Monday, June 16, 2008

दात येताना...

दात येताना...


(डॉ. श्री बालाजी तांबे)
दात येण्याची प्रक्रिया अतिशय क्‍लिष्ट असते. त्यात अस्थी व मज्जा या दोन्ही धातूंचा सहभाग असतो. त्यामुळे शारीरिक व मानसिक पातळीवर अनेक बदल होत असतात. म्हणून मूल अस्वस्थ होते. हिरड्या शिवशिवतात. त्यामुळे सतत काहीतरी चावण्याचा त्यांचा प्रयत्न असतो. अशा वेळी त्याच्या तोंडात अस्वच्छ वस्तू जाणार नाही याकडे लक्ष ठेवावे लागते. अन्यथा जंतुसंसर्गामुळे त्रासाची तीव्रता वाढते. दात येणे सोपे जावे यासाठी आयुर्वेदाने अनेक उपायही सांगितले आहेत. ........
कौमारभृत्यतंत्र हे आयुर्वेदाच्या अष्टांगातील एक महत्त्वाचे अंग. यात गर्भधारणा होण्याच्या आधीपासून ते गर्भवतीच्या आहार-आचरणापर्यंत, बालकाच्या जन्मापासून ते संगोपनापर्यंत सर्व विषयांचा उहापोह आहे. कौमारभृत्य विषयावरचा सध्या उपलब्ध असणारा आर्ष ग्रंथ म्हणजे "काश्‍यपसंहिता'. यात "दन्तजन्मिक' नावाचा एक अध्याय आहे या अध्यायाच्या सुरुवातीला सांगितलेले आहे,

इह खलु नृणां द्वात्रिंशत्‌ दन्ताः, तत्राष्टौ सकृज्जाताः स्वरुढदन्ता भवन्ति, अतः शेषा द्विजाः ।।
...काश्‍य सूत्रस्थान

मनुष्याला एकूण ३२ दात असतात. त्यातील आठ दात "सकृतजात' म्हणजे फक्‍त एकदाच उत्पन्न होतात तर उरलेले २४ दात "द्विज' म्हणजे एकदा पडून पुन्हा येणारे असतात. व्यवहारात यांनाच आपण "दुधाचे दात' म्हणतो. दुधाचे दात येण्याच्या प्रक्रियेला आयुर्वेदात "दन्तोद्‌भेदन' असे नाव दिलेले आहे. सर्वसाधारणपणे बालक पाच-सहा महिन्यांचे झाले की दात यायला सुरुवात होते. आयुर्वेदिक विचारसरणीनुसार, बालकाची पचनसंस्था विकसित होत असल्याचे हे लक्षण आहे. म्हणूनच दात येईपर्यंत बालकांसाठी स्तन्यपान हा सर्वोत्तम आहार असतो आणि पाचव्या-सहाव्या महिन्यात दात यायला लागले की "अन्नप्राशनसंस्कार' करून इतर अन्न सुरू करायचे असते.

हिरड्यांमध्ये दातांचे मूळ रोवण्याची क्रिया गर्भावस्थेतच होत असते. याला "दन्त- निषेक' म्हणतात. जन्मानंतर हिरड्यांच्या आत दात तयार होण्याच्या क्रियेला दात "मूर्तित्वाला येणे' म्हणतात. तर, हिरड्यांमधून दात बाहेर पडण्याच्या, दात दिसू लागण्याच्या प्रक्रियेला दातांचे "उद्भेदन होणे' असे म्हणतात. या सर्व क्रिया तसेच दात वाढणे, दुधाचे दात पडणे, पक्के दात येणे, दात मजबूत राहणे, हलणे, खराब होणे या सर्व गोष्टी आनुवंशिक, म्हणजेच गुणसूत्र, जनुकांच्या आधाराने ठरणाऱ्या, असतात असेही आयुर्वेदात सांगितलेले आहे.

तत्रास्थिमज्जानौ दन्तोत्पत्तिहेतु ।
... अष्टांगसंग्रह उत्तरस्थान

दात येण्यास अस्थी व मज्जा हे दोन धातू कारणीभूत असतात. लहान बालकांमध्ये धातूंचा क्रमाक्रमाने विकास होत असतो, वयाच्या सहाव्या-सातव्या महिन्यात दुधाचे दात आले तरी एवढ्या कमी वयात अस्थी, मज्जाधातू पूर्णपणे सशक्‍त झालेले नसल्याने ते दात लवकरच पडतात व त्यानंतर आलेले पक्के दात दीर्घकाळ टिकतात.

दुधाचे दात येण्याबाबत व पडण्याबाबत अजून एक गोष्ट काश्‍यपसंहितेत सांगितलेली आहे, ती म्हणजे,

यावत्स्वेव च मासेषु जातस्य सत्‌ उद्भिद्यन्ते तावत्स्वेव च वर्षेषु पतिताः पुनरुद्भिद्यन्ते ।।

ज्या महिन्यात बालकाला दात येतात, तितक्‍याच वर्षांनी ते पडून पुन्हा नवे दात येतात. म्हणजे बाळ सहा महिन्यांचे असताना त्याला दात यायला सुरुवात झाली तर ते पडायला सुरुवात सहाव्या वर्षी होते.

फार लवकर म्हणजे चवथ्या महिन्यात किंवा त्याहून लवकर दात येणे बालकाच्या तब्येतीच्या, सशक्‍ततेतच्या दृष्टीने चांगले नसते. आठव्या महिन्यात दात येणारे बालक दीर्घायुषी असते, असे आचार्य काश्‍यप सांगतात. दात हा अस्थीधातूचा उपधातू असल्याने आणि दात येण्यास अस्थी व मज्जा हे दोन्ही धातू जबाबदार असल्याने ही प्रक्रिया अतिशय क्‍लिष्ट असते. यामुळे बालकात शारीरिक व मानसिक पातळीवर अनेक बदल होत असतात. म्हणूनच दात येताना मूल अस्वस्थ होणे स्वाभाविक असते.

अगदी सरसकट सगळ्या मुलांना दात येताना त्रास होतोच असे नाही. विशेषतः गर्भावस्थेपासून ज्यांच्या अस्थी व मज्जाधातूचे यथायोग्य पोषण झाले आहे, जन्मानंतर ज्यांना पुरेशा प्रमाणात व शतावरी, प्रवाळ वगैरे धातुपोषक द्रव्यांनी पोसलेले स्तन्यपान मिळालेले आहे, त्यांना दात येणे हलके जाते असा अनुभव आहे. तरीही दात येण्याचा काळ बालकांच्या आरोग्याच्या दृष्टीने संवेदनशील, नाजूक असतो.

दात येताना काय त्रास होऊ शकतात हे आयुर्वेदात याप्रकारे सांगितलेले आहे,

दन्तोद्भेदश्‍च सर्वरोगायतनम्‌ । विशेषेण तु तन्मूला ज्वराशिरोभितापस्तृष्णा - भ्रमाभिष्यन्द - कुकूणकपोत्थकीवमथु - कास - श्‍वास - अतिसार - विसर्पाः ।।
... अष्टांगसंग्रह

दात येणे हे अनेक विकारांना कारणीभूत ठरू शकते, विशेषतः ताप, डोके दुखणे, खूप तहान लागणे, चक्कर येणे, डोळे येणे, उलटी होणे, खोकला, दमा, जुलाब, विसर्प - त्वचाविकार वगैरे त्रास होऊ शकतात.

मुलांच्या प्रकृतीनुसार, धातूंच्या शक्‍तीनुसार हे त्रास कमी-अधिक प्रमाणात होत असतात, त्यातही मुलीपेक्षा मुलाला दात येणे अधिक त्रासदायक ठरते कारण मुलीच्या हिरड्या व दात तुलनेने मऊ व नाजूक असतात.

दात येताना शिवशिवतात त्यामुळे मूल सतत काहीतरी चावायला बघते. अशा वेळी त्याच्या तोंडात अस्वच्छ वस्तू जाणार नाही याकडे लक्ष ठेवावे लागते अन्यथा जंतुसंसर्ग होऊन त्रासाची तीव्रता वाढू शकते. शक्‍यतो चावण्यासाठी मुलांच्या हातात गाजर, ज्येष्ठमधाची काडी किंवा खारीक द्यावी.

दात येणे सोपे जावे यासाठी आयुर्वेदाने अनेक उपायही सांगितले आहेत.
दन्तपालो तु मधुना चूर्णेन प्रतिसारयेत्‌ ।
धातकीपुष्प-पिप्पल्योर्धात्रीफलरसेन वा ।।
... योगरत्नाकर

धायटीची फुले व पिंपळी यांचे चूर्ण हिरड्यांवर चोळल्याने किंवा आवळ्याच्या रस हिरड्यांना चोळल्याने दात येणे सोपे जाते.

वेखंड, बृहती, कंटकारी, पाठा, कुटकी, अतिविषा, नागरमोथा व शतावरी वगैरे मधुर द्रव्यांनी सिद्ध केलेले तूप हे ही दात येताना होऊ शकणाऱ्या त्रासावर उत्तम असते. त्रास होऊ नये म्हणून आधीपासूनच या तुपाचा वापर करण्याचाही खूप चांगला उपयोग होतो.

दन्तोद्भेदगदान्तक रस नावाची गोळी पाण्यात उगाळून हिरड्यांवर लेप करण्याने दात सहज व चांगले यायला मदत मिळते.

यासारखे प्रतिबंधात्मक उपाय योजले तर सहसा मुलांना दात सहजतेते येतात, तरीही जुलाब, उलट्या, त्वचेवर रॅश, खोकला, ताप वगैरे त्रास झाले तर त्यासाठी लक्षणानुरूप उपचार करवे सांगतात.

उदा. उलट्या-जुलाब, अपचन झाले असता मुलांना साळीच्या लाह्यांची पेज देणे उत्तम असते, आल्या-लिंबाचा रस व मध यांचे मिश्रण थोडे थोडे चाटविण्याचाही उपयोग होतो. कुडा, अतिविषा, मुरुडशेंग, नागरमोथा ही द्रव्ये उगाळून तयार केलेली गुटी देणेही चांगले. "संतुलन बाल हर्बल सिरप' सारखे सिरप घेण्याचाही अशा स्थितीत उत्कृष्ट परिणाम करू शकते.

ताप आला असता नागरमोथा, काकडशिंगी, अतिविषा यांचे पाव चमचा चूर्ण मधासह चाटवता येते. तसेच प्रवाळपंचामृत, कामदुधा गोळी थोड्या प्रमाणात चाटविण्याचाही उपयोग होतो. गुडूची, शतावरी वगैरे रोगप्रतिकारशक्‍ती वाढविणाऱ्या द्रव्यांपासून तयार केलेली "समसॅन' सारखी गोळी दात येताना देणे उत्तम असते. याने मुलाची ताकद टिकून राहते व रोगप्रतिकारयंत्रणा सक्षम राहिली की दात सहज येणे शक्‍य होते.

सर्दी-खोकला झाल्यास सितोपलादि चूर्ण, गरजेप्रमाणे "श्‍वाससॅन' चूर्ण किंवा "ब्रॉंकोसॅन सिरप' देण्याचा उपयोग होतो. बेहडा, ज्येष्ठमध, अडुळशाची पाने याचा काढा किंवा गवतीचहा, तुळशीची पाने, ज्येष्ठमध यांपासून केलेला "हर्बल टी' देता येतो. बालकपरिचर्येत सांगितल्याप्रमाणे मुलाला सुरुवातीपासूनच "सॅन अंजन'सारखे शुद्ध व नेत्र्य द्रव्यांनी संस्कारित केलेले अंजन लावल्यास सहसा डोळ्यांचे त्रास होत नाहीतच, तरीही डोळे आले, डोळ्यातून पाणी येत असले तर त्रिफळा, लोध्र वगैरे द्रव्यांच्या पाण्याने डोळे पुसून घेता येतात, डोळ्यात "संतुलन सुनयन तेला'सारखे नेत्र्य औषधांनी सिद्ध तेल टाकता येते. अंगावर रॅश वगैरे उठला तर संगजिऱ्याचे चूर्ण, शतधौतघृत लावता येते व बरोबरच "अनंतसॅन', "मंजिष्ठासॅन'सारखी रक्‍तशुद्धीकर औषधे देता येतात. एकंदरच, दात येण्याच्या या कालावधीत बालकाची ताकद कमी होत असल्याने या काळात तेल लावणे, धूप देणे, "संतुलन बालामृता'सारखे रसायन चाटवणे वगैरे गोष्टी अवश्‍य कराव्यात. मूल खेळते ती जागा तसेच मूल ज्या वस्तू खेळणी हाताळते त्या वस्तू स्वच्छ असण्याकडे विशेष लक्ष द्यावे. दात येण्याच्या काळातच मुलाला स्तन्यपानाव्यतिरिक्त इतर आहाराची सुरुवात होत असते. त्यामुळे तो क्रमाक्रमाने द्यावा, एकदम पचनशक्‍तीवर भार येणार नाही याची खबरदारी घ्यावी.

दातांच्या, हिरड्यांच्या आरोग्याच्या दृष्टीने सर्वात महत्त्वाचे म्हणजे अगदी लहानपणापासून मुलाच्या हिरड्या व दात आल्याव दात व हिरड्या नख नीट कापलेल्या बोटाने हळुवारपणे नियमितपणे स्वच्छ कराव्यात जेवणानंतर चूळ भरायची सवयही लवकरात लवकर लावावी.

दात घासण्यासाठी आयुर्वेदाने सांगितलेल्या बकुळ, खैर वगैरे द्रव्यांपासून बनवलेले चूर्ण वा तयार "संतुलन योगंती' चूर्ण वापरणे श्रेयस्कर होय.

लहानपणापासून हिरड्या व दातांची अशी नीट काळजी घेतली, बालकाच्या अस्थी-मज्जा धातूंना गर्भावस्थेपासूनच योग्य पोषण मिळण्याकडे लक्ष दिले, दात येतानाच्या संवेदनशील काळात आहार-औषध-धुरी-अभ्यंग वगैरे उपायांची योजना केली तर निरोगी दातांची साथ आयुष्यभरासाठी निश्‍चितच मिळू शकेल.

-------------------------------------------------------
सकाळ एसएमएस
डॉ. श्री बालाजी तांबे यांच्याशी संपर्क साधायचा असल्यास टाईप करा fdoc आणि पाठवा 54321 वर
-------------------------------------------------------

- डॉ. श्री बालाजी तांबे

No comments:

Post a Comment

ad