आयुष्यामध्ये माणसाला डोकेदुखी ही केव्हा ना केव्हा तरी सतावते. कधीतरी डोकेदुखी नाही असा माणूस शोधून सापडणे कठीणच! अशा या डोकेदुखीची कारणे व तीव्रता प्रत्येक माणसागणिक वेगवेगळी असू शकतात. ढोबळ मानाने डोकेदुखी ही दोन प्रकारात विभागता येते. १) तीव्र डोकेदुखी, २) सौम्य किंवा क्रॉनिक डोकेदुखी. तीव्र डोकेदुखीमध्ये डोके काही काळापुरते जास्त प्रमाणात दुखते. सौम्य डोकेदुखी ही खूप दिवस बऱ्याच दिवसांपासून असते. आंतरराष्ट्रीय डोकेदुखी संस्थेने डोकेदुखी १४ गटांमध्ये विभागली आहे. डोकेदुखीच्या निदानानुसार पहिले चार गट हे प्राथमिक डोकेदुखीचे, नंतर ४ ते १२ गट हे माध्यमिक डोकेदुखीचे व शेवटचे दोन गट मज्जातंतू व चेहऱ्याच्या दुखण्याचे समजले जातात.
डोकेदुखीच्या व्याधीचा अभ्यास फार पुरातन काळापासून सुरू आहे. १९६२ मध्ये थॉमस विलीस या शास्त्रज्ञाने डोकेदुखीचे पहिले वर्गीकरण केले. १७८७ मध्ये क्रिस्टियनबार या शास्त्रज्ञाने डोकेदुखीचे प्राथमिक व माध्यमिक असे गट करून त्यात ८४ प्रकार अंतर्भूत केले.
डोकेदुखी ही अनेक कारणांमुळे होऊ शकते. काही प्रकारांमध्ये डोकेदुखीबरोबर मान ताठ होणे, ताप येणे, आकडी किंवा फिट येणे, बेशुद्धी होणे, कान व डोळे दुखणे अशी काही लक्षणे असतील तर त्यासाठी ताबडतोब वैद्यकीय सुविधा पुरविण्यासाठी लक्ष द्यावे लागते. कधीही डोके न दुखणाऱ्याचे सतत डोके दुखणे व लहान मुलांच्या डोके दुखण्याकडे ताबडतोब लक्ष देऊन वैद्यकीय तपासणी करावी लागते.
डोकेदुखीच्या कारणांचे तीन प्रकार आढळतात. १) स्थानिक, २) सार्वदेहिक, (शरीराशी संबंधित),
३) प्रतिक्षेपित (शरीराच्या एका भागातील आवेगामुळे इतरत्र झालेल्या प्रतिक्रियेमुळे).
स्थानिक कारणांमध्ये सर्दी, नासा केटरातील शोथ (चेहऱ्याच्या हाडामधील नाकाशी जोडलेल्या हवा असलेल्या पोकळीच्या अंतत्र्वचेची दाहयुक्त सूज), डोळ्यातील काचबिंदू मेंदूपासून निघणाऱ्या पाचव्या मज्जेच्या शाखेस सूज येणे, मस्तिष्क शोथ (मेंदूची दाहयुक्त सूज) परिमस्तिष्क शोथ (मेंदूच्या आवरणाची सूज) व मस्तिष्कातील अर्बुदे (गाठी) यांचा अंतर्भाव होतो.
सार्वदेहिक कारणांमध्ये कोणत्याही कारणाने आलेला ज्वर, मूत्रपिंडाचा विकार, रक्तदाबाधिक्य, मद्यपान वगैरे गोष्टींचा अंतर्भाव होतो. प्रतिक्षेपित कारणांमध्ये यकृताचे विकार अपस्मार(फेफरे), हिस्टेरिया, अतिविचार, मानसिक क्षोभ, जागरण, अतिवाचन, दृष्टिदोष, अतिशय झगझगित प्रकाश यांचा अंतर्भाव होतो.
सर्दी झाल्यावर प्रथम डोके दुखते. सर्दी ही गारठा, जंतुदोष व अॅलर्जीमुळे होते. थंड हवा किंवा गारठा असल्यास शरीराचे उष्णतामान खाली येते. ज्यामुळे सर्दी होऊ शकते. काही जणांना धूर, धूळ, परागकण यांची अॅलर्जी असते. अशा व्यक्ती वरील कारणांच्या संपर्कात आल्यावर त्यांना सर्दी होते. अतिसूक्ष्म अशा विषाणूंचा संसर्ग हा श्वासमार्ग, घसा व नाक यांना झाल्यास डोके जड होते. व आतील भागाला सूज येते. सर्दीचा संसर्ग नाकाजवळील वातपोकळीत पोहचून त्याचा दाह सुरू होतो व त्यामुळे डोके दुखते. उध्र्वश्वसनसंस्थेच्या जंतुसंसर्गामुळे सायनस नावाचे दुखणे संभवते. यामध्ये डोक्याच्या व चेहऱ्याच्या हाडांमधील पोकळ जागांमध्ये चिकट द्रवपदार्थ साठतो व डोके दुखते.
अंगात ताप असताना डोके दुखते. वेगवेगळ्या प्रकारच्या आजारांमध्ये डोकेदुखी तीव्र किंवा सौम्य असते. टायफॉईड, मलेरिया, पोलीओ, कांजण्या, मेंदूज्वर, गोवर, इनफ्ल्यूइन्झा यामध्ये तापाचे व डोकेदुखीचे प्रमाण तीव्र असते. आजकालच्या धकाधकीच्या जीवनामुळे बऱ्याचजणांची डोकेदुखी ही चिंतेमुळे असते. श्रीमंत पैसे लपविण्याची चिंता करतात. गरीब दोनवेळच्या जेवणाची चिंता करतात. मध्यमवर्गीय संसाराविषयी, मुलाबाळांचे आरोग्य व शिक्षणाविषयी चिंता करतात. अशी माणसे सतत बेचैन राहतात. व डोकेदुखीला सामोरे जातात.
काही जणांना मानसिक विकृती असतात. या मानसिक ताणांमुळे डोकेदुखी होऊ शकते. डोकेदुखी बरोबर चक्कर येत असेल तर रुग्णाला मधुमेह, उच्चरक्तदाब औषधांची अॅलर्जी, दारू-तंबाखूचे व्यसन, मेंदूचा विकार, लॅबरिनथाईन व्हरटिगो यापैकी एक कारण असू शकते.मेनिंनजायटिस म्हणजे मेंदूच्या आवरणाला सूज येणाऱ्या आजारात प्रचंड डोकेदुखी असते व ताप येतो. काही वेळेस बेशुध्दी असते. हाडांच्या कवटीमधल्या मेंदूभोवती ३ आवरणे असतात. त्यांना मेनिनजेस म्हणतात. या तीन आवरणातील बाहेरच्या दोन आवरणांमध्ये सेरेब्रोस्पाइनल किंवा मज्जाद्रव असते. या द्रवाला बुरशी, विषाणू क्षयाचे जंतू, जिवाणू यांचा जंतुसंसर्ग झाल्यास वरील प्रकारचा आजार उद्भवतो. मेंदूच्या आतमध्ये असणाऱ्या पोकळीमध्ये द्रव असते. या पाण्यासारख्या द्रवाचा योग्य निचरा न झाल्यास त्याचा दाब मेंदूवर पडून डोकेदुखी सुरू होते. मेंदूच्या आवरणांना सूज येऊन जर रक्तस्राव झाला तर डोके फुटल्याप्रमाणे वेदना होऊन बेशुद्धी होते व रुग्णाला ताबडतोब हॉस्पिटलमध्ये हलवावे लागते.
चेहरा व डोक्यामागील भागातील मज्जातंतूंची वेदना असेल तर डोके प्रचंड दुखते. काही वेळेस डोके हे विशिष्ट ठिकाणी दुखत असेल तर मेंदूमध्ये गाठ असण्याची शक्यता असते. मानेच्या व डोक्याच्या मागच्या बाजूस डोकेदुखी असेल तर ती रक्तदाब वाढल्यामुळे होते. काही औषधे जसे सॉरबिट्रेट जे रक्तवाहिनी रुंदावण्याचे काम करते. यामुळे डोकेदुखी होऊ शकते. मलावरोध होऊन शौचाला साफ होत नसेल तर काही वेळेस डोकेदुखी होते. शौचाला न झाल्यामुळे आतडय़ातून विषारी व अनावश्यक द्रव्ये परत रक्तात शोषली जातात त्यामुळे डोकेदुखी वाढते. स्थूलता, वारंवार दिली जाणारी काही औषधे, बाळंतपण व म्हातारपण यामध्ये कमेरेचे व पोटाचे स्नायू अशक्त होतात. तसेच घामावाटे शरीरातील पाणी बाहेर जास्त प्रमाणात टाकले गेले तर वरील सर्व शक्यतांमध्ये मलाविरोध होऊ शकतो. मूत्रपिंडाचे कार्य बिघडल्यावर रक्तातील अनावश्यक द्रव्ये शरीराबाहेर टाकली जात नाहीत. यामुळे डोकेदुखी होऊन रक्तदाब वाढतो व हातापायांवर सूज येते. काही वेळेस इतर अवयव जसे जठर, यकृत, प्लीहा गर्भाशय यात जर काही बिघाड असेल तर तेथील वेदना मज्जातंतूद्वारे डोक्यात परावर्तीत होऊन डोके दुखते. मायग्रेन किंवा अर्धशीशीचा त्रास असेल तर डोके अर्धे दुखते. हे दुखणे बरेच दिवस चिवटपणे राहते. डोळ्यावर ताण पडल्यावर डोके दुखते. सतत शिवणकाम, वाचन करणे, टी.व्ही. बघणे यामुळे डोळ्यांवर ताण पडतो व डोकेदुखी सुरू होते.
साध्या वैद्यकीय तपासण्या व उपचारांनी डोकेदुखी थांबत नसेल तर मज्जातंतूच्या विकारासाठी किंवा सूज व दाह असण्याची शक्यता पडताळण्यासाठी हेड सिटीस्कॅन नावाची तपासणी केली जाते. ज्यामध्ये मेंदूच्या सर्व कोनातून फोटो घेतले जातात. ज्यामुळे दाह किंवा सूज कोणत्या भागात आहे हे समजते. त्यामुळे पुढील उपचार करणे सोपे जाते. अशा या विविध प्रकारच्या डोकेदुखींवर वेगवेगळे उपचार केले जातात. जीवाणू, विषाणूंमुळे होणाऱ्या सर्दी व तापातील डोकेदुखीवर गरम पाण्याचा वाफारा घ्यावा. क्रोसिन किंवा मेटॅसिनच्या १-२ गोळ्या घ्याव्यात. नाकामध्ये ऑट्रीव्हीनसारखे ड्रॉप्स टाकावेत. प्रतिजैविके (अॅन्टीबायोटिक्स) योग्य प्रमाणात डॉक्टरांच्या सल्ल्याने घ्यावीत. सायनसचा त्रास होत असेल तर वरील सर्व उपायांबरोबर सायनसच्या भागावर शेक द्यावा. जंतुसंसर्गात ताप जास्त असेल तर डोक्यावर बर्फ किंवा गार पाण्याच्या पट्टय़ा ठेवाव्यात.
मेंदूच्या आवरणाचा दाह किंवा सूज असेल तर मेंदूवर वाढलेला दाब कमी करण्याकरता मज्जाद्रव पाठीच्या कण्यातून काढावा लागतो. त्यासाठी रुग्णाला रुग्णालयात नेऊन प्राणवायू देऊन डॉक्टरांच्या देखरेखेखाली ही प्रक्रिया करावी लागते, तसेच सल्फा किंश टेट्रासायक्लिन क्लॉरॅमफेनिकॉल अशी औषधे डॉक्टरांच्या सल्ल्याने द्यावी लागतात. टी. बी. मेनिंनजायटिस असेल तर स्ट्रेप्टोमायसिन आयसोनायझाईड वगैरे औषधे योग्य प्रमाणात घ्यावी लागतात. डोकेदुखी ही चिंतेमुळे होत असेल तर डॉक्टर कॉम्पोज ही एक गोळी किंवा इतर काही औषधे देतात. ज्यामुळे मन शांत होऊन झोप लागते. मलावरोधाने डोके दुखत असेल तर सौम्य रेचक देता येते. जास्त पाणी पिण्याने व पालेभाज्या खाल्ल्याने ही सवय कमी होऊ शकते. पोटाचे व्यायाम केल्याने व गरम पाणी पिण्याने शौचास साफ होऊ शकते. रक्तदाब वाढल्याने डोके दुखू लागले तर भरपूर विश्रांती घ्यावी. खारवलेले पदार्थ टाळावेत, धूम्रपान, मद्यपान, टाळावे. मानसिक ताण कमी करण्याचा प्रयत्न करावा. योगासने करावीत. आयुर्वेदिक चिकित्सेमध्ये डोकेदुखीसाठी खालीलप्रमाणे उपाय केले जातात. रक्तधातूतील दुष्टीमुळे होणाऱ्या शिर:शूलमध्ये शिंग, जळू, तुंबडी वापरून रक्त काढावे लागते. वानज शिर:शूळ असेल तर महावात विध्वंस व महायोगराज गुग्गुळ आल्याच्या रसाबरोबर दिले जाते. अगुतेल व नारायणतेल गरम करून नाकात घालावे. पित्तज शिर:शूळ असेल तर प्रवाळ सुवर्णमाक्षिक मौक्तिकभस्म मोरावळ्याच्या रसात किंवा डाळिंबाच्या पाकात चाटवावे. कफज शिर:शूळ असेल तर वातज शिर:शुळातील औषधे गरम पाण्याबरोबर किंवा दशमूलारिष्टाबरोबर द्यावीत. एवढय़ा उपायांनी जर डोकेदुखी नाही थांबली तर वातजावर शिरोबस्ती, पित्तजावर रेचक व कफजावर वमनचिकित्सा आयुर्वेदात केली जाते.
अशी ही डोकेदुखी होऊच नये म्हणून खालील काळजी घ्यावी. जीवाणू व विषाणूंचा संसर्ग होऊ नये म्हणून शरीराची प्रतिकारशक्ती वाढवावी, त्यासाठी समतोल सकस आहार घेणे जरुरी आहे. धूर, धूळ यापासून स्वत:चे संरक्षण करून स्वच्छतेवर भर द्यावा. अ व ड जीवनसत्वयुक्त आहाराने प्रतिकारशक्ती वाढते. दूषित हिरडय़ा, टॉन्सिल्सचा त्रास, फुटलेला कान यावर ताबडतोब उपचार करावेत. अन्यथा संसर्ग मेंदूपर्यंत पोहोचण्याची शक्यता असते. अर्धशीशीचा त्रास असेल तर कडक उन्हात फिरणे टाळावे. थंड हवेपासून स्वत:चा बचाव करावा. डोळ्यांमुळे होणाऱ्या डोकेदुखीसाठी नेत्रतज्ज्ञांकडून आवश्यक ती तपासणी करून घेणे आवश्यक आहे. जागरणे, मानसिक तणाव, उपोषण निर्जली उपाय टाळल्यास डोकेदुखीला आमंत्रण मिळत नाही. औषधांची गरज असल्याशिवाय औषधे घेऊ नयेत. योगामधील शवासन केल्यास मानसिक थकवा व ताण कमी होऊ शकतो. अॅक्युपंक्चरच्या उपायाने सततची डोकेदुखी काही प्रमाणात कमी होऊ शकते. मार्च २००७ मध्ये काही संशोधकांनी असे प्रसिद्ध केले आहे की मेंदूला इलेक्ट्रोड जोडून मेंदूला उत्तेजित करून डोकेदुखी कमी होऊ शकते. नामस्मरण व अध्यात्मानेसुद्धा मनाचा ताण कमी होऊन डोकेदुखीसारख्या व्याधी आपल्यापासून दूर राहू शकतात. अशा या डोकेदुखीसाठी वेळेवर उपचार, पथ्य झाल्यास आपण आपले दैनंदिन व्यवहार सुरळीतपणे चालवू शकतो.Ayurveda, healthy Food, Healthy Living, Abstract India, Shree Balaji Tambe, India, Yoga, Meditation, Life Style, Marathi Blog
No comments:
Post a Comment