Showing posts with label सौंदर्य. Show all posts
Showing posts with label सौंदर्य. Show all posts

Tuesday, August 30, 2011

उपवर

आरोग्याची काळजी लग्न ठरल्यावर नव्हे, तर "उपवर' वयापासूनच घ्यायला हवी. मुलगा-मुलगी या दोघांचेही आरोग्य जितके चांगले, तितके लग्नानंतरचे सहजीवन सोपे असणार, हे वेगळे सांगायची गरज नाही. आज आपण हरतालिकेच्या निमित्ताने "उपवर' वयातील मुलीने आरोग्याची काळजी कशी घ्यावी, याची माहिती घेणार आहोत.

उपवर म्हणजे विवाहयोग्य, लग्नासाठी तयार. लग्न ठरले, की लग्नाची तयारी, धावपळ हे सगळे जोरात सुरू होते. लग्नाचा समारंभ सुखरूप पार पडावा म्हणून घरातील प्रत्येक जण आपापल्या परीने झटत असतो; मात्र या सगळ्यात आरोग्याकडे दुर्लक्ष करून चालत नाही, त्यातही स्वतः नवऱ्या मुलीने तर आरोग्यासाठी खूपच दक्ष राहणे आवश्‍यक असते.

अर्थात आरोग्याची काळजी लग्न ठरल्यावरच नाही तर "उपवर' वयापासूनच घ्यायला हवी. मुलगा-मुलगी या दोघांचेही आरोग्य जितके चांगले, तितके लग्नानंतरचे सहजीवन सोपे असणार, हे वेगळे सांगायची गरज नाही. आज आपण हरतालिकेच्या निमित्ताने "उपवर' वयातील मुलीने आरोग्याची काळजी कशी घ्यावी, याची माहिती घेणार आहोत.

"उपवर' वयात मुलीला सौंदर्य सर्वांत अधिक हवेहवेसे वाटणे स्वाभाविक आहे. पण खऱ्या सौंदर्याला आरोग्याची जोड असणे आवश्‍यक असते. मेक-अपच्या साह्याने त्वचेवर उसना उजळपणा आणता आला, तरी उपवर वयात आणि लग्नानंतरही त्वचेची सतेजता, लवचिकता, घट्टपणा, मृदुता या गोष्टी अधिक महत्त्वाच्या असतात. एखाद्या दिवशी केसांची स्टाइल करता आली तर एरवी रेशमी, निरोगी केसच खरी साथ देणार असतात. डोळे, नखे, ओठ या सर्वच गोष्टी सजवता आल्या तरी मुळात निरोगी असाव्याच लागतात. त्यासाठी "उपवर' वयापासून स्वतःकडे लक्ष देणे भाग असते.
सौंदर्यासाठी महत्त्वाच्या अशा शरीर अवयवांच्या आरोग्याची जोपासना कशी करावी, हे थोडक्‍यात याप्रमाणे सांगता येईल. मुलगा व मुलगी या दोघांनाही पुढील उपचारांचा फायदा होईल.

1. त्वचा - आयुर्वेदाने त्वचेला हितकर अशी "वर्ण्य' द्रव्ये सांगितलेली आहेत. अनंतमूळ, हळद, चंदन, कोरफड, नागरमोथा, पद्मकाष्ठ, कोष्ठ वगैरे वनस्पती त्वचेची कोमलता व मृदुता कायम ठेवतात, शिवाय त्वचेचे पोषण करून त्वचा उजळण्यास, घट्ट राहण्यास व निरोगी राहण्यास मदत करतात. प्रकृतीनुसार जशी स्निग्ध, कोरडी किंवा मिश्र स्वरूपात त्वचा असेल, त्यानुसार या वर्ण्य द्रव्यांची निवड करून विशेष पॅक किंवा उटणी, उदा. "सॅन वात फेस पॅक', "सॅन पित्त फेस पॅक', "सॅन मसाज पावडर' लेप बनवता येतात व त्यांचा नियमित वापर करण्याने त्वचेचे सौंदर्य तसेच आरोग्यही कायम राहू शकते.
त्वचा वातदोषाचे स्थान आहे व त्वचेच्या सौंदर्यासाठी, आरोग्यासाठी हा वातदोष संतुलित राहणे आवश्‍यक असते. अभ्यंग हा उपचार यासाठी उत्तम असल्याने नियमित अभ्यंग करण्याने त्वचा सतेज, कोमल, दृढ व निरोगी राहते.

2. केस - वर्ण्य द्रव्यांप्रमाणेच आयुर्वेदाने केसांना हितकर असणारी "केश्‍य' द्रव्ये सांगितलेली आहेत. ही द्रव्ये केस धुण्यासाठी तसेच डोक्‍यावर लेप करण्यासाठी वापरता येतात. उदा. शिकेकाई, रिठा, नागरमोथा वगैरे द्रव्ये केसांची हानी न करता त्यांना स्वच्छ करणारी असतात. कोरफड, मेंदी, जास्वंदसारख्या वनस्पतींमुळे केस मऊ, रेशमी होण्यास मदत मिळते. आयुर्वेदामध्ये केस लांब होण्यासाठी, केस पांढरे होऊ नयेत यासाठी विशिष्ट लेप सांगितले आहेत. केसांचे सौंदर्य तसेच आरोग्य टिकविण्यासाठी केसांचे धूपन करण्याचीही पद्धत आहे.
केस हाडांशी संबंधित असतात व हाडांवर वातदोषाचा प्रभाव असतो. वातदोष बिघडवण्यात, तसेच डोक्‍यात उष्णता वाढल्यास केसांच्या अनेक तक्रारी उद्भवू शकतात. त्यामुळे डोक्‍याला केश्‍य द्रव्यांनी सिद्ध केलेले व शीतल गुणधर्माचे तेल लावणे चांगले असते. "संतुलन व्हिलेज हेअर तेला'सारखे तेल नियमित लावण्याने केसांचे पोषणही होते.

3. डोळे - डोळ्यांच्या सौंदर्यासाठी करावयाच्या बाह्य उपचारांमध्ये महत्त्वाचे म्हणजे काजळ. याने डोळे स्वच्छ होतात, जंतुसंसर्ग होण्यास प्रतिबंध होतो व डोळ्यांचे आरोग्य टिकून राहते. मोतीभस्म, त्रिफळा घृत वगैरेंनी युक्‍त "सॅन अंजना'सारखे काजळ असले, तर त्यामुळे डोळ्यांवरचा ताण दूर होऊन डोळे तेजस्वी राहण्यासाठी मदत मिळते. आठवड्यातून एक - दोन वेळा त्रिफळा, लोध्र वगैरे नेत्रशुद्धिकर द्रव्यांनी सिद्ध पाण्याने डोळे धुतल्याने सुंदर व निरोगी राहण्यास मदत मिळते.

4. नखे - नखे काळजीपूर्वक कापणे आवश्‍यक असतेच, पण नखांच्या शेजारची त्वचा घट्ट व स्निग्ध राहणे आवश्‍यक असते. वाढलेले वय सर्वप्रथम हाताच्या बोटांवर समजते असे म्हणतात. नखे व आजूबाजूची त्वचा नीट राहण्यासाठी आठवड्यातून एक-दोन वेळा कोरफडीचा ताजा गर लावता येतो. लिंबाचा रस व मध यांचे मिश्रण काही वेळ लावून ठेवण्यानेही नखे, बोटे चांगली राहतात.

5. शरीरबांधा - बांधा सुडौल असणे हेही सौंदर्याचे एक लक्षण होय. बांधा प्रकृतीनुसार ठरत असला तरी तो सुबद्ध राहण्यासाठी प्रयत्न करता येतात. बाह्य उपचारांचा विचार करता अंगाला नियमितपणे तेल लावणे व उद्वर्तन (उटणे) लावणे हे बांध्याची सुबकता राखण्यास सहायक असते.

सौंदर्य व आरोग्यासाठी बाह्य उपचारांप्रमाणेच दोष-धातू-मलांच्या संतुलनासाठी काही विशेष औषधांचे व रसायनांचे सेवन करता येते.
नितळ, सतेज, त्वचेसाठी रक्‍तधातू शुद्ध व संपन्न असावा लागतो. त्यासाठी "वर्ण्य' औषधांचे सेवन करणेही हितावह असते. त्या दृष्टीने "संतुलन अनंत कल्प', "सॅन रोझ'सारखे रक्‍तवर्धक रसायन घेण्याचा उपयोग होताना दिसतो. केसांच्या आरोग्यासाठी हाडांची मजबूती आवश्‍यक असते. त्यासाठी प्रवाळपंचामृत, शौक्‍तिक भस्म, "कॅल्सिसॅन' "हेअर सॅन' वगैरे योग उपयुक्‍त असतात. नियमित दूध पिणे हेसुद्धा हाडांसाठी व पर्यायाने केसांसाठी उपयुक्‍त असते. डोक्‍यामध्ये कोंडा होणे, केसांची टोके दुभंगणे, केस निर्जीव भासणे, नखे तुटणे वगैरे त्रासांवर या प्रकारे आतून ताकद देण्याचा अधिक चांगला उपयोग होतो. सुबक बांध्यासाठी "शतावरी कल्प' घेणेही हितावह असते.

आचरणाचा विचार करता वेळेवर व पुरेशी झोप घेणे, नियमित वेळेला जेवणे, केस-डोळे-त्वचा यांना तीव्र ऊन फार वेळ लागू न देणे, दुपारी न झोपणे, मल-मूत्र वगैरे नैसर्गिक वेग बळेच धरून न ठेवणे या गोष्टी सांभाळणे जसे आरोग्यासाठी हितकर असते, तसेच सौंदर्यासाठीही हितकर असते.

स्त्रीच्या वा मुलीच्या सौंदर्यावर, आरोग्यावर तिच्या स्त्रीत्वाचा, संप्रेरकांच्या संतुलनाचा मोठा प्रभाव असतो. उपवर वयात तर संप्रेरके अतिशय संवेदनशील असतात. मानसिक, भावनिक बदलांचा या संप्रेरकांवर फार खोलवर परिणाम होत असतो. म्हणूनच उपवर वयात पाळी व्यवस्थित येण्याकडे खूप लक्ष द्यायला हवे. पाळीत अनियमितता असणे, पाळीच्या वेळी पोट दुखणे, पाठ-कंबर दुखणे वगैरे त्रास होत असले तरी बऱ्याचदा "लग्नानंतर सगळे ठीक होईल' अशी आशा बाळगली जाते. पण असे दुर्लक्ष करणे ही मुलीच्या आरोग्यासाठी, बऱ्याचदा प्रजननक्षमतेसाठीही खूप घातक ठरू शकते. म्हणून पाळी सुरू झाल्यापासून पाळीला कारणीभूत असणाऱ्या रसधातू-रक्‍तधातूच्या पोषणासाठी, संपन्नतेसाठी प्रयत्न करायला हवेत.

उपवर वयात मन भावनाप्रधान असते, म्हणावे तेवढे परिपक्व झालेले नसते. या वयात स्त्री-पुरुषात आकर्षण निर्माण होणे हेसुद्धा नैसर्गिक असते, पण अति मानसिक उत्तेजना किंवा निसर्गाच्या विरुद्ध, परंपरेने चालत आलेल्या अनुशासनाच्या विरुद्ध जाऊन चुकीचे काही तरी करण्याने आरोग्य व सौंदर्य या दोघांवर दुष्परिणाम होऊ शकतात.
---- Ayurveda, Vastu shastra, healthy Food, Healthy Living, Abstract India, Shree Balaji Tambe, India, Yoga, Meditation, Life Style, Marathi Blog

Friday, December 10, 2010

सुंदर ते ध्यान

डॉ. श्री बालाजी तांबे
सौंदर्य सर्व चराचरात असते, पण ते व्यक्‍तिगत असते. सौंदर्य हे पाहणाऱ्याच्या मनात, डोळ्यात, बुद्धीत व मेंदूत असते. ही सौंदर्याची देवाशी असलेली जवळीक. देव जसा एकमेवाद्वितीय असतो, तसे सौंदर्यही एकमेवाद्वितीय असते. म्हणूनच सौंदर्याची मोजमापे ठरविता येत नाहीत. तरीही एकूण पाहिल्यानंतर, ऐकल्यानंतर, स्पर्शानंतर मनात कुठल्याही प्रकारची विकृती निर्माण झाली नाही तर ते खरे सौंदर्य असे म्हणायचे.

सौंदर्य हे सर्व प्राणिमात्रांना विश्‍वात व जीवनात धरून ठेवण्याचे आकर्षण आहे. दिवसाच्या पहिल्या क्षणी म्हणजे सूर्योदयाच्या क्षणी संपूर्ण आकाशभर पसरलेला सोनेरी लालसर गुलाबी रंग आणि रसरसता लाल रंगाचा गोळा पाहिल्यानंतर या जीवनाचे आकर्षण कोणाला वाटणार नाही? सूर्याचे कर्तृत्व, सूर्याची उष्णता, सूर्याने जीवनाला दिलेली ऊब आणि सूर्याने जीवननिर्मितीसाठी दिलेली शक्‍ती याला कशाचीच तुलना नाही. असा हा सूर्य सकाळच्या वेळी त्याच्या उषा ह्या सहचरीबरोबर ज्यावेळी प्रकट होतो, त्यावेळचे सौंदर्य एवढे अवर्णनीय असते, की थंड हवेच्या ठिकाणी हिल स्टेशनवर गेलेली जोडपी रात्री थकून भागून झोपल्यानंतर सकाळी साखरझोपेतून उठू नये, असे वाटत असतानाही भल्या पहाटे उठून सूर्योदय पाहायला जातात, त्यामागे ओढ असते सौंदर्याचीच.

मराठीतील व संस्कृतातील सुंदर व सौंदर्य ह्या शब्दांचा संबंध आपल्या भारतीय पौराणिक कथेशी असावा व म्हणून सौंदर्य आपल्याला अधिकच काही सुचवून जाते. दोन राक्षस होते, एकाचे नाव सुंद, दुसऱ्याचे उपसुंद. त्यांना ब्रह्मदेवाने म्हणजे पृथ्वीच्या सृजनकर्त्यानेच असे वरदान दिलेले होते की तुम्हाला दुसरे कोणी कधी मारू शकणार नाही, केवळ तुम्हीच तुम्हाला मारू शकाल. देवाने दिलेले प्राकृत सौंदर्य हे दुसरे कोणीच कधीच नष्ट करू शकत नाही. चुकीच्या वागण्यामुळे, चुकीच्या खाण्यापिण्यामुळे जन्मतः आलेला सौंदर्याचा प्रसाद मनुष्य स्वतःच नासवून टाकतो. अर्थात चेहऱ्यावर ऍसिड वगैरे टाकण्याच्या घटनांमध्ये सुद्धा सौंदर्याचे चुकीच्या वेळी, चुकीच्या जागी प्रदर्शन असण्याचाच संभव अधिक असतो. पण जसे सौंदर्यवती स्त्री किंवा रुबाबदार पुरुष लक्षात घेत नाहीत, की सौंदर्य वा रुबाबदारपणा ही देवाची देणगी आहे, आपण ही देणगी फक्‍त सांभाळायची आहे आणि मग त्यांना सौंदर्याचा गर्व होतो. ही देणगी म्हणजे आपले स्वतःचे कर्तृत्व आहे अशा घमेंडीत हे लोक इतरांकडे तुच्छतेने पाहतात व पर्यायाने त्यांचे इतरांशी संबंध बिघडतात व शेवटी ते स्वतःचा व सौंदर्याचा घात करतात. नेमके हेच सुंद व उपसुंद या राक्षसांचे झाले. आपल्याला कोणीही मारू शकत नाही असे म्हटल्यावर ते उन्मत्त झाले नाहीत तरच नवल ! त्यांना आवरण्यासाठी इंद्राने तिल्लोत्तमा (तिल + उत्तमा) नावाची एक अप्सरा पाठविली. तीळ किती छोटा असतो ह्याची आपल्याला कल्पना आहे. आयुर्वेदात ह्या तिळाच्या तेलाचे महत्त्व सांगितलेले आहे. पण हाच तीळ शरीरावर एका विशिष्ट जागी आला तर सौंदर्य अजूनच खुलते. तिल्लोत्तमेला पाहिल्यानंतर तिला कोणी प्राप्त करून घ्यावे यावरून सुंदोपसुंदांमध्ये वाद सुरू झाला, वादाचे रूपांतर लढाईत झाले. स्त्रीसाठी झालेल्या लढायांमधली ही पहिली लढाई. बऱ्याच वेळा असे वाटते की लढाई स्त्रीसाठी नसून ती सौंदर्यासाठी आहे. पण सौंदर्य हा अनुभवण्याचा विषय आहे. सौंदर्यावर ताबा मिळवायचा, त्यावर स्वतःची मालकी प्रस्थापित करायची ही कल्पना नसते. सौंदर्याची प्रत्येकाला ओढ असते परंतु सौंदर्य राहते एका बाजूला व प्रयत्न होते त्या व्यक्‍तीवरच्या स्वामित्वाचा. सुंद व उपसुंद ह्यांच्यातही हेच झाले. तिल्लोत्तमा कोणाची होईल ह्याच्यावर दोघांनी भांडण केले व शेवटी त्यांनी या लढाईत स्वतःलाच मारून घेतले.

तिल्लोत्तमेच्या या कार्यावर सर्व देव खूष झाले व त्यांनी तिला वर दिला की तुझ्या नावातील "तिळ' यज्ञात हवनद्रव्य म्हणून वापरले जातील आणि तिळापासून बनविलेल्या तेलाचा पृथ्वीवर सौंदर्यासाठी औषधी उपयोग होईल. तिल्लोत्तमेला आनंद झाला. सौंदर्याची किंमतही सिद्ध झाली. सौंदर्याचा आस्वाद घेणे, त्याचा आनंद घेणे महत्त्वाचे आहे ही कल्पना सुंदोपसुंदीच्या ह्या गोष्टीमुळे महत्त्वाची ठरली. सौंदर्यावर मालकी हक्क गाजवावा अशी ती काही वस्तू नाही, तशा प्रयत्नांना मराठीत सुंदोपसुंदी असे म्हटले जाते.

सौंदर्य हे पाहणाऱ्याच्या मनात, डोळ्यात, बुद्धीत व मेंदूत असते असे म्हणायला हरकत नाही, त्यामुळे सौंदर्याची एक ठराविक व्याख्या करता येईल असे दिसत नाही. एखाद्याला न आवडलेली वस्तू दुसऱ्याला मनापासून आवडते. दुकानात नेऊन पत्नीला एखादी साडी दाखवावी तर तिला ती साडी अजिबात पसंत पडत नाही. तुला ही साडी चांगली दिसेल असे प्रत्यक्ष नवरा म्हणत असताना तिने ती साडी घ्यायला काय हरकत आहे? एरवी पती-पत्नीत असलेला समविचार नेमका त्यावेळी एकमेकाच्या विरोधात कसा जातो हेच समजत नाही. पलीकडच्या काउंटरवर स्त्रिया साड्या पाहात असतात त्यापैकी एकीचे लक्ष त्या निवडलेल्या साडीवर जाते. ती विक्रेत्याकडून ती साडी मागून घेते, तिच्या ग्रुपमधल्या सगळ्यांनाच साडी खूप आवडते. तिने साडी घेण्याचे ठरविल्यावर पहिली बाई विक्रेत्याला विचारते, ""अहो, तशीच दुसरी साडी तुमच्याकडे आहे का? मीही तीच विकत घेईन म्हणते.'' अर्थातच तशी दुसरी साडी दुकानात नसते. ह्या सगळ्या डिझायनर साड्या असतात, त्यांचा एकेकच नग बनविलेला असतो. एकाच डिझाईनच्या अनेक साड्या असल्या तर त्यात सौंदर्य कसले? सौंदर्य सर्व चराचरात असते, पण ते व्यक्‍तिगत असते. ही सौंदर्याची देवाशी असलेली जवळीक. देव जसा एकमेवाद्वितीय असतो तसे सौंदर्यही एकमेवाद्वितीय असते. म्हणूनच सौंदर्याची मोजमापे ठरविता येत नाहीत. तरीही एकूण पाहिल्यानंतर, ऐकल्यानंतर, स्पर्शानंतर मनात कुठल्याही प्रकारची विकृती निर्माण झाली नाही तर ते खरे सौंदर्य असे म्हणायचे.

तेव्हा ह्या संपूर्ण विश्‍वाला एका संतुलनात ठेवलेले दिसते. गोलाकार कुठेच खटकत नाही, बोचत नाही, टोचत नाही. म्हणून शरीरात असलेले गोलावे जसे शरीराचे सौंदर्य वाढवितात तसे ह्या संपूर्ण विश्‍वाचे सौंदर्य आपल्याला अनुभवायला येऊ शकते. याचा अर्थ असा की सौंदर्य संतुलनात असते. शरीराच्या बाबतीत डोळ्याचा आकार बदामाचा असो, कमळाच्या पाकळीप्रमाणे असो, माशाप्रमाणे असो किंवा डोळे भेदक, बटबटीत असोत, काळेभोर असोत वा हिरवे असोत त्यांचे स्वतःचे म्हणून एक विशेष सौंदर्य असते आणि त्या विशेष सौंदर्यामुळे ती व्यक्‍तीही सौंदर्यवती ठरते. सौंदर्य हे नखशिखांत पाहिजे, त्यात कुठे बारीकसा दोष असला तरी इतर सर्व संतुलित अवयवांच्या सौंदर्यामुळे तो दोष झाकलाही जातो. असे असल्यामुळे बुटकी व्यक्‍तीही सुंदर असू शकते व उंच व्यक्‍तीही सुंदर असू शकते. अर्थात ताडामाडासारखी अति उंच व्यक्‍तीची उंची जाडीच्या प्रमाणात नसली तर ते सौंदर्याला बाधक ठरू शकते. पण तरीही उंच व्यक्‍तीत त्वचा, कांती, डोळे, केस, भरदार छाती, उन्नत उरोज असे सर्व सौंदर्य असले तर एकूण व्यक्‍तिमत्व सुंदरतेत मोजले जाते. एक गोष्ट निश्‍चित की माणसाच्या जिवाला कुठेतरी दिलासा मिळून परमेश्‍वरी सृजनात असलेले सौंदर्य जर पटले व मन शांत झाले तर उद्‌गार बाहेर येतात, सुंदर, अति सुंदर!!

- डॉ. श्री बालाजी तांबे आत्मसंतुलनव्हिलेज, कार्ला 410 405
---- Ayurveda, Vastu shastra, healthy Food, Healthy Living, Abstract India, Shree Balaji Tambe, India, Yoga, Meditation, Life Style, Marathi Blog

सौंदर्य

डॉ. श्री बालाजी तांबे

सौंदर्य हा नैसर्गिक भाव असल्याने निसर्गाला धरून केलेल्या उपचारांचा व उपायांचा खरा फायदा होणार आहे हे विसरून चालणार नाही. क्षणिक सौंदर्यासाठी आरोग्याकडे दुर्लक्ष होणार असेल तर त्यातून नुकसान होईल, हे सहज ध्यानात येऊ शकेल. म्हणून सौंदर्यरक्षणामध्ये नैसर्गिक द्रव्ये, वनस्पती, सकस आहार, संतुलित जीवनशैली यांचे महत्त्वाचे योगदान असते.

सौंदर्याची ओढ, सौंदर्याची आवड कोणाला नसते? स्त्री असो वा पुरुष, सर्वांनाच सौंदर्य व पाठोपाठ येणारी आकर्षकता हवीहवीशी वाटणे अगदी स्वाभाविक आहे. प्राचीन काळातही देवदेवतांपासून, राजकन्येपर्यंत अगदी आश्रमात राहणाऱ्या एखाद्या ऋषीकन्येपर्यंत सर्वांनीच सौंदर्य टिकवण्यासाठी, खुलविण्यासाठी प्रयत्न केलेले दिसतात. भारतासारख्या प्राचीन संस्कृतीचा वारसा असणाऱ्या देशात तर सौंदर्यसाधनेला सांस्कृतिक स्थान मिळाल्याचे दिसते. काळानुसार, देशानुसार, हवामानानुसार सौंदर्याची मोजमापे बदलली तरी एकंदरीत सौंदर्याची ओढ आणि महत्त्व कायम आहे. जन्मजात सौंदर्याची देणगी सर्वश्रेष्ठ असतेच, पण सौंदर्य टिकवणे आणि खुलवणेही तेवढेच महत्त्वाचे असते. नितळ त्वचा, सतेजता, गडद रंगाचे रेशमी, लांब केस, चेहऱ्याचा रेखीवपणा, उत्तम बांधा तसेच ओठ कोरडे नसणे, घाम अति प्रमाणात न येणे, उंची व बांधा यांचे प्रमाण योग्य असणे, शरीराला आवश्‍यक घट्टपणा, कणखरपणा असणे या सर्व गोष्टी सौंदर्याच्या दृष्टीने महत्त्वाच्या होत. सौंदर्य हा नैसर्गिक भाव असल्याने निसर्गाला धरून केलेल्या उपचारांचा व उपायांचा खरा फायदा होणार आहे हे विसरून चालणार नाही. क्षणिक सौंदर्यासाठी आरोग्याकडे दुर्लक्ष होणार असेल तर त्यातून नुकसान होईल हे सहज ध्यानात येऊ शकेल. म्हणून सौंदर्यरक्षणामध्ये नैसर्गिक द्रव्ये, वनस्पती, सकस आहार, संतुलित जीवनशैली यांचे महत्त्वाचे योगदान असते.

त्वचा
त्वचा हा व्यक्‍तीचा खरा दागिना समजला जातो.
क्षीरस्य संतानिका इव सप्त त्वचो भवति ।...सुश्रुत शारीरस्थान
ज्याप्रमाणे दूध तापत असताना त्यावर साय येते त्याप्रमाणे शरीर तयार होताना, धातूंचे पचन होत असताना त्वचा तयार होते.
म्हणूनच सतेज त्वचेसाठी एकंदर आरोग्य चांगले राहणे, सर्व धातूंचे व्यवस्थित पोषण होणे हे सुद्धा महत्त्वाचे होय. निरोगी त्वचेसाठी पुढील प्रयत्न करता येतात.
- धातूंचे पोषण व्हावे, शरीराला तसेच त्वचेलाही आवश्‍यक स्निग्धता मिळावी आणि नितळ, सतेज त्वचा मिळावी म्हणून नियमित अभ्यंग करणे उत्तम होय. रक्‍तशुद्धिकर व वात-पित्तशामक औषधांचा संस्कार करून तयार केलेले 'अभ्यंग तेला'सारखे तेल अंगाला लावणे उत्तम असते.
- त्वचेवर सुरकुत्या पडणे, त्वचा कोरडी पडणे हे त्वचेला घातक ठरू शकते. यावरही नियमित अभ्यंग करण्याचा आणि स्नानाच्या वेळी मसुराच्या पिठात हळद, धणे पूड, दही किंवा दूध मिसळून तयार केलेले उटणे किंवा तयार "सॅन मसाज पावडर'सारखे उटणे लावण्याचा चांगला फायदा होऊ शकतो.
- गुलाबपाण्यात चंदन, दालचिनी, हळकुंड उगाळून तयार केलेले गंध चेहऱ्यावर लावण्याने सुरकुत्यांना प्रतिबंध होतो तसेच त्वचा नितळ व सतेज राहण्यास मदत होते.
- चेहरा किंवा दंड-पाठीवर पिंपल्स येणे सुद्धा सौंदर्याला बाधक असते. यावर रक्‍तशुद्धिकर द्रव्यांनी सिद्ध केलेले "रोझ ब्युटी तेला'सारखे तेल लावण्याचा, "सॅन पित्त फेस पॅक'सारखा पॅक लावण्याचा उपयोग होतो.
- चेहरा व हातापायाच्या पंजांची त्वचा अधिकच नाजूक व संवेदनशील असते. शिवाय पाणी, धूळ, धूर, उन्हाच्या संपर्कात हे भाग अधिक प्रमाणात येत असल्याने या ठिकाणच्या त्वचेची अधिक काळजी घेणे आवश्‍यक असते. त्या दृष्टीने आठवड्यातून एक - दोन वेळा चेहऱ्यावर, पंजांवर साय लावून ठेवणे उत्तम असते. रात्री झोपण्यापूर्वी "रोझ ब्युटी तेला'सारखे तेल लावण्यानेही या ठिकाणच्या नाजूक त्वचेचे संरक्षण होऊ शकते.
- तळहात कोरडे होणे, कडक होणे हा समस्या अनेकांना असते. लिंबाच्या रसात मध टाकून तयार केलेले मिश्रण हातांना लावून ठेवण्याचा उपयोग होऊ शकतो.

डोळे
डोळे सुद्धा सौंदर्याचा विचार करताना डोळे महत्त्वाचे होत. डोळ्यांमधली चमक व सतेजता आरोग्याशिवाय मिळू शकत नाही. डोळे सुंदर दिसावेत म्हणून वापरलेली प्रसाधने नैसर्गिक नसल्याने डोळ्यांच्या आरोग्याला व सौंदर्याला बऱ्याचदा घातक ठरू शकतात. त्याऐवजी सर्व नैसर्गिक, शुद्ध व उत्तम प्रतीच्या द्रव्यांपासून आयुर्वेदिक पद्धतीने बनविलेले अंजन (उदा. सॅन अंजन काळे, ग्रे किंवा क्‍लिअर) वापरण्याने डोळ्यांचे आरोग्यही उत्तम राहते, शिवाय डोळ्यांचे प्रसाधनही होते.

- संगणक, प्रदूषण वगैरेंमुळे थकलेल्या डोळ्यांना पुन्हा स्फूर्ती यावी यासाठी बंद डोळ्यांवर गुलाबपाण्याच्या किंवा निरशा थंड दुधाच्या घड्या ठेवता येतात.

दात, केस, नखे
दात, केस, नखे यांची निगा राखणे हे सुद्धा सौंदर्याच्या दृष्टीने खूप महत्त्वाचे असते. हे तिन्ही शरीरघटक शरीरातील अस्थिधातूंशी संबंधित असतात. दूध, डिंक, खारीक, खसखस वगैरे घटकांचा रोजच्या आहारात समावेश करण्याने यांचे आरोग्य व सौंदर्य हे दोन्ही सुरक्षित राहतात.

- दात-हिरड्यांना उपयुक्‍त द्रव्यांनी संस्कारित केलेल्या "सुमुख तेला'सारख्या तेलाच्या गुळण्या धरणे, दात घासण्यासाठी नैसर्गिक द्रव्यांचा वापर करणे उत्तम होय.
- पाण्यात काम, घरकाम केल्याने नखांच्या कडेची त्वचा रुक्ष होऊन निघू शकते. यावर दुधावरची साय वा लोणी हलक्‍या हाताने जिरविण्याचा उपयोग होतो.
- केस मऊ व रेशमी होण्यासाठी आठवड्यातून एकदा केसांना नारळाचे दूध लावून नंतर केस शिकेकाई, रिठा वगैरे मिश्रणाने धुण्याचा उपयोग होतो.

- जास्वंदीची फुले, काड्या व पाने बारीक करून तयार केलेला लेप केसांना लावल्याने केसांचे कंडिशनिंग करता येते.
- ओठ कोरडे होऊ नयेत म्हणून ओठांना शतधौतघृत किंवा दुधावरची साय लावण्याचा उपयोग होतो.
- घाम अति प्रमाणात येणे हे पित्तदोष वाढल्याचे लक्षण असू शकते, त्यामुळे गुलकंद, पित्तशांतीसारखी पित्तशामक औषधे घेण्याचा उपयोग होतोच पण घरच्या घरी कुळथाचे पीठ, जिरे पूड , लिंबाचा रस तसेच नागरमोथा, लोध्र वगैरे वनस्पती टाकून तयार केलेले उटणे लावण्याचा उपयोग होतो.
- काखेत वगैरे ज्या ठिकाणी घाम अधिक प्रमाणात येतो तेथे स्नानानंतर तुरटीचा खडा फिरविण्याचा उपयोग होतो.

बांधा हा सुद्धा सौंदर्यामध्ये महत्त्वाचा असतो. स्त्रियांचा कमनीय बांधा, पुरुषांची भरदार छाती व एकंदर कणखरपणा टिकण्यासाठी प्रयत्न करावे लागतात. या विषयी सविस्तर माहिती आपण पुढच्या वेळेला पाहू. तसेच सौंदर्यप्रसाधनांच्या वापराने मिळविलेले सौंदर्य आणि आतून उत्स्फूर्तपणे मिळविलेले सौंदर्य यात मोठा फरक असतो. पंचकर्माच्या साहाय्याने शरीरशुद्धी करून आतून सौंदर्य कसे मिळविता येते हेही आपण पुढच्या वेळेला पाहू.

- डॉ. श्री बालाजी तांबे आत्मसंतुलनव्हिलेज, कार्ला 410 405
---- Ayurveda, Vastu shastra, healthy Food, Healthy Living, Abstract India, Shree Balaji Tambe, India, Yoga, Meditation, Life Style, Marathi Blog

ad