Thursday, July 15, 2010

त्वचा

डॉ. श्री बालाजी तांबे

त्वचा हे एक नाजूक पण प्रभावी असे संरक्षक कवच असते. त्वचा शरीर आणि बाह्य वातावरण यांच्यामधली दुवा असते. तसेच शरीरात काय चालले आहे, दोष संतुलित आहेत की नाहीत, धातू संपन्न आहेत की नाहीत आणि मलांचे विसर्जन व्यवस्थित होते आहे की नाही हे अचूकपणे सांगणारा आरसाही असते. म्हणूनच त्वचेवर झालेला बदल त्रासदायक असला - नसला तरी त्याकडे दुर्लक्ष करणे चांगले नाही.

प्रथमदर्शनीचा प्रभाव ज्या महत्त्वाच्या गोष्टींवर अवलंबून असतो, त्यातील एक म्हणजे त्वचा. बऱ्याचदा त्वचेचे सौंदर्य गोरा-सावळा-काळा अशा रंगात मोजले जाते. पण त्वचेची खरी आकर्षकता असते ती सतेजतेत. सावळ्या-काळ्या रंगाची त्वचाही सतेज असली, तर आकर्षक वाटते.

त्वचा हा एक अवयव आहे आणि ती स्पर्शेन्द्रियाचे स्थानही आहे. दोन्ही दृष्टीने त्वचेची नीट काळजी घेणे खूप महत्त्वाचे असते. त्वचा हे एक नाजूक पण प्रभावी असे संरक्षक कवच असते. त्वचा शरीर आणि बाह्य वातावरण यांच्यामधली दुवा असते. तसेच शरीरात काय चालले आहे, दोष संतुलित आहेत की नाहीत, धातू संपन्न आहेत की नाहीत आणि मलांचे विसर्जन व्यवस्थित होते आहे की नाही हे अचूकपणे सांगणारा आरसाही असते. म्हणूनच त्वचेवर झालेला बदल त्रासदायक असला - नसला तरी त्याकडे दुर्लक्ष करणे चांगले नाही किंवा त्वचेवरील पुरळ, गळू, फोड वगैरे नुसतेच दाबून टाकणेही योग्य नाही. त्वचा खूप संवेदनशील असते. ऊन, उष्णता, रासायनिक पदार्थ, अति थंडी, जोराचा वारा वगैरे गोष्टींचा इतकेच नाही, तर मानसिक भावनांचाही त्वचेवर परिणाम होऊ शकतो. वयानुसार शरीरात जे बदल होत असतात, त्यानुसारही त्वचा बदलत जाते. उदा. मुलगा-मुलगी वयात येताना चेहऱ्यावर तारुण्यपीटिका येतात. स्त्रियांच्या बाबतीत बाळंतपणानंतर किंवा रजोनिवृत्तीनंतर चेहऱ्यावर वांग येऊ शकतात वगैरे. पण त्वचा निरोगी राहावी, सतेज राहावी यासाठी प्रयत्नशील राहता येते. तारुण्यात पदार्पण केल्याचे एक लक्षण म्हणून तारुण्यपीटिकांकडे पाहिले तरी त्यामुळे ऐन तारुण्यात तोंड लपविण्याची पाळी येऊ नये यासाठी नक्की प्रयत्न करता येतात.

त्वचेची निर्मिती
मुळात त्वचा कशी तयार होते हे आपण पाहू.
गर्भे शुक्रशोणितस्याभिपच्यमानस्य क्षीरस्य संतानिका इव सप्त त्वचो भवन्ति ।...सुश्रुत शारीरस्थान

ज्याप्रमाणे दूध तापत असता त्यावर साय येते, त्याप्रमाणे शुक्र व आर्तव म्हणजे पुरुषबीज व स्त्रीबीज यांचा संयोग होऊन गर्भ बनत असताना त्वचा तयार होते. थोडक्‍यात त्वचेमध्ये सातही धातू अभिव्यक्‍त झालेले असतात. आणि म्हणूनच त्वचा आरोग्याचा आरसा असते.
त्वचा निरोगी असणे म्हणजे नेमके काय हेही आयुर्वेदात सांगितलेले आहे,
स्निग्धश्‍लक्ष्णमृदुश्‍लक्ष्णमृदुप्रसन्नसूक्ष्माल्पगम्भीरसुकुमारलोमा सप्रभेव त्वक्‌ चास्य भवति ।...चरक विमानस्थान

स्निग्ध - त्वचा उचित प्रमाणात स्निग्ध असावी. अतिशय तेलकट त्वचाही चांगली नाही किंवा खूप कोरडी त्वचाही चांगली नाही. श्‍लक्ष्ण, मृदु - त्वचा मऊ व नाजूक असावी. अतिशय राकट, खरखरीत त्वचा असणे चांगले नाही.
प्रसन्न - त्वचा प्रसन्न म्हणजे आकर्षक, बघितल्यावर प्रसन्नता देणारी असावी, काळवंडलेली नसावी, त्वचेवर कुठेही रॅश, पिटीका, फोड, डाग वगैरे नसावेत.
सूक्ष्म - त्वचा पातळ असावी. खूप जाड, निबर त्वचा असणे आरोग्याचे लक्षण नाही.

अल्प-गंभीर-सुकुमार-लोमा - त्वचेवरची लव अल्प असावी, खोलवर मूळ असलेली असावी आणि नाजूक सुकुमार अशी असावी.
सप्रभा - सर्वात महत्त्वाचे म्हणजे त्वचा सतेज असावी. रंग कोणताही असला तरी जर त्वचेवर सतेजता असली तर ती आकर्षकच वाटते.
जखम लवकर भरून येणे आणि त्या ठिकाणची त्वचा बाजूच्या त्वचेच्या रंगासारखी होणे हे सुद्धा त्वचा निरोगी असण्याचे लक्षण असते. अजिबात घाम येत नसला किंवा नेहमीपेक्षा फारच अधिक प्रमाणात घाम येऊ लागला तर ते त्वचारोगाचे पूर्वरूप समजले जाते.

आहार आणि आचार
त्वचा निरोगी राहावी, आकर्षक असावी असे कोणाला वाटणार नाही? वय वाढले तरी त्याचा परिणाम त्वचेवर दिसू नये असे कोणाला वाटणार नाही? आहार-आचरणात थोडे पथ्य सांभाळले, थोडे नियम पाळले तर हे नक्कीच शक्‍य होईल. आहारातील अपथ्य आणि आचरणातील नियम पुढीलप्रमाणे होत.
- दूध व फळे; मुगाची खिचडी व दूध; दूध व मीठ; दुधाबरोबर लसूण, मुळा, शेवग्याच्या शेंगा वगैरे पदार्थ एकत्र करून खाणे त्वचेसाठी अपथ्यकर होय.
- रोज दही खाणे, मासे, अति प्रमाणात मीठ, अति प्रमाणात आंबट पदार्थ, तीळ, गवार, वांगे, ढोबळी मिरची, उडीद, शेतातले नवे अन्न या गोष्टी अपथ्यकर होय.
- उन्हात फार वेळ राहण्यानेही त्वचा खराब होऊ शकते.
- पोटभर जेवल्यावर लगेचच धावपळीचे काम किंवा व्यायाम करणे हे सुद्धा त्वचेसाठी अहितकर होय.
- उलटीचा वेग दाबून ठेवल्यानेही त्वचा बिघडू शकते.
- उन्हातून आल्यावर किंवा अन्य काही कारणाने शरीर तापले असताना लगेच थंड पाणी पिण्याने किंवा थंड पाण्याने स्नान करण्याने त्वचा खराब होऊ शकते.
- दिवसा झोपण्याने सुद्धा त्वचारोग होऊ शकतात.
- ज्ञानी, गुरुजनांचा अपमान करण्याने, चोरी-व्यभिचारादी वाईट कर्मे करण्यानेही त्वचा खराब होऊ शकते, असे आयुर्वेद सांगतो.

त्वचेच्या आश्रयाने स्पर्शेन्द्रिय सुद्धा राहात असते. म्हणजे स्पर्शज्ञानाची महत्त्वाची जबाबदारीसुद्धा त्वचेवर असते. म्हणूनच सौंदर्य व आरोग्य ह्या दोन्ही गोष्टी ज्यावर अवलंबून असतात, त्या त्वचेची काळजी आवर्जून घ्यायला हवी.

सतेज त्वचेसाठी हे कराच!
त्वचेसाठी हितावह असे काही साधे उपाय पुढीलप्रमाणे सांगता येतील.
- दुधावरची साय त्वचेसाठी खूप चांगली असते. चेहरा, हात, मान वगैरे नाजूक त्वचा असणाऱ्या ठिकाणी १५-२० मिनिटांसाठी साय लावून नंतर कोमट पाण्याने धुणे.
- कोरफडीचा ताजा गर सुद्धा त्वचेसाठी चांगला असतो. स्नानाच्या आधी पाच - सात मिनिटांसाठी गर लावून ठेवता येतो. चेहऱ्यावर लावलेला गर वाळू लागल्यावर लगेच धुवून टाकायचा असतो, अन्यथा त्वचेला ओढ बसू शकते.
- विविध औषधी द्रव्यांना संस्कारित तेलाचा अभ्यंग हे तर त्वचेसाठी जणू वरदानच आहे. रात्री झोपण्यापूर्वी किंवा स्नानापूर्वी एक - दोन तास तेल जिरवून नंतर सुगंधी वनस्पतींच्या उटण्याने स्नान करण्याने त्वचा सतेज होते, वर्ण उजळतो व त्वचारोगांना प्रतिबंध होतो.
- झोपण्यापूर्वी नाकात साजूक तुपाचे किंवा औषधांनी सिद्ध तुपाचे थेंब टाकण्यानेही त्वचेचे आरोग्य, विशेषतः चेहऱ्याच्या त्वचेचे आरोग्य चांगले राहायला मदत मिळते. चेहऱ्यावर अकाली सुरकुत्या पडणे, डोळ्यांखाली काळी वर्तुळे येणे वगैरे तक्रारींना प्रतिबंध होतो.
- त्वचा कोरडी होणे, फुटणे, तळपाय-तळहाताला भेगा पडणे, त्वचा काळवंडणे, निस्तेज होणे, अकाली सुरकुतणे वगैरे त्रास वातदोषाच्या असंतुलनातून होत असतात. यावर आहारात दूध, लोणी वगैरे उचित स्निग्ध पदार्थांचा समावेश करणे, अभ्यंग, उटणे, नस्य वगैरे उपायांचा फायदा होतो.
- त्वचा लालसर होणे, गांधी उठणे, चेहऱ्यावर वांग उठणे, पीटिका येणे, गळू होणे, तळहात-तळपायातून रक्‍त येणे वगैरे त्रास मुख्यत्वे पित्तदोषाच्या असंतुलनातून होऊ शकतात. यावर नियमित पादाभ्यंग, गुलकंद-मोरावळ्यासारख्या थंड गोष्टी खाणे, रात्री जागरणे न करणे वगैरे उपाय करता येतात.

त्वचेमधले बिघाड हे बऱ्याचदा हॉर्मोन्सच्या असंतुलनामुळेही होऊ शकतात. अशा वेळी मात्र तज्ज्ञ वैद्यांच्या सल्ला घेणेच चांगले असते.

--------------------------------------------------
गर्भवतीचा आहार व बाळाची त्वचा
त्वचा निरोगी राहावी, वर्ण उजळावा यासाठी सुरुवातीपासून काळजी घेता येते. अगदी गर्भवती स्त्रीच्या आहार-आचरणावर जन्मणाऱ्या बालकाच्या त्वचेचे आरोग्य अवलंबून असते. गर्भारपणात दूध, लोणी, तूप, पंचामृत, केशर, सुवर्णवर्ख, शहाळ्याचे पाणी, गोड व ताज्या फळांचे रस वगैरे गोष्टींचे नियमित सेवन करण्याने त्वचेची मूळ जडणघडण व्यवस्थित होण्यास मदत मिळते, त्वचेची सतेजता, नितळता व एकंदरच निरोगित्व सुधारू शकते. त्वचेला हितकर असणाऱ्या दूध, लोणी वगैरे गोष्टी एकंदर आरोग्यासाठीही चांगल्या असतात.
--------------------------------------------------

- डॉ. श्री बालाजी तांबे ---- Ayurveda, Vastu shastra, healthy Food, Healthy Living, Abstract India, Shree Balaji Tambe, India, Yoga, Meditation, Life Style, Marathi Blog

No comments:

Post a Comment

ad