Tuesday, June 14, 2016

सेंद्रिय अन्न

सेंद्रिय अन्न

अन्न- पाणी- हवा या तीन गोष्टी जर नैसर्गिक अवस्थेत राहिल्या, तर आरोग्य अनुभवता येईल. पण, यात असंतुलन झाले, तर मात्र मनुष्याच्या दुःखाला सीमा राहणार नाहीत. सध्या ज्याला ऑरगॅनिक किंवा सेंद्रिय म्हटले जात आहे, त्यालाच आयुर्वेदाने "नैसर्गिक सात्त्विक अन्न‘ असे नाव दिले आहे. जरी काही अन्नाचे प्रकार पूर्ण नैसर्गिक नसले व संपूर्णतया अनैसर्गिकही नसले, तरी अशा वेळी त्यांच्या गुणवत्तेनुसार व त्या अन्नाच्या प्रकृतीनुसार त्यांना "राजसिक‘ किंवा "तामसिक‘ म्हटले जाते. 

निसर्गचक्र सतत फिरत राहिले पाहिजे. अर्थात, या चक्राची गतिमानता म्हणजेच जीवन! ज्ञातातून अज्ञाताकडे, जडातून चैतन्याकडे शक्तीचे परिवर्तन म्हणजेच या सतत चालणाऱ्या चक्राची गती. नैसर्गिक जीवनपद्धती म्हणजे या चक्राच्या बरोबरीने सतत कर्मरत राहणे. किंबहुना, जीवनाची इतिकर्तव्यता निसर्गचक्राला गतिमान ठेवण्यातच असते. शक्‍तीच्या उन्नत स्वरूपात परिवर्तनासाठीसुद्धा मुळात शक्‍तीची आवश्‍यकता असतेच. चेतनाशक्‍ती (अधिक उन्नत अशी शक्‍ती) सर्व वस्तुजातातील जड शक्‍तीवर काम करून त्या जडाची उत्क्रांती घडवते. या क्रियेला भारतीय परंपरेने "यज्ञ‘ अशी संज्ञा दिली आणि हा यज्ञ ज्या कर्मामुळे घडतो ते कर्म ज्ञानानुभवाधिष्ठित असते. श्रीमद्‌भगवद्‌गीतेत पुढील श्‍लोक दिलेला आहे. 

अन्नाद्भवन्ति भूतानि पर्जन्यादन्नसम्भवः । यज्ञाद्भवति पर्जन्यो यज्ञः कर्मसमुद्भवः ।।3-14।। 

कर्मामुळे यज्ञ (शक्तिरूपांतरण क्रिया), यज्ञामुळे पर्जन्य, पर्जन्यामुळे अन्न आणि अन्नामुळे जीवमात्र अर्थात मनुष्यसुद्धा, असे हे निसर्गचक्र सतत चालू असते. ज्याअर्थी उत्पत्ती व जीवन अन्नावर अवलंबून असते, त्याअर्थी जीवनात अन्नाचे महत्त्व अतिशयच असणार. किंबहुना, जीवनाचा स्तर किंवा जीवनातील सुख-दुःखे अन्नावरच अवलंबून असणार हे निश्‍चित. जे कोणी केवळ शरीरपोषणासाठी म्हणजेच फक्‍त भौतिक रूपांतरणासाठी अन्न सेवन करतात त्यांचे जीवन व्यर्थ, असे स्पष्टच सांगितले आहे. पण, जे जड शक्‍तिरूपी अन्न खाऊन ते निसर्गचक्ररूपी यज्ञात अर्पण करून त्यापासून शरीर, मन व आत्मा यांच्यासाठी लागणाऱ्या उन्नत अवस्थेच्या शक्‍तीमध्ये रूपांतरण करतील, ती माणसे सुखी, समाधानी व आनंदी होतात. 

एक असाही समज आहे, की अन्न, औषध किंवा इतर वस्तू या वनस्पतिजन्य (हर्बल) असाव्यात. तसा प्रचार करून वस्तूंवर तसे लिहून अनेकांनी आपल्या तुंबड्या भरल्या. खरे पाहता नुसते वनस्पतीज असे म्हणण्यात काहीच अर्थ नसतो. वनस्पतिजन्य म्हणण्याबरोबरच ते सेंद्रिय किंवा नैसर्गिक उत्पादन असेल, तरच त्याला अर्थ असतो व त्याचे महत्त्व उरते. सध्या बायो फूड, ऑरगॅनिक फूड, सेंद्रिय अन्न, सेंद्रिय शेती या संकल्पनांना खूप महत्त्व आले आहे. वैज्ञानिकांनी पण यावर विचारमंथन व संशोधन सुरू करून या ऑरगॅनिक म्हणजेच नैसर्गिक अन्नाचा व आरोग्याचा संबंध जोडला व सध्या वाढत असलेल्या नवीन नवीन रोगांचे कारण अनैसर्गिक रासायनिक खते वगैरे वापरून केलेले अन्न हा निष्कर्षही प्रसिद्ध केला. निसर्ग म्हणजे त्यातील तीन महत्त्वाच्या गोष्टी - हवा (वातावरण), तहानेसाठी पाणी, भुकेसाठी अन्न. म्हणजेच अन्न- पाणी- हवा या तीन गोष्टी जर नैसर्गिक अवस्थेत राहिल्या, तर आरोग्य अनुभवता येईल. पण, यात असंतुलन झाले, तर मात्र मनुष्याच्या दुःखाला सीमा राहणार नाहीत. सध्या ज्याला ऑरगॅनिक किंवा सेंद्रिय म्हटले जात आहे, त्यालाच आयुर्वेदाने "नैसर्गिक सात्त्विक अन्न‘ असे नाव दिले आहे. जरी काही अन्नाचे प्रकार पूर्ण नैसर्गिक नसले व संपूर्णतया अनैसर्गिकही नसले, तरी अशा वेळी त्यांच्या गुणवत्तेनुसार व त्या अन्नाच्या प्रकृतीनुसार त्यांना "राजसिक‘ किंवा "तामसिक‘ म्हटले जाते. 

जन्माला आलेल्या प्रत्येकाला जीवनाची आस असते आणि त्यासाठी आपोआपच अन्नाचीही आस असते. प्रतिष्ठा, पैसा, जमीन-जुमला कितीही असला, तरी त्याची किंमत अन्नाशिवाय शून्य राहील, हे आपण जाणून आहोतच. म्हणूनच आयुर्वेदाने तर स्पष्ट सांगितले आहे. "सर्वं अन्ने प्रतिष्ठितम्‌‘. अर्थात, सगळं काही अन्नाच्या आधीन आहे. 

असे हे जीवनास अत्यावश्‍यक असलेले अन्न अधिकाधिक जीवनोपयोगी कसे बनवता येईल, यासाठी आयुर्वेदशास्त्राने अनेक मार्ग सुचवले, अनेक संकल्पना समजावल्या. "अग्निसंस्कार‘, "कालसंस्कार‘ एवढेच नाही, तर अन्न कधी खावे, कसे खावे, कशाबरोबर खावे अशा लहानातल्या लहान; पण अत्यंत मोलाच्या सूचनाही दिल्या. मात्र अन्न शरीर, मन, आत्म्याच्या समाधानासाठी, तुष्टी-पुष्टीसाठी असते, याचे भान मनुष्याला राहिले नाही. संपूर्ण आरोग्यविचार न करता केवळ रुचीच्या आहारी जाऊन अन्न निवडले जाऊ लागले आणि नैसर्गिक काय आहे याचा विचार न करता खोट्या आशेपायी आणि नाहक स्वार्थापायी अनैसर्गिक अन्न तयार केले गेले, अर्थातच रोगवाढीस वाव मिळाला. 

हे सगळं आज अचानक घडलं असं नाही, तर मनुष्य मोह - हव्यासाच्या आहारी जाऊन निसर्गाविरुद्ध जेव्हा जेव्हा गेला, तेव्हा तेव्हा असंच घडलं. हजारो वर्षांपूर्वी लिहिल्या गेलेल्या चरकसंहितेत याचा उल्लेख सापडतो. 

सर्वे शारीरदोषा भवन्ति ग्राम्याहारात्‌ ।.... चरक चिकित्सास्थान 

अर्थात, मोठ्या गावात - शहरात राहणाऱ्या म्हणजे निसर्गापासून दूर गेलेल्या व्यक्‍तींनी केलेला "ग्राम्याहार‘ किंवा बाहेरचे खाणे हे सर्व शरीरदोषांचे, विकारांचे मूळ कारण आहे. अर्थात, त्यावेळचे अनैसर्गिक अन्न आणि आजचे अनैसर्गिक अन्न यांत फरक आहे. चरकाचार्यांनी शिळे अन्न, सुकवलेल्या भाज्या, जुने सुकवलेले मांस, विरुद्ध अन्न, नवीन धान्य वगैरे गोष्टींचा उल्लेख केला; तसाच आज आपल्याला रासायनिक खते घालून, अनैसर्गिक कीटकनाशके फवारून उगवलेल्या भाज्या, धान्य, अन्नातील गुणसूत्रांत बदल करून तयार केलेल्या अन्नाचा समावेश करावा लागेल. 

रासायनिक खते वापरून तयार केलेले अन्न अनैसर्गिक का, हे आपल्याला समजून घ्यावे लागेल. रात्री घराबाहेर बसलेला कुत्रा चोराची चाहूल लागल्यावर म्यॉंव म्यॉंव असे ओरडू लागला, तर आपला काय समज होईल? उघड्या ठेवलेल्या साखरेला जर मुंग्या लागल्या नाहीत किंवा कुंडीतील गुलाबाला आठवडाभर पाणी वगैरे न घालता तो मान न टाकता ताजा, टणक व उमललेला राहिला तर आपला काय समज होईल. नक्कीच साखर खोटी असणार व गुलाबाचं फूलही प्लॅस्टिकचं, बनावटी, अनैसर्गिक असणार, हे आपल्याला सहज समजेल. सध्या बाजारात मिळणारे गुलाब नाजूकही नसतात व त्यांना सुगंधही नसतो, फक्‍त ते दिसतात गुलाबासारखे. 

प्रत्येक वस्तूचा एक स्वभाव असतो. आयुर्वेदात अन्नधान्य, भाजीपाला, पाणी, मूत्र वगैरे सर्व द्रव्यांचा अभ्यास करून त्याचा स्वभाव, गुण-दोष लिहून ठेवलेले आहेत. नुसतेच लिहून ठेवलेले आहेत असे नव्हे, तर नैसर्गिक अवस्थेत त्या वस्तूंच्या स्वभावाचा अनुभव आजही कुणालाही घेता येतो. स्वभाव म्हणजे त्या वस्तूचे जडत्व, उष्ण-शीतत्व, खारट-गोड आदि चव, शरीरात त्याचा होणारा परिणाम व त्याचे होणारे कर्म. कुठल्या झाडाला किती पाणी लागतं, किती सूर्यप्रकाश लागतो, कोठल्या प्रकारच्या मातीची आवश्‍यकता असते, कोठला ऋतू त्यासाठी अनुकूल वा प्रतिकूल आहे हे सर्व ठरलेलं असतं. वातावरणात बदल करून चुकीच्या जमिनीत रासायनिक खते वापरून तयार केलेले अन्न हा काहीतरी वेगळा प्रकार होणार व त्याला अनैसर्गिक म्हणता येईल. त्यातून दोन विजातीय संयोगातून तयार करवलेली वनस्पती म्हणजेच संकरित वनस्पती व गुणसूत्रं बदललेली वनस्पती मूळ स्वभावाशी इमानदारी ठेवून नसते. उत्पादन वाढावे व कीटकांनी वनस्पतीवर हल्ला चढवू नये, फळे मोठ्या आकाराची व एकसारखी असावीत व दिसायलाही सुंदर असावीत अशी अपेक्षा ठेवली, की गुणसूत्रांत बदल करावा लागतोच. त्यामुळे वनस्पतीचा मूळ स्वभावच बदलून त्या अनैसर्गिक होतात व त्यांच्यापासून मिळणारे अन्नपण अनैसर्गिक होते. म्हणजेच असे सर्व उत्पन्न अनैसर्गिकच म्हणावे लागेल. प्रत्येक वनस्पतीचा जसा एक स्वभाव असतो, तशी त्याची रोगप्रतिकारशक्‍तीही ठरलेली असते. गुणसूत्र बदलल्यामुळे त्यांच्यावर पडणारी कीड किंवा रोगराईचे निवारण करण्यासाठी अत्यंत जहाल कीटकनाशके वापरावी लागतात व या कीटकनाशकांचे विष वनस्पतीत व फुला-फळांमध्ये भिनते. 

जगात सर्वांना, मग ते गरीब - श्रीमंत कोणीही असोत, दोन घास अन्न मिळालेच पाहिजे; पण त्यासाठी नुसते अन्नधान्य मुबलक असून चालणार नाही, तर ते विकत घेण्यासाठी खिशात चार पैसेही असावे लागतील. ते चार पैसे कष्ट केल्याशिवाय मिळणार नाहीत. मनुष्याला जर कमी कामात जास्त मोबदला किंवा काम न करता फुकट जेवण मिळू लागले, तर मग मुळात शेती करणार कोण व कशासाठी? पण कमी श्रमात खूप उत्पन्न मिळण्यासाठी रासायनिक शेती करून गहू- तांदूळ यांच्यासारखेच दिसणारे; पण संपूर्ण वेगळ्या गुणधर्माचे सर्व अन्नधान्य व भाजी, फळफळावळ देणारे वाण तयार झाले, ज्यांचा आहारात समावेश केल्यामुळे गेल्या 50 वर्षांत मानवजातीचे आरोग्य पूर्ण ढासळत गेले. त्याचबरोबर जमीन पण जळून - होरपळून गेली आणि अशा संकरामुळे वांझ झालेल्या जमिनीतून काहीही उगवणे शक्‍य राहिले नाही. नुकत्याच प्रसिद्ध झालेल्या एका बातमीत जगातील सर्वश्रेष्ठ प्रतीचा माळवी पंजाबी गहू जेथे तयार होतो, त्या ठिकाणी खते व कीटकनाशकांच्या बेसुमार वापरामुळे जमीन पूर्ण नष्ट तर झाल्याचे म्हटले आहे. अशा प्रतीचे अन्न खाल्ल्यामुळे अन्नातील झालेल्या गुणसूत्रांतील बदलांमुळे मनुष्याच्या गुणसूत्रांत बदल होतात व ते बदल चार पिढ्यांपर्यंत दिसून येऊ शकतात. तसेच, स्त्रियांच्या गर्भधारणेत अडथळा तर येतोच; परंतु गर्भपात होण्याची शक्‍यता वाढते, असेही पुढे म्हटलेले आहे. 

गाई-म्हशी व दूध व दुधाचे पदार्थ याबाबतीत पण संकरित वाण आणि जनावरांना दिलेले अनैसर्गिक खाद्य व हार्मोन व इतर औषधे यामुळे मनुष्यमात्रांना नवीन नवीन रोगांना कसे तोंड द्यावे लागत आहे हेही दिसून येते. अनैसर्गिकरीत्या अन्न व औषधे देऊन वाढवलेल्या प्राण्याचे मांस खाऊन किती भयंकर मोठी आपत्ती ओढवली याची "मॅड काऊ डिसीज‘, "बर्ड फ्लू‘ अशी उदाहरणे आपल्या डोळ्यांसमोर आहेतच. व्यवहारात वापरल्या जाणाऱ्या इतर वस्तूंतही रसायनांचा उपयोग केल्याने काय त्रास होतो याचा प्रत्येकाला अनुभव आहे. सुगंधी फुलांची शुद्ध तेले, अत्तरे किंवा उदबत्त्या न वापरता केवळ स्वस्त किमतीचे उत्पादन करण्यासाठी कृत्रिम रासायनिक सुगंध वापरल्यामुळे फुफ्फुसांचे व त्वचेचे रोग पसरत आहेत. केसांना चिकटपणा येऊ नये म्हणून वनस्पतीज खोबरेल तेलाऐवजी रासायनिक शुद्धिप्रक्रियेतून तयार झालेले खनिज तेल वापरल्यामुळे केस जाऊन टक्कल तर पडतेच; पण उष्णता वाढून मेंदूचेही रोग होतात, डोळ्यांना कमी दिसू लागते. बाजारात मिळणाऱ्या "वनस्पतिजन्य‘ अशी उगाचच जाहिरात केलेल्या अनेक सौंदर्यप्रसाधनांत वनस्पतीचा अर्क एक थेंब असू शकतो व बाकी सर्व वस्तू रासायनिकच असतात. या वस्तूंचा प्रयोग प्राण्यांवर केला नाही, अशीही एक जाहिरात उगाचच केलेली असते. नाही तरी फेस क्रीमचा प्रयोग प्राण्याच्या चेहऱ्यावर कसा करणार? ही सर्व उत्पादने सेंद्रिय नसतात. त्यामुळे अशा सौंदर्यप्रसाधनांच्या वापराने अनेकांना त्वचेचे विकार किंवा इतर विकार होऊ शकतात. कुंकवाच्या टिकलीने फुटक्‍या कपाळाचा अनुभव अनेक स्त्रियांनी घेतलेला असेलच. या अनैसर्गिक द्रव्यांच्या उपयोगामुळे, तसेच अनैसर्गिक अन्न- पाणी सेवनामुळे मनुष्याची एकूणच वीर्यशक्‍ती कमी झाली व असाध्य रोगांचा प्रसार वाढला. 

अशा परिस्थितीतही निराश होण्याचे कारण नाही, कारण योग्य वेळी शास्त्रज्ञांना, विचारवंतांना आणि विशेषतः पाश्‍चिमात्य जनतेला आयुर्वेदाचे मार्गदर्शन लाभले आणि बायो फूड, ऑरगॅनिक अन्न म्हणजेच नैसर्गिक वस्तू व नैसर्गिक अन्नाचे महत्त्व समजून आले व त्यांनी निर्धार केला की दोन घास कमी मिळाले तरी चालेल; पण खाऊ तर नैसर्गिक अन्नच खाऊ. अनैसर्गिक वस्तू खाऊन नंतर औषधपाण्यावर जादा खर्च करण्यापेक्षा अन्नालाच थोडी अधिक किंमत दिली, तर ते अंतिमतः स्वस्तच पडते. नैसर्गिक शेतीत शेतीला लागणाऱ्या बहुतेक सर्व वस्तू (बियाणे, खत वगैरे) शेतकऱ्यांच्या घरातच तयार होतात. शिवाय, शेतीतील वस्तू शेतीतच वापरून निसर्गचक्राचे संतुलन ठेवण्यास मदत मिळते. रासायनिक खते, कीटकनाशके वगैरे सर्व बाहेरून विकत घ्यावे लागते.
एकूणच खराब झालेल्या जमिनीला पुन्हा शेतीसाठी उपयुक्‍त करणे, हजारो एकर पडीक जमीन पुन्हा शेतीसाठी उपयुक्‍त करणे व माणसांना शेतीप्रवण करणे हे पहिले काम करावे लागेल. त्याच्यानंतर कुठलेही अनैसर्गिक अन्नच नव्हे, तर इतर कोठलीही अनैसर्गिक वस्तू अजिबात वापरायची नाही, असा निश्‍चय करून सेंद्रिय शेतीवर भर द्यावा लागेल. कोबीचा गड्डा उगाचच खूप मोठा दिसतो व स्वस्त आहे म्हणून विकत घेतला, तर पचपचीत व पांचट पानांची रास व त्याबरोबर खतांची उष्णता व कॅन्सरसारख्या रोगाला बोलावणाऱ्या खुणा सहजच घरात येतील. 

आपले स्वतःचे आपल्या मुलांचे म्हणजे आपल्या पुढच्या पिढीचे व पर्यायाने पृथ्वीचे आरोग्य व अस्तित्व टिकवायचे असेल, तर फक्‍त सेंद्रिय अन्नच खायचे, हा संकल्प "खाईन तर तुपाशी नाही तर उपाशी‘ अशा निष्ठेने करावा लागेल.

- डॉ. श्री बालाजी तांबे, आत्मसंतुलन व्हिलेज, कार्ला 410 405 

Ayurveda, Vastu shastra, healthy Food, Healthy Living, Abstract India, Shree Balaji Tambe, India, Yoga, Meditation, Life Style, Marathi Blog, Marriages, Love

No comments:

Post a Comment

ad