Sunday, July 19, 2009

घेतले शरीर जाणुनी

'सकाळ'ने आरोग्यविषयक प्रबोधनासाठी २००३ मध्ये "फॅमिली डॉक्‍टर' ही पुरवणी सुरू केली. गेली सहा वर्षे या पुरवणीद्वारे भारतीय जीवनशास्त्राच्या आधारे प्रबोधन केले जात आहे. या पुरवणीच्या पहिल्या शंभर अंकांत कोणकोणत्या विषयांची हाताळणी केली गेली, याचा हा आढावा....
आरोग्य ही प्रत्येक जिवाची मूलभूत आवश्‍यकता आहे असे म्हटल्यास अतिशयोक्‍ती ठरू नये. आरोग्य हा जणू जीवनाचा सहजभाव असतो. जिवंत आहे म्हणून जगणे, हे काही खरे जगणे नाही. जीवनाचा आनंद घेत, अनुभव घेत अधिकाधिक संपन्न पद्धतीने जगण्याला जगणे म्हणायला हवे, पण त्यासाठी आरोग्य आवश्‍यक असते. म्हणूनच म्हणतात,
सर्वमन्यत्‌ परित्यज्य शरीरं अनुपालयेत्‌ ।
अन्य सर्व गोष्टींचा त्याग करून शरीराचे रक्षण करावे. कारण शरीर अर्थात आरोग्य असेपर्यंतच जीवनाला संपन्न बनविण्याची, जीवन खऱ्या अर्थाने जगण्याची धमक असते. म्हणूनच आरोग्याचे रक्षण आणि रोगापासून खऱ्या अर्थाने मुक्‍तता हे आपणा सर्वांचे आद्यकर्तव्य समजायला हवे. याच उद्देशाने २००३ मध्ये आरोग्याची देवता श्री धन्वंतरी यांच्या पूजनदिनी म्हणजेच धनत्रयोदशीच्या दिवशी "फॅमिली डॉक्‍टर' ही पुरवणी सुरू केली.
जीवनशास्त्राची माहिती
यामधून जनमानसामध्ये आरोग्याच्या दृष्टीने जागरुकता निर्माण होणे अपेक्षित होतेच, तसेच सर्वसामान्यांना एकंदर वैद्यकशास्त्राची तोंडओळख व्हावी, हीसुद्धा इच्छा होती. आधुनिक वैद्यकशास्त्रे असोत की हजारो-लाखो वर्षांची परंपरा लाभलेली आपली आयुर्वेद, योग वगैरे शास्त्रे असोत, ती मुळात तयार झाली ती जनकल्याणाच्या हेतूने. शास्त्र म्हणून ती योग्य हातात जायला पाहिजेत हे जितके खरे, तितकेच ज्यांच्यासाठी ती तयार झाली त्यांच्यापासून ती अगदीच नामानिराळी राहायला नकोत, हेही खरे.
"फॅमिली डॉक्‍टर'ने नेमके हेच काम केले. विशेषतः आरोग्यशास्त्र किंवा जीवनशास्त्र म्हणायला हवे अशा आयुर्वेदशास्त्राची शास्त्रोक्‍त माहिती जनसामान्यांपर्यंत पोचविण्यासाठी "फॅमिली डॉक्‍टर' कमालीचा यशस्वी ठरला. लहान मुलाला अ, आ, इ, ई पासून भाषा शिकवावी त्याप्रमाणे आरोग्यासंबंधी सर्व विषयांची मूलभूत माहिती साध्या व सोप्या भाषेत देणे हे "फॅमिली डॉक्‍टर'चे वैशिष्ट्य समजावे लागेल. यामुळे आजपर्यंत गुपित असलेले ज्ञानाचे भांडार सर्वसामान्यांपर्यंत पोचविण्यासाठी तर मोकळे झालेच. शिवाय वैद्यकशास्त्राचा अभ्यास करणाऱ्यांना, अगदी वैद्यक व्यवसायातील मंडळींनाही साध्या भाषेत समजावलेली ही शास्त्रवचने उपयुक्‍त ठरली.
जीवनशास्त्र असणाऱ्या आयुर्वेदशास्त्रातली अनेक तत्त्वे आपणा भारतीयांच्या जीवनशैलीत आपोआप रुजलेली आहेत. पण परंपरा म्हणून चालत आलेल्या या नियमांना, चालीरीतींना शास्त्राचा भक्कम पाया आहे हे समजणे अतिशय आवश्‍यक होते. "फॅमिली डॉक्‍टर'मधील 'आयुर्वेद उवाच' या लेखमालेने हे काम करायचे ठरविले. आरोग्यरक्षणाच्या दृष्टीने आयुर्वेदाने सांगितलेले स्वस्थवृत्त, दिनचर्या, ऋतुचर्या वगैरे विषय अगदी साध्या भाषेत मांडले. नुसते मांडले असे नाही, तर ते प्रत्यक्ष जीवनात कसे आणायचे, याचेही मार्गदर्शन केले.
आयुर्वेदाचा गूढार्थ
कोणतेही शास्त्र म्हटले की त्या शास्त्राची म्हणून काही विशेष परिभाषा असते, विशिष्ट संज्ञा असतात. बऱ्याचदा या संज्ञांचे नुसते भाषांतर करणे पुरेसे नसते, तर त्या शास्त्राला अपेक्षित असणारी संकल्पना समजून घेणे आवश्‍यक असते. "आयुर्वेद उवाच' या लेखमालेतून आपण आयुर्वेदाच्या पारिभाषिक संज्ञा गूढार्थासह समजून घेतल्या.
आरोग्य हे कणाकणाने मिळवायचे असते. आहार, निद्रा, मैथुन वगैरे सहजभाव असणाऱ्या गोष्टींमध्ये संतुलन साधले तर काय फायदे होतात व त्यांच्या अति आहारी जाण्याने काय नुकसान होते, याविषयी माहिती आपण घेतली.
द्रव्यगुणविज्ञान हा आयुर्वेदातील महत्त्वाचा विषय. कोणती वस्तू कधी योग्य, कधी अयोग्य हे माहिती होण्यासाठी मुळात त्या वस्तूचे गुण-दोष माहिती हवेत. आयुर्वेदाने द्रव्यगुणविज्ञानातून हे काम अतिशय समर्पक रीतीने केलेले आहे. गोड, तिखट, कडू वगैरे चवी फक्‍त आवडीनिवडीपुरत्या मर्यादित नसतात, तर त्यांचा शरीरावर विशिष्ट परिणाम होत असतो, याविषयीची माहिती आपण घेतली. पदार्थातील गुण-दोषांचे ज्ञान होण्यासाठी त्याचे गुण, वीर्य, विपाक, प्रभाव, माहिती असणेही आवश्‍यक असते, या सर्वांची माहिती "फॅमिली डॉक्‍टर'मधल्या "आयुर्वेद उवाच'मधून घेतली.
यानंतर आपण महत्त्वाच्या औषधी वनस्पतींची माहिती घेतली. बऱ्याच औषधी वनस्पती आपल्या आसपास उगवलेल्या असतात, पण ती औषधी आहे हे माहिती नसते किंवा तिचा औषध म्हणून घरच्या घरी कसा उपयोग करून घेता येईल याचे ज्ञान नसते. आयुर्वेद उवाचमधून वनस्पती दिसते कशी, वाढते कुठे, तिचे शास्त्रीय नाव काय, तिचे गुण, चव, वीर्य, विपाक, प्रभाव काय व त्यानुसार तिचे औषधी उपयोग काय असतात याविषयी थोडक्‍यात माहिती घेतली.
भारतीय शास्त्रांची ओळख
आयुर्वेद हे जसे आरोग्याचे शास्त्र आहे, तसेच इतर अनेक भारतीय शास्त्रे आहेत. ही सर्व शास्त्रे एकमेकांना पूरक असतात. एका शास्त्रामध्ये निपुण व्हायचे असले तरी या पूरक शास्त्रांची ओळख असणे आवश्‍यक असते. त्या दृष्टीने न्यायशास्त्र, वैशेषिकशास्त्र वगैरे शास्त्रांची ओळख करून घेतली. आयुर्वेदाने शरीराची माहितीही अतिशय वेगळ्या व वैशिष्ट्यपूर्ण पद्धतीने दिलेली आहे. पंचभौतिक शरीराची माहिती करून घेण्यापूर्वी आपण पंचमहाभूते समजून घेतली. स्थूल शरीर म्हणजे काय, सूक्ष्म शरीर म्हणजे काय हे बघितले. प्रमाणबद्ध निरोगी शरीर कसे असावे हे पाहिले. हृदय, मेंदू, फुप्फुसे वगैरे महत्त्वाच्या अवयवांची आयुर्वेदोक्‍त माहिती बघितली तसेच मर्म संकल्पनाही समजून घेतली.
अशा प्रकारे "आयुर्वेद उवाच' ही लेखमाला आयुर्वेद म्हणजे काय हे समजावणारी होती. आयुर्वेदाच्या विद्यार्थ्याने जसा आयुर्वेदाचा अभ्यास करावा तसाच अभ्यास "आयुर्वेद उवाच' वाचून इतरांनाही करता आला. विषयाला समर्पक श्‍लोक आणि त्याचे साध्या स्पष्ट भाषेत स्पष्टीकरण असे "आयुर्वेद उवाच'चे स्वरूप असल्याने आयुर्वेदाच्या विद्यार्थ्यांनाही हसतखेळत आयुर्वेद शिकता आला.
सर्वसामान्य वाचकांमध्ये आरोग्यजाणीव
"फॅमिली डॉक्‍टर'ने आजपर्यंत अनेक विषय हाताळले. आरोग्यरक्षण, रोगनिवारण, मनःशांती, योग, सौंदर्य, दीर्घायुष्य, तारुण्य, बुद्धिमत्ता असे विविध पण जीवनाभिमुख विषय "फॅमिली डॉक्‍टर'ने निवडले व लोकांपर्यंत पोचवले. यातून आरोग्याच्या संदर्भात उत्तम ज्ञानप्रबोधन होऊ शकले.
रोगाच्या नुसत्या नावावरून वास्तविक फारसे काही समजत नाही. अमुक रोग झाला म्हणजे शरीरात नेमके काय बिघडले? असा बिघाड होण्यामागे काय कारणे होती? रोगावर उपचार करण्यामुळे नेमके काय साधले जाणार आहे? घरातल्या इतरांना, विशेषतः पुढच्या पिढीला हा रोग संक्रामित होऊ नये म्हणून काय काळजी घ्यायला हवी, यासारख्या महत्त्वाच्या गोष्टी "फॅमिली डॉक्‍टर'मधील मुखपृष्ठ कथा वा स्तंभातून समजू शकल्या. आयुर्वेद हे ज्ञानाचे अगाध शास्त्र आहे आणि त्याचे वैशिष्ट्य असे, की त्याचा जेवढा अभ्यास करावा, जेवढे चिंतन करावे तेवढा त्याचा गूढार्थ अधिकाधिक स्पष्ट होत जातो. "फॅमिली डॉक्‍टर'मधील लेखामधून असा गूढार्थ लक्षात आल्याचा अनेक वैद्यांनीही सांगितले.
"फॅमिली डॉक्‍टर'च्या मुख्य विषयासंबंधी असणाऱ्या मुखपृष्ठ कथेतून डोळे, नाक, कान, त्वचा वगैरे इंद्रियांची माहिती घेतली, त्यांचे आरोग्य कसे सांभाळायचे, त्यासंबंधात कोणते त्रास होऊ शकतात, त्यावर कशा प्रकारचे उपचार होऊ शकतात वगैरे माहिती घेतली.
आधुनिक जीवनाचा भाग बनलेल्या ऍलर्जी, डोकेदुखी, आम्लपित्त, अपचन वगैरे त्रासांबद्दल पाहिले. स्थूलता, मधुमेह, दमा, रक्‍तदाब, मूळव्याध, संधिवात वगैरे पदोपदी आढळणाऱ्या आजारांविषयी जाणून घेतले. केस, त्वचा, स्तन, शरीरबांधा वगैरे सौंदर्यसंबंधित विषयही "फॅमिली डॉक्‍टर'मध्ये येऊन गेले. कोलेस्टेरॉल, डायट वगैरे सातत्याने चर्चेत असणाऱ्या विषयांची खरी माहिती "फॅमिली डॉक्‍टर'मधून लोकांसमोर मांडता आली. जनुकशास्त्र, किरणोत्सर्ग वगैरे आधुनिक विषयांचाही समावेश केला. मन म्हणजे काय, बुद्‌ध्यंक म्हणजे काय, स्मृती-विस्मृतीचा खेळ कसा असतो, जीवनात सकारात्मकता कशी आणायची या विषयांचेही मार्गदर्शन केले. तारुण्याचा खरा अर्थ, तारुण्य टिकविण्याचे उपाय, कायाकल्पाची संकल्पना जनसामान्यांपर्यंत आणण्याचे मोलाचे काम "फॅमिली डॉक्‍टर'ने केले.
हा होता "फॅमिली डॉक्‍टर'च्या पहिल्या १०० अंकांचा आढावा. पहिल्या १०० अंकांतच इतके विषय हाताळले तरी आजपर्यंत "फॅमिली डॉक्‍टर'चा प्रवास अखंडपणे चालू आहे.
डॉ. श्री बालाजी तांबे
आत्मसंतुलन व्हिलेज, कार्ला 410 405

No comments:

Post a Comment

ad