Thursday, July 9, 2009

आत्मवास

उपवास ही एक शरीर, मन व आत्मा यांना एकत्र जोडण्यासाठी केलेली योजना आहे. म्हणजे उपवास हा सर्वात मोठा आध्यात्मिक योग म्हणायला हरकत नाही- जो मनाला बरोबर घेऊन वा मनाला बाजूला ठेवून, शरीर व आत्म्याला एकत्र जोडतो.
भारतीय संस्कृतीत व प्राचीन भारतवर्षात मानवाच्या कल्याणासाठी ऋषीमुनींनी जे काम करून ठेवले आहे, ते संपूर्ण जगात इतरत्र कुठेही झालेले दिसत नाही. लोककल्याणासाठी, मानवाच्या उत्तम आरोग्यासाठी, मानवाचे जीवन समृद्ध करण्यासाठी अनेक शास्त्रे विकसित केली व महत्त्वाचे म्हणजे ही सर्व शास्त्रे एकमेकाला पूरक आहेत. आरोग्य उत्तम राहण्यासाठी, आध्यामिक उन्नती व्हावी यासाठी व माणसाला हवी असलेली चिरंतन शांती मिळावी यासाठी उपवासाचे नियोजन केलेले दिसते.
साधारणतः उपवास म्हणजे खाण्याशी संबंधित क्रिया हे समीकरण असल्यामुळे उपवासाचा संबंध केवळ शरीराच्या आरोग्याशी आहे असा समज होतो. परंतु उपवास हा माणसे त्यांच्या स्वतःच्यात असलेल्या अस्तित्वाशी व अंतरात्म्याशी जोडणारा एक विधी आहे. "उप' म्हणजे जवळ व "वास' म्हणजे राहणारा. म्हणजे आपल्या सर्वात जवळ राहणाऱ्याशी भेट करवून देणारा तो "उपवास'. खरे पाहताना मनुष्य स्वतःच्या जेवढा जवळ असेल जेवढा स्वतःशी एकरूप असेल, त्याचे बाह्य व्यक्तिमत्त्व त्याच्या अंतरंगाशी जेवढे समरूप व जोडलेले असेल तेवढा मनुष्य आरोग्यवान राहतो.
प्रज्ञापराध म्हणजे स्वतःच्या अंतरात्म्यापासून दूर नेणारे कर्म असे समजायला हरकत नाही व आयुर्वेदाने प्रज्ञापराध हेच सर्व रोगांचे कारण सांगितले आहे.
उपवास ही एक शरीर व मन व आत्मा यांना एकत्र जोडण्यासाठी केलेली योजना आहे. म्हणजे उपवास हा सर्वात मोठा आध्यात्मिक योग म्हणायला हरकत नाही, जो मनाला बरोबर घेऊन वा मनाला बाजूला ठेवून, शरीर व आत्म्याला एकत्र जोडतो.
भारतात चार महिने एवढ्या मोठ्या कालावधीसाठी उपवासतंत्राचे विशेष नियोजन केलेले दिसते. वर्षा ऋतूत ज्यावेळी पावसाळा परम अवस्थेत असतो, म्हणजे साधारण श्रावण, भाद्रपदात होणारी वातवृद्धी सर्वांना त्रासदायक ठरू शकते. वातामुळे शरीराला अस्वस्थता येऊ शकते, रोग निर्माण होऊ शकतो वा मनाला चंचलता प्राप्त होऊ शकते. मनाच्या चंचलतेमुळे सर्व कटकट व त्रास उत्पन्न नाही झाले तरच नवल.
म्हणून आषाढी एकादशीपासूनचे पुढचे चार महिने उपवासासाठी वापरावेत असे शास्त्राने सांगून ठेवले आहे. या चार महिन्यात एखादी विशिष्ट वस्तू सेवन न करणे, जडान्नाचे सेवन टाळणे, मांसाहार न करणे, मद्यपान न करणे, कांदा, वांगे वा तत्सम वातूळ पदार्थ न खाणे असा उपवास करता येतो. याच बरोबर सोमवार, शनिवार वगैरे आठवड्यातून एक दिवस किंवा एकादशी, प्रदोष, चतुर्थी वगैरे दिवस निवडून उपवास करता येतो. साधारणतः उपवासात तपस्या अंतर्भूत असल्यामुळे स्वतःचे आवडीचे पदार्थ न खाता साधे, पचायला सोपे असलेले अन्न खाण्याचा नेम केला जातो. या सगळ्याने मन शांत होऊन शरीरशक्‍ती, मन व आत्मा यांना एकत्र करण्यासाठी वापरता येईल अशी योजना असते. म्हणून साधारणतः एकभुक्‍त राहून उपवास केला जातो म्हणजे एक वेळ जेवण करून बाकी वेळ लंघन केले जाते; एखाद्या दिवशी नुसत्या फळांवर, दुधावर वा पाण्यावर राहणे, पचायला सोपा असा एकच कुठला तरी पदार्थ खाणे अशा अनेक प्रकारे उपवास केला जाऊ शकतो.
चातुर्मासातील उपवास विशेष महत्त्वाचे असले तरी विशिष्ट दिवशी, विशिष्ट कारणाने बारा महिने उपवास केले जातात. गुरुकृपा लाभण्याच्या हेतूने गुरुवारी, शनीची बाधा होऊ नये या हेतूने शनिवारी, श्रीविष्णूंच्या कृपेसाठी एकादशी वा प्रदोष, शंकरासाठी सोमवारी उपवास करणारी मंडळी असतात.
विष्णू, शंकर ही विशिष्ट शक्‍तींची नावे असून त्या शक्‍तीच्या देवतांना प्रसन्न करणे म्हणजे ती शक्‍ती मिळविणे किंवा त्या शक्‍तीच्या अभावाने होणारे त्रास टाळणे हा उपवासामागचा हेतू असू शकतो. ग्रहणकाळात प्रकाशशक्ती मंद झाल्यामुळे वातावरण दुषित होते व पचनक्रिया मंदावते म्हणून आजारी माणसाशिवाय इतरांनी अन्नपान करू नये असे समजतात, हाही एक प्रकारचा उपवासच समजायला हरकत नाही.
कायाकल्पातील पंचकर्म हा विधी करून घेत असताना रात्रीच्या जेवणात जवळजवळ काही खायला न देता पंचकर्म करून घेणाऱ्याचे समाधान व्हावे या दृष्टीने २-३ वाट्या नुसते सूप दिले जाते, जे दात न वापरता नुसते गिळता येते. पंचकर्मादरम्यान असा आहार दिल्याने संपूर्ण शरीराची शुद्धी होऊन चेहऱ्यावर तेज येते.
परदेशात अनेक ठिकाणी उपवास ही संकल्पनाच माहिती नाही. तरीही युरोपीय देशात काही ठिकाणी वर्षातील चाळीस दिवस उपवास करण्याची प्रथा आहे. येशू ख्रिस्तांना क्रूसावर चढविण्याची घटना दुःखद असल्यामुळे या दिवसापासून ४० दिवस उपवास केला जातो. परंतु ही दुःखद घटना असल्यामुळे आपण आनंदात राहू नये असा सीमित अर्थ घेऊन मद्य व मांसाहार टाळला जातो असे दिसते. यावेळी बाकी सर्व गोष्टी सेवन केल्या जातात; मासे खाणे हा मांसाहार नाही असे समजून या उपवासादरम्यान मत्स्याहारही केला जातो.
काही ठिकाणी उपवासाच्या वेगळ्या पद्धती आढळतात. दिवसभर पाणी न पिता रात्री उपवास सोडणे अशा प्रकारच्याही उपवासाच्या पद्धती दिसतात. त्यामागे देशपरत्वे काही कारण असू शकते.
भारतीय परंपरेने व भारतीय शास्त्राने सुचविलेला उपवास अत्यंत वैज्ञानिक, शास्त्रशुद्ध व अलौकिक आहे असेच म्हणावा लागेल. अर्थात उपवासाचा अतिरेक करू नये. उपवास करणे हा एक निर्णय असतो. साधारणतः उपवासाच्या दिवशी परमेश्‍वराची उपासना व आत्मचिंतन अपेक्षित असते. अधिक सावधानता ठेवणे अपेक्षित असते. तेव्हा चुकून काही तरी तोंडात टाकले व उपवास मोडला असे घडू नये. कधीतरी लहान मुलाने एखादा उपवासाला न चालणारा पदार्थ उपवास करणाऱ्याच्या तोंडात घातला तर उपवास मोडला असे समजून मनःस्ताप करून घेण्यात काही अर्थ नसतो.
प्रत्येकाने स्वतःची प्रकृती पाहून, स्वतःचे वजन पाहून, वात-पित्त-कफदोषांचा विचार करून केव्हा, कधी व कसा उपवास करायचा हे ठरविणे आवश्‍यक असते. मित्र उपवास करतो आहे म्हणून वा परमेश्‍वराकडून वर मिळण्याच्या लोभाने उपवास करणे काही खरे नव्हे. उपवास करणे याचा अर्थ काही न खाता उलट अधिक काम करणे व असावधातनेने इकडे-तिकडे भटकणे ही गोष्ट निंद्य समजली पाहिजे. सावधानता, सजगता, आत्मचिंतन, नामजप, भक्ती, सेवा असे सर्व करून नंतर अन्न बनविण्यात, जेवण्यात व नंतर पचविण्यात वेळ जाऊ नये म्हणूनही उपवासाच्या दिवशी खाण्या-पिण्यावर निर्बंध असावा. खाण्या-पिण्यावर निर्बंध पाळत असताना उपवासाचे निरनिराळे पदार्थ सेवन करून जिभेचे चोचले पुरवायचे असे उपवास बरोबर नाही.
कितीही शपथ घेऊन उपवासाचे व्रत घेतलेले असले तरी वृद्ध वा आजारी व्यक्‍तींनी उपवास न करणेच श्रेयस्कर असते. अशांनी डॉक्‍टरांचा सल्ला घेऊनच उपवास करावा.
धार्मिक संकल्पनेवर आधारित हरतालिका, वटपौर्णिमा, ऋषिपंचमी वगैरे उपवासही स्त्रिया करतात. धार्मिकता हा सर्व अंधविश्‍वास आहे, त्यात काही अर्थ नाही असा विचार करून काहीच न करण्यापेक्षा अशा दिवशी उपवास करून फायदा करून घ्यायला हरकत नसावी. एकूणच उपवासाचे महत्त्व खूप आहे. कारण त्याची फलश्रुती आहे आत्मदर्शन, आत्मवास व परमशांती. उपवासामुळे आत्मयोग साध्य होतो आणि शरीर, मन व आत्म्याचे संतुलन होते. एकूण, उपवासाचे महत्त्व अवर्णनीय आहे.
डॉ. श्री बालाजी तांबे
आत्मसंतुलन व्हिलेज, कार्ला 410 405

No comments:

Post a Comment

ad