Friday, November 21, 2008

स्मृतिवर्धन कसे कराल?

स्मृतिवर्धन कसे कराल?


(डॉ. श्री बालाजी तांबे)
वयाच्या पाचव्या वर्षापर्यंतचा काळ स्मृतिसंपन्नतेसाठी खूप महत्त्वाचा असतो. या कालावधीत मुलांची स्मरणशक्ती वाढविता यावी यासाठी काय प्रयत्न करता येतील याचे सविस्तर मार्गदर्शन आयुर्वेदाने केलेले आहे. जन्मापूर्वी गर्भसंस्कारांच्या माध्यमातून आणि मोठेपणी पंचकर्मादी उपचारांद्वारे शरीराची आणि ध्यानधारणेद्वारे मनाची शुद्धी राखण्यानेही मनाच्या, मेंदूच्या क्षमता वाढविता येतात, स्मृतिवर्धन करता येते. ........
आयुर्वेदात बुद्घी, स्मृती, मेधा, धृती असे प्रज्ञेचे चार प्रकार सांगितलेले आहेत. सारासार विचार करून योग्य निर्णय देणारी ती बुद्धी, स्मृती म्हणजे स्मरणशक्‍ती, मेधा म्हणजे एखादा विषय समजून घेणारी व आकलन करवणारी शक्‍ती, तर धृती म्हणजे संयमशक्‍ती. संपूर्ण शारीरिक, मानसिक आरोग्यासाठी प्रज्ञेचे हे चारही भेद संपन्न असावे लागतात. आयुर्वेदिक जीवनशैली अंगीकारल्यास प्रज्ञासंपन्नता साध्य होऊ शकते. या चार प्रज्ञाप्रकारांपैकी आज आपण स्मृती म्हणजे स्मरणशक्‍तीची माहिती घेणार आहोत.

गर्भ तयार होताना असंख्य मनोभाव एकत्र येत असतात. बालकाचा स्वभाव, त्याची बुद्धिमत्ता वगैरे तो मोठा झाल्यावर प्रगट होत असले तरी त्याची जडणघडण या मनोभावांच्या योगे गर्भावस्थेतच झालेली असते. आयुर्वेदात हे भाव सहा मुख्य घटकांकडून येतात असे सांगितले आहे. उदा. मांस, रक्‍त, हृदय, आतडी वगैरे शरीरातील सर्व मृदू भाव मातेकडून मिळत असतात तर केस, नखे, दात वगैरे कठीण शरीरभाव पित्याकडून येत असतात. आत्म्याकडून, रसधातूमुळे म्हणजे गर्भावस्थेत मिळणाऱ्या पोषणामुळे, मनाकडून व सवयीनुसार येणाऱ्या निरनिराळ्या भावांच्या संयोगातून गर्भाची उत्पत्ती होते.

यातील आत्मज भावांमध्ये स्मृतीचा अंतर्भाव केलेला आहे, तसेच मनापासून मिळणाऱ्या भावांमध्येही स्मृतीचा अंतर्भाव केला आहे. यावरून एक गोष्ट लक्षात येते की स्मृती काही प्रमाणात जन्मजात असते तर काही प्रमाणात मनाशी संबंधित असते. मन जेवढे शुद्ध व संपन्न राहील तेवढी स्मृती चांगली राहू शकते. स्मृती म्हणजे पूर्वी पाहिलेले अनुभवलेले वा ऐकलेले लक्षात राहणे. बऱ्याचदा असे वाटू शकते की स्मरणशक्‍ती ही फक्‍त अभ्यासासाठी, परीक्षेत चांगले गुण मिळवून उत्तीर्ण होण्यासाठी आवश्‍यक आहे. पण दैनंदिन जीवन जगण्यासाठी स्मृती खूप महत्त्वाची असते, प्रज्ञापराध न होता, म्हणजेच अनैसर्गिक गोष्टी हातून न घडता, आरोग्य टिकून राहण्यासाठी स्मृती अत्यावश्‍यक असते आणि त्याच्याही पलीकडे सृष्टीतील सर्व तत्त्वांचे यथार्थ स्वरूप काय आहे याचे स्मरण करून देणारी तत्त्वस्मृती आत्मज्ञान होण्यासाठी गरजेची असते. थोडक्‍यात स्मृतीसंपन्नतेसाठी सर्वांनीच जागरूक राहायला हवे, आवश्‍यक ते प्रयत्न करायला हवेत.

स्मृतीमध्ये विकृती आली की स्मृतिभ्रंश, अपस्मार, अतत्त्वाभिनिवेश (स्मृतिविभ्रम) वगैरे मानसरोग उत्पन्न होतात असेही आयुर्वेद सांगतो. स्मृतीमध्ये बिघाड होऊ शकतो हे जसे आयुर्वेदाला मान्य आहे तसेच स्मृती संपन्न करण्याचे उपायही आयुर्वेदाने सांगितलेले आहेत.

गर्भोत्पत्ती होताना मनाचा सहभाग महत्त्वाचा असतो.
तत्र पूर्वं चेतनाधातुः सत्त्वकरणो गुणग्रहणाय प्रवर्तते ।
... चरक शारीरस्थान

आत्म्याच्याही अगोदर मनाच्या माध्यमातून गर्भाचे गुण तयार होण्यास सुरुवात होते आणि गर्भाचे मन माता-पित्याच्या, विशेषतः मातेच्या मनाशी संबंधित असते. अर्थातच मनाचा एक भावस्वरूप असणारी स्मृती संपन्न व्हावी असे वाटत असले तर गर्भावस्था हा सर्वोत्तम काळ समजायला हवा.

गर्भवतीने मनाच्या प्रसन्नतेसाठी, मनाच्या संपन्नतेसाठी केलेले सर्व उपाय गर्भाची स्मृती संपन्न होण्यासाठी उपयोगी पडतात. म्हणून गर्भसंस्कार महत्त्वाचा होय (सविस्तर माहिती "सकाळ' प्रकाशित "आयुर्वेदीय गर्भसंस्कार' या पुस्तकात).

स्मृती वाढविण्याच्या दृष्टीने गर्भवती स्त्रीला काळजी घेता येईल असे मुद्दे -
- मनापर्यंत पोचून मनावर संस्कार करू शकणारे संगीत, मंत्र ऐकणे.
- सात्त्विक आहाराचे सेवन करणे.
- सात्त्विक औषधे म्हणजे ज्यांच्यात कोणतीही रासायनिक द्रव्ये वापरलेली नाहीत, ज्यांच्यामुळे शरीरावर कोणत्याही प्रकारचा दुष्परिणाम होत नाही अशी नैसर्गिक घटकद्रव्यांपासून बनविलेली औषधे सेवन करणे. उदा. पुरेसे लोहत्तत्व मिळविण्यासाठी "संतुलन रुधिरा', कॅल्शियमची पूर्ती होण्यासाठी "कॅल्सिसॅन', "सॅन रोझ (शांती रोझ)' वगैरे.
- मन, मेंदू व शरीर या तिघांचीही जीवनशक्‍ती वाढविणारी अमृशतकरायुक्‍त पंचामृत, "सॅन रोझ (शांती रोझ)', धात्री रसायन वगैरे रसायने सेवन करणे.
- नियमितपणे ॐकार गूंजन, ध्यान करणे.
- मनावर संस्कार करू शकेल असे वाचन करणे.
- जन्मानंतरची पहिली पाच वर्षे सुद्धा स्मृतिसंपन्नतेच्या दृष्टीने खूप महत्त्वाची असतात. त्यादृष्टीने खालील उपाय सांगता येतात.
- पहिले सहा महिने सुवर्णप्राशन म्हणजे एक-दोन थेंब मधासह २४ कॅरट शुद्ध सोने उगाळून बाळाला चाटविण्याचा संस्कार स्मृतिवर्धनासाठी उत्कृष्ट असतो.
- केशर, सुवर्णवर्ख, वेखंड वगैरे बुद्धी-स्मृतिवर्धक द्रव्ये बालकाला नियमित देणेही उत्तम असते. त्या दृष्टीने "संतुलन बालामृता'सारखे रसायन मधासह चाटवता येते. यामुळे बालकाचा एकंदर विकासही उत्तम होऊ शकतो. रोगप्रतिकारशक्‍ती वाढल्याने सर्दी खोकला, ताप यासारख्या त्रासांना प्रतिबंध होऊ शकतो.
- लहान मुले शारीरिक दृष्ट्या अतिशय संवेदनशील असतात. खाण्या-पिण्यातून, औषधांतून त्यांच्या शरीरात रासायनिक द्रव्ये जाणार नाहीत याची काळजी घ्यावी लागते. कारण अशा द्रव्यांचे मेंदूवर व मनावर अनिष्ट परिणाम होऊन त्याचे पर्यवसान बुद्धी- स्मृतीमांद्यामध्ये होऊ शकते.
- लहान वयात शरीर व मन अतिशय संस्कारक्षम असतात. शिवाय त्यांचा विकासही अतिशय जोमाने होत असतो. या संस्कारक्षमतेचा पुरेपूर फायदा करून घेण्यासाठी लहान मुलांना च्यवनप्राश, धात्री रसायन, ब्राह्मी घृत, "संतुलन ब्रह्मलीन सिरप', "संतुलन ब्रह्मलीन घृत'वगैरे रसायने देता येतात. यामुळे स्मृती संपन्न होऊ शकते.

मोठ्या वयात शरीर जेवढे शुद्ध ठेवता येईल, मनातील रज-तमदोष आटोक्‍यात ठेवता येतील तेवढी स्मृती चांगली राहण्यास मदत मिळते. यासाठी वयाच्या पस्तिशी-चाळिशीच्या सुमाराला पंचकर्म करून घेणे, पंधरा दिवसातून एकदा घरच्या घरी एरंडेल तेल व योगसारक चूर्णाच्या साहाय्याने पोट साफ करणे, वेळोवेळी जंतांचे औषध घेणे, हलका व प्रकृतीनुरूप आहार घेणे, अनैसर्गिक रंग, प्रिझर्वेटिव्हज्‌ व इतर रासायनिक द्रव्ये टाकून तयार केलेले खाद्य-पेय पदार्थ टाळणे वगैरे उपाय करता येतात. यामुळे शरीरही निरोगी राहते, बुद्धी-स्मृती संपन्न राहतात.

शरीरामध्ये प्राणशक्‍तीचे अभिसरण जेवढे चांगले होईल तेवढी स्मरणशक्‍ती चांगली राहायला मदत मिळते. त्यासाठी अनुलोम-विलोम, प्राणायाम, ॐकार गूंजन, भस्रिका, दीर्घश्‍वसन वगैरे उत्तम होत. योगासने, विशेषतः शवासन, शीर्षासन, योगनिद्रा हेही स्मृतीसाठी उत्तम असतात.

एकंदर जीवनशक्‍ती वाढावी, रोगप्रतिकारशक्‍ती चांगली राहावी व निरोगी दीर्घायुष्याचा लाभ घेता यावा यासाठी आयुर्वेदात अनेक रसायने सांगितली आहेत. बहुतेक सर्व रसायने शरीरासाठी हितकारक असतात, तसेच बुद्धी-स्मृतिवर्धकही असतात. म्हणूनच च्यवनप्राश, "संतुलन सूर्यप्राश', "संतुलन आत्मप्राश', "संतुलन ब्रह्मलीन घृत', धात्री रसायन यासारखी रसायने नियमित सेवन केल्यास स्मरणशक्‍ती चांगली राहू शकते. रसायनांच्या अध्यायात आयुर्वेदाने चार मेध्य रसायनांचाही अंतर्भाव केलेला आहे,

मण्डुकपर्ण्याः स्वरसः क्षीरेण यष्टीमधुकस्य चूर्णम्‌ ।
रसो गुडुच्यास्तु समूलपुष्प्याः कल्कः प्रयोज्यः खलु शंखपुष्प्याः ।
मेध्यानि चैतानि रसायनानि मेध्या विशेषेण च शंखपुष्पी ।।

१. मण्डुकपर्णीचा रस घेणे.
२. ज्येष्ठमधाचे चूर्ण दुधात घालून घेणे.
३ गुळवेलीचा रस घेणे.
४. मूळ व फळासहित शंखपुष्पीचा कल्क सेवन करणे.

याने रसायनाचे सर्व फायदे मिळतात शिवाय आकलनशक्‍ती व स्मरणशक्‍ती वाढतात. थोडक्‍यात, सुरुवातीपासून गर्भसंस्कार केले, लहान वयात बुद्धि-स्मृतिवर्धक रसायने सेवन केली व मोठ्या वयात शरीरशुद्धी, योग्य आहार, योगासने वगैरे उपायांनी स्मृती टिकविण्यासाठी प्रयत्न केले तर निरामय संपन्न आयुष्याचा आनंद प्रत्येकाला घेता येऊ शकेल.

--------------------------------------------------------
आयुर्वेदाच्या मान्यतेनुसार
१ बुद्घी, स्मृती, मेधा, धृती असे प्रज्ञेचे चार प्रकार.
२ आत्मज तसेच मनापासून मिळणाऱ्या भावांमध्ये स्मृतीचा अंतर्भाव.
३मन जेवढे शुद्ध व संपन्न तेवढी स्मृती चांगली राहू शकते.
--------------------------------------------------------

- डॉ. श्री बालाजी तांबे

1 comment:

  1. mala vachlele kahi athvat nahi kinva shikavlele kahi athavat nahi tar hyavar kahi ayurvedik kinva gharguti upay sngu shakta ka ?
    Maza e mail id-- rajateli5@gmail.com

    ReplyDelete

ad