Friday, July 24, 2009

खाल तसे व्हाल!

प्रकृती उत्तम राहण्यासाठी अन्न उत्तम हवे. उत्तम म्हणजे नेमके कसे, याचे आयुर्वेदात विवेचन केलेले आहे.
खाल तसे व्हाल' असे आपण नेहमीच ऐकतो. पण, आयुर्वेदाच्या संदर्भात हे अधिकच खरं आहे. अन्नावर बाह्य शक्तींचा प्रभाव पडत असतो आणि त्यामुळे अन्नात काही दोष निर्माण झाल्यास ते खाणाऱ्या व्यक्तीला त्याचा त्रास होतो.
शिजवलेले अन्न विशेषकरून अधिक संवेदनशील असते आणि त्यात वातावरणातल्या नकारात्मक शक्ती शोषल्या जाऊ शकतात. म्हणून शिजवलेले अन्न ग्रहण करताना अत्यंत सावध असायला हवे. ते अन्न कोणी शिजवलेले आहे, कसे शिजवले आहे आणि कोणी ते वाढले आहे या साऱ्या घटकांचा त्यात विचार करावा लागतो. प्राचीन काळी स्वयंपाक्‍यांना "महाराज' म्हणत आणि त्यांना बराच मान असे. अन्नाला तेव्हा खूप महत्त्व दिलं जात असे कारण व्यक्तीचे संपूर्ण व्यक्तिमत्त्व, प्रकृती ती कोणते अन्न ग्रहण करते यावरच अवलंबून असते.
आयुर्वेदात "अन्नयोग' ही संकल्पना आहे. म्हणजे अन्न शिजविण्याची आणि वाढण्याची संस्कृती. स्वयंपाक्‍याने स्वयंपाकघरात प्रवेश करण्यापूर्वी हात-पाय स्वच्छ धुतलेले असायला हवेत आणि सेवेच्या भावनेने आपल्या कामाला सुरूवात करायला हवी. यामुळे तो स्वयंपाकी अन्नामध्ये प्रेम आणि सकारात्मक शक्तीचा संचार घडवून आणू शकतो. अशा अन्नामुळे ते ग्रहण करणाऱ्याला आनंद मिळेल आणि त्याच्या ते अंगी लागेल.
ठराविक व्यक्तींनीच अन्न शिजवण्याचे आणि वाढण्याचे काम करायला हवे. अनेकांनी स्वयंपाकघरात लुडबूड करता कामा नये. आधुनिक बुफे किंवा स्वतःच वाढून घेण्याच्या पद्धतीच्या हे अगदी विरुद्ध आहे. ठराविक व्यक्तींनीच अन्न शिजविणे आणि वाढण्याचे काम केले म्हणजे केवळ अन्न आरोग्यपूर्ण राहते असे नव्हे, तर वेगवेगळ्या शक्तींचा गोंधळ उडण्याचा धोकाही त्यामुळे नष्ट होतो.
भात, वरण, भाजी, पोळी असे शिजवलेले अन्न नेहमी झाकून ठेवलेले असावे. त्याने बाहेरील नकारात्मक शक्तींचा प्रवेश टाळला जाऊ शकतो. व्यक्त-अव्यक्त इच्छा-आकांक्षांचा अन्नावर परिणाम होतो. तो दिसत नसला तरी अन्नावर आणि पर्यायाने ते ग्रहण करणाऱ्यावर त्याचा प्रभाव दिसतो.
शिजवलेले अन्न चविष्ट असते. त्यामुळे ते ग्रहण करताना अधिकच सावधगिरी बाळगायला हवी. अन्न ग्रहण करायचे स्थान आरोग्यपूर्ण असावे, तेथे अन्न वाढताना विशेष खबरदारी घ्यावी, आदी साऱ्या बाबींकडे बारकाईने लक्ष पुरवायला हवे. क्रोधी, खिन्न, विचलित किंवा आक्रमक मनःस्थितीत असलेल्या माणसाने तयार केलेल्या स्वयंपाकावर तशाच प्रवृत्तींचा परिणाम झालेला दिसून येतो. दूध, दही, पक्व फळे, सुका मेवा आणि साबूदाणे, लाह्या, मक्‍याच्या लाह्या यासारख्या वाळवलेल्या धान्यांवर नकारात्मक शक्तींचा परिणाम होत नाही. त्याचमुळे उपवासकाळातही हे पदार्थ खाण्यास परवानगी असते. या अन्नावर नकारात्मक शक्तींचा प्रभाव नसल्याने ते कमीत कमी विचलन उत्पन्न करतात. त्यामुळे या अन्नाला "सात्त्विक' अन्न म्हणतात. फळे आणि दूध मात्र कधीही एकत्र घेऊ नयेत.
डॉ. श्री बालाजी तांबे

No comments:

Post a Comment

ad