Friday, April 4, 2014

आरोग्यप्रसाद

रामनवमीला पंजिरी खाण्याने नुसतेच उन्हाळ्यापासून संरक्षण मिळते असे नव्हे, तर त्यात वीर्यवर्धक, पौष्टिक व बाहेरचा उष्मा सहन होऊन स्वस्थ झोप मिळेल अशा घटकांचीही व्यवस्था केलेली असते. पंजिरी केवळ रामनवमीलाच खावी असे नव्हे, तर रामजन्मापासून पुढे महिनाभर, अगदी ज्येष्ठ महिन्यापर्यंत खायला हरकत नाही. याने खूप फायदा होऊ शकेल. शरीराला ताकद मिळण्यासाठी, स्नायूंना बळकटी आणण्यासाठी लहान मुलांना चमचाभर भिजविलेली चण्याची डाळ देण्याची पद्धत लक्षात घेतली तर हनुमान जयंतीला गूळ-चणे खाण्यामागचा अर्थ लक्षात येईल.

भा रतीय संस्कृती ही संपूर्णपणे केवळ मनुष्यमात्राच्या कल्याणाचाच विचार करते. त्या निमित्ताने सण-वार, देव-धर्म, पूजा-अर्चा, यज्ञ-कर्म अशा अनेक गोष्टी परंपरेत आणून मनुष्यमात्राला समृद्धीबरोबर आरोग्य मिळेल याचाच विचार केलेला असतो. तसे पाहता खरे म्हणजे देवाला प्रेमाशिवाय काहीही नको असते. मनुष्याला पण हवे असते प्रेम. तेव्हा चंदनाची उटी, केशराची फुले, सुवर्णालंकार व मोदकमेवा हे सर्व देवाला आवश्‍यक नसते. प्रसाद देवाला दाखवला तरी शेवटी तो खाल्ला जातो दाखवणाऱ्याकडूनच. म्हणूनच सुदाम्याच्या मूठभर पोह्यांनी श्रीकृष्ण जेवढे प्रसन्न झाले तेवढे अन्नाचे 56 भोग लावूनही झाले नसतील. देवाला अर्पण केलेल्या प्रसादात वातावरणातील श्रद्धेमुळे देवाचा आशीर्वाद ओढला जातो व गूळ-दाण्यांचे रूपांतर प्रसादात होते. शिरा कितीही चांगला झालेला असला व तो कितीही खाल्ला तरी समाधान होत नाही, पण तोच शिरा प्रसाद म्हणून ग्रहण केला की होणारे समाधान अनोखे असते. पूजेत विज्ञान आहेच, ते कळले नसले तरी पूजा केल्यावर व प्रसाद खाल्ल्यानंतर माणसाला मिळणारी आत्मतृप्ती व समाधान लॉटरीचे मोठे बक्षीस लागले तरी होत नाही. हाच प्रसादाचा फायदा.
भारतीय सणांची योजना करताना त्या त्या वेळचे ऋतुमान, त्या ठिकाणचा काळ लक्षात घेऊन काय खावे काय न खावे, कुठले पक्वान्न असावे असे अलिखित नियम तयार झालेले दिसतात. गुढीपाडव्याच्या दिवशी कडुनिंबाची चटणी व नंतर तोंड गोड करणारे श्रीखंड, त्यानंतर येणाऱ्या रामनवमीला मिळणारी पंजिरी आणि हनुमान जयंतीला मिळणारे चणे-गूळ आरोग्याला लाभदायक असतात. श्रीखंड पचायला थोडे जड असते, शिवाय हा थोडा आंबवलेला पदार्थ आहे. असे श्रीखंड शरीरात सहज सात्म्य व्हावे व शरीराला पुष्टी मिळावी, वीर्य व आरोग्य मिळावे या दृष्टीने आयुर्वेदाने श्रीखंडाला लागणारे घटक व ते बनविण्याची कृती व्यवस्थित सांगून ठेवली आहे. यात जवळचा रस्ता शोधण्यासाठी व स्वस्तात साधन शोधण्यासाठी बदल केला आणि त्यामुळे श्रीखंड बाधले तर त्याची जबाबदारी गुढीपाडव्यावर नसते. ही जबाबदारी, अन्न नेहमी चांगल्या गुणवत्तेचे व सात्त्विक असावे हा सर्वसाधारण नियम डावलून पैसे वाचविण्यासाठी खाल्लेल्या अन्नावर वा तसा विचार करणाऱ्यावर असते. आयुर्वेदिक श्रीखंड करताना दही ज्या मातीच्या भांड्यात लावायचे ते कापराने धुपवलेले असते आणि श्रीखंड पचविण्यासाठी लागणारा अग्नी मधरूपाने समाविष्ट असतो, श्रीखंडाच्या अन्नशुद्धीसाठी त्यात तूप टाकलेले असते.

चैत्र-वैशाख हा वसंत ऋतू. या वेळी उन्हाळ्याची नुकतीच सुरवात झालेली असते. या दिवसाचे वर्णन "चैत्रमास, त्यात शुद्ध नवमी ही तिथी, गंधयुक्‍त तरीही वात उष्ण हे किती? दोन प्रहरी का गं शिरी सूर्य थांबला, राम जन्मला गं सखी राम जन्माला, ' या शब्दांत गीतरामायणात केलेले आहे. या दिवसात जिवाची काहिली झाली नाही, जिवाची तगमग वाढली नाही तरच नवल. म्हणून रामनवमीच्या प्रसादासाठी "पंजिरी'ची योजना केलेली असते. मूत्रविसर्जन व्यवस्थित व्हावे, मूत्राघात होऊ नये, जळजळ होऊ नये, शरीरात उष्णता वाढू नये, डोळ्यांची आग होऊ नये, अन्नपचन व्यवस्थित व्हावे आणि शरीरातील अग्नी संतुलित राहावा म्हणजेच शरीरातील हार्मोन्सची व्यवस्था नीट चालावी या दृष्टीने पंजिरीत ओवा, सुंठ, धणे यांचा समावेश केलेला असावा. मधुर रसाशिवाय प्रसाद नसतो, पक्वान्न नसते, त्यामुळे या प्रसादात साखर असतेच. ज्यांच्याजवळ सोय असेल त्यांना चारोळी, बदाम, पिस्ता, केशर हे पदार्थही यात टाकता येतात. अशा रीतीने बनविलेली चमचाभर पंजिरी खाऊन भांडेभर पाणी प्यायल्यावर राम अंतर्यामी दर्शन देऊन जातो. वसंत ऋतूत वितळणारा कफ त्रास देऊ शकतो तेव्हा कफदोष कमी करण्याचीही या प्रसादात व्यवस्था केलेली असते. सर्वसामान्यांच्या घरी पंजिरी फार कष्ट न घेता व फार पैसे खर्च न करताही बनवलेली असू शकते किंवा एखाद्या स्वयंभू मंदिरात वा हृदयस्थ रामाच्या दर्शनासाठी इच्छुक असणाऱ्यांसाठी विशेष पंजिरीची योजना केलेली असते. आयुर्वेद ही कुठलीही मागणी पूर्ण करणारी व आरोग्य देणारी कामधेनू आहे. साध्या पंजिरीमध्ये धणे, बडीशेप, थोडीशी सुंठ, जिरे वगैरे टाकलेले असते; तर विशेष पंजिरीमध्ये धणे, बडीशेप, डिंकाची लाही, मिरी, सुंठ, वेलची, जायफळ, जायपत्री वगैरेंची योजना केलेली असते. पंजिरी खाण्याने नुसतेच उन्हाळ्यापासून संरक्षण मिळते असे नव्हे तर त्यात वीर्यवर्धक, पौष्टिक व बाहेरचा उष्मा सहन होऊन स्वस्थ झोप मिळेल अशा घटकांचीही व्यवस्था केलेली असते. पंजिरी केवळ गुढीपाडव्याला वा रामनवमीलाच खावी असे नव्हे तर रामजन्मापासून पुढे महिनाभर, अगदी ज्येष्ठ महिन्यापर्यंत खायला हरकत नाही. याने खूप फायदा होऊ शकेल. शरीराला ताकद मिळण्यासाठी, स्नायूंना बळकटी आणण्यासाठी लहान मुलांना चमचाभर भिजविलेली चण्याची डाळ देण्याची पद्धत लक्षात घेतली तर हनुमान जयंतीला गूळ-चणे खाण्यामागचा अर्थ लक्षात येईल व हनुमान देवता ताकदीची व बलदंड का आहे हेही लक्षात येईल.

हे सगळे पहिले की एकूण आयुर्वेद अनेक प्रकारे मनुष्यमात्राची कशा प्रकारे काळजी घेतो हे लक्षात येईल आणि चरक, सुश्रुत या आचार्यांना मनोमन नमस्कार केल्याशिवाय राहता येणार नाही.

Ayurveda, Vastu shastra, healthy Food, Healthy Living, Abstract India, Shree Balaji Tambe, India, Yoga, Meditation, Life Style, Marathi Blog, Marriages, Love

No comments:

Post a Comment

ad