Sunday, July 11, 2010

गरम पाण्याचा शेक घ्या!

गरम पाण्याचा शेक घ्या!
संतोष शेणई

सध्याच्या गतिमान आयुष्यात थोडी विश्रांती घेऊ म्हटले तरी आसपासचे जग आपल्याला ती घेऊ देत नाही. त्यातून वेगवेगळे तणाव निर्माण होत आहेत. कामाच्या ताणामुळे शरीरात व मनात तणाव निर्माण होतात. त्यातून डोकेदुखी, पाठदुखी, कंबरदुखी कधी मागे लागते, हेच कळत नाही. पाठीचा कोणता स्नायू दुखतोय हे नेमके कळत नाही, तर कधी कमरेत लचक भरलीय का, ही शंका येते. फ्रोजन शोल्डरचा कुणाला त्रास होऊ लागतो, तर कुणाचे गुडघे कुरकूर करू लागतात. एखाद्या वेदनाशामक मलमाने मालिश करून आपण तातडीचा आराम मिळवतोही; पण या दुखण्यातून पूर्ण सुटका होत नाही. आपल्याला माहीत असलेले उपचार घ्यावेत, तर ते महागडे तरी असतात किंवा ते करून घेण्यासाठी भरपूर वेळ द्यावा लागतो. या दोन्ही गोष्टी आपल्याला शक्‍य नसतात. आता एक आणखी पर्याय आपल्यापुढे आला आहे, तो म्हणजे "उष्ण जलोपचार'!

गरम पाण्यात पंचा बुडवून दुखऱ्या ठिकाणी शेक घ्यायची आपली पद्धत होतीच की! पण आजीच्या पद्धतीना अशास्त्रीय ठरवून आपण त्या बाद केल्या आहेत. आता त्या पद्धतीची परदेशी आवृत्ती आली आहे - "हॉट वॉटर थेरपी'. डॉ. पॅट्रिक होरे व डेव्हिड हार्प यांनी लिहिलेल्या पुस्तकाचा सुरेख अनुवाद सुभाष जोशी यांनी केला आहे. अगदी अंघोळ करता करता दहा मिनिटे राखून ठेवायची आणि उपचार घ्यायचे, हे सोपे सूत्र यामागे आहे. एकीकडे गरम पाण्याचा दुखऱ्या भागाला होणारा स्पर्श आणि त्या भागाला दिलेला थोडासा व्यायाम, थोडासा ताण यामुळे हे उपचार होतात. ही पद्धत सोपी आहे. ती खूप परिणामकारक असल्याचा डॉ. होरे यांचा दावा आहे. या उपचारपद्धतीची खूप चांगल्या रीतीने या पुस्तकात ओळख करून देण्यात आली आहे. ही उपचारपद्धती नेमकी काय आहे? तिचे वेगळेपण कशात आहे? गरम पाण्याने नेमके काय साधते? याविषयी सुरवातीला निवेदन आहे.

भारतीय संस्कृतीने, आयुर्वेदाने पाण्याला अंतर्गत व बाह्यउपचारात महत्त्व दिलेले आहेच. गरम पाण्याची कुंडे ही तीर्थक्षेत्रे बनतात, हा आपला अनुभव आहे. आयुर्वेदातील स्वेदनाची आपल्याला माहिती आहे. याचाच वेगळा उपयोग डॉ. होरे यांनी करून घेतलेला आहे. आपल्या प्रभावी कथनशैलीत सोपेपणाने ते शरीराची माहिती करून देतात आणि आपल्याला विश्‍वासात घेतात. नेमके कुठे दुखते हे कसे ओळखायचे? तिथे आपल्या आपण मसाज कसा करायचा? हे समजावून सांगतात. मग गरम पाण्यात व्यायाम कसा करायचा, शरीराला ताण कसा द्यायचा, हे सांगतात. आपल्या नेहमीच्या शारीरिक क्रियाच व्यायाम म्हणून किंवा ताण देण्यासाठी उपयोगात आणलेल्या असल्याने आपण काहीतरी वेगळे करायचे आहे, ही भावनाच दूर होते व रुग्णांना आत्मविश्‍वास मिळतो. त्यांनी दैनंदिन सरावाची आखणीही करून दिली आहे. गरम पाण्याच्या उपचारपद्धतीत जसे आयुर्वेदाचे वेगळे रूप तुम्हाला दिसेल, तसे त्यानंतर शरीराला आराम देण्याच्या पद्धतीतही जाणवेल. प्राणायाम, ध्यानधारणा हे उपाय आयुर्वेदाने सांगितले आहेत. शरीर व मन स्वस्थ ठेवण्यासाठी या गोष्टी उपयुक्त ठरतात. या पद्धतीत थोडा बदल करून अमेरिकन रीतीने मोजणी करीत ध्यानधारणा करण्यास डॉ. होरे सुचवतात. एकूण भारतीयांना सहज स्वीकारता येईल, आपल्या जीवनशैलीत असलेलीच अशी ही उपचारपद्धती आहे. ती मुळात अमेरिकनांना सांगितली आहे. त्यामुळे अनेक ठिकाणी अमेरिकन जीवनशैलीनुसार तपशील येतो. भाषांतराच्या वेळी हा तपशील सुधारून घेता आला असता खरा; पण मग कदाचित आपणच म्हणालो असतो, हे तर आपल्याला आजीने आधीच सांगितलेले आहे.

उष्ण जलोपचार - डॉ. पॅट्रिक होरे, डेव्हिड हार्प, अनुवाद - सुभाष जोशी
मेहता पब्लिशिंग हाउस
पाने - १३४, किंमत १२० रुपये.
---- Ayurveda, healthy Food, Healthy Living, Abstract India, Shree Balaji Tambe, India, Yoga, Meditation, Life Style, Marathi Blog

No comments:

Post a Comment

ad