Wednesday, October 13, 2010

संधिवात

डॉ. ह. वि. सरदेसाई
संधिवात आणि संबंधित विकारांनी ग्रस्त असणाऱ्या रुग्णांची संख्या खूप मोठी असते. डॉक्‍टरांकडे जाणाऱ्या दर पाच रुग्णांपैकी एका रुग्णाला संधिवात अथवा संबंधित विकाराने त्रास झालेला असतो. हे आजार अनेक प्रकारे रुग्णाला हतबल करू शकतात. त्यातल्या त्यात आशेचा किरण म्हणजे अपंगत्वाला कारणीभूत असणारे सांधे आता शस्त्रक्रियेच्या पद्धतीने बदलता येतात. त्यामुळे वेदनेवर मात करता येते आणि हालचाल शक्‍य होते. गुडघे, खुबे, खांदे, कोपरे, बोटांतील सांधे हे सर्व आता बदलता येतात. संधिवाताचे अनेक प्रकार असू शकतात. त्यातल्या त्यात दोन प्रकार महत्त्वाचे समजले जातात. पहिल्या प्रकाराला ऱ्हुमॅटॉइड (rheumatoid) म्हणतात व दुसऱ्याला ऑस्टियोआर्थ्रायटिस (asteoarthrits) असे नाव दिले जाते. हे दोन्ही प्रकार दीर्घसूत्री असतात.

म्हणजे जवळजवळ कायम स्वरूपाचे असतात. याउलट इतर काही प्रकारच्या संधिवातात आजार फार काळ टिकत नाही. उदाहरणार्थ - रिऍक्‍टिव्ह (reactive) प्रकारचा आजार काही काळाने संपूर्ण जातो. ऱ्हुमॅटॉइड आणि ऑस्टियोआर्थ्रायटिस या प्रकारात तीव्रता कमी-जास्त होत राहते. कधी कधी नैसर्गिक भरती-ओहोटीमुळे पूर्णपणे वेदनामुक्ती मिळू शकते. हा फायदा करीत असणाऱ्या उपचारांचा परिणाम आहे, का उपचारांशिवाय घडणाऱ्या नैसर्गिक परिक्रमांचा भाग आहे, हे अशा एखाद्या रुग्णाच्या अनुभवावरून ठरविणे कठीण असते. अनेक रुग्णांवर उपचार करताना व तितक्‍याच रुग्णांवर उपचार न करताना केलेल्या तपासणींच्या नोंदींवर आढळलेल्या माहितीवर संख्याशास्त्रीय अभ्यासानेच ठरविता येते (Statistically significant results).

ऱ्हुमॅटॉईड संधिवात हा सतत वाढत जाणारा विकार असतो. सांधे दुखतात, सुजतात, सांध्यांत दाह होतो (inflammation),  हाता-पायांच्या बोटांतील सांधे, गुडघे, खांदे हे सांधे या आजारात अनेकांचे पकडले जातात. त्वचेत गाठी होतात. फुफ्फुसात व डोळ्यातदेखील दोष निर्माण होतात. सुरवात सांध्यांच्या हालचालीतील सफाई जाण्यापासून होते. सांधे दुखू लागतात. व्यक्तीला आपण बरे नाही, अशी भावना जाणवू लागते. आजार कोणत्याही वयात सुरू होऊ शकतो. लहान वयापासून (वय 5 ते 10 वर्षे) ते तारुण्य व प्रौढ वयातदेखील (30 ते 50) सुरू होताना आढळतो. प्रत्येक सांध्याच्या आवरणाच्या आतल्या बाजूने एक अस्तर असते. त्याला सायनोव्हियम (Sinovium)  म्हणतात. आजाराची सुरवात या अस्तराच्या दाहाने होते. आजाराला या स्थितीत रोखले नाही तर तो या अस्तराच्या पलीकडील हाडांना इजा पोचवू शकतो. दाह शमविणे, वेदना ताब्यात आणणे आणि पुढची गुंतागुंत टाळणे हे उपचाराचे ध्येय असते. याकरता दाह शमविणारी औषधे वापरतात. फिजिओथेरपीचा (Physiotherapy) वापर केला जातो (बर्फाचा शेक, डायाथर्मी, सांध्यांना विश्रांती, योग्य व्यायाम). एखाद्या रुग्णात सांधा बदलावाही लागतो. हा ऱ्हुमॅटॉईड प्रकारचा संधिवात का होतो, या प्रश्‍नाचे उत्तर आज ठाऊक नाही. आपल्या शरीराच्या प्रतिकारशक्तीच्या काही भागातील काही गफलतीमुळे आपल्याच शरीरातील पेशींविरुद्ध प्रतिपिंडे (antibodies) तयार होऊ लागल्याने असे होते. या विकाराने ग्रस्त झालेली माणसे अनेकदा रक्ताच्या नात्याची असतात. त्यामुळे या आजारात काही जनुकीय वारसा असावा असे शास्त्रज्ञांना वाटते.

उलटपक्षी ऑस्टियोआर्थ्रायटिस हा विकार शरीराच्या झिजेतून निर्माण होतो. सांध्याच्या रचनेत दोन हाडांच्या मध्ये कुर्चा असते. अतिवापरामुळे ही कुर्चा झिजून जाते. हाडांच्या टोकांना इजा होण्यापासून बचावण्याचे कार्य आता होत नाही. सांध्यांना व हाडांना सारखे धक्के बसू लागतात. वाढत्या वयात ही झीज अधिकच प्रकर्षाने होऊ लागते. या धक्‍क्‍यांना थांबविण्यासाठी सांध्यांच्या कडेने नवीन हाडे तयार होतात. त्यांना स्पर्स (Spurs) म्हणतात. या आजाराची सुरवात प्रौढ वयात होते. गुडघे, खुबे, पाठीचा कणा व हातापायांची बोटे येथील सांधे लवकर झिजू लागतात. एखाद्या सांध्याला इजा झाली किंवा त्या भागावर अतिरेकी ताण पडला तर हा आजार शरीराच्या कोणत्याही सांध्यात होऊ शकतो. अतिरेकी वजनामुळेदेखील वजन वाहून नेणाऱ्या भागांवर आता ताण पडतो. सुदैवाने ऑस्टियोआर्थ्रायटिसच्या रुग्णातील 50 टक्‍क्‍यांहून अधिक रुग्णांना सुरवातीच्या वेदनेतून सुटका मिळाल्यानंतर कित्येक वर्षे वेदनारहित कालखंड मिळतो.

या दोन महत्त्वाच्या प्रकारांखेरीज अनेक इतर प्रकारचे संधिवात असू शकतात. सुरवातीला उल्लेखलेला रिऍक्‍टिव्ह प्रकारचा संधिवात हा शरीरात अन्यत्र कोठेतरी जिवाणू अगर विषाणूंमुळे झालेल्या जंतुसंसर्गाला शरीराने दिलेला प्रतिसाद (रिऍक्‍शन) असतो. मूळ आजार शमल्यावर हा प्रतिसादही जातो. सेप्टिक (Septic)  प्रकारच्या संधिवातात प्रत्यक्ष सांध्यातच जिवाणू अगर विषाणूमुळे जंतुसंसर्ग होतो. काही जिवाणूंविरुद्ध प्रभावी प्रतिजैविके (अँटिबायोटिक्‍स) वापरून आजार आटोक्‍यात आणता येतो. गाऊट (gaut) नावाच्या आजारात रक्तात युरिक ऍसिड नावाचा घटक वाढतो. युरिक ऍसिडचे स्फटिक सांध्यात जमतात, त्यामुळे सांधा सुजतो, दाह होतो, तीव्र वेदना होतात. ऍलोप्युरिनॉल (allopurinol) नावाच्या औषधाने गाऊट या विकारावर चांगला ताबा ठेवता येतो. पायाच्या अंगठ्याला गाऊटचा त्रास होणे या आजारात नेहमी आढळते. काही आजार आपल्या शरीरातील बंध व आवरणे या पेशींना होतात (connective tissue). यांना कोलॅनन डिसऑर्डर्स (collagen disorders) म्हणतात. शरीरातील कोणतेही सांधे धरले जाऊ शकतात. पाठीच्या कण्यातील मणक्‍यांमधील सांधे धरले (ankylosing spondylitis) तर कणा एखाद्या बांबूसारखा ताठ होतो (Bomboo spine). रुग्णाच्या तक्रारींचे स्वरूप, तपासून आढळणारी लक्षणे, रक्ताच्या तपासण्या, क्ष किरण वापरून काढलेले फोटो, एमआरआय स्कॅन्स इत्यादींमुळे संधिवाताचे निदान करता येते.

संधिवाताचे उपचार करणाऱ्या तज्ज्ञांना ऱ्हुमॅटॉलॉजिस्ट (rheumatologist) म्हणतात. प्रत्येक रुग्णाची व्यवस्थित छाननी करून उपचार ठरवावा लागतो. योग्य औषधे आणि फिजिओथेरपी यांचा वापर गुणकारी ठरतो. काही रुग्णांत शस्त्रक्रिया आवश्‍यक होते. सांधे औषधोपचारांनी बरे होण्यापलीकडे गेलेले असले तर ते बदलण्याने जीवन खूपच सुकर होऊ शकते. अनेक प्रकारची औषधे संधिवातावर वापरली जातात. पॅरॅसिटॅमॉल (paracetamol) हे औषध वेदनाशामक म्हणून वापरले जाते. नॉन स्टिरॉयडल अँटी इन्फ्रमेटरी एजंट्‌स (Non Steraidal Anti Inflammatary agents) या प्रकारच्या औषधांमुळे सूज कमी होते. हालचालीतील सफाई वाढते. वेदनाही कमी होते. या औषधांचा वापर करताना या उपचारांच्या नको असणाऱ्या गुणधर्मांवर (side-effects) लक्ष ठेवावे लागते. जठराच्या अस्तराचा दाह होणे संभवते. या दृष्टीने कोणाही व्यक्तीने डॉक्‍टरांच्या सल्ल्याखेरीज अशी औषधे घेऊ नयेत. दीर्घ काळ सेवनाने जठराच्या अस्तरात जखमा होऊ शकतात. या जखमांतून सातत्याने रक्त झिरपत जाते व रक्तक्षय होतो. शिवाय काहींच्या यकृतावर, काहींच्या मूत्रपिंडावर, काहींच्या हृदयाच्या स्नायूंवर विपरीत परिणाम होतो. ही औषधे तज्ज्ञांच्या सल्ल्यानेच, त्यांच्या नजरेखालीच घेतली पाहिजेत. काही औषधांच्या वेळेवर केलेल्या योजनेमुळे ऱ्हुमॅटॉइड संधिवाताची वाढ रोखता येते. या प्रकारातील औषधे आपल्या प्रतिकारशक्तीतील प्रतिपिंडनिर्मितीच्या यंत्रणेवर नियंत्रण घालतात. काहींत सुवर्णाच्या अणूचा वापर केला जातो. मलेरिया या आजारावर गुणकारी ठरलेले क्‍लोरोक्विन वापरले जाते. पेनिसिलमाईन व सल्फाझाल्पाझिनदेखील उपयुक्त असल्याचे आढळलेले आहे. कॉटिकोस्टेरॉइड्‌स ही औषधे प्रभावी असतात, पण त्यांचे नको असणारे परिणामही घातक ठरू शकतात. नव्या संशोधनाची दि
शा ट्यूमर नेक्रोसिस फॅक्‍टर (Tumor necrosis Factor)या रेणूला निष्प्रभ करणारे रेणू वापरण्याच्या बाजूने आहे. हायब्युटॉनिक ऍसिडचा वापर आणि बी पेशींविरुद्ध कार्य करणारे रेणू शोधणे या नव्या संशोधनाच्या वाटा आहेत.
---- Ayurveda, Vastu shastra, healthy Food, Healthy Living, Abstract India, Shree Balaji Tambe, India, Yoga, Meditation, Life Style, Marathi Blog

No comments:

Post a Comment

ad