणप्रेमी मंडळींना होऊ लागली आहे. प्लॅस्टिकचा वापर कमी करा, असे प्रत्येकजण सांगत असतात. परंतु प्रत्यक्ष कृती कोणीही करत नाही. परंतु ‘शब्दाला कृतीची जोड हवी.’
सगळ्यांना हा प्रश्न भेडसावत असेल की, प्लॅस्टिक म्हणजे आहे तरी काय?
‘प्लॅस्टिक’ हा अधातू असून उच्च अणुभाराचा सेंद्रिय पदार्थ हा त्याचा अत्यावश्यक घटक आहे. सेल्युलोज, कार्बन, पेट्रोलियम पदार्थ व नैसर्गिक वायू आदी पदार्थापैकी कोणत्याही एका पदार्थापासून प्लॅस्टिक तयार करता येते.
तुम्हाला वाटत असेल की प्लॅस्टिकच्या वस्तू वापरण्यात अनेक फायदे आहेत जसे की, वजनाला हलके तरीही मजबूत, विद्युतरोधक, अनेक आकार सहजपणे घेऊ शकणारे, आघात शोषून घेऊ शकणारे, वंगणाची गरज नसणारे, झीज व घर्षण कमी होणारे, पारदर्शक, अर्धपारदर्शक, अपारदर्शक या तिन्ही स्वरूपात उपलब्ध तसेच आकर्षक रंगांच्या शेकडो छटांमध्ये मिळणारे, न गंजणारे, उत्पादनात कमी यांत्रिकी क्रियांची आवश्यकता, पुष्कळशा रसायनांचा यावर परिणाम होत नाही. उत्कृष्ट जलविरोधक तर इतर पदार्थाच्या तुलनेत अल्प किंमत इ. गुणधमार्ंमुळे अनेक क्षेत्रातील प्लॅस्टिकचा वापर उदा. मेडिसीन, इंजिनिअरिंग क्षेत्रातील गुंतागुंतीची यंत्रे, विमाने, मोटारी, इलेक्ट्रिकल उद्योग, बांधकाम उद्योग, बुलेटप्रूफ जाकिटे, अग्निरोधक वस्तू इ. गोष्टीत प्लॅस्टिक माणसाला अक्षरश: वरदानच ठरले आहे, असे म्हटले तरी वावगे होणार नाही. असे हे प्लॅस्टिक आज आपल्याला अतिशय सुखदायक वाटत आहे पण जसे फायदे तसे तोटेही आहेत. ते पुढीलप्रमाणे- प्लॅस्टिक जाळले तर त्यातून झिंक लेड, कॅडमिअमसारखी हेवी मेटल्स, बेन्झोपायरिन, डायकिसन, कारिनेटेड हायड्रोकार्बन्स पी.सी.डी. एफ. यासारखे आरोग्यास घातक वायू बाहेर पडून हवेत मिसळले जातात आणि त्यापैकी काही वायूंपासून श्वसनाचे विकार व कॅन्सरसारखे विकारही उद्भवू शकतात.
परंतु माणसाचा गुणधर्म असा आहे की, तो फक्त तात्पुरता फायदा पाहतो. त्याचे फायदे व नुकसान पाहतच नाही. प्लॅस्टिक जमिनीत गाडले किंवा जमिनीवर पसरून टाकले तर त्या ठिकाणी जंतू, किडे, कृमी वाढत नाहीत व तेथे काही उगवूही शकत नाही. थोडक्यात जमिनीचा कस असलेल्या वनस्पतींचा नाश होत आहे.
प्लॅस्टिकचे ठोकळे करून समुद्रात बुडवले तर समुद्रातील मासे ते कुरतडतात आणि या माशांना व हे मासे खाणाऱ्या माणसांनाही याचा त्रास होतो. परंतु हा विचार करणार कोण?
प्लॅस्टिकचा कचरा या समस्येचे निराकरण करण्यासाठी सर्वप्रथम प्रत्येकाने स्वत:ला शिस्त लावून घेतली पाहिजे. ‘आधी केले मग सांगितले’ असे असले पाहिजे. सांगणारे भरपूर असतात. परंतु करणारे खूप कमी असतात. आपण वापरत असलेल्या प्लॅस्टिकची योग्यरीतीने विल्हेवाट लावली जाते की नाही याबद्दल दक्ष राहिले पाहिजे.
प्लॅस्टिकचा वापर डोळसपणे करणे ही काळाजी गरज आहे. काही विशिष्ट क्षेत्रांमध्ये प्लॅस्टिक वापरणे योग्य ठरू शकते. किंवा तेथे ते आवश्यकही असू शकते. उदा. इंजिनिअरिंग, वैद्यकीय, औद्योगिक व संशोधन क्षेत्र. किंबहुना काही वेळा प्लॅस्टिकमुळे जंगल वाचवायला मदतही होऊ शकते. उदा. प्लॅस्टिकच्या खुच्र्या, दारे, खिडक्यांची तावदाने यामुळे जंगलतोड काही प्रमाणात कमी होऊ शकते.
परंतु आपल्या रोजच्या आयुष्यात प्रत्येक गोष्टीत जे प्लॅस्टिक घुसले आहे ते योग्य आहे काय? प्लॅस्टिकचे खराटे, झाडू, बादल्या, सुप, पाट, कॅरिबॅग या वस्तू वापरायला हव्यात का? आता तर मंगल कार्यालयातून पिण्याचे पाणीही प्लॅस्टिक ग्लासमध्ये देण्याची पद्धत सुरू झाली आहे. रस्त्यावर आणि रेल्वेत मिळणारे सरबत किंवा इतर पेय ग्लास विसळण्याचा त्रास नको म्हणून प्लॅस्टिक पिशव्यांतून, थर्माकोलच्या किंवा प्लॅस्टिकच्या ग्लासमधून मिळत आहे आणि हे ग्लास ठिकठिकाणी फेकलेले दिसतात. हीच का आपली आधुनिकता?
प्लॅस्टिकच्या अश अमर्याद आणि अयोग्य वापरामुळे पर्यावरणावर होणारे परिणाम जीवसृष्टीच्या अस्तित्वावरच हल्ला करत आहेत. त्यामुळे प्लॅस्टिक वस्तूंमुळे होणारी सोय व त्यामुळे होणारे प्रदूषण या दोन्हींचा तौलनिक अभ्यास करून प्रत्येकाने आपल्या आणि आपल्या पुढील पिढय़ांच्या भल्यासाठी प्लॅस्टिकचा अनावश्यक वापर समंजसपणे टाळला पाहिजे. आणखी दोन हजार वर्षानी उत्खनन केले तर जमिनीच्या पोटात प्लॅस्टिकचे ढिगारे सापडतील. ही आपल्या संस्कृतीची खूण आपण मागे ठेवणार आहोत का?
आपण प्लॅस्टिकचा कचरा किंवा इतरही कचरा रस्त्यावर टाकण्याची सवय निर्धाराने मोडली पाहिजे.
प्रदूषणाला बसवा आळा
ईश्वर सर्वव्यापी आहे असे म्हणतात. याचप्रमाणे आता पृथ्वीवरील सर्वव्यापी वस्तू म्हणजे कॅरी बॅग! जळी, स्थळी, काष्ठी, पाषणी तिचेच दर्शन होत असते. शहरांजवळच्या टेकडय़ा, बागा, बघाल तिथे कॅरी बॅग. लोक पर्यटनाला किंवा फिरायला म्हणून जातात व तिथे कचरा करून येतात. त्यामुळे प्लॅस्टिकचा कचराच कचरा सर्वत्र दिसत आहे.
सध्याच्या या धावपळीच्या जीवनात प्रश्नण्यांची सेवा करण्यास कोणासही वेळ नाही. त्यांना खायला कोण देत नाही. त्यामुळे त्यांना खावा लागतो तो कचरा कुडय़ांमधील कचरा. अन्नाबरोबर सडलेले, नासलेले, कुजलेले, पदार्थ खावे लागतात आणि हे सर्व पदार्थ कॅरी बॅगच्या आत असल्याने त्यांना ते काढून खाता येत नाहीत. प्रश्नण्यांच्या पोटात ५-१० किलो प्लॅस्टिक पिशव्यांचे गठ्ठे सहज सापडतील. दुकानदार गिऱ्हाईकाला सगळ्या वस्तू प्लॅस्टिक पिशव्यांमध्ये देत असतो. फुटाण्याच्या पुडीपासून ते तांदूळ-गहूच्या पिशव्यांपर्यंत. त्यामुळे घरात, बाहेर, रस्त्यावर, कचराकुंडीत, कचराकुंडीच्या बाहेर, प्रश्नण्यांच्या शरीरात प्लॅस्टिक, प्लॅस्टिक, प्लॅस्टिक. जिकडे पाहावे तिकडे प्लॅस्टिकच!
कॅरी बॅगचे उत्पादन होणारच नाही असे निर्णय सरकारने घेतलेले पाहिजेत.
सर्व छोटय़ा, मोठय़ा विक्रेत्यांनी, फळवाले, भाजीवाले, मिठाईवाले यांना एकत्र येऊन ग्राहकांना कॅरी बॅग देणे बंद केले पाहिजे. ग्राहकांनीही कॅरी बॅगा मागू नयेत व दिल्यातरी घेऊ नयेत.
पहिले पाऊल टाकू या!
तुम्ही- आम्ही सर्वजण प्लॅस्टिक वापरणे मर्यादित करू या।।
कॅरी बॅगमध्ये अन्न बांधून फेकण्याची सवय टाळू या।।
स्वयंपाकघरात वापरत असलेल्या प्लॅस्टिक वस्तूंचा वापर टाळू या.
कोमल घुगरी

No comments:

Post a Comment

ad