शारीरिक आणि मानसिक स्वास्थ्य टिकून राहिले तरच "अर्थार्जनाला' अर्थ राहतो. आयुर्वेद शास्त्राचा आधार घेऊन व्यवसायाच्या स्वरूपानुसार सवयींमध्ये बदल केले तर प्रत्येकालाच "व्यावसायिक स्वास्थ्य' लाभेल. ........
"स्वस्थस्य स्वास्थ्य रक्षणम्' हे आयुर्वेद शास्त्राचे प्रमुख तत्त्व आहे. व्यवसाय कोणताही असला तरी तो करत असताना स्वतःच्या आरोग्यावर विपरीत परिणाम झाला तर व्यवसायात आनंद लाभत नाही. शारीरिक आणि मानसिक स्वास्थ्य टिकून राहिले तरच "अर्थार्जनाला' अर्थ राहतो, अन्यथा समाधान मिळत नाही. हे टाळण्यासाठी आयुर्वेद शास्त्राचा आधार घेऊन आपल्या व्यवसायाच्या स्वरूपानुसार आपल्या दिनचर्येत, आणि सवयींमध्ये बदल केले तर प्रत्येकालाच "व्यावसायिक स्वास्थ्य' लाभून मानसिक आनंदही द्विगुणित होईल.
शिफ्ट ड्यूटी
रात्रपाळी आणि दिवसपाळी अशा दोन प्रकारांचा यात विचार केला जातो.
रात्रपाळीसाठी आहाराच्या दृष्टिकोनातून -
१) रात्रपाळीच्या कामगारांनी दुपारचे जेवण फार उशिरा घेऊ नये. सर्वांत महत्त्वाचे म्हणजे रात्रभराच्या जागरणानंतर सकाळी प्रथम झोप पूर्ण करावी आणि मगच जेवावे. जेवल्यानंतर भरपूर झोप घेणे टाळावे.
२) फार तिखट पदार्थ, आलं, लसूण, हिरवी मिरची यांचा अति वापर, चणे, पावटे, मटकी, हरभरा इ. गॅसेस उत्पन्न करणारे पदार्थ कमीत कमी घ्यावेत.
३) रात्रीचे जागरण करता यावे म्हणून चहा-कॉफीचा अतिरेक टाळावा. उशिरा भूक लागलीच तर एखादे फळ किंवा तूप-खजूर खावा. चहा घेऊ नये.
४) जेवणामध्ये साजूक तूप, लोणी, गोड ताक यांचा समावेश असावा। पाव- ब्रेड कमी प्रमाणात खावा.
विहाराच्या दृष्टिकोनातून -
१) रात्रपाळीमध्ये जागरणाने डोळे लाल होतात. विशेषतः कॉम्प्युटरवर काम असेल तर आणखीनच त्रास होतो. अशा वेळी गुलाबपाण्याच्या पट्ट्या ठेवाव्यात.
२) रोज सकाळी दोन्ही नाकपुड्यांमध्ये साजूक तूप पातळ करून २ थेंब घालावे.
३) अंगाला तेल लावून गरम पाण्यानेच स्नान करावे. त्यामुळे अंग दुखणे, अंग मोडून येणे कमी होते.
४) सिगारेट, विडी, तंबाखू, गुटखा इ. व्यसनांच्या आहारी जाऊ नये.
अशा प्रकारे रात्रपाळीच्या लोकांनी आपल्या आहारविहारात बदल केल्यास रात्रपाळी सुखकर ठरू शकते.
दिवसपाळीच्या आहाराच्या दृष्टिकोनातून -
१) सकाळी लवकर बाहेर पडताना भूक नसेल तर खाऊ नये, बरोबर जेवणाचा डबा घेऊन जावा. फार चमचमीत, तिखट पदार्थ नेऊ नयेत. खूप जण रोज डब्यात "दही-भात' घेऊन जातात. रोजचा दहीभात पित्त वाढवणारा ठरू शकतो. एखाद्या दिवशी दही-भात नेण्यास हरकत नाही.
२) कंपनीमध्ये जेवण असल्यास आंबट ताक, पापड, रायते, आंबट दही, लोणचे रोज खाणे टाळावे.
३) वातानुकूलित (ए.सी.) वातावरण असल्यास फूल शर्ट, स्वेटर, हाफ स्वेटर घालण्याची सवय ठेवावी. सतत गारवा सर्दी, खोकला उत्पन्न करू शकतो. एखाद्या व्यक्तीस वारंवार सर्दीचा त्रास असल्यास थर्मासमधे गरम पाणी घेऊन जावे आणि तहान लागली की शक्यतो गरम पाणी प्यावे.
४) दिवसपाळीच्या लोकांनी घरी जाण्यास उशीर झाला तर जिभेचे चोचले पुरवणारे पदार्थ टाळून भुकेच्या पोटी जेवणच जेवावे.
विहाराच्या दृष्टिकोनातून -
१) रात्रीचे जागरण टाळावे.
२) संध्याकाळी घरी परतल्यानंतर थोडे मोकळ्या हवेत पायी चालून यावे. त्यामुळे उत्साह वाढतो.
३) ऑफिसमधली कामे घरी न आणता अवांतर वाचन करावे. एखादी कला जोपासावी. संगीत ऐकावे. ज्यामुळे मन प्रसन्न राहून दुसऱ्या दिवशी नव्या जोमाने कामास सुरवात करता येते.
अशा प्रकारे "शिफ्ट ड्यूटी'चा व्यवसाय असेल तर आहारविहारात ठराविक बदल केल्यास लहानसहान तक्रारी दूर होतीलच.
४) अति संभाषण (बोलण्याचा व्यवसाय) -
या प्रकारामध्ये वकील, गायक, कीर्तनकार, प्रवचन देणारे, अभिनेता, प्राध्यापक, शिक्षक इत्यादी जणांचा समावेश होतो. या स्वरूपाच्या व्यवसायात "बोलणे' ही क्रिया जास्त प्रमाणात होते. त्यामुळे आवाज बसणे, घसा कोरडा पडणे, घसा दुखणे इ. तक्रारी उद्भवतात. त्या टाळण्यासाठी काही पथ्ये अवश्य पाळली गेली पाहिजेत.
आहाराच्या दृष्टिकोनातून -
१) जेवणामध्ये, आंबट दही, ताक (आंबट), रायते, तेलकट, तुपकट पदार्थ, अतिथंड पदार्थ टाळावेत. ताक अगदी गोड असेल तरच घ्यावे.
२) कोल्ड्रिंक्स, बाहेरची अति थंड लस्सी, आइस्क्रीम, विविध कॉकटेल्स, थंड मिल्क शेक, बर्फाचा गोळा हे पदार्थ कमीत कमी घेण्याचा प्रयत्न करावा. या पदार्थांचा "थंडावा' घशाला त्रासदायक ठरतो.
३) चहा-कॉफीसारख्या गरम पेयांनी घशाला आराम पडत असला तर त्याचा अतिरेक केल्यास पचनावर वाईट परिणाम होतो. दिवसभरातून २-३ वेळा चहा घेण्यास हरकत नसते.
४) बोलण्यामध्ये कॅलरीज खूप खर्च होऊन थकवा जाणवतो. अशा वेळी शहाळ्याचे पाणी, फळांचे रस घ्यावेत. ओला खजूर खावा.
विहाराच्या दृष्टिकोनातून -
१) बोलण्याचे काम जास्त असल्याने स्वरयंत्रावर, घशावर ताण येतो. त्यामुळे रोज सकाळी उठल्यावर गरम पाण्याने गुळण्या कराव्यात.
२) खडीसाखर कायम जवळ ठेवावी. त्यामुळे घसा कोरडा पडत असल्यास चघळण्यासाठी खडीसाखर उपयोग ठरते. विविध गोळ्या, थंडाव्या देणाऱ्या गोळ्या कमी वापराव्यात.
३) प्राध्यापक, शिक्षक यांना फळ्यावर खडून लिहिताना खडूच्या सूक्ष्म कणांचा त्रास होतो. अशा लोकांनी "डस्टलेस चॉक' वापरावा. बाह्य धुळीपासून बचावासाठी मास्कचा उपयोग करावे.
४) नाटक, चित्रपट क्षेत्रातील कलावंतांना अभिनय करण्याच्या निमित्ताने एकसारखे बोलावे लागते. अशा कलावंतांनी कायम थर्मास बरोबर ठेवावा आणि त्यात दूध, चहा कॉफीऐवजी गरम पाणी ठेवावे. कारण घशाला जेव्हा कोरड पडते तेव्हा गरम पाण्याचा घोट घेतल्यास खूप बरे वाटते. घशावरच्या स्नायूवरचा ताण कमी होतो. तसेच थोड्याफार प्रमाणात कफ येत असेल तर तोदेखील कमी होऊन बोलण्यासाठी घसा मोकळा राहतो. गायकांनी, कीर्तनकारांनीसुद्धा हे पथ्य पाळावे. अशा प्रकारे काही नियम पाळल्यास व्यवसाय करताना आरोग्यही टिकून राहते.
- वैद्य विनिता कुलकर्णी
आयुर्वेदतज्ज्ञ, पुणे.
No comments:
Post a Comment