डॉ. श्री बालाजी तांबे
मन मनास उमगत नाही, हे खरंच. मन हे इंद्रिय अन्य इंद्रियांसारखं एखाद्या अवयवाला चिकटून येत नाही, त्यामुळे ते कुठंय ते सांगता येत नाही; पण ते असं इंद्रिय आहे, की जे सर्व शरीराला व्यापून असतं. प्रत्येक गोष्टीचं ज्ञान आणि अन्य इंद्रियांची कार्ये मनाच्या सहभागाशिवाय होत नाहीत. मन प्रसन्न असेल तर सारं जग सुंदर असतं. मनाची अप्रसन्नता सारं जगणं दुर्मुखलेलं करतं.
हा शरीर व आत्मा यांच्यामधला एक महत्त्वाचा दुवा असतो. इंद्रियांची कार्येसुद्धा मनाशिवाय होत नसतात. मन हे स्वतःसुद्धा एक इंद्रियच आहे. मन हे असं इंद्रिय आहे की जे सर्व शरीराला व्यापून असतं, शरीरातील सर्व लहान-मोठ्या घडामोडींना सहायक स्वरूप असतं.
कोणत्याही गोष्टीचं ज्ञान होण्यासाठी आत्म्याची प्रेरणा जशी हवी, तसाच मनाचा सहभागही अत्यावश्यक आहे. कानाने आवाज तेव्हाच ऐकू येतो जेव्हा मन श्रोत्रेंद्रियाशी संबंधित असते. आपण प्रत्यक्षातही हा अनुभव कैक वेळा घेतो, की वाचनात दंग असताना एखादी व्यक्ती शेजारी येऊन उभी राहिली तर कळत नाही, पण टीव्हीवर आवडता कार्यक्रम पाहात असताना आईला मुलाने मारलेली हाक ऐकू येते. म्हणजेच मन ज्या इंद्रियाशी संबंधित असते त्याच विषयाचे ज्ञान होते, बाकीचे विषय ज्ञात होऊ शकत नाहीत.
मन मोलाचं
मन फार महत्त्वाचं आहे. कारण मन हे अहंकार, बुद्धी व इंद्रियांवरही आपला अधिकार गाजवू शकते.
मनाची कार्ये सांगताना चरकाचार्य म्हणतात -
इन्द्रियाभिग्रहः कर्म मनसः स्वस्यनिग्रहः । उहो विचारश्च ततः परः बुद्धिः प्रवर्तते ।।...चरक शारीरस्थान
इंद्रियांचे नियंत्रण करणे हे काम मनाचे आहे. "उह' म्हणजे ऊहापोह अर्थात अमुक गोष्ट केल्यास काय होईल व त्याचा परिणाम बरा-वाईट असा होईल व लाभ किंवा हानिकारक काय हे ठरविते ती बुद्धी. बुद्धीने बरे-वाईट काही सांगितले तरी इंद्रियांच्या कर्माची जबाबदारी मनाचीच असते. इंद्रिये स्वतःच्या विषयाकडे आकर्षित झाली की त्यावर मनाचा ताबा राहात नाही म्हणून इंद्रियविजय व मनःशक्ती वाढविणे हे उपाय महत्त्वाचे ठरतात.
एकदा मन नियंत्रणाखाली आले की शरीर-मानस व्यापार सुरळीत चालतात. म्हणूनच आयुर्वेदशास्त्रच नाही तर बाकी योगशास्त्र, अध्यात्मशास्त्रही "मनावर ताबा ठेवणे' ही सर्वांत महत्त्वाची गोष्ट मानतात व त्या दृष्टीने उपायही सांगतात.
मन सत्त्व, रज आणि तम या त्रिगुणांनी युक्त असते. खरं तर यातील सत्त्व हा "गुण' असून रज व तम हे "दोष'च समजले जातात. सत्त्वगुणाचे प्राधान्य असणारे मन शुद्ध, प्रसन्न व संशयरहित असते आणि अशा मनाचे स्वतःवरही पूर्ण नियंत्रण असते. मन हे अन्नमय आहे हे सर्वच प्राचीन भारतीय शास्त्रांनी आणि आधुनिक विज्ञानानेही मान्य केले आहे. आपण जे खाऊ तसं आपलं मन घडत जातं म्हणूनच आयुर्वेदशास्त्रात सात्त्विक आहाराची प्रशंसा केली आहे. मन हे उभयेंद्रिय असल्यामुळे त्यावर जडाच्या दिशेनं अन्नाचा व चैतन्याच्या दिशेनं आत्म्याच्या सात्त्विकतेचा परिणाम होत असतो.
प्रज्ञापराध आणि मन
आयुर्वेदानं रोगांची तीन मुख्य कारणं सांगितलेली आहे. त्यात प्रज्ञापराध हा सर्वांत महत्त्वाचा सांगितला. प्रज्ञा म्हणजे कार्यरत बुद्धी. बुद्धीने निर्णय घेण्यापूर्वी स्मृती व धृती याची मदत घ्यावी लागते. स्मृती व धृती यांनी चूक केली तर बुद्धी चुकीचा निर्णय घेते. या तिघांच्या चुकीमुळे या तिन्ही पातळ्यांवर चुकीचा निर्णय झाला की प्रज्ञापराध होतो म्हणजेच कर्मासाठीची प्रेरणा चुकीची मिळते. स्मृती ही अनुभवाची साठवण आणि मुळात ती असते आत्मतत्त्वाची स्मृती. स्मृती ज्या वेळी भलत्याच गोष्टींचा ऊहापोह करते त्या वेळी स्मृतिभ्रंश होतो म्हणजेच चुकीची धारणा होते. भौतिक उदाहरण घ्यायचं झालं, तर वाटेत पडलेल्या दोरीला पूर्वीच्या साठवणीतील सापाच्या बरोबर तुलना करून सर्प आहे ही निश्चिती मनात झाली, म्हणजे तशी धारणा झाली की तो धृतिभ्रंश झाला. यानंतर बुद्धीने निर्णय करायचा; परंतु चुकीची धारणा झाल्यानंतर बुद्धीचाही निर्णय चुकीचाच येतो. प्रज्ञापराध टाळण्यासाठी मनाला आत्मरत करणे हा एक अप्रतिम उपाय ठरतो. प्रज्ञापराध झाला की व्यक्तीकडून अनुचित, अयोग्य कार्य घडतं, त्यातून सर्व दोष बिघडतात आणि रोगाची सुरवात होते. यात मनाचा मोठा सहभाग असतो. कारण कार्यरत बुद्धी ज्या मनाकडून काम करून घेते त्या मनाचे प्रत्यक्ष काम करणाऱ्या इंद्रियांवर वर्चस्व असते.
यच्च अन्यदीदृशं कर्म रजोमोहसमुत्थितम् । प्रज्ञापराधं तं शिष्टा ब्रुवते व्याधिकारणम् ।।...चरक शारीरस्थान
रज व तम गुणाने आविष्ट झालेले मन जेव्हा इंद्रियांकडून चुकीची कार्य करवून घेते तेव्हा त्याला प्रज्ञापराध असं म्हणतात.
या सर्व वर्णनावरून एक गोष्ट लक्षात येते की प्रज्ञापराध होऊ नये असं वाटत असेल म्हणजेच रोगाला आमंत्रण द्यायचं नसेल तर मन शुद्ध व सात्त्विक असायला हवं आणि मनाचे दोष - रज व तम - कमी व्हायला हवेत, मनावर नियंत्रण ठेवता यायला हवे. आत्मरत मनच मनावर नियंत्रण ठेवू शकतं. बऱ्याचदा आपण अनुभवतो की एखादी गोष्ट करण्याचा मोह होत असतो, बुद्धी-धृती मनाला बजावत असतात की हे करणे योग्य नाही तरीही मन जोपर्यंत इंद्रियांच्या सुखकल्पनांच्या मोहापासून स्वतःला परावृत्त करत नाही तोपर्यंत मनाची द्विधा स्थिती चालू राहते.
मनाच्या संपन्नतेसाठी सद्वृत्त
मनाने बुद्धीचे ऐकावे यासाठी मनाला अनुशासनाच्या गोडीत गुंतवणे भाग असते. याचसाठी आयुर्वेदाने सद्वृत्त सांगितलं आहे. शरीराच्या आरोग्यासाठी स्वस्थवृत्त तर मनाचे आरोग्य व संपन्नतेसाठी सद्वृत्त हवेच.
सद्वृत्तातील काही महत्त्वाच्या गोष्टी याप्रमाणे होत,
सकाळ, संध्याकाळ स्नानसंध्या म्हणजे स्नान, मार्जनादी नित्यकर्म, सूर्योपासना करावी.
अग्नीची उपासना करावी. बाह्य अग्नी व शरीरस्थ अग्नी संतुलित ठेवावा.
गुरू, आचार्य, सिद्ध यांची पूजा करावी. ज्ञानाचा आदर करावा.
पाय स्वच्छ ठेवावेत. चुकीच्या मार्गाचे अवलंबन करू नये.
अपवित्र, अप्रशस्त वस्तूकडे पाहू नये. वाईटापासून दूर राहावे.
अन्नाची निंदा करू नये तसेच चुकीचे, प्रकृतीला न मानवणारे अन्न खाऊ नये.
निंद्य व्यक्तीचे म्हणजे चुकीची कामे करणाऱ्या व्यक्तीचे अन्न खाऊ नये.
रात्रीच्या वेळी दही खाऊ नये.
शास्त्राने सांगितलेल्या, स्वतः ठरविलेल्या किंवा एखाद्या संस्थेच्या नियमांचे उल्लंघन करू नये.
रात्री भटकू नये. संशय येईल किंवा लपवावे लागेल असे कार्य, चौर्यकर्म करू नये.
अनोळख्या ठिकाणी म्हणजे संभ्रम दूर झाल्याशिवाय आणि स्वसंरक्षणाची खात्री नसेल अशा ठिकाणी भटकू नये.
सूर्यास्तानंतर लगेच किंवा थकून भागून आल्यानंतर लगेच भोजन, शयन, अध्ययन व मैथुन करू नये.
अशा अनुशासनाने मनाला नियंत्रित केले तर त्यास चुकीचे निर्णय घेण्यापासून परावृत्त करता येते.
मानसिक रोगाची शक्यता
रज-तम हे मनाचे दोष वाढले की त्यातून मानसिक रोग निर्माण होतात. मानसिक रोग होण्याची शक्यता कोणामध्ये असते हे आयुर्वेदात याप्रमाणे सांगितले आहे,
अतिशय भित्र्या स्वभावाच्या व्यक्ती
शरीरातील वात-पित्तादी दोष अति प्रमाणात वाढलेल्या व्यक्ती
अनुचित आहार म्हणजे ऋतुमानाला व प्रकृतीला न मानवणारा आहार करणाऱ्या व्यक्ती
अनुचित पद्धतीच्या शरीरक्रिया करणाऱ्या म्हणजे स्वतःच्या ताकदीचा विचार न करता वागणाऱ्या व्यक्ती
अतिशय अशक्त व क्षीण व्यक्ती
चंचल स्वभावामुळे कोणत्याही निर्णयाप्रत येऊ न शकणाऱ्या व्यक्ती
काम-क्रोध-लोभ वगैरे षड्रिपूंच्या आहारी जाणाऱ्या व्यक्ती
बुद्धी विचलित झालेल्या म्हणजे हे का ते ठरवू न शकणाऱ्या व्यक्ती
मानस रोगांमध्ये शरीरशुद्धी सर्वप्रथम येते. शरीर शुद्ध झाले की मनही शांत व्हायला मदत मिळते.
शरीरशुद्धीचा प्रसाद
हृदिन्द्रियशिरःकोष्ठे संशुद्धे वमनादिभिः । प्रसादमाप्नोति स्मृतिं संज्ञां च विन्दति ।।...चरक चिकित्सास्थान
विरेचनादी पंचकर्मांनी हृदय, इंद्रिये, शिर व शरीर उत्तम रीतीने शुद्ध झाले की मन प्रसन्न होते, स्मरणशक्तीही वाढते अर्थातच मानस रोग बरे होण्याची पूर्वतयारी होते.
मानरोगांमध्ये जुने तूप, गोमूत्र, शतावरी-ब्राह्मी-जटामांसी वगैरे मन-बुद्धीची ताकद वाढविणारी द्रव्ये, जीवनीय औषधांसारखी एकंदर जीवनशक्ती वाढविणारी उपयुक्त द्रव्ये असतात. बरोबरीने विशिष्ट औषधीद्रव्यं शरीरावर धारण करणे, यज्ञ-यागादी कर्मे करणे, धूप करणे, दान करणे यांसारख्या ग्रहचिकित्सेतील उपायही योजायचे असतात. मानसिक रोगाची भीती बाळगण्याची गरज कोणाला नसते, हे याप्रमाणे सांगितले आहे,
निवृत्तामिषमद्यो यो हिताशी प्रयतः शुचिः ।...चरक चिकित्सास्थान
जो मद्य व मांस सेवन करत नाही.
जो प्रकृतीला अनुरूप हितकर आहार सेवन करतो.
जो प्रत्येक कार्य सावधानपूर्वक करतो
जो पवित्र व शुद्ध असतो.
तेव्हा या सर्व गोष्टींची काळजी घेतली, मन सैरभैर न सोडता अनुशासित केले, योग-प्राणायामादी
क्रियांनी मनावर नियंत्रण ठेवण्याचा प्रयत्न केला तर त्यातून शरीर व मन दोघांचेही आरोग्य अबाधित राहील व निरामय आयुष्याचा आनंद घेता येईल.
हे एकच आहे व त्यामुळे एकाच वेळेला ते दोन इंद्रियांच्या ठिकाणी राहू शकत नाही. एका वेळेला एकाच विषयाचे ज्ञान करू शकते.
महावेगी मन
मात्र प्रत्यक्षात आपण असाही अनुभव घेतो, की एकाच वेळेला आपण डोळ्यांनी नृत्य पाहतो, कानांनी गाणे ऐकतो, हातांनी ताल धरतो, तर हे कसे होते? याचे उत्तर असे की मन एकच असले तरी अतिशय सूक्ष्म असल्याने महावेगवान असते. मोजताही येणार नाही अशा कालावधीत ते डोळ्यांकडून कानाकडे, कानाकडून हाताकडे, हाताकडून डोळ्यांकडे अविरत फिरत असते आणि एकाच वेळेस एकाहून अधिक विषयांचे ग्रहण करू शकते. मन जेवढे शुद्ध तेवढे एकाच वेळेत अनेक विषय ग्रहण करण्याची क्षमता अधिक असते. यावरूनच "अष्टावधानी' हे विशेषण मन एकाच वेळेला आठ वेगवेगळ्या ठिकाणी लक्ष देऊ शकत असणाऱ्या व्यक्तींना दिले जाते.
मनाचे प्रकार
कणखरपणावरून मनाचे तीन प्रकार केलेले आहेत, प्रवरसत्त्वसार, मध्यसत्त्वसार व हीनसत्त्वसार.
ज्याचे मन कधीही खचत नाही, जो कधीही विषण्ण होत नाही, ज्याची समज चांगली असते, ज्याची स्मरणशक्ती चांगली असते, जो कोणत्याही कामासाठी तत्पर असतो, जो काम मनापासून करतो, ज्याचे आचरण शुद्ध व पवित्र असते, ज्याला शारीरिक वा मानसिक वेदना झाल्या तरी जणू झाल्याच नाहीत असा दिसतो, तो मनुष्य प्रवरसत्त्वसार असतो.
दुसरा मनुष्य वेदना सहन करतो आहे म्हणून आपणही सहन केल्या पाहिजेत असे समजून मनाचे धैर्य एकवटतो, तो मनुष्य मध्यसत्त्वसार असतो. दुसऱ्याने समजावले असता, धीर दिला असता त्यांची सहनशक्ती वाढते.
हीनसत्त्वसारवान मनुष्याचे धैर्य खूपच कमी असते. दुसऱ्याकडे पाहून किंवा दुसऱ्याचे ऐकूनही तो धीर धरू शकत नाही. शरीर बलवान असले तरी थोड्याही वेदना सहन करू शकत नाही व तो अगदी हळव्या मनाचा असतो.
रोगाचे निदान करतानाही मनाच्या या प्रवृत्तीचा विचार करणे भाग असते. कारण उत्तम धैर्य असणारा मनुष्य जेवढा त्रास होत असेल, त्याच्या मानाने खूप कमी प्रमाणात तो वर्णन करतो तर हीन धैर्य असणारा मनुष्य त्रास कमी असला तरी खूप अधिक प्रमाणात वर्णन करतो. अर्थातच नेमके निदान करण्यासाठी वैद्याला रुग्णाचे मन विचारात घेणे गरजेचे असते, मनाची ही धीरता नंतर रोगनिवारणासाठीही तेवढीच महत्त्वाची असते.
---- Ayurveda, Vastu shastra, healthy Food, Healthy Living, Abstract India, Shree Balaji Tambe, India, Yoga, Meditation, Life Style, Marathi Blog
No comments:
Post a Comment