Showing posts with label खिन्नता. Show all posts
Showing posts with label खिन्नता. Show all posts

Thursday, February 4, 2016

आरोग्यासाठी प्रसन्न मन -2

अनुभव घेत असताना किंवा कार्य करत असताना त्या कार्याचा अनुभव काल्पनिक तर घेतला जात नाही ना, यावरही लक्ष ठेवून मनाला तशी सूचना देण्याकडेही लक्ष ठेवावे लागेल. विषयापासून निवृत्ती साधता आली, तर काही मदत होऊ शकेल. मन प्रसन्न होत नाही, पण आपण याची जबाबदारी याच्यावर की त्याच्यावर, असा विचार करत ‘विषया’पर्यंत आलो. सर्व जबाबदारी विषयाची असल्यामुळे विषयामुळे मन प्रसन्न राहू शकत नाही. कारण विषय हे इंद्रियांना स्वतःच्या बाजूला वळवितात. इंद्रियांना वेगवेगळी लालूच दिल्यामुळे त्यांच्यावर निर्बंध टाकले, तरी काल्पनिक अनुभव किंवा विचार मनात येत राहतात. त्यामुळेही मन प्रसन्न व्हायला अडचण येते. 

जग हे जडापासून बनलेले आहे. या विश्वातील मायेच्या चमक-दमककडे आकर्षित होऊन किंवा चुकीच्या आवाहनामुळे मनुष्य चुकीच्या मार्गाला जातो. यामुळे मन प्रसन्नता हा सोम्यागोम्यासाठीचा मार्ग नव्हे असे म्हणून आपण मोकळे होतो. पण प्रत्येक माणसाला आज ना उद्या स्वतःचे आरोग्य, समृद्धी, आत्मसमाधान व तेजाचा विचार करावाच लागेल. कारण सरतेशेवटी शांती त्या ठिकाणीच मिळणार असते. 

मन, बुद्धी, चित्त, अहंकार हे सर्व थोड्या थोड्या फरकाने एकमेकांपासून वेगळे असले, तरी ते सर्व एकच आहेत. यातील बुद्धी आहे महत्त्वाची. अहंकार हा अंधकारच होय. तेथे सगळ्याचाच अभाव असतो. तेथे असतो फक्‍त स्वार्थीपणा व लंपटपणा. चित्त हे बुद्धीचे आदेश मनापर्यंत पोचविण्याचे माध्यम. बुद्धीचे व्यवस्थित मार्गदर्शन मनाला मिळाले तर मन शांत होऊ शकते, प्रसन्न होऊ शकते. एखादा मनुष्य नशीबवान आहे असे आपण म्हणतो. तो नशीबवान होतो, कारण त्याला योग्य वेळी योग्य गोष्टी सुचतात. त्याला खरोखर भगवंतांचा कृपाशीर्वाद मिळत असणार, जेणेकरून त्याला जीव, आत्मा व परमात्म्याच्या श्रेयस गोष्टी सुचतात. बुद्धीने अशा प्रकारे ऐनवेळेला सु-विचार सुचविण्यासाठी, चांगली कल्पना सुचविण्यासाठी, चांगल्या अनुभवाचा साक्षीदार करून देण्यासाठी खूप पूर्वतयारी असण्याची गरज असते. म्हणून ज्ञान हे अनुभवावर आधारित असते.

एक गृहस्थ मोठे कवी होते. त्यांनी गंगेवर एक छान काव्य रचले होते. त्यासाठी त्यांना पुरस्कारही मिळाला होता. पुरस्कार घेण्यासाठी एवढ्या लांब आलेलो आहोत, तेव्हा गंगास्नान करून जावे अशा हेतूने ते गंगेवर पोचले. ते पाण्यात उतरण्याचा प्रयत्न करत होते. काठावर असलेल्या एकाने सांगितले येथे उतरू नका, कारण येथे खूप मगरी, सुसरी आहेत. त्यावर कवी म्हणाले की, मगरी-सुसरी या तर गंगेचे वाहनच आहेत. मी तळापर्यंत जाणारच नाही, कारण वाहनावर गंगा आरूढ झालेली आहे. मी फक्‍त वर वरच्या पाण्यात स्नान करणार आहे. पाण्यात उतरल्यावर मगरीने पाय धरण्याचा प्रयत्न केला, तेव्हा या वाहनाचा अनुभव आधी घ्यायला पाहिजे होता असे लक्षात आले. गंगेचे वाहन मगर आहे म्हणत असताना मगर गंगेच्या पाण्यावर विहरत असतात, गंगा मगरावर आरूढ झालेली नसते. हा अनुभव नसल्याने नुसत्या शब्दाच्या माध्यमातून लिहिलेल्या काव्याला पुरस्कार मिळू शकतो, पण व्यवहारात त्याचा उपयोग होत नाही. अशी अनेक उदाहरणे सांगता येतील. शंकरांनी विषप्राशन केल्यानंतर त्यांच्या कंठाची आग होऊ लागली, तेव्हा त्यांनी सर्प थंड असतो म्हणून सर्पाला कंठाभोवती लपेटून घेतले. परंतु प्रत्यक्ष सर्पाचा थंडपणा अनुभवल्यावर मिळणारे ज्ञान वेगळे असते. असे अनेक प्रसंग आठवतील की, ज्यात बुद्धी व बुद्धीवर बसविलेले तर्क यांनाच ज्ञान समजून आचरण केल्याने आयुष्यात चांगल्या संधीला मुकावे लागले. 

अनुभव घेत असताना किंवा कार्य करत असताना त्या कार्याचा अनुभव काल्पनिक तर घेतला जात नाही ना, यावरही लक्ष ठेवून मनाला तशी सूचना देण्याकडेही लक्ष ठेवावे लागेल. विषयापासून निवृत्ती साधता आली, तर काही मदत होऊ शकेल. मन प्रसन्न होत नाही, पण आपण याची जबाबदारी याच्यावर की त्याच्यावर असा विचार करत आपण ‘विषया’पर्यंत आलो. सर्व जबाबदारी विषयाची असल्यामुळे विषयामुळे मन प्रसन्न राहू शकत नाही. कारण विषय हे इंद्रियांना स्वतःच्या बाजूला वळवितात. इंद्रियांना वेगवेगळी लालूच दिल्यामुळे त्यांच्यावर निर्बंध टाकले, तरी काल्पनिक अनुभव किंवा विचार मनात येत राहतात. त्यामुळेही मन प्रसन्न व्हायला अडचण येते. विषयांवर जबाबदारी टाकणे म्हणजे काय, तर एखाद्या वस्तूचे पॅकिंग फारच आकर्षक असल्यामुळे ती वस्तू आपण वापरतो, एखादा मनुष्य दिसायला अतिशय स्मार्ट व रुबाबदार किंवा स्त्री सौंदर्यवान दिसत असल्यामुळे त्यांच्याकडे आमचे मन आकर्षित होते अशा प्रकारे विषयावर जबाबदारी टाकली जाते. विषय मनाला विचलित करतात हे एका दृष्टीने बरोबर आहे. 

प्रत्येक इंद्रिय वेगवेगळ्या गुणांनी बांधलेले असते. विषयांचे पण स्वतःचे गुण ठरलेले असतात. त्यामुळे इंद्रिये विषयाकडे आकर्षित होतात. सृष्टीने सृजनासाठीचे आणि जीवन व्यवस्थित चालण्यासाठी काही नियम केलेले आहेत. त्यातही अशी आकर्षणे निसर्गतःच टाकून ठेवलेली आहेत, उदा. प्रजोत्पादनासाठी उपयोगी पडणारे पुरुष व स्त्री यांच्यातील आकर्षण. पुरुष व स्त्री यांच्यातील आकर्षणामुळे जीवनात शृंगाररस उत्पन्न होतो व एकूण जीवनाचे सौंदर्य कळून जीवनाविषयी आकर्षण उत्पन्न होते. विषयांना समजून घेणे खूप आवश्‍यक आहे. विषय कशासाठी आहे हे पाहणे आवश्‍यक असते. शिडी ही वरच्या मजल्यावर जाण्यासाठी साधन आहे. शिडी कितीही उत्तम दर्जाची बनवायची असे ठरविले, तरी ती सोन्याची बनवता येत नाही, कारण सोने मऊ असल्याने सोन्याच्या पायऱ्या वाकू शकतात. शिडीच्या पायऱ्या सुंदर दिसणाऱ्या चकचकीत धातूच्याही करता येत नाहीत, कारण शिडीच्या पायऱ्यांवर पाय द्यायचाच असतो. शिडीवरून चढून गेल्यावर आपल्या परमप्रिय व्यक्‍तीची भेट झाली, तर शिडीची कोणी पूजा करत नाही आणि कायम शिडी बरोबर घेऊनही कोणी फिरत नाही. 

अशा प्रकारे प्रत्येक बाह्यवस्तूचे आपल्या जीवनात किती महत्त्व आहे हे प्रत्येकाने नक्की केले, तर विषयांपासून सुटका होण्याचे नक्की होऊ शकते. जेवल्याशिवाय राहता येत नाही. पाण्याला जीवन म्हटले जाते, ते प्रत्येकाला आवश्‍यक असतेच. परंतु ज्या वेळी जिवावर बेतण्याची वेळ येते तेव्हा पाण्यावर भागत नाही. अन्नावाचून चालत नसले, तरी त्यावाचून महिनाभर राहता येऊ शकते. आवडीच्या वस्तू जेवणात असल्या, तर जेवण जाते; अन्यथा तोंडात घास गोल फिरतो असे म्हणणारी व्यक्‍ती उपासमार झाली की गणपतीला वाहिलेल्या दूर्वा खायलाही मागे-पुढे पाहत नाही. 

प्रत्येक विषयाचे चिंतन करून आपले जीवन चालविण्यासाठी, जीवनात हाती घेतलेले कार्य तडीस नेण्यासाठी मुळात कुठले विषय अगदी निकडीचे आहेत ते ठरविणे, त्या विषयांची वर्गवारी लावून, त्यांचे आपल्या आयुष्यात असलेले प्राधान्य ठरवून नंतर त्या विषयांचे आपल्या आयुष्यातील स्थान नक्की करावे. विवाहिताला पत्नी व तिच्यापासून मिळणारे सुख हा विषय महत्त्वाचा असणे साहजिक आहे. परंतु लग्न न झालेल्या अनेक व्यक्‍ती असतात. आपल्याला जीवनाच्या लक्ष्याप्रत पोचण्यासाठी काय अत्यावश्‍यक आहे हेही ठरवावे लागते. श्रीमद्‌ आदि शंकराचार्यांनी ‘भज गोविन्दम्‌’ या स्तोत्रात ‘एतद्‌ मांसवसादिविकारम्‌’ असे म्हटलेले आहे. म्हणजे ज्या वस्तूंची डोळ्यांना भुरळ पडते ते आयुर्वेदातील मज्जा व मांस यांचे खेळ असतात. तेव्हा त्यांना अवास्तव महत्त्व न देता हे मज्जा व मांस ज्या जिवाशी संबंध ठेवून असतात त्या जिवाचा, त्या व्यक्‍तीचा विचार करणे अधिक आवश्‍यक असते.
असे करत गेल्याने सरतेशेवटी अणूरेणूत असलेल्या परमात्म्यापर्यंत पोचल्यानंतर विषयनिवृत्ती सोपी होऊ शकेल. अशी विषयनिवृत्ती झाली, तर इंद्रियांवर अनुशासन करणे सोपे होईल. 
Ayurveda, Vastu shastra, healthy Food, Healthy Living, Abstract India, Shree Balaji Tambe, India, Yoga, Meditation, Life Style, Marathi Blog, Marriages, Love

Wednesday, February 3, 2016

ताणतणाव

- डाॅ. ह. वि. सरदेसाई
कशामुळे ताण-तणावातून विकार होईल, हे प्रत्येक व्यक्तीत वेगवेगळे असू शकते. माणसाच्या मनोशारीरिक घटनेवर (जडण-घडणीवर) ते अवलंबून राहते. नेमक्‍या कोण-कोणत्या घटनांनी ताणतणाव निर्माण होईल, याबद्दल विविध मते असणे स्वाभाविक आहे.

परिस्थितीत होणारा बदल कमी जास्त प्रमाणात ताण निर्माण करतो. या बदलाशी जुळवून घेण्याची क्षमता महत्त्वाची असते. या क्षमतेतील त्रुटी तणाव निर्माण करते. हा बदल कधी कधी तुलनेने नगण्यही असू शकतो. कधी तर झालेला किंवा होऊ घातलेला बदल किफायतशीरदेखील असू शकतो (जसे बढती मिळणे व बदली होणे), अशा कोणत्याही बदलाशी जुळवून घेण्याची क्षमता कमी असण्याने माणसाच्या मनोशारीरिक अस्तित्वात विकार होऊ शकतात. कशामुळे ताण-तणावातून विकार होईल, हे प्रत्येक व्यक्तीत वेगवेगळे असू शकते. माणसाच्या मनोशारीरिक घटनेवर (जडण-घडणीवर) ते अवलंबून राहते. नेमक्‍या कोण-कोणत्या घटनांनी ताणतणाव निर्माण होईल, याबद्दल विविध मते असणे स्वाभाविक आहे.

तणाव निर्माण करणाऱ्या प्रसंगाचा प्रकार वयोमानानुसार बदलू शकतो. पौगंडावस्थेत आपल्या पालकांच्या अपेक्षा, तारुण्यात वैवाहिक साथीदारांसंबंधीची मिलनोत्सुकता, पुढे कामातील वरिष्ठांशी संबंध, आर्थिक स्वास्थ्य-सुबत्ता मिळण्याची आणि ती कमावण्याकरिता करावी लागणारी धडपड, पुढे वैवाहिक जोडीदाराबरोबर सलोख्याचे स्नेह-संबंध टिकणे, वयस्कर वाड-वडिलांच्या प्रकृतीच्या समस्यांना सांभाळणे, लहान मुलांचे बेशिस्त वागणे, सामाजिक मूल्यांचा ऱ्हास होताना पाहणे, वार्धक्‍याबरोबर येणारी शारीरिक आणि आर्थिक तूट, याबरोबर घसरणारी कौटुंबिक आणि सामाजिक प्रतिष्ठा आणि नेहमीच असणारी, परंतु वार्धक्‍यात विशेषतः जाणीव होत राहणारी मृत्यूची भीती, ही सारी कमी-जास्त प्रमाणात तणाव निर्माण करणारी कारणे प्रत्येक व्यक्तीत असू शकतात. या कारणांना वास्तवात जाणणे, वास्तव स्वीकारणे आणि वास्तवाचा उपभोग घेण्याची क्षमता जोपासणे, हे खऱ्या समृद्ध मनाचे लक्षण होय.
तणावामुळे व्यक्ती चिंतातुर अथवा खिन्न होऊ शकते. अनेकांना शारीरिक लक्षणे उद्‌भवतात. काही जणांची वृत्ती समस्यांपासून पलायन करण्याची असते. अशा व्यक्ती मद्यपाशात स्वतःला झुगारून देतात किंवा अतिरेकी खातात व स्थूल बनतात किंवा जुगार, रेस अथवा पत्ते खेळणे, अशा वास्तवातून पलायनाच्या मार्गाला लागतात. बहुतेकांना तणाव निर्माण करणाऱ्या प्रसंगांच्या पुनरावृत्तीचे भय वाटत राहते. (जसे परीक्षा, सभेत भाषण करणे, मुलाखत देणे) काहींना क्रोध येत राहतो (अपेक्षा भंग होणे) काहींना अपराधीपणाची भावना येत राहणे (आपल्या हातून चूक घडली याचा पश्‍चात्ताप, ‘पाप’ घडल्याची टोचणी) काहींना घडून गेलेल्या घटनेबद्दल शरम वाटत राहते, (आपल्या कृत्यांबद्दल अथवा इतरांनी केलेल्या आपल्या ‘अपमाना’बद्दल) अशी भीती, राग, अपराधीपणाची भावना, लाज वाटणे इत्यादी भावना ज्याप्रमाणे प्रत्यक्ष प्रसंग घडताना 

निर्माण होतात, त्याचप्रमाणे त्या त्या प्रसंगाच्या आठवणीनेदेखील जशाच्या तशाच निर्माण होतात. या भावनांमुळे व्यक्ती अस्वस्थ होते. माणसाची चिडचिड होते, स्वभाव रागीट किंवा चिडका बनतो, अकारण थकवा येतो, लहान सहान गोष्टींनी (आवाजामुळे) दचकावयाला होते आणि आपण तणावाखाली असण्याची जाणीव होते. या तणावामुळे एकाग्रता शक्‍य होत नाही, मनात विचारांचे वारू बेलगाम संचार करू लागतात, झोपेत व्यत्यय येऊ लागतो (झोप लागण्यास वेळ लागतो, जाग लवकर येते, सारखी जाग येते) अस्वस्थ करणारी स्वप्ने पडू लागतात. आपण आजारी आहोत, या भावनेने व्यक्ती पछाडली जाते, स्वतःला योग्य वाटेल ती औषधे (विनाकारण) घेण्याकडे कल होऊ लागतो. व्यसनाधीनता बळावते. प्रत्यक्ष त्रास होत असल्याने विविध तपासण्यांत फारसा दोष सापडत नाही, याचे नवल वाटू लागते.

बदलांना स्वीकारताना होणारे त्रास हे ‘चिंतातुर’तेपेक्षा वेगळे असतात, याचे ध्यान ठेवावे. शिवाय, इतर मानसिक आजार किंवा स्वभाव-दोष यांपासूनदेखील या परिस्थितीशी ‘जुळवून घेण्यातील त्रुटी’ने होणारे दोष वेगळे असतात. काही शारीरिक आजारांबरोबर आलेल्या मानसिक आजारांचीदेखील दखल घेणे आवश्‍यक असते. परिस्थितीशी जुळवून घेण्याच्या क्षमतेतील त्रुटीमुळे होणारे त्रास ती परिस्थिती बदलली (परीक्षा किंवा मुलाखत होऊन गेली) की आपोआप शमतात, तसे मानसिक विकारांचे होत नाही. परिस्थिती स्वीकारली म्हणजे जुळवून घेण्याचा प्रश्‍न मागे राहात नाही. परिस्थितीत बदल झाल्यावर येणारे विकार होण्यास जबाबदार असणारा परिस्थितीतील बदल न्यायालयांचे समन्स येणे, मिलनोत्सुक प्रेमसंबंधात विधान होणे) ओळखता येतो. साधारणपणे अशा घटनेचे परिणाम जेव्हा सहा महिने होतात, तेव्हा या तणावांना तीव्र प्रकारचे म्हटले जाते आणि जेव्हा जास्त काळ (अथवा कायम) होत राहणारा त्रास हा दीर्घकाळ चालणारा त्रास मानला जातो.

अशा बदलामुळे आलेल्या घटनांच्या उपचारात विविध प्रकारचे उपाय करणे उपयोगी पडते. सुरवात काही क्रियांपासून करणे इष्ट असते. बरीच माणसे श्‍वास भरभर घेऊ लागतात; परिणामी, रक्तीतील कार्बन-डाय-ऑक्‍साइडचे प्रमाण कमी होते. त्यामुळे हातापायांच्या बोटांना मुंग्या येतात, नाक व चेहरा किंवा कान येथेही अशा संवेदना जाणवतात. या संवेदनामुळे व्यक्ती आणखीनच भयभीत होते. शरीरक्रियांच्या अज्ञानातून उद्‌भवलेल्या भीतीचे निराकरण करून तक्रार लगेच दूर करण्यासाठी अशा व्यक्तीला एखाद्या (बंद) कागदाच्या पिशवीत श्‍वासोच्छवास करावयास सूचना द्याव्यात. थोड्याच श्‍वसनानंतर मुंग्या येणे थांबेल, भीती जाईल, मग कागदी पिशवी काढावी.
कोणत्याही कारणाने माणसाने श्‍वास भराभर घेतला तरी त्याच्या रक्तातील कार्बन-डाय ऑक्‍साइडचा निचरा होतो. असा निचरा प्रमाणाबाहेर झाल्याने हातापायांना मुंग्या येतात. शिवाय, काही रक्तवाहिन्यांचे आकुंचन होणेही संभवते. आपल्या मेंदूतील टेंपोरल लोब या भागात अशा प्रकारे रक्तवाहिन्यांच्या आकुंचनामुळे प्राणवायूचा पुरवठा कमी पडणे शक्‍य होते. परिणामी, त्या व्यक्तीलाकाही प्रकारचे ‘भास’ होणे शक्‍य आहे. याची माहिती प्राणायामातील ‘भास्त्रिका’ हा प्रकार करणाऱ्या साधकांना असावी.ज्या व्यक्तींना विशिष्ट बदलांमुळे तणाव येतो याची कल्पना असते किंवा देता आली तर अशा प्रसंगांना कसे तोंड द्यावे, याचे समुपदेशन उपयोगी पडते. तणावांची जाणीव होऊ लागताच शवासनासारखे शरीर सैल करणे व श्‍वासावर पूर्ण लक्ष केंद्रित करून इतर सर्व विचार करण्याकरिता मन मोकळे न ठेवणे याचाही उपयोग होतो. हा एका प्रकारे जागृत मन विचाररहित ठेवण्याचा (ध्यानाचा) प्रयत्न होय.

काही सामाजिक परिस्थितीचा परिणाम तणाव निर्मितीत होणे शक्‍य असते. काहींना गर्दीत जाणे नको वाटते, काहींना नव्या ओळखी करून घ्याव्याशा वाटत नाहीत, व्यासपीठावर जाण्याची अकारण भीती काहींना असते, अशा सामाजिक प्रसंगांना ओळखणे महत्त्वाचे ठरते. या प्रसंगांतून बाहेर पडताना सुरवात अगदी माफक (दोन-तीन माणसे) आकड्यापासून सुरवात करून (किंवा तशी कल्पना करून) त्या प्रसंगांना तोंड देण्याची मनाची तयारी केली जाते. काही वेळा मोठे बदल करावे लागतात. (उदा. नोकरी बदलणे) परंतु, हे निर्णय पूर्ण विचारांच्या नंतरच घ्यावेत.

मानसोपचार क्वचितच लागतो; परंतु समुपदेशन उपयोगी पडते. मनाला भविष्यकाळ किंवा भूतकाळांतील घटनांच्या विचारांत गुंतण्याची सवय लागलेली असते. त्याऐवजी मनाला वर्तमानकाळात आणि आताच्या परिस्थितीत राहण्याचा सराव करणे उपयुक्त ठरते. चिंता ही नेहमीच भवितव्याशी संबंधित तर अपराधीपणा हा नेहमीच भूतकाळात घडलेल्या घटनांबद्दल असतो, याची जाणीव ठेवावी.

काही औषधांचा वापरदेखील उपयोगी ठरतो. अर्थात, कोणत्याही औषधांचा वापर त्या संबंधात ज्ञान आणि वापरण्याचा अनुभव असणाऱ्या (डॉक्‍टर) व्यक्तीनेच करावा. पूर्वी आपल्याला बरे वाटले होते, हा अनुभव किंवा केवळ सद्‌हेतूने सुचविलेले औषध घेणे केवळ निरुपयोगीच नव्हे, तर अपायकारकही ठरू शकते, याचीदेखील जाणीव असावी. अनेक औषधांना नको असणारे परिणाम असतात, कधी कधी हे नको असणारे परिणाम गंभीर परिणाम करू शकतात, घातकही ठरू शकतात. यासंबंधात अमेरिकेतील जगप्रसिद्ध मॅसॅच्युसेट्‌स जनरल हॉस्पिटलमधून प्रसिद्ध झालेल्या एका शोध-निबंधातील माहिती दखलपात्र आहे. सलग दाखल झालेल्या सहाशे रुग्णांना ‘उपचाराचा’ झालेला त्रास अभ्यासला गेला तेव्हा असे आढळले की, या ६०० पैकी २९० रुग्णांना उपचारांचा काहींना काही त्रास झाला. यापैकी ७७ रुग्णांना गंभीर दुखणे झाले, तर १५ रुग्ण त्यांच्या आजारांनी नव्हे, तर उपचारांच्या दुष्परिणामांनी दगावले! लोरॅझिपॅम ०.५ ते १.० मिलीग्रॅम दिवसातून दोन वेळा असे उपयोगी पडणारे औषध डॉक्‍टरांच्या नजरेखाली मर्यादित काळापुरते फायदेशीर ठरू शकते.

सहसा योग्य समुपदेशन व रुग्णाला आजाराच्या स्वरूपाचे ज्ञान देऊन भीती घालविण्याने बरेच रुग्ण बरे होतात. उशिरा केलेले किंवा चुकीचे उपचार, आजार रेंगाळवतात व दीर्घकाळ चालू राहिलेले आजार एकदा जुनाट झाले की बरे होणे कठीण होते.

Ayurveda, Vastu shastra, healthy Food, Healthy Living, Abstract India, Shree Balaji Tambe, India, Yoga, Meditation, Life Style, Marathi Blog, Marriages, Love

खिन्नता

- डॉ. ह. वि. सरदेसाई

एखाद्या न आवडणाऱ्या घटनेनंतर वाईट वाटणे स्वाभाविक असते; परंतु खिन्नता टिकून राहणे ही विकृती होय. एखाद्या व्यक्तीला वाईट वाटले तर त्या व्यक्तीची देखभाल करणाऱ्या व्यक्तीला सहानुभूती अवश्‍य वाटते. खिन्नता निर्माण झाल्यास काळजी घेणाऱ्या (आई-वडिलांना) व्यक्तींच्या मनात अपेक्षाभंग निर्माण होतो. त्यातून अशी काळजी घेणाऱ्या व्यक्तीला चिडचिड येऊ शकते. ज्या व्यक्तीला वाईट वाटत असते, त्या व्यक्तीचा आत्मसन्मान टिकलेला असतो. उलटपक्षी खिन्न झालेल्या व्यक्तीला अपराधीपणा आणि स्वतःबद्दल किंमतशून्यतेची भावना बळावलेली असते.

आपल्या ‘फॅमिली डॉक्‍टर’कडे उपचारासाठी गेलेल्या रुग्णांपैकी तीस टक्के रुग्णांच्या तक्रारींचा उगम ‘खिन्नते’तून येतो. आपल्या जनुकीय रचनेवर मेंदूच्या पेशींच्या दळणवळणाचे कार्य अहोरात्र चालू असते. हे दळणवळण ज्या रासायनिक रेणूंमार्फत घडते, त्या रेणूंना न्यूरो-ट्रान्समिटर्स म्हणतात. हे रेणू विशिष्ट ठिकाणी, विशिष्ट वेळेला, विशिष्ट प्रमाणात निर्माण होणे आणि विशिष्ट वेळांत त्यांचा निचरा होणे आवश्‍यक असते. तसे झाले तरच मेंदूचे कार्य सुरळीतपणे चालू शकते. भावना, विचार आणि अनुभवांची स्मृती योग्य प्रकारे होण्याकरता या कार्याची योग्य प्रकारे कार्यवाही आवश्‍यक असते. या व्यवस्थेवर आपल्या जनुकीय रचनेचा मोठा ताबा असतो. कोणती भावना, कोणत्या वेळी, कोणत्या प्रमाणात निर्माण व्हावी हे या कार्यावर ठरत राहते.

जनुकीय रचनेप्रमाणे, वाढीच्या वयातील अनुभव आणि समस्या यांचादेखील या रसायनांच्या निर्मितीवर परिणाम होत राहतो. काही व्यक्तिमत्त्वातील दोष (समाजाचे स्थैर्य विसकटण्यास जबाबदार असे वागणे ः कायदे न पालणे, इतरांना शारीरिक इजा करण्याकडे प्रवृत्ती असणे, जबाबदारीची जाणीव नसणे) प्रकट होऊ लागतात. या पेक्षाही आई-वडिलांचा विवाह-विच्छेद किंवा वडिलांचे अर्थाजन बंद पडणे या अनुभवांचे दुष्परिणाम होतात. अशा मुलांमध्ये अनेक शारीरिक तक्रारी येतात; परंतु कोणताही आजार आढळून येत नाही. एखाद्या न आवडणाऱ्या घटनेनंतर वाईट वाटणे स्वाभाविक असते; परंतु खिन्नता टिकून राहणे ही विकृती होय. एखाद्या व्यक्तीला वाईट वाटले तर त्या व्यक्तीची देखभाल करणाऱ्या व्यक्तीला सहानुभूती अवश्‍य वाटते. खिन्नता निर्माण झाल्यास काळजी घेणाऱ्या (आई-वडिलांना) व्यक्तींच्या मनात अपेक्षाभंग निर्माण होतो. त्यातून अशी काळजी घेणाऱ्या व्यक्तीला चिडचिड येऊ शकते. ज्या व्यक्तीला वाईट वाटत असते, त्या व्यक्तीचा आत्मसन्मान टिकलेला असतो. उलटपक्षी खिन्न झालेल्या व्यक्तीला अपराधीपणा आणि स्वतःबद्दल किंमतशून्यतेची भावना बळावलेली असते.

खिन्नतेने ग्रासलेल्या व्यक्तीला किमान चार प्रकारचे त्रास जाणवू लागतात. १) खिन्नतेची, बरे वाटत नसल्याची भावना आणि परिस्थितीला जुळवून घेण्यातील क्षमतेची त्रुटी, २) खिन्नतेमुळे होणारे आजार, ३) खिन्नता आणि उन्माद यांच्या परिक्रमा आणि ४) आजार आणि उपचार यांच्यातून निर्माण झालेले त्रास, नको असणारे दुष्परिणाम, आजाराला होणारे प्रतिसाद.

१) परिस्थितीत घडलेल्या घटनेला प्रतिसाद म्हणून येणारी खिन्नता. प्रिय व्यक्तीचा विरह अथवा मृत्यू, विवाहविच्छेद, आर्थिक नुकसान, सामाजिक (अथवा कौटुंबिक) आदर गमावणे. अशा घटना घटताना राग येतो, नंतर अपराधीपणाची भावना बळावते. घटना घडल्यावर तीन महिन्यांच्या आंत त्रास होतो. आपले दैनंदिन कार्य करताना अडचणी जाणवू लागतात. थोडेफार वाईट वाटत राहते. चिंता येत राहते. स्वभाव चिडका बनतो. एकाग्रता जमत नाही. काहीही कार्य करण्याबद्दल आत्मविश्‍वास डळमळू लागतो आणि खिन्नतेच्या भावनेच्या जोडीला विविध शारीरिक तक्रारी जाणवू लागतात. (पुढे पहावे).
२) मोठ्या प्रमाणात खिन्नतेचे परिणाम ः कोणत्याही बाबीत रस घ्यावासा वाटेनासा होतो. कशाचाही आनंद होत नाही. सगळ्या गोष्टींतून निवृत्त व्हावे ही भावना बळावते. आपले सगळे निर्णय चुकले आहेत, अशी अपराधीभावना येत राहते. मन एकाग्र होऊ शकत नाही. सतत थकवा वाटत राहतो. आता आपली काही किंमत राहिलेली नाही, असे वाटते. ज्या तक्रारींची कारणे सापडू शकत नाहीत, अशा विविध शारीरिक तक्रारी सतत येत राहतात. लैंगिक विषयात आणि संबंधातील रस लोपतो. मृत्यूचे विचार थैमान घालतात. कधी कधी या विचारांचे रूपांतर आचारात (आत्महत्या करण्यात) होऊ शकते. (परीक्षेत किंवा प्रेमात अपयश, आर्थिक नुकसान, प्रिय व्यक्तीचा मृत्यू) यातील बऱ्याच तक्रारी, विशेषतः थकवा, दिवसाच्या सुरवातीला (सकाळी) अधिक जाणवतात. झोपेत व्यत्यय येतो, सहसा भल्या पहाटेच जाग येते व तेव्हा मन खिन्न असते. भूक लागेनाशी होते. वजन कमी होऊ लागते, मलावरोध (शौच्याला घट्ट होणे, मल बाहेर पडण्यात अडचण जाणवणे) बळावतो. एखाद्या रुग्णाला खूप अस्वास्थ्य जाणवते व वास्तवाला अनुरूप नसणारे विचार आणि आजार होऊ लागताच. असा प्रकार वयस्कर रुग्णात अधिक प्रमाणात आढळतो. शंकेखोर प्रवृत्ती वाढते. ‘आपल्याबद्दल माणसे बोलतात, आपल्यामागे आपल्याला नावे ठेवतात’ असे विचार येतात. ‘आपल्याला कॅन्सरसारखा एखादा मोठा आजार झाला आहे’ हा विचार पिच्छा सोडत नाही. काही रुग्णात खूप झोप येऊ लागते, खादाडपणा वाढतो, थकवा असतो; परंतु एखादी बातमी ऐकून खूप उत्साहित होतात. काही रुग्णांना ऋतुमानानुसार आजार दिसू लागतात. या प्रकाराला SAD (Seasonal Affeclive Disorder) म्हणतात. ज्या देशात (अथवा प्रदेशात) हिवाळ्यात दिवस खूपच लहान असतो, तेथे हे आजार अधिक प्रमाणात आढळतात. या रुग्णांना कर्बोदके (साखर, भात, बटाटा) खाण्याची इच्छा बळावते. उत्साह वाटेनासा होतो. खा खा सुटते व झोप पुरेनाशी होते. काही गर्भवती स्त्रियांना बाळंतपणानंतर तीन आठवडे ते सहा महिन्यांनी खिन्नतेचा मोठा विकार जडतो. माफक प्रमाणात थकवा आणि खिन्नता अनेक स्त्रियांना (८० टक्के) बाळंतपणानंतर जाणवू शकतो. दहा ते पंधरा टक्के या नव-मातांना मोठ्या प्रमाणात खिन्नतेचा आजार होऊ शकतो. आपल्या बाळाच्या सुरक्षेबद्दल अतिरेकी चिंता निर्माण होते. या माताना झोप लागत नाही. वागण्यात अतिरेकी चिंता किंवा अविश्‍वास दाखविला जाऊ लागतो. वेळीच उपचार आवश्‍यक असतात.
काही खिन्न व्यक्ती सतत थकलेल्या, निरुत्साही, सर्व कार्यांतून अंग काढून घेणाऱ्या असतात. असा आजार एक-दोन वर्षे चालतो. काही स्त्रियांना रजोनिवृत्तीच्या वेळी खिन्नतेने पछाडले जाते, तर काहींना मासिक पाळी येण्यापूर्वीचे दोन आठवडे खिन्नतेचे त्रास होऊ शकतात.

३) उन्माद आणि खिन्नता यांच्या परिक्रमा येणे हा एक स्वतंत्र आजारच मानला जातो. आजाराच्या नावाप्रमाणे रुग्णाला उन्मादाचे आणि खिन्नतेचे आलटून-पालटून झटके येतात. उन्मादाच्या स्थितीत रुग्ण अस्वस्थ आणि बेचैन असतो, त्याला स्वस्थ बसवत नाही. जे डोक्‍यात विचार येतात, त्यांत अतिरेकी उत्साहाने भाग घेतला जातो, चटकन राग येतो. कल्पनांच्या भराऱ्या सुरू होतात. कोणत्याही एका विचारावर किंवा कामांत दीर्घकाळ रस राहत नाही, थोडीच झोप पुरते. या वैचारिक आणि भावनात्मक भराऱ्यांचे ऐकणाऱ्याला सुरवातीला कौतुक वाटते, पण काही वेळातच सारखे बदलणारे विचार, इतरांचा दृष्टिकोन स्वीकारण्यातील त्रुटी, मधून-अधून येणारा थकवा आणि स्वभावातील स्वतःच्या विचारांबद्दलचा भंपक मोठेपणा या अवगुणांची ओळख पटल्यावर ‘नको यांची संगती’ असा विचार मित्रांत फैलावू लागतो. स्वभाव अतिरेकी खर्चिक बनतो. ‘नोकरीवर लाथ मारीन’ अशा विचाराने वारंवार त्यागपत्र देऊन मागून पश्‍चात्तापाची पाळी येते. लग्न घाईत ठरविणे, उरकणे, विवाहबाह्य लैंगिक संबंध जोपासणे, मोठेपणाच्या फुशारक्‍या मारणे अशा वागण्याने कुटुंबीय व स्नेही कंटाळून जातात. दीर्घकाळ मैत्री जोपासणे किंवा स्थिर, सुखी संसार करणे क्वचितच जमते. सामान्यपणे उन्मादाचा काळ हा खिन्नतेच्या काळापेक्षा कमी लांबीचा असतो.

याच प्रकारात ‘सायक्‍लो थायमिक डिसॉर्डर्स’ नावाने ओळखला जाणारा एक भाग असतो. या व्यक्ती सतत काही वेळा खिन्नता तर काही वेळा थोड्या प्रमाणात उन्माद अशा आलटून-पालटून असतात. या व्यक्तींचे वर्णन पुढील श्‍लोकात चांगले आहे - ‘‘क्षणे तुष्ट - क्षणे रुष्टा - तुष्टा रुष्टा - क्षणे क्षणे। अव्यवस्थितचित्तस्य प्रसादोऽपि भयंकर  (लोकोक्ती) (अर्थ - क्षणात समाधान पावणारा तर क्षणात रागावणारा. क्षणाक्षणात रागावणारा तर कधी हसणारा अशा अस्थिर चित्ताच्या माणसाची कृपी ही भयंकर हानिकारक असते. अर्थात्‌ क्षणा-क्षणाला हा अतिशयोक्तीचा भाग आहे. सायक्‍लो थायमिक डिसऑर्डरमध्ये प्रत्येक भावना साधारण दोन वर्षे राहते!

४) आजारांना प्रतिसाद अथवा रासायनिक रेणूंना (औषधांना) प्रतिसाद म्हणून घेणारी खिन्नता बहुतेक सर्व. सौम्य अथवा गंभीर विकारांना आपले अस्तित्व ‘खिन्नता’ अथवा ‘चिंता’ या स्वरूपात प्रतिसाद देतेच. हृदयविकार, पक्षाघात, दीर्घकाळ चालणारे संधिवातासारखे आजार आले म्हणजे खिन्नता येतेच. कॅन्सर झाला आहे, ही बातमी धक्कादायक, चिंताजनक आणि खिन्नता निर्माण करणारी असते. रजोनिवृत्ती संबंधात वर उल्लेख आलेला आहेच. मद्यपान हे खिन्नतेचे आणि आत्मघाताचे महत्त्वाचे कारण असते. ब्लडप्रेशर ताब्यात ठेवण्याकरता एकेकाळी रेसर्पित नावाचे औषध वापरले जाई, त्याने अनेकांना खिन्नता येई. कॉर्टिकोस्टेरॉईडस्‌ आणि गर्भ-प्रतिबंधक गोळ्यांच्या वापराने देखील खिन्नता येते. सध्या ब्लडप्रेशर ताब्यात आणण्याकरता वापरत असणाऱ्या मिथाईल डोपा आणि क्‍लोनिडीन या औषधांच्या वापरात खिन्नता येणे हा एक नको असणारा आहे.

हृदयविकारात वापरले जाणारे डिजिटॅलिस हे जगत्‌विख्यात औषध आणि पार्किन्सन्स डिसीनमध्ये वापरले जाणारे लिव्हीडोपा हे औषध घेणाऱ्यांना डिप्रेशन येते. नेहमीच्या वापरातील औषधांपैकी बीटा ब्लॉकर्स प्रकारची औषधे दीर्घकाळ घेतली तर खिन्नता येऊ शकते. कोणतेही औषध वापरण्यापूर्वी रुग्णाला खिन्नता येण्याचा पूर्व-इतिहास असला तर खात्री करून घेणेच इष्ट असते.

खिन्नता हा विकार अनेकांना असतो व त्याचे परिणाम अनेक प्रकारचे असतात, याची कल्पना समाजाला, रुग्णांना आणि डॉक्‍टरांना असणे आवश्‍यक आहे. विशेषतः थकवा, निरुत्साह, निद्रानाश, भूक न लागणे, वजन कमी होणे, मलावरोध असे वरपांगी शारीरिक दुखणे खिन्नतेमुळे असण्याची शक्‍यता कधीही नजरेआड होऊ देता कामा नये.

Ayurveda, Vastu shastra, healthy Food, Healthy Living, Abstract India, Shree Balaji Tambe, India, Yoga, Meditation, Life Style, Marathi Blog, Marriages, Love

ad