आरोग्य ताल
| |
- डॉ. श्री. बालाजी तांबे (www.balajitambe.com)
|
आपला दिनक्रम या चक्राच्या अनुरूप ठेवला, तर शरीराच्या अनेक क्रिया सुरळीत चालतात. अर्थात, संतुलन कायम राहते. याउलट या चक्राकडे दुर्लक्ष करून स्वतःची मनमानी करत राहिल्यास आज ना उद्या त्याचे दुष्परिणाम सहन करावेच लागतात.
वयोऽहोरात्रिभुक्तानां तेऽन्तमध्यादिगाः क्रमात् ।
... अष्टांगहृदय सूत्रस्थान
वात- पित्त- कफ हे दोष वय, दिवस, रात्र व अन्नपचन होत असताना अनुक्रमे अंती व मध्यकाळी व प्रारंभी अधिक बलवान असतात व विशेषत्वाने कार्यरत असतात.
वय
वयाचे तीन भाग म्हणजे बाल्यावस्था, तारुण्यावस्था व वृद्धावस्था. बाल्यावस्थेत स्निग्ध, बलस्वरूप कफाचे आधिक्य असते, कारण या काळात शरीराची वाढ होणे अपेक्षित असते. सर्व धातूंना योग्य प्रकारे पोषण मिळून शरीराला दृढ बनवण्याचे काम हा कफ करत असतो. तारुण्यावस्थेत पित्ताचे आधिक्य असते, त्यामुळे तारुण्यात जोम, स्फूर्ती मिळून उत्साहपूर्णता मिळू शकते व धडाडीची कामे होऊ शकतात. वृद्धावस्थेत वात वाढतो, त्यामुळे शरीराची शक्ती हळूहळू कमी होते, इंद्रियांची ताकद क्षीण होते व शरीराचा नाश होतो.दिवसाचे १२ तास आणि रात्रीचे १२ तास यांचेही प्रत्येकी ३-३ भाग केले असता पहिल्या भागात कफाचे आधिक्य असते, म्हणजे सकाळी व संध्याकाळी ६ ते १० हा काळ कफाचा समजला जातो. मधला भाग म्हणजे दुपारी व मध्यरात्री १० ते २ या काळात पित्त वाढत असते, तर तिसऱ्या भागात म्हणजे दुपारी २ ते ६ व रात्रीच्या शेवटी २ ते ६ हा काळ वाताचा असतो. वात- पित्त- कफ यांचे असे ठराविक वेळेला वाढण्याचे आणि नंतर आपोआप कमी होण्याचे चक्र आपल्या शरीरात अविरत, रोजच्या रोज चालू असते.आपला दिनक्रम या चक्राच्या अनुरूप ठेवला, तर शरीराच्या अनेक क्रिया सुरळीत चालतात. अर्थात, संतुलन कायम राहते. याउलट या चक्राकडे दुर्लक्ष करून स्वतःची मनमानी करत राहिल्यास आज ना उद्या त्याचे दुष्परिणाम सहन करावेच लागतात. वात शरीरात गती व हालचाल करू शकणारे तत्त्व होय. झोपेतून उठण्याची क्रिया अर्थातच वाताच्या कार्यक्षेत्रातील आहे. वर पाहिल्याप्रमाणे सकाळी सहा वाजता वाताचा काळ संपतो. सहज उठायचे असेल तर वाताच्या काळातच उठायला हवे. एकदा का सहा वाजल्यानंतर कफाचा काळ सुरू झाला, की उठणे अधिकाधिक अवघड होत जाते. सकाळी लवकर उठण्याचा दुसरा महत्त्वाचा फायदा म्हणजे वाताच्या काळात मलमूत्र विसर्जन सुलभ व योग्य प्रकारे होऊ शकते, कफाचा काळ सुरू झाला की विसर्जनाची क्रिया पूर्ण होणे अवघड होते.
आधुनिक विज्ञानामुळे झोपेसाठी, उठण्यासाठी, अन्नग्रहण किंवा शौचविसर्जनासाठी शरीरात काय घडते, कुठली केमिकल्स व हार्मोन्स काम करतात हे दाखवून दिले व शरीरातील घड्याळाचा व जैविक परिक्रमेच्या कल्पनेचा स्वीकार केलेला आहे. पित्त हे पचनाचे कार्य करणारे तत्त्व आहे, त्यामुळे पित्ताच्या काळात अर्थात दुपारी १२ ते १ च्या दरम्यान जेवल्यास अन्नाचे पचन सहज होऊ शकते. पित्ताचा काळ असूनही उपाशी राहिल्यास काही काम नसलेले पित्त शरीरात अतिरिक्त उष्णता वाढवते. पित्ताचा काळ उलटून गेल्यानंतर जेवल्यास अन्न पचन करणाऱ्या पित्ताच्या अभावी पचू शकत नाही. म्हणून मध्यानी जेवणेच आरोग्यासाठी हितकर समजले जाते.
झोपण्याच्या बाबतीतही त्रिदोषांचे हे चक्र ध्यानात घ्यावे लागते. झोप येते ती कफामुळे. कफाचा काळ रात्री १०-११ वाजेपर्यंत असतो. त्यामुळे या वेळेपर्यंत झोपल्यास झोप लगेच लागते व ती झोप शांत असते. याउलट रात्री ११ च्या पुढेही जागत राहिले, म्हणजे पित्ताचा काळ सुरू झाला, की त्याने शरीरात पित्तदोषाचे असंतुलन व्हायला सुरवात झाल्याने अंग गरम होते; डोळ्यांची, हातापायांच्या तळव्यांची आग होणे, डोके दुखणे, केस गळणे वगैरे विविध तक्रारींना आमंत्रण मिळते. रात्रपाळी करणाऱ्या किंवा विमानात काम करणाऱ्या असंख्य व्यक्तींचा हा अनुभव आहे.
बऱ्याच वेळा दवाखान्यात मला काही रुग्ण सांगतात, की सायंकाळी ६-६।। च्या सुमारास पोटात खड्डा पडतो आणि काही खावेसे वाटते. तसेच, काही जण सांगतात की रविवार असल्याने छान उशिरापर्यंत झोपायचे ठरवून आदल्या शनिवारी रात्री उशिरापर्यंत टी.व्ही. बघत बसलो, तरी रविवारी सकाळी सहा वाजताच जाग आली. नंतर तासभर अंथरुणात लोळण्याचा प्रयत्न केला तर उठल्यावर अंग दुखू लागल्याने सगळा रविवारचा मूडच गेला. अशा प्रकारे सायंकाळी पित्ताचा काळ संपताना भूक लागल्यास काहीतरी (तळलेले पदार्थ सोडून) अवश्य खावे. जैन धर्माप्रमाणे तर अजूनही सूर्यास्तानंतर काहीही खात नाहीत.
अशाच प्रकारे आयुर्वेदाने बाह्य ऋतुचक्राचा व शरीरप्रकृतीच्या घड्याळाचा त्रिदोषांशी संबंध दाखवून दिला. लहान मुले, तरुण किंवा वृद्धांनी सकाळ, दुपार, संध्याकाळी, रात्री; तसेच सहा ऋतूंपैकी कोठल्या ऋतूत काय खावे, काय खाऊ नये, कोठले काम करावे आदी आहार-विहाराचे उत्कृष्ट मार्गदर्शन केलेले आहे. अर्थात, त्याचबरोबर कोठला रोग कोणत्या ऋतूत बळावण्याचा किंवा बरा होण्याची शक्यता असते हे दाखवून दिलेले आहे.
अशा प्रकारे मनुष्यमात्र जर या कालचक्रात किंवा घड्याळाला अनुसरून चालेल, म्हणजेच इतरांना दिलेल्या भेटीच्या वेळा सांभाळण्याबरोबरच जर परमेश्वराला म्हणजेच निसर्गाला दिलेली वेळ पाळेल; तर संतुलित, निरोगी व शांत आयुष्याची गुरुकिल्ली देव आपल्या हाती देईल.
Ayurveda, Vastu shastra, healthy Food, Healthy Living, Abstract India, Shree Balaji Tambe, India, Yoga, Meditation, Life Style, Marathi Blog, Marriages, Love
No comments:
Post a Comment