Friday, July 24, 2009

कूस उजवेना...

वंध्यत्व म्हणजे केवळ गर्भधारणाच न होणे असे नसून गर्भधारणा झाली तरी पूर्ण नऊ महिने गर्भ गर्भाशयात टिकू शकत नाही व गर्भपात होतो, त्यासही वंध्यत्वच म्हणतात.
कोणतीही कुटुंब नियोजनाची साधने न वापरता योग्य समागमानंतरही एक वर्षभरात गर्भधारणा झाली नाही तर त्याला वंध्यत्व असे म्हणतात. वंध्यत्वासाठी स्त्री व पुरुष हे सारखेच जबाबदार असतात.
स्त्री वंध्यत्व कारणे
१) अंडाशयात बीज तयार न होणे किंवा त्याची वाढ नीट न होणे किंवा ते योग्य काळात बीजांडातून बाहेर न पडणे यास प्रामुख्याने हॉर्मोनमध्ये घडणारे बदल कारणीभूत असतात.
२) बीज वाहून नेणारी फेलोपियन ट्यूब बंद असणे, यात बीज जेव्हा बीजांडातून बाहेर पडते तेव्हा ते या ट्यूबमध्ये येते व येथेच स्त्रीबीज व पुरुषबीज एकत्र येऊन गर्भधारणा होते. परंतु ट्यूबमध्ये अवरोध असेल तर स्त्रीबीज व पुबीज एकत्र येऊ शकणार नाहीत म्हणून गर्भधारणा होत नाही.
३) गर्भाशयात पडदा असणे, अर्बुद असणे किंवा गर्भाशयाला निरनिराळ्या इन्फेक्‍शनमुळे सूज असल्याने स्त्री-बीज फलित जरी झाले तरी गर्भाशयात गर्भधारणा किंवा गर्भाची वाढ होऊ शकत नाही.
४) गर्भाशय मुख दुर्बल असणे, यात गर्भधारणा झाली तरी गर्भाचे वजन पेलून धरण्याची क्षमता गर्भाशय मुखात नसल्याने गर्भस्त्राव होतो.
५) योनी मार्गात इन्फेक्‍शन असणे.
६) हॉर्मोनमध्ये बदल घडलेले असणे. या बदलामुळे बीज नीट तयार होत नाही किंवा गर्भाशयात गर्भशय्या पुरेशा प्रमाणात तयार होत नाही. त्यामुळे गर्भधारणा होत नाही.
७) स्त्रीस टी. बी. रुबेला, गुप्तरोगासारखे आजार असणे.

८) थायरॉईडचा त्रास असणे, थायरॉईड ही एक हॉर्मोनल ग्रंथी आहे. या हॉर्मोनमध्ये घडणाऱ्या बदलांनी गर्भधारणा होत नाही.
९) पी.सी.ओ.डी. म्हणजे पॉलिसिस्टीक ओव्हॅरियन डिसीज असणे. यात अंडाशयातून बीज बाहेर न पडता ते तेथेच राहून सिस्ट तयार होतात व वंध्यत्व येते.
१०) वय- मासिक पाळी सुरू झाल्यापासून ती संपेपर्यंत स्त्री गर्भधारणा करू शकत असली तरी वयाच्या ३५ वर्षांनंतर होणारी गर्भधारणा ही त्रासदायक असते व बऱ्याच वेळा गर्भपाताची शक्‍यता असते.
वंध्यत्व म्हणजे केवळ गर्भधारणाच न होणे असे नसून गर्भधारणा झाली तरी पूर्ण ९ महिने गर्भ गर्भाशयात टिकू शकत नाही व गर्भपात होतो. त्यासही वंध्यत्वच म्हणतात.

वंध्यत्वाचे दोन प्रकार असतात.
१) प्रायमरी इन्फर्टिलिटी- यात स्त्रीस पूर्वी कधीही गर्भधारणा झालेली नसते.
२) सेकंडरी इन्फर्टिलिटी- यात स्त्रीस एखादे मूल असते व नंतर गर्भधारणा होत नाही.
स्त्री वंध्यत्व परीक्षण
स्त्री वंध्यत्वाची चिकित्सा करताना खालील परीक्षणे करतात. यात प्रथम तिचे सर्वदेहिक परीक्षण करतात.
१) त्यात तिच्या मासिक पाळीचा इतिहास व तक्रारीची माहिती घेतली जाते.
२) पूर्वी झालेल्या व्याधींचा इतिहास विचारतात.
३) पूर्वी झालेल्या शस्त्रक्रियेची नोंद घेतात.
४) कुटुंब नियोजन साधनांच्या वापराबद्दल माहिती विचारतात.
५) पूर्व प्रसव इतिहास याबद्दल माहिती घेतात.
स्थानिक परीक्षण
१) बाह्य योनी परीक्षण यात स्त्रीस कोणत्या गुप्तरोगाची लागण नाही याची परीक्षा करतात.
२) योनी परीक्षण- योनीत कोठे योनी अर्बुद नाही ना किंवा श्‍वेत स्राव होत नाही ना, याचे परीक्षण करतात. तसेच योनी स्त्रावाचेही परीक्षण करतात.
प्रयोग शालेय परीक्षण
अ) रक्त परीक्षण -
१) यात प्रामुख्याने स्त्रीच्या हॉर्मोनची तपासणी करतात व त्यात ज्या हॉर्मोनच्या पातळीबद्दल झाला असेल त्यावर (औषधी) चिकित्सा केली जाते.
२) तसेच रक्त परीक्षणात त्या स्त्रीचे एच. बी. व इतर कोणते इन्फेक्‍शन नाही ना यासाठी सीबीसी काऊंट केला जातो.
३) वंध्यत्वात टी.ओ.आर.सी.एच. नावाची रक्ताची तपासणी करतात. ज्यात टी. बी. इत्यादीसारखे आजार त्या स्त्रीस झाला आहे किंवा होऊन गेला आहे ते समजते व त्यानुसार उपाय करता येतात.
ब) मूत्र परीक्षणही करतात
क) एन्डोमेट्रीयल बायॉप्सी - यात एन्डोमेट्रियम म्हणजे गर्भाशयात तयार होणाऱ्या गर्भशय्येचे परीक्षण करतात.
ड) सोनोग्राफी - गर्भाशय, अंडाशय, बीज व बीजवाहिनी यांच्या अंतर्गत अवस्थेबद्दल माहिती मिळते. तसेच दर महिन्याला स्त्रीबीज तयार होते का, त्याची वाढ कशी होते, बीज कोणत्या दिवशी अंडाशयातून बाहेर पडते याचे परीक्षण केले जाते.
ई) एच.एस.जी.टेस्ट - म्हणजे हिस्टेरोसाल्पिंगोग्राफी यात गर्भाशय मुखातून डाय आत सोडतात व थोड्या थोड्या वेळाने एक्‍स-रे घेतला जातो. ज्यात तो डाय गर्भाशयातून दोन्ही ट्यूब्जमधून बाहेर पडतो का नाही त्याची तपासणी करतात. यावरून फॅलोपियन ट्यूबमध्ये अवरोध आहे की नाही ते समजते.
फ) लॅपरोस्कोपी- यात दुर्बिणीद्वारे गर्भाशय, बीज, बीजवाहिनी अंडाशय यांची आतून तपासणी केली जाते. त्याच वेळी काही विकृती, अवरोध अढळल्यास ती दुरुस्ती केली जाते. ही परीक्षण पद्धती केवळ निदान पुस्तीच नसून चिकित्सा म्हणूनही लॅपरोस्कोचा उपयोग होतो.
स्त्री वंध्यत्व चिकित्सा
आयुर्वेदानुसार स्त्री वंध्यत्वासाठी पुढील चिकित्सा सांगितली आहे.
१) ज्या हेतुमुळे शरीरात बिघाड होऊन वंध्यत्व आले आहे, प्रथम त्याचा त्याग करणे.
२) मासिक पाळीच्या तक्रारी पाहून त्यानुरूप चिकित्सा केली जाते. यात कुमारी आसव, अशोकारिस्टासारखी औषधे वापरून गर्भाशय गर्भधारणेस योग्य बनवले जाते.
३) गर्भाशयाला बल देणारी औषधे वापरून गर्भाशय गर्भधारणेस योग्य बनवले जाते.
४) बीज तयार करण्यासाठी व त्याची योग्य वाढ होण्यासाठी औषधे दिली जातात.
५) सार्वदेहिक व्याधींची चिकित्सा केली जाते व सर्व शरीर धातूंना बल देणारी बृहन्‌ चिकित्सा करतात.
६) पंचकर्म चिकित्सेत वमन, बस्ती, नस्य इ. ने खूपच चांगले फायदे होतात. या क्रियेने तुमचे शरीर शुद्ध होते. त्यामुळे तयार होणारे हॉर्मोन्सही व्यवस्थित तयार होतात. पी.सी.ओ.डी.च्या रुग्णांना पंचकर्माचा व उत्तर बस्तीचा विशेष उपयोग होतो.
७) उत्तर बस्ती- यात गर्भाशय मार्गाने औषधी आत सोडली जातात. त्याने गर्भाशयाचे आतून शोधन होते व नंतर गर्भाशयाला बल देणारी औषधे दिली जातात. त्यामुळे गर्भधारणा लवकर होण्यास मदत होते.
८) वारंवार गर्भपात होणाऱ्यांनी प्रथम वमन, बस्ती इ. पंचकर्माने प्रथम शरीर शुद्ध करून घ्यावे व नंतर गर्भधारणेस उपयुक्त औषधे घेतली तर त्याचा शरीरावर परिणाम लवकर होऊन गर्भधारणा लवकर होते.
९) शतावरी, अश्‍वगंधा, फलघृत, गोघृत इ. सारखी अनेक गुणवान औषधी वापरून स्त्रीच्या सर्व धातू व गर्भाशय यांना बल दिले जाते व त्यामुळे गर्भधारणा होऊन होणारी संतती आरोग्यवान असते.
१०) अर्वाचिन औषधी चिकित्सेत बीज नीट तयार होणे, ते वाढणे यासाठी औषधी चिकित्सा देतात.
११) आय. यु.आय. नावाची उपचारपद्धती केली जाते. यात पतीचेच वीर्य योनीमार्गातून गर्भाशयात इंजेत्शनद्वारे सोडले जाते.
१२) आय.व्ही.एफ- यात स्त्रीबीज व पुरुषबीज यांना प्रयोगशाळेत म्हणजे स्त्री शरीराबाहेर ट्यूबमध्ये एकत्र आणतात व नंतर त्याची विशिष्ट टप्प्यापर्यंत वाढ झाल्यावर फलित गर्भ स्त्रीच्या गर्भाशयात वाढीसाठी सोडला जातो.
वैद्य वर्षा देशपांडे

No comments:

Post a Comment

ad