Friday, December 10, 2010

संतानयोग

डॉ. श्री बालाजी तांबे

संतती म्हणजे सातत्य, तर संतान म्हणजे धागा, सातत्य टिकविणारा तंतू. आपला वारसा पुढे चालावा म्हणजेच पुढच्या पिढीच्या रूपात आपले अस्तित्व कायम राहावे ही प्रेरणा, निसर्गात टिकून राहण्याची ऊर्मी प्रत्येक सजीवात असते आणि म्हणूनच निसर्गाचे चक्र चालू राहते. किडा-कीटकांपासून, वनस्पती, प्राणी, मनुष्य सर्वांनाच निसर्गतःच पुनरुत्पादनाची ओढ असते. म्हणूनच संतानयोग शतकानुशतकापासून चालत राहतो.
संतती, संतान हे दोन्ही शब्द खूप अर्थपूर्ण आहेत. संतती म्हणजे सातत्य, निरंतरत्व तर संतान म्हणजे धागा, सातत्य टिकविणारा तंतू. आपला वारसा पुढे चालावा म्हणजेच पुढच्या पिढीच्या रूपात आपले अस्तित्व कायम राहावे ही प्रेरणा, निसर्गात टिकून राहण्याची ऊर्मी प्रत्येक सजीवात असते आणि म्हणूनच निसर्गाचे चक्र चालू राहते. किडा-कीटकांपासून, वनस्पती, प्राणी, मनुष्य सर्वांनाच निसर्गतःच पुनरुत्पादनाची ओढ असते. म्हणूनच संतानयोग शतकानुशतकापासून चालत राहतो.
संतानयोग साधण्यासाठी म्हणजेच संपन्न, निरोगी अपत्याचा जन्म होण्यासाठी आयुर्वेदाने काही आवश्‍यक गोष्टी सांगितल्या आहेत.

वीर्यलक्षणे
* पुरुषस्य अनुपहतरेतसः - पुरुषाचे वीर्य निर्दोष असावे. शुद्ध वीर्याची लक्षण पुढीलप्रमाणे असतात,
तत्सौम्यं स्निग्धं गुरु शुक्‍लं मधुगन्धि मधुरं पिच्छिलं बहु बहलं घृततैलक्षौद्रान्यतमवर्णं च शुक्रं गर्भाधानयोग्यं भवति ।
...अष्टांगसंग्रह शारीरस्थान

जे शुक्र सौम्य, स्निग्ध, जड, पांढऱ्या रंगाचे, मधासारख्या गंधाचे, मधुर, बुळबुळीत, मात्रेने अधिक, तूप-तेल किंवा मधाच्या वर्णाचे असते ते गर्भधारणेसाठी योग्य असते.

वीर्याचे प्रमाण, वीर्यातील शुक्राणूंची संख्या, शुक्राणूंची बीजांडापर्यंत पोचण्याची क्षमता या सर्व गोष्टी व्यवस्थित असल्या, पुरुषाच्या प्रजननसंस्थेत कोणत्याही प्रकारचा दोष नसला तर गर्भधारणा होणे शक्‍य असते.

शुद्ध आर्तवाची लक्षणे
* स्त्रियाश्‍च अप्रदुष्टयोनिशोणितगर्भाशयाया - स्त्रीची प्रजननसंस्था, विशेषतः गर्भाशय व बीजांड निर्दोष असावे. शुद्ध आर्तवाची लक्षणेही आयुर्वेदात सांगितलेली आहेत,
मासान्निष्पिच्छदाहार्ति पञ्चरात्रानुबन्धि च ।नैवातिबहुलात्यल्पमार्तवं शुद्धमादिशेत्‌ ।।
शशासृक्‌ प्रतिमं यच्च यद्वा लाक्षारसोपमम्‌ ।तदार्तवं प्रशंसन्ति यच्चाप्सु न विरज्यते ।।...माधवनिदान
जे आर्तव (पाळीतील रक्‍तस्राव) दर 28 दिवसांनी येते, चार-पाच दिवस टिकते, ज्यात कोणत्याही प्रकारचा चिकटपणा किंवा गाठी नसतात, जे बाहेर पडताना जळजळ वा वेदना होत नाहीत असे आर्तव शुद्ध समजावे. तसेच अधिक प्रमाणात किंवा खूप अल्प प्रमाणात नसणारे आणि गर्भाशयाची शुद्धी करणारे आर्तव शुद्ध असते. आर्तव शुद्ध आहे की नाही हे समजण्यासाठी एक चाचणीही सांगितली आहे. सुती कापडावरचा आर्तवाचा डाग नुसत्या पाण्याने धुतल्यास समूळ धुतला जायला हवा, असे आर्तव शुद्ध असते. याउलट जर ते नीट धुतले गेले नाही, खाली पिवळट वगैरे डाग राहिला तर ते अशुद्ध समजले जाते.
याशिवाय बीजांड वेळेवर तयार होते आहे, योनीमधून पांढरे पाणी वा तत्सम स्राव होत नाही, मूत्रमार्गात वा योनिमार्गात जंतुसंसर्ग होण्याचा त्रास नाही अशा परिस्थितीत स्त्री गर्भधारणेसाठी सक्षम समजली जाते.

गर्भधारणा : काल व संस्कार
* संसर्गः ऋतुकाले - ऋतुकाळ म्हणजे रजोदर्शनापासून सोळाव्या रात्रीपर्यंतचा काळ. ऋतुकाळातील उत्तरोत्तर दिवसात म्हणजे रजोदर्शनापासून 12, 13, 14, 15, 16 या दिवसात स्त्री-पुरुषाचा संबंध आला असता गर्भधारणा होऊ शकते. यातही जितक्‍या पुढच्या दिवशी गर्भधारणा होईल तितकी गर्भाची शक्‍ती चांगली असते.

तासु उत्तरोत्तरमायुरारोग्यैश्‍वर्य सौभाग्यबलवर्णेन्द्रिय सम्पद्‌ अपत्यस्य भवति ।...अष्टांगसंग्रह शारीरस्थान
उत्तरोत्तर दिवशी गर्भ राहिल्यास तो अधिकाधिक आरोग्य, ऐश्‍वर्य, सौभाग्य, बल, वर्ण, गुणवान, इंद्रियांनी संपन्न असतो आणि ऋतुकाळ संपल्यावर म्हणजे 16व्या रात्रीनंतर गर्भधारणा झाल्यास संततीमध्ये आरोग्य, बल वगैरे गोष्टी कमी कमी होत जातात.

* शुक्रशोणितसंसर्गमन्तर्गर्भाशयगतं जीवो।
रक्रामति सत्त्वसंप्रयोगात्‌ -
शुक्राणू व बीजांड यांचा जेव्हा गर्भाशयात संयोग होतो आणि त्याचवेळी मनयुक्‍त जीवही गर्भात प्रवेश करतो तेव्हा गर्भधारणा होऊ शकते.
या ठिकाणी "जीव', तोही "मनाने युक्‍त असणारा जीव' महत्त्वाचा असतो. गर्भधारणा होण्यासाठी केवळ स्त्रीबीज व पुरुषबीजाचा संयोग पुरेसा नसतो तर त्याला जिवाची जोड मिळणे आवश्‍यक असते. म्हणून आयुर्वेदात "गर्भाधान संस्कार' सांगितला आहे. या संपूर्ण संस्कारात मनाच्या सहभागाला फार महत्त्व दिले आहे.

इच्छेतां यादृशं पुत्रं तद्रूपचरितांश्‍च तौ ।चिन्तयेतां जनपदांस्तदाचारपरिच्छदौ ।।...अष्टांगसंग्रह शारीरस्थान
स्त्री-पुरुषांचे मन ज्या प्रकारच्या भावांनी युक्‍त असेल त्याचा मोठा प्रभाव गर्भधारणेवर असतो. गर्भधारणेच्या आधी स्त्री-पुरुषाची मानसिक स्थिती, गर्भधारणेच्या वेळी मनात येणारे विचार यांचा गर्भधारणेवर मोठा परिणाम होत असतो म्हणून स्त्री-पुरुषांनी प्रसन्न मनाने, प्रसन्न वातावरणात शुद्ध स्थानऊर्जा असणाऱ्या ठिकाणी गर्भाधानास प्रवृत्त व्हावे असे आयुर्वेदात सुचविलेले आहे.

* सात्म्यरसोपयोगात्‌ सम्यक्‌ उपचारैश्‍चोपर्यमाणः अरोगः अभिवर्धते
- गर्भधारणा झाली की गर्भवतीने प्रकृतीला अनुकूल आहाराचे सेवन करण्याने आणि गर्भिणी परिचर्येचे व्यवस्थित पालन करण्याने गर्भ निरोगी राहतो आणि गर्भाशयात व्यवस्थित वाढू लागतो. गर्भधारणा झाली की स्त्रीची खरी जबाबदारी सुरू होते. गर्भवती स्त्री जसे वागेल, जे खाईल-पिईल, जे ऐकेल, जे विचार करेल त्या सर्व गोष्टींचा गर्भावर प्रभाव असतो आणि म्हणूनच संतानयोग व्यवस्थित सिद्ध होण्यासाठी गर्भावस्था महत्त्वाची असते. योग येणे, योगायोग असे शब्दप्रयोग आपण करतो. संतानयोग हा खरोखर 'योग'च असतो. मनात आले, स्त्रीबीज-पुरुषबीजाचा संयोग झाला की लगेच त्यातून संतानोत्पत्ती होईल असे नाही. किंबहुना हा योग जितका चांगल्या प्रकारे जुळून येईल, गर्भधारणा होण्यापूर्वी जेवढी चांगली पूर्वतयारी केलेली असेल तितकी गर्भधारणा होणे सोपे असते आणि संपन्न, निरोगी संतती जन्माला येऊ शकते.

संतानयोग जुळून यावा म्हणून...
संतानयोग जुळून यावा म्हणून, गर्भधारणेला अनुकूल वातावरण तयार व्हावे म्हणून आयुर्वेदात अनेक उपाय दिलेले आहेत. त्यातील काही महत्त्वाचे उपाय पुढीलप्रमाणे -
शरीरशुद्धी - स्त्रीबीज व पुरुषबीज निरोगी हवे असतील तर त्यासाठी मूळ स्त्री-पुरुष निरोगी हवेत. आरोग्यासाठी आणि स्त्रीबीज, पुरुषबीजाची संपन्नता वाढविण्यासाठी सुद्धा स्त्री-पुरुषांचे शरीर शुद्ध असणे महत्त्वाचे असते. या शिवाय शरीरशुद्धीमुळे स्त्री-पुरुषांची इंद्रिये प्रसन्न व्हायला मदत मिळते, त्यांच्यातील आकर्षण वाढायला मदत मिळते आणि या सर्वांचा गर्भधारणा होण्यास निश्‍चितच उपयोग होतो.

रसायन सेवन - स्त्रीबीज व पुरुषबीज गर्भधारणेसाठी सक्षम बनण्यासाठी शुक्रधातू संपन्न असणे आवश्‍यक असते आणि त्यासाठी रसायने उत्तम असतात. शरीरशुद्धी झालेली असली की रसायने अधिकच प्रभावीपणे काम करू शकतात.

प्रकृती व्यवसाय वगैरे गोष्टी लक्षात घेऊन रसायन गुणांनी युक्‍त औषधे, कल्प, प्राश वगैरेंची योजना करता येते. सर्वसाधारणपणे पुरुषासाठी "चैतन्य कल्प', "आत्मप्राश'सारखी रसायने, गोक्षुरादी चूर्ण वगैरे उत्तम असतात; तर स्त्री शतावरी कल्प, "सॅनरोझ'सारखे रसायन, "पित्तशांती गोळ्या', "प्रशांत चूर्ण' वगैरेंचे सेवन करू शकते. सुवर्णवर्ख, केशर युक्‍त पंचामृत, भिजविलेले बदाम नियमित सेवन करणेही उत्तम असते.

संगीत - निरोगी बीजांड तयार व्हावे, हॉर्मोन्सचे संतुलन टिकावे, विशेषतः स्त्री संतुलन कायम राहावे यासाठी स्त्रीने काही विशेष संगीतरचना ऐकाव्यात असे शास्त्रात सांगितले आहे. वेदमंत्र, वीणावादन, विशिष्ट रागात बद्ध केलेल्या रचना यामुळे स्त्रीसंतुलन साध्य करता आले की त्याचीही गर्भधारणेला मदत मिळते.

मानसिक प्रसन्नता - सौमनस्यं गर्भधारणाम्‌ म्हणजे गर्भधारणा होण्यासाठी मन स्वस्थ असणे, मन प्रसन्न असणे आवश्‍यक असते असे सांगितले आहे. स्त्री-पुरुषांमध्ये तर प्रेमभाव असावाच पण एकंदर संपूर्ण कुटुंबामध्ये आपुलकीची भावना असली तर ती गर्भधारणेस पूरक ठरते.

अशा प्रकारे खऱ्या अर्थाने संतानयोगाची परंपरा पुढे न्यायची असेल, म्हणजे आपल्यातील गुण पुढच्या पिढीत जावेत, दोष मात्र मागे राहावेत अशी इच्छा असेल तर पूर्वनियोजित गर्भधारणाच हवी. आयुर्वेदीय गर्भसंस्कारांच्या मदतीने हे प्रत्यक्षात आणणे सहज शक्‍य आहे.

---- Ayurveda, Vastu shastra, healthy Food, Healthy Living, Abstract India, Shree Balaji Tambe, India, Yoga, Meditation, Life Style, Marathi Blog

1 comment:

 1. Hi,
  We have read few of your posts and your blog is simply amazing. Thus we are leaving this comment.
  Blogjunta.com is hosting the first of its kind Best of Indian Blogopshere 2010 polls. Do particiapte in it.
  To know more visit www.blogjunta.com

  P.S: Sorry we were not able to locate your mail ID hence dropping a note here.
  Drop us a mail at blogjunta(at)gmail(dot)com


  Yours Bloggingly,
  Team Blogjunta

  ReplyDelete

ad