Monday, January 5, 2009

स्पॉंडिलायसिस म्हणजे काय?

स्पॉंडिलायसिस म्हणजे काय?


(डॉ. जयदेव पंचवाघ)
आपल्या दोन मणक्‍यांमधल्या मऊ कुर्चा "शॉक ऍबर्सोर्बर' व "बॉल बेअरिंग'चे काम करतात. त्यांतील पाण्याचे प्रमाण कमी व्हायला लागले, की त्यांची जाडी कमी होते आणि मणके एकमेकांच्या जवळ यायला लागतात. त्याच वेळी शरीराला जाणीव होते, की या भागात काही तरी गडबड आहे...

साध्या शब्दात सांगायचे म्हणजे मणक्‍यांची झीज होण्याच्या प्रक्रियेला "स्पॉंडिलायसिस' असे म्हणतात. वयमानापरत्वे प्रत्येकाला हा त्रास कमी-अधिक प्रमाणात होत असतो.

आपल्या दोन मणक्‍यांमध्ये "डिस्क' (गादी/कुर्चा) असते. ही "शॉक ऍबर्सोर्बर' व "बॉल बेअरिंग'चे कार्य करत असते. डिस्कचा मधला भाग जेलीप्रमाणे मऊ असतो. त्यात पाण्याचे प्रमाण अधिक असते. जेव्हा झीज सुरू होते, तेव्हा हे पाण्याचे प्रमाण आटायला लागते. डिस्कची उंची कमी होते व दोन मणके एकमेकांच्या जवळ यायला लागतात.

त्याचवेळी शरीराला जाणीव होते, की या भागात काही तरी गडबड आहे. आपल्या शरीराचा एक गुणधर्म असा आहे, की कुठेही अस्थिरता जाणवली, की तेथे जास्त हालचाल न होण्याचे उपाय योजले जातात. त्यामुळे प्रथम मानेच्या भागातले स्नायू आकुंचन पावतात व कडक होतात. त्यामुळे मान "अवघडते.' त्यानंतर हळूहळू "डिस्क'च्या अवतीभवती नवीन कॅल्शिअम साचायला लागते व हळूहळू त्याचे नवीन हाडात रूपांतर होते. हे हाड वरून व खालून "चोची'प्रमाणे वाढते. "अस्थिर' भाग सांधण्याच्या शरीराच्या प्रयत्नांचा हा भाग असतो.

अशा प्रकारांची हाडांची टोकं मणक्‍यातल्या मागच्या भागातल्या सांध्यांमधूनसुद्धा वाढतात. त्याचप्रमाणे मज्जारज्जूभोवती असलेल्या इतर काही भागांतल्या सांध्यांमधूनसुद्धा वाढतात. त्याचप्रमाणे मज्जारज्जूभोवती असलेल्या इतर काही भागांतसुद्धा कॅल्शिअम जमा व्हायला लागते. या प्रक्रियेला स्पॉंडिलायसिस म्हणतात. मणक्‍यांची ही झीज वयाच्या २५ वर्षांनंतर सुरू होते व ५० वर्षांनंतर ९५ टक्के लोकांच्या एक्‍स-रे मध्ये कमी-अधिक प्रमाणात स्पॉंडिलायसिस असतो.

मानेच्या स्पॉंडिलायसिसची लक्षणे कोणती?
अधून-मधून मान अवघडणे, मणके एकमेकांना सांधले गेल्याने मानेची हालचाल नेहमीप्रमाणे न होणे अशी लक्षणे बहुतांश लोकांमध्ये वयानुसार दिसतात. बहुतांश लोकांमध्ये यापुढे प्रकरण जात नाही. मात्र स्पॉंडिलायसिसची प्रक्रिया नेहमीपेक्षा खूप जास्त झाल्यास मज्जारज्जू व नसांवर दाब येऊ शकतो. त्याचवेळी लक्षणे दिसू शकतात.

तसेच काही लोकांमध्ये मणक्‍यातील कॅनॉल (ज्यातून मज्जारज्जू व नसा जातात) जन्मतःच चिंचोळा असतो, त्यातच जर या वाढलेल्या हाडांचा दाब आला, तर "दुष्काळात तेरावा महिना' अशी स्थिती होते. हा दाब मज्जारज्जूवर आहे का नसांवर आहे, यावर लक्षणे अवलंबून असतात.

मज्जारज्जूचा दाब ः
१) चालताना (विशेषतः अंधारात चालताना) तोल न सांभाळता येणे.

२) पायांमध्ये जडपणा वाटणे. पायातील शक्ती कमी वाटणे.

३) चालताना पायातील चप्पल निसटणे.

४) तळहातात बधिरपणा येणे. क्‍लिष्ट कामे करणे अवघड जाणे. (उदा. बोटांनी बटण लावणे, पॅंटचे बक्कल काढणे, नाडी बांधणे, ब्लाऊजचे हूक काढणे अथवा लावणे, हातात भरलेला चहाचा कप धरणे, पोळी-भाकरी एका हाताने तोडणे इ. क्रिया करणे अवघड व अशक्‍य होत जाते.) आजार वाढले, तरी तळहाताची झीज झालेली दिसते. कारण स्नायूंचा आकार आकसायला लागतो. बोटे वाकडी होऊ लागतात.

५) आजार वाढले तर पायात कडकपणा येतो. पाय गुडघ्यात वाकले जातात, चालणे अशक्‍य होते. अंथरूण धरण्याची पाळी येते. हाताने काम करणे अशक्‍य होते व मनुष्य परावलंबी होतो.

६) आजार आणखी वाढल्यास लघवीवरचा व नंतर संडासवरचा "कंट्रोल' जातो. लघवी नकळत व्हायला लागते.

नसेवरचा दाब ः
कधी कधी मानेतील मणक्‍यातून बाहेर पडणाऱ्या नसेवर दाब येतो. यात एका बाजूलाच लक्षणे दिसतात.

१) एका बाजूची मान, खांदा दुखणे.

२) खांद्यापासून कळ अथवा मुंग्या सुरू होऊन दंडात व हातात पसरतात. ही कळ असह्य असते. हात डोक्‍यावर ठेवल्यास ही कळ कधी कधी कमी होते.

३) दंड, हात किंवा तळहातातील स्नायूंची शक्ती कमी होणे. कधी कधी कळा न येतासुद्धा फक्त शक्ती कमी होऊ शकते. याला "वेदनारहित' नसेवरचा दाब म्हणतात.

दोन मणक्‍यांच्या मधून बाहेर पडणारी नस एका गोलाकार बोगद्यातून बाहेर येते. "स्पॉंडिलायसिस'चे वाढलेले हाड जर या बोगद्यात घुसले तर नसेवर दाब येतो व हातात कळा, मुंग्या, कमजोरी इत्यादी लक्षणे दिसतात. मज्जारज्जू व नस दोन्हींवरचा दाब यात वर दिलेल्या दोन्ही गटांतील लक्षणे दिसतात.

मानेच्या स्पॉंडिलायसिसवर उपाय काय?
जर हा स्पॉंडिलायसिस फक्त झीज होण्यापुरताच मर्यादित असेल (म्हणजेच मज्जारज्जू व नसेवर दाब आल्याची लक्षणे नसतील) तर वेळीच योग्य व्यायामाने उपयोग होऊ शकतो.

मानेच्या व्यायामाविषयी अनेक गैरसमज आहेत. वास्तविक योग्य मार्गदर्शनाखाली हे व्यायाम करावेत.

१) मान खाली-वर वाकवणे, गोल फिरविणे वगैरे मानेची लवचिकता वाढवणारे व्यायाम आहेत. हे व्यायाम थोड्या प्रमाणात पूरक म्हणून ठीक आहेत.

२) मानेच्या स्नायूंची शक्ती, आकार व घट्टपणा वाढवण्याचे व्यायाम अत्यंत महत्त्वाचे आहेत. याला बंधन नाही. मात्र जिममध्ये जाऊन मार्गदर्शनाखाली व्यायाम करण्याची तयारी हवी. मानेच्या स्नायूंची शक्ती व घट्टपणा वाढल्यास मणक्‍यावरचा भार कमी होतो व स्पॉंडिलायसिस प्रक्रिया कमी होते. मान खूप अवघडली असल्यास व वेदना होत असल्यास व्यायाम तात्पुरता टाळावा. अशावेळी कॉलर घालून मानेच्या हालचालींना विश्रांती द्यावी, वेदनाशामक गोळ्या घ्याव्यात व दगदग टाळावी. दुखणे कमी झाल्यावरच व्यायामाला सुरवात करावी.

स्पॉंडिलायसिसने जर उग्र स्वरूप धारण केले असेल, म्हणजेच नसांवर किंवा मज्जारज्जूवर दाब आल्याची लक्षणे सुरू झाली असतील, तर मात्र ही गोष्ट गांभीर्याने घेण्याची गरज आहे. यात योग्य तपासण्या व उपचार करावे लागतात.
मज्जारज्जूवर दाब आल्याची लक्षणे असल्यास बहुतांश वेळा शस्त्रक्रियेची गरज भासते. ही शस्त्रक्रिया मणक्‍यापुढील भागातून किंवा मागच्या भागातून करता येते. मज्जारज्जूच्या दाबाला नेमकी पुढून शस्त्रक्रिया करावी, की मागून हे तज्ज्ञ डॉक्‍टरच ठरवू शकतात.

प्रत्येक रुग्णाचा स्कॅन बघून हा निर्णय घेण्यात येतो. या आजारात शस्त्रक्रिया जितकी लांबवली जाईल, तितका धोका वाढतो. याचे वेळ जाईल तसे लक्षणे सुधारण्याची शक्‍यता कमी होत जाते. उदा. एका रुग्णाच्या आजाराच्या स्ट्रोजेस आपण पाहू या.

अ) लक्षणांना सुरवात- सहा महिन्यांपासून- चालताना तोल जाणे, हातातून वस्तू निसटून खाली पडणे.
ब) लक्षणांत वाढ आधार घेऊन चालायला लागणे. हातातील कमजोरीत वाढ.
क) चालताना खूपच आधार लागणे. हाताची बोटे वाकडी होणे.
ड) अंथरुणाला खिळणे.

यापैकी "अ' किंवा "ब' स्थितीत शस्त्रक्रिया केल्यास फायदा लवकर व पूर्णपणे होतो. त्यातही "अ' स्थितीत शस्त्रक्रिया करणे श्रेयस्कर. एक लक्षात घेणे आवश्‍यक आहे, की "अ' ही आजाराची प्राथमिक स्थिती नाही आहे. कारण दाब येऊ लागल्यावर बरेच दिवस मज्जारज्जू तो दाब सहन करतो. मज्जारज्जूची सहनशीलता संपल्यानंतर लक्षणांना सुरवात होते.

स्पॉंडिलायसिस फक्त नसेवर येत असल्यास मात्र बऱ्याचवेळा औषध, विश्रांती व कॉलर वापरून दुखणे पूर्णपणे जाऊ शकते. क्वचित प्रसंगी हातातील कळा औषधोपचाराला दाह देत नसतील, तरच शस्त्रक्रियेची गरज असते.

स्पॉंडिलायसिसमध्ये तपासण्या कोणत्या करतात?
आपल्याला माहीतच आहे, की "एक्‍स-रे'वर मुख्यत्वे करून हाडे दिसतात. मणक्‍याची हाडे व वाढलेली हाडे एक्‍स-रेमध्ये दिसतात तसेच स्पॉंडिलायसिसची प्रक्रिया खूपच वाढली असल्यास मणके एकमेकांवर घसरू शकतात. या गोष्टी एक्‍स-रेमध्ये दिसतात. परंतु, महत्त्वाचा भाग म्हणजेच मज्जारज्जू व नसा मात्र एक्‍स-रेमध्ये दिसत नाहीत.
त्यामुळे एम.आर.आय.ची तपासणी अत्यंत महत्त्वाची ठरते. मज्जारज्जू अथवा नसेवर दाब असल्याची लक्षणे असल्यास डॉक्‍टर एमआयआर करायला सांगतात. एक्‍स-रे केला म्हणजे तपासण्या झाल्या, असा गैरसमज अनेक रुग्णांमध्ये दिसतो. एक्‍स-रे ही अत्यंत प्राथमिक चाचणी आहे. किंबहुना, कधी कधी एक्‍स-रे नॉर्मल असला, तरीसुद्धा मज्जारज्जूवर गंभीर दाब असू शकतो.

- डॉ. जयदेव पंचवाघ, चेताशल्यविशाद, पुणे

No comments:

Post a Comment

ad