Wednesday, April 16, 2008

व्याधी व्यवसायाची

व्याधी व्यवसायाची


व्यावसायिक आरोग्य उत्तम ठेवायचे असेल, तर व्यवसाय आणि तो करणारा अशा दोघांचे आरोग्य नीट राहणे आवश्‍यक असते. व्यवसायात अनैसर्गिकताचा शिरकाव झाला की आधी व्यवसायाच्या आणि मग तेथे काम करणाऱ्या मंडळींच्या आरोग्यावर परिणाम झाल्याशिवाय कसे राहील?
कर्मण्येवाधिकारस्ते मा फलेषु कदाचन ।
मा कमर्फलहेतुर्भूः मा ते संगो।स्त्वकर्मणि ।।
... श्रीमद्‌भगवद्‌गीता २-४७।।

याचा अर्थ असा, की सतत कर्म करणे आवश्‍यक आहे, पण त्याचबरोबर असेही सांगितले, की फळाची आशा करू नये. जेव्हा कर्म व फळ एकत्र येतील, तेव्हा त्याला व्यवसायाचे स्वरूप येते. व्यवसायात केलेल्या कर्माचा मोबदला मिळविणे अपेक्षित असते. सर्व व्यवसाय धर्मार्थ वा पैसे न घेता करणे, असा गीतातत्त्वज्ञानाचा अर्थ काढणे चुकीचे ठरेल.

व्यवसाय म्हणजे आपल्याजवळ असलेल्या ज्ञानाचा, कौशल्याचा, संग्रहाचा वा वस्तूंचा दुसऱ्याला उपयोग करून देत असताना त्यासाठी काही मोबदला मिळविणे. तेव्हा व्यवसाय करताना फळाची अपेक्षा ठेवावीच लागते. कारण ते उपजीविकेचे साधन असते. जीविका व उपजीविका हा भेदही आपल्याला समजून घ्यावा लागेल. प्रेम, श्रद्धा, संस्कार, शांती या "जीविका' आहेत. कारण त्याशिवाय जीवन आनंदात जगणे अवघड होईल. अन्न, वस्त्र, पाणी, निवारा यांचा अंतर्भाव उपजीविकेत होईल. उपजीविकेतील हे घटक मिळविण्यासाठी करावी लागणारी कर्मे व्यवसायात मोडतात. निसर्गाचे चक्र चालू राहावे यासाठी करावी लागणारी कर्मे व्यवसायात मोडतात. म्हणून व्यवसाय नैतिकतेने केला तर ती एक साधना ठरते. अनैतिकतेने केलेला व्यवसाय निसर्गाला व समाजाला मान्य होणार नाही.

मोबदला भलत्याच प्रमाणात असला, दुसऱ्याला मदत करत असताना अडवणुकीचा प्रकार केला गेला, एकाकडून मोबदला घेऊन दुसऱ्याला त्रास देण्याचा व्यवसाय असला, तर तो निंद्यच समजला जाईल. दिलेल्या वस्तूच्या मोबदल्यात काय घ्यायचे, की जेणेकरून देण्या- घेण्याच्या साखळीत असणाऱ्या प्रत्येकाला स्वतःचे जीवन व्यवस्थितपणे पुढे चालवता येईल, हे पाहणे आवश्‍यक असते.

अनेकदा व्यवसाय करताना माणसे स्वतःचे कौशल्य वापरत नाहीत किंवा नसलेल्या कौशल्याचा मोबदला मागण्याचा प्रयत्न करतात. समोरच्याला कसे फसविता येईल आणि जास्त मोबदला मिळविता येईल, याचा विचार करतात. नोकरीच्या वेळात वैयक्‍तिक कामे करणे, बसून राहणे, टिवल्याबावल्या करण्यात वेळ दवडणे, एखाद्या यंत्रात काही मामुली दुरुस्ती करण्याची आवश्‍यकता असताना त्यात असलेला दोष फुगवून सांगून गिऱ्हाइकाकडून बरेच पैसे उकळणे, दुधापासून सोन्यापर्यंत सर्वत्र भेसळ करणे, गरज नसताना रोग्याला विविध तपासण्यांच्या जाळ्यात अडकवणे आदी प्रकार व्यवसाय या सदरात मोडणार नाहीत. असे केल्यास ते व्यवसाय "कृष्ण'बंधनात येतील.

कर्माचे बंधन उत्पन्न होऊ नये यासाठी भगवंतांनी फलाशा सोडून कर्म करायला सांगितले. एखादी करू नये ती गोष्ट केली, निसर्गाच्या विरुद्ध वागले, तर प्रज्ञापराध होतो. त्यातून रोग उत्पन्न होतात, असे आयुर्वेदशास्त्र सांगते. फसवणुकीचा मोह होणे व तशी फसवणूक करणे, यामुळे व्यवसायाचे आणि व्यवसाय करणाऱ्याचे आरोग्य नक्कीच धोक्‍यात येते. पोट भरण्याचे आवश्‍यक साधन आहे, हे समजून व्यवसाय करावा. पण त्याने उगीच डोकेदुखी होणार नाही, हे पाहणे आवश्‍यक आहे. अनैसर्गिक रीतीने केलेल्या व्यवसायामुळे हळूहळू व्यवसायाचेच आरोग्य धोक्‍यात येते. मध्यंतरी आपण सर्वांनी शेअर्सच्या किमती एकदम वर-खाली झालेल्या पाहिल्या. यात काही माणसे देशोधडीला लागली, तर काहींनी बराचसा पैसा कमावला. काही मंडळींची अशी खेळी म्हणजेच का व्यवसाय?

जशी निसर्गाचे एक चक्र व साखळी आहे, तसे प्रत्येक छोट्या-मोठ्या व्यवसायात एक चक्र असते. कामगार अंगमेहनतीचा मोबदला घेतो, तर कारखान्याच्या ऑफिसमध्ये बसलेली मंडळी इतर कामे करतात आणि त्या कामाचा मोबदला घेतात. शेवटी त्या कारखान्याचे उत्पादन विकले गेले, तरच व्यवसाय नफ्यात चालतो. कामगारांनी काम न करता बसून राहणे, कुणाचे लक्ष नसल्यास काम न करणे, अपेक्षेनुसार काम पूर्ण न करणे, काम न करताच पगारात वाढ मागणे, कारखाना नफ्यात चालो वा तोट्यात- नियमांवर बोट ठेवून बोनस, पगारवाढ वगैरे मागण्या करणे, अशा कोणत्याही प्रकारे या चक्रात खीळ घालण्याचा प्रयत्न केला गेला, तर व्यवसायाचे आरोग्य धोक्‍यात येऊ शकते. उलट नफा कारखान्याच्या नोकर वर्गात व्यवस्थितपणे वाटला नाही, नोकर वर्गाला नुसतेच कर्म करायला प्रवृत्त केले आणि नफा स्वतःकडेच ठेवला, तरीसुद्धा व्यवसाय धोक्‍यात येऊ शकतो. रात्रंदिवस काम करता असताना स्वतःच्या प्रकृतीकडे दुर्लक्ष करणे, स्वतःचे कुटुंबीय वा नातीगोती यांना मुळीच वेळ न देणे वगैरे गोष्टींमुळेही व्यवसायाचे आरोग्य धोक्‍यात येऊ शकते.

व्यवसायाचे आरोग्य व्यक्‍तीच्या आरोग्याशी संबंधित आहे व व्यवसायाचे आरोग्य टिकविण्याच्या दृष्टीने व्यक्‍तीचे आरोग्य महत्त्वाचे आहे. एकाच व्यवसायातील दोन- चार महत्त्वाच्या व्यक्‍ती एकाच वाहनातून प्रवास करत असता, त्या वाहनाला अपघात झाल्यास व्यवसाय कोलमडून पडू शकतो. अशा व्यक्‍तींवर त्या व्यवसायाचे आरोग्यच नव्हे, तर अस्तित्वही अवलंबून असते. बऱ्याच व्यवसायांमध्ये अशीही कामे असतात, की ज्यामुळे ते काम करणाऱ्या व्यक्‍तीच्या आरोग्याला बाधा येऊ शकते. कारखान्यातून निघणाऱ्या दूषित वायूमुळे कामगाराला त्रास होऊ शकतो, रंगकामात रंगाचे कण कामगाराच्या फुप्फुसात जाऊ शकतात. अशा वेळी योग्य ती काळजी न घेतल्यास बिघडलेले आरोग्य त्या व्यवसायामुळे बिघडलेले असते. मिळणाऱ्या लठ्ठ पाकिटाकडे पाहून दिवसरात्र संगणकासमोर बसणाऱ्या मंडळींचे नुसते डोळेच खराब होतात असे नव्हे, तर स्मरणशक्‍ती कमी होणे, पक्षाघात, पचन बिघडणे, खांदे जखडणे, पाठ दुखणे आदी विकारही होऊ शकतात.

अनावश्‍यक खूप सारा पैसा हाती आला, की चुकीच्या खाण्या-पिण्याच्या पद्धती अवलंबल्या जातात. सर्व गोष्टी पैशाने विकत घेता येतात अशा गैरसमजातून न विकत घेण्यासारख्या गोष्टीही विकत घेतल्या जातात. व्यक्‍ती-व्यक्‍तींमधील नातेसंबंधाला बाधा येते, पैशाच्या जोरावर शरीरसंबंध घडतात. गंमत म्हणून सापाला खेळवत असता एखाद्या बेसावध क्षणी साप डंख मारतो, तसेच काहीसे होते. अनेक हुुशार मंडळी भलत्याच रोगाला बळी पडलेली दिसतात. नशेत असताना गाडी चालविल्याने झालेल्या अपघातात माणसे दगावलेली दिसतात. हे का घडते याचा विचार करणे आवश्‍यक आहे.

व्यवसायाशी निगडित आरोग्याचा विचार करत असताना, शिक्षकाला दिवसभर उभे राहणे आवश्‍यक असते व त्यामुळे गुडघ्यांवर ताण येतो, खडूची पावडर नाकातोंडात जाऊ शकते, इलेक्‍ट्रॉनिक उपकरणाचा वापर केला जात असल्यास त्यातून निघणाऱ्या रेडिएशनचे डोळ्यांवर परिणाम होऊ शकतात. बैठे काम करणाऱ्यांचा उजवा हात, उजवा खांदा वा पाठीचा कणा बाधित होऊ शकतो. तसेच गाणाऱ्याचाही आवाज उत्तम असावा लागतो. तेव्हा त्यानुसार काळजी घेणे आवश्‍यक असते.

प्रत्येकाचे आरोग्य त्याच्या व्यवसायानुसार असणे गरजेचे आहे. उदा. विमान चालविणाऱ्या पायलटचे शरीर लवचिक व प्रमाणबद्ध असणे आवश्‍यक आहे. कधी कधी व्यवसायामध्ये वेळेचेही भान ठेवावे लागते. व्यवसायाला किती वेळ द्यावा याबद्दलचे गणित सांभाळावे लागते; अन्यथा त्याच्या लक्षात येत नाही, पण व्यवसाय करणाऱ्याचे आरोग्य बिघडले तर व्यवसायाचे आरोग्यही बिघडू शकते. व्यवसाय तोट्यात चालत असल्यास किंवा खूप अडचणी असल्यास मालकाचे आरोग्य बिघडू शकते.

काळ आपल्या परीने व आपल्या गतीने धावत असतो. पण अनेक व्यवसायांत काळाच्या पुढे धावण्याची शर्यत लागलेली दिसते. बारा महिन्यांत मिळणारा नफा एका महिन्यात मिळवायचा असा चंग बांधल्यास मालकासकट सर्वांवरच खूप मानसिक ताण येतो, शक्‍य नसलेली वचने ग्राहकाला दिली जातात, त्यातून प्रज्ञापराध घडून रोगाला आमंत्रण मिळते. भांडवल नसताना खूप मोठा व्यवसाय करण्याचा प्रयत्न केल्यास खूप मानसिक ताण येऊ शकतो. एकंदर व्यवसायातील मानसिक ताण व्याधींना आमंत्रण देणारा ठरतो. म्हणून प्रत्येक व्यावसायिकाने मानसिक ताण घालवून मनःशांतीसाठी प्रयत्न करणे आवश्‍यक आहे.

No comments:

Post a Comment

ad