Friday, November 21, 2008

विसरू नका स्मृतीचे महत्त्व!

विसरू नका स्मृतीचे महत्त्व!


(डॉ. श्री बालाजी तांबे)
ज्यांना उत्तम स्मृती हवी आहे, त्यांना श्रुती वाढविणे आवश्‍यक असते. त्यासाठी लक्षपूर्वक ऐकणे आणि मला अजून बरेच काही कळलेले नाही, ते जाणून घेता येऊ शकेल हे समजणे आवश्‍यक असते. एखाद्याने चूक दाखविली तरी त्यामुळे माझे कल्याणच होणार आहे, ही संकल्पना मनात असली तर कुठलीही गोष्ट ऐकता येऊ शकते. लक्षात राहू शकते. .......
भारतीय प्रार्थनापद्धतीत "श्रुति-स्मृति-पुराणोक्‍तफलप्राप्त्यर्थं' असा संकल्प आढळतो. जे कानावर पडले आहे ते ऐकणे म्हणजे "श्रुती'. कानावर पडलेले सर्वच लक्षात राहाते असे नाही. अनेकांनी बहुतेक वेळा लक्ष देऊन ऐकलेलेच नसते. मनुष्याच्या स्वभावाप्रमाणे तो स्वतःला सोयीचे, स्तुतिपर व स्वतःच्या फायद्याचे तेवढे ऐकतो. त्यामुळे इतर गोष्टी ऐकू येत नाहीत. आवाज कानावर पडतो, शब्दही कानावर पडतात, अर्थ कळला असे वाटते, ऐकल्यासारखे वाटते पण ऐकलेले नसते असा अनुभव पुष्कळ वेळा येतो.

याचाच अर्थ काय तर ऐकणे ही कृती नुसत्या कानावर अवलंबून नाही. मनुष्य बहिरा नाही म्हणजे तो ऐकतोच असे नव्हे. अवधानाने लक्ष देऊन जाणीवपूर्वक ऐकलेले ते श्रुती व असे ऐकलेले पुन्हा पुन्हा ऐकता येते. किंबहुना असे ऐकलेले स्मृतीमध्ये परिवर्तित होते. संगणकाच्या भाषेत बोलायचे झाले तर जे हार्ड डिस्क वर सेव्ह झालेले असते ती स्मृती व अशी स्मृती कधीही नष्ट होत नाही.

आवाज जरी अवकाशात कायम राहात असला तरी तो श्रुती, स्मृती या संकल्पनेत गेलेला नसल्याने गोंगाटाच्या स्वरूपात शिल्लक राहतो. त्या सगळ्याचा मिळून फार तर ॐकार नादाप्रमाणे ऐकू येऊ शकेल पण त्यातल्या वेगवेगळ्या संकल्पना ओळखण्यासाठी खूप तपश्‍चर्येची आवश्‍यकता असते. पण नाद श्रुती-स्मृतीत साठवला गेला तर तो सर्व काळी, सगळ्या वेळी उपलब्ध होऊ शकतो व नंतर त्याच्यावर अवलंबून फलश्रुती तयार होते.

यात पुराणोक्‍त शब्द यासाठी जोडला की विचारांना भौतिकतेत परिवर्तित केल्याशिवाय फळ मिळाल्याचे समाधान होत नाही. या त्रिमितीच्या जगतात शरीररूपाने जगत असताना पंचेंद्रियगोचर वस्तू प्राप्त झाल्यावरच काहीतरी मिळाल्याची जाणीव होते. वाढदिवसाच्या शुभेच्छा मनात असल्या तरी त्या पोचविण्यासाठी गुलाबाच्या फुलाची तरी गरज असतेच किंवा एखादी शरीरमुद्रा वा आलिंगनादी क्रिया असा स्पर्शभेट झाल्यानंतरच काही तरी उपलब्धी झाली असे वाटते.

सिद्धांतांना पंचमहाभूतांच्या भौतिक मर्यादेत आणून जगताच्या व्यवहारात समजतील अशा रीतीने कथा सांगणे म्हणजे "पुराण'. श्रुति-स्मृतीत असलेल्या संकल्पना भौतिकात प्राप्त होण्यासाठी प्रार्थना केलेल्या असतात व त्यात श्रुति-स्मृति- पुराणोक्‍तफलप्राप्त्यर्थं असा संकल्प अंतर्भूत केलेला असतो. त्यावरून एक गोष्ट लक्षात येते की ज्यांना उत्तम स्मृती हवी आहे त्यांना श्रुती वाढविण्याचा प्रयत्न करणे आवश्‍यक असते. श्रुती वाढविण्यासाठी दोन मार्ग आहेत. एक म्हणजे लक्षपूर्वक ऐकणे, ज्यासाठी माणसाला माझ्याहून कुणीतरी मोठा असू शकतो व परमेश्‍वर सर्वात मोठा आहे, मला अजून बरेच काही कळलेले नाही व ते जाणून घेता येऊ शकेल हे समजणे आवश्‍यक आहे. एखाद्याने चूक दाखविली तरी त्यामुळे माझे कल्याणच होणार आहे ही संकल्पना मनात असली तर कुठलीही गोष्ट ऐकता येऊ शकते.

विषयांचे सुख द्वाड, येथे बहु गोड
पुढे आहे अवघड, यमयातना

असे तुकाराम महाराजांनी सांगून ठेवले आहे. विषयांचे सुख गोड वाटले तरी ते क्षणिक असते म्हणून त्यात निदान अति काळापर्यंत तरी अडकू राहू नये असा बोध घेण्यासारखा आहे. एखाद्या कल्पनेला फार लांब काळापर्यंत चिकटून राहण्याच्या सवयीमुळे वर्तमान काळात जगता येत नाही म्हणजेच पुढची संकल्पना ऐकू येत नाही, समजून घेता येत नाही. तसेच ज्या अर्थी मनुष्याला दोन कान व एक तोंड मिळालेले आहे त्या अर्थी त्याने बोलण्यापेक्षा दुप्पट ऐकावे असे अभिप्रेत धरले तर ऐकण्यासाठीही आपण वेळ द्यायला हवा हे सत्य आपल्याला समजून येईल.

अशा तऱ्हेने ऐकण्याची तयारी झाल्यानंतर इंद्रियांना सवय लावण्यासाठी उघड्या डोळ्याने परमेश्‍वराचे एकाग्र ध्यान करणे किंवा डोळे बंद करून एकाग्रतेने अंतर्मुख होण्याचा प्रयत्न करणे, या गोष्टींची आवश्‍यकता भासेल. श्रुती वाढविण्यासाठी कानाचे आरोग्य सांभाळणे खूप गरजेचे असते. ऐकणे व बोलणे हे एकाच दरवाजातून आत बाहेर जाणाऱ्या दोन गोष्टी आहेत. तेव्हा तोंडाने किती बोलायचे व त्यावर किती ताण द्यायचा हे ठरवून मौनाची उपासना आचरल्यास श्रुती वाढविण्यासाठी उपयोग होतो. कानात "संतुलन श्रुती तेला'सारखे एखादे तेल टाकल्यास किंवा वेळच्या वेळी कान साफ करून घेतल्यास कानात जमणारा मळ निघून जाऊन कान साफ होतो तसेच अधून मधून कोणीतरी कान उघाडणी केल्यासही कान साफ होतो. झोपताना डोक्‍यावर एखादे तेल लावले, एरंडेल तेल टाळूवर लावून झोपले किंवा विशेष तयार केलेल "संतुलन ब्रह्मलीन तेल' टाळूवर चोळून झोपले तर मेंदूच्या आतील आरोग्य चांगले राहून श्रुती व्यवस्थित पोचू शकतात. सतत स्वार्थप्रेरित कल्पना न जोपासता बाहेरच्या जगताची आपल्याला जशी गरज आहे तशी आपलीही बाहेरच्या जगाला गरज आहे हे लक्षात ठेवून, बाहेरच्या जगाला काय देतो आहोत याचा विचार करण्याने सारासार विवेक जागृत होऊन निर्णायक क्षमता जागृत होते ज्यामुळे श्रुतींचे रूपांतर स्मृतीत होते.

नुसतीच घोकंपट्टी करून लक्षात ठेवलेली सूत्रे जशीच्या तशी परीक्षेत उतरवली तर या गोष्टीला एका टेपवरून दुसऱ्या टेपवर किंवा संगणकाच्या एका हार्ड डिस्कवरून दुसऱ्या हार्ड डिस्कवर उतरवण्याइतकेच महत्त्व आहे. जिवंत माणसात व मशीनमध्ये असलेला फरक समजून घेऊन स्मृतीचा उपयोग अनुभव म्हणून केला व त्याचा व्यवहारात प्रचार केला तर बोलणे म्हणजे केवळ बडबड न राहता त्याचा "वेद" होऊ शकतो.

प्रत्येक गोष्ट लक्षात ठेवताना म्हणजेच स्मृतीची शक्‍ती वाढवत असताना ती मशीन म्हणून न वाढवता एक मनुष्य म्हणूून वाढविलेली असली व स्मृतीचा उपयोग केवळ वैयक्‍तिक कारणासाठी नाही तर कौटुंबिक व सर्व मानवजातीच्या कल्याणासाठी करणे आवश्‍यक आहे हे लक्षात ठेवले तर स्मृती वाढविण्याचे तंत्र आपसूकच अवगत होईल.

-----------------------------------------------------
डॉ. श्री बालाजी तांबे यांच्याशी संपर्कासाठी टाईप करा fdoc आणि पाठवा 5432 वर
-----------------------------------------------------

- डॉ. श्री बालाजी तांबे

No comments:

Post a Comment

ad