Showing posts with label दिनक्रम. Show all posts
Showing posts with label दिनक्रम. Show all posts

Monday, June 13, 2016

शरीरातील घड्याळ

शरीरातील घड्याळ
- डॉ. श्री. बालाजी तांबे (www.balajitambe.com)
आयुर्वेदाने ऋतुचक्र व शरीरातील घड्याळ यांचा संबंध प्राचीन काळीच दाखवून दिला. वात-पित्त-कफ यांचा शरीरातील घड्याळाशी असलेला संबंध आणि दिवस-रात्र-पावसाळा-उन्हाळा यांचा निसर्गचक्राशी असलेला संबंध अभ्यासून कोणत्या वेळी कोणत्या ऋतूत काय करावे, काय खावे याचे मार्गदर्शन केले आहे. आणि त्यातूनच ब्राह्ममुहूर्तावर ध्यान, सूर्योदयापूर्वी शौचविसर्जन, दुपारी पित्ताचा प्रभाव असताना जेवण, सायंकाळचे हलके भोजन आणि रात्रीच्या पित्तप्रकोपाच्या काळात जाग्रण न करता घेतलेली झोप हे आरोग्याचे मार्ग सुचवले आहेत.

माणसाच्या पायाला आणि त्याच्या मागे अनेक चक्रे लागलेलीच असतात. मनुष्य चक्रम असला, तर त्याला सुदर्शन चक्र दाखवावे लागते आणि बुद्धिमान असला तर त्याला हैराण करणारे चक्रम काही कमी नसतात. विश्वचक्र अविरत चालणारे असून ते आपल्याबरोबर माणसाला आत ओढून ढकलत ढकलत गरागरा फिरावयास लावणारे आहे, हे सर्वपरिचित आहे. एकूण या जगात राहायचे म्हणजे या चक्राबरोबर फिरत राहायचे. पुन्हा पुन्हा भोगाव्या लागणाऱ्या यातनांच्या तेचतेचपणाच्या कंटाळवाण्या जन्म-मरण-जन्म या पुनर्जन्माच्या चक्राच्या तडाख्यातून सुटण्यासाठी म्हणजेच मोक्षप्राप्तीसाठी औदुंबराच्या झाडाच्या भोवती प्रदक्षिणाच घालाव्या लागतात. एकूण काय की गरगर फिरण्याचे निसर्गाचे चक्र हेच सत्य हे समजून घेतल्याशिवाय जीवन सुखी होऊ शकत नाही. भारतीय संस्कृतीने ह्या चक्राला छेद देऊन बाहेर पडण्याचा म्हणजे शक्तीच्या उत्क्रांत क्रियेस "यज्ञ‘ असे नाव दिले. श्रीमद्‌भगवद्‌गीतेत भगवान म्हणतात - 
अन्नाद्‌भवन्ति भूतानि पर्जन्यादन्नसम्भवः । यज्ञाद्‌भवति पर्जन्यो यज्ञः कर्मसमुद्‌भवः ।। 

यज्ञातून प्रकट झालेली परमात्मशक्‍ती मनुष्याला कार्यप्रवृत्त करते. त्यातून ऋतुचक्र निर्माण होऊन ऋतुचक्रापासून पर्जन्य आणि पुढे पावसापासून अन्न निर्माण होते. अन्नापासून "शिते तेथे भुते‘ या म्हणीप्रमाणे अन्नामागे धावणारी माणसे! आणि मग पुन्हा उत्क्रांतीसाठी यज्ञ आणि पुन्हा पुन्हा, पुन्हा पुन्हा कायम फिरणारे असे हे निसर्गचक्र. 

श्रीमद्‌भगवद्‌गीतेतही म्हटलेले आहे की -
एवं प्रवर्तितं चक्रं नानुवर्तयतीह यः । अघायुरिन्द्रियारामो मोघं पार्थ स जीवति ।। 

वरील निसर्गचक्राचे जो प्राणी पालन करत नाही, त्या निसर्गचक्राला अनुसरून वागत नाही आणि जो अहंकार व स्वार्थप्रेरित इंद्रियांच्या (ही इंद्रिये असतात माणसाची पण ती वश असतात बाह्यजगतातील चमक दमक असलेल्या द्रव्याला) स्वाधीन होऊन निसर्गचक्राचे उल्लंघन करतो त्यालाच पापी म्हणतात व त्याचे आयुष्य व्यर्थच जाते. 

जीवनचक्राचा अनुभव आपण नेहमीच घेत असतो. याच चक्रसंकल्पनेच्या मदतीने माणसाने काळ आणि त्याची मापनपद्धती शोधून काढून घड्याळ बनवले. बरीच माणसे हातावर बांधलेल्या घडाळ्याच्या फारच स्वाधीन राहतात व वेळ पाळणे हेच जणू एक मोठे कार्य आहे याचा गाजावाजा करतात. पण हे लोक शरीरातील घड्याळाची, जे जीवनचक्राशी जोडलेले आहे, काळजी घेत नाहीत. वेळ पाळणे हे जेवढे महत्त्वाचे तेवढेच त्यामागची भूमिका, होणारे कार्य आणि अंतिमतः अनुभवता येणारी शांती महत्त्वाची गोष्ट आहे हे कधीही विसरून चालत नाही. आपण जरी शरीराचे घड्याळ विसरायचा प्रयत्न केला, तरी शरीर घड्याळाप्रमाणे चालत राहते. सर्व वनस्पती, जलचर, भूचर, प्राणी, पक्षी निसर्गाच्या चक्राला धरूनच जीवनक्रम जगतात. मनुष्याला मात्र वेळेवर झोपणे, वेळेवर उठणे, वेळेवर खाणे-पिणे व नैसर्गिक क्रीडा-मैथुन का जमू नये? इंद्रियांना रथाच्या घोड्याची उपमा दिलेली आहे. जो दशरथी हा रथ चालवतो, त्याचा जर इंद्रियांवर ताबा राहिला नाही, तर शरीरातील घडाळ्याचे सेकंद, मिनीट, तास, गजर हे सर्व काटे उलट सुलट फिरू लागतात. वेळी अवेळी गजराच्या घंटा शरीर ऐकवते आणि त्याकडेही लक्ष दिले नाही, तर शेवटी शरीररूपी घड्याळ बंद पडते. 

आपण बाहेर जाणार असलो तर व्हिडिओ रेकॉर्ड प्लेअर वर वेळ प्रोग्रॅम करून ठेवल्यास आपला आवडता कार्यक्रम आपण आपल्या अनुपस्थितीत जसा रेकॉर्ड करू शकतो तसेच मेंदू ठराविक वेळेला शरीरात संदेश पाठवून भूक लागणे, शौच विसर्जन करणे, झोपणे, झोपेतून जागे होणे या क्रिया करवत असतो. मनुष्य ज्या वेळी याच्या विपरीत वागतो तेव्हा तो शरीरव्यवस्थेत संप्रेरकांच्या उत्पादन व कार्यव्यवस्थेत अडथळे आणून आजारपणास आमंत्रण देत असतो.
आयुर्वेदाने ऋतुचक्र व शरीरातील घड्याळ यांचा संबंध प्राचीन काळीच दाखवून दिला. वात-पित्त-कफ यांचा शरीरातील घड्याळाशी असलेला संबंध आणि दिवस-रात्र-पावसाळा-उन्हाळा यांचा निसर्गचक्राशी असलेला संबंध अभ्यासून कोणत्या वेळी कोणत्या ऋतूत काय करावे, काय खावे ह्याचे मार्गदर्शन केले आहे. आणि त्यातूनच ब्राह्ममुहूर्तावर ध्यान, सूर्योदयापूर्वी शौचविसर्जन, दुपारी पित्ताचा प्रभाव असताना जेवण, सायंकाळचे हलके भोजन आणि रात्रीच्या पित्तप्रकोपाच्या काळात जाग्रण न करता घेतलेली झोप हे आरोग्याचे मार्ग सुचवले आहेत. वीर्यधातूची शरीरातील प्रभावाची वेळ ओळखून स्त्री-पुरुष संबंधांचे काळवेळ सुचवले. अर्थात अवेळी व चुकीचे कार्य करणाऱ्या व्यक्तींना शक्तिनाशाचा भुर्दंड सोसावा लागतोच. 

एखादा मनुष्य कार्यरत असला किंवा फालतू कामात वेळ घालवत असला, झोपला, उठला, त्याने काहीही केले किंवा तो थांबला तरी बाहेरचा काळ व निसर्गाचे घड्याळ चालूच राहते. प्रत्येक माणसाचे हे कर्तव्यच आहे की, त्याने स्वतःच्या हातावर बांधलेल्या किंवा भिंतीवर टांगलेल्या घडाळ्यावर लक्ष देताना शरीरातून टिकटिक-टिकटिक अशी जाणीव करून देणाऱ्या घडाळ्याकडे पण लक्ष ठेवावे व बाहेरील व आतील संतुलन साधल्याने आरोग्यप्राप्ती, कार्यसिद्धी व सुख मिळवावे.

डॉ. श्री बालाजी तांबे
आत्मसंतुलन व्हिलेज, कार्ला 410 405 
Ayurveda, Vastu shastra, healthy Food, Healthy Living, Abstract India, Shree Balaji Tambe, India, Yoga, Meditation, Life Style, Marathi Blog, Marriages, Love

आरोग्य ताल

आरोग्य ताल
- डॉ. श्री. बालाजी तांबे (www.balajitambe.com)

आपला दिनक्रम या चक्राच्या अनुरूप ठेवला, तर शरीराच्या अनेक क्रिया सुरळीत चालतात. अर्थात, संतुलन कायम राहते. याउलट या चक्राकडे दुर्लक्ष करून स्वतःची मनमानी करत राहिल्यास आज ना उद्या त्याचे दुष्परिणाम सहन करावेच लागतात. 

वयोऽहोरात्रिभुक्तानां तेऽन्तमध्यादिगाः क्रमात्‌ । 
... अष्टांगहृदय सूत्रस्थान
वात- पित्त- कफ हे दोष वय, दिवस, रात्र व अन्नपचन होत असताना अनुक्रमे अंती व मध्यकाळी व प्रारंभी अधिक बलवान असतात व विशेषत्वाने कार्यरत असतात.

वय 
वयाचे तीन भाग म्हणजे बाल्यावस्था, तारुण्यावस्था व वृद्धावस्था. बाल्यावस्थेत स्निग्ध, बलस्वरूप कफाचे आधिक्‍य असते, कारण या काळात शरीराची वाढ होणे अपेक्षित असते. सर्व धातूंना योग्य प्रकारे पोषण मिळून शरीराला दृढ बनवण्याचे काम हा कफ करत असतो. तारुण्यावस्थेत पित्ताचे आधिक्‍य असते, त्यामुळे तारुण्यात जोम, स्फूर्ती मिळून उत्साहपूर्णता मिळू शकते व धडाडीची कामे होऊ शकतात. वृद्धावस्थेत वात वाढतो, त्यामुळे शरीराची शक्‍ती हळूहळू कमी होते, इंद्रियांची ताकद क्षीण होते व शरीराचा नाश होतो.दिवसाचे १२ तास आणि रात्रीचे १२ तास यांचेही प्रत्येकी ३-३ भाग केले असता पहिल्या भागात कफाचे आधिक्‍य असते, म्हणजे सकाळी व संध्याकाळी ६ ते १० हा काळ कफाचा समजला जातो. मधला भाग म्हणजे दुपारी व मध्यरात्री १० ते २ या काळात पित्त वाढत असते, तर तिसऱ्या भागात म्हणजे दुपारी २ ते ६ व रात्रीच्या शेवटी २ ते ६ हा काळ वाताचा असतो. वात- पित्त- कफ यांचे असे ठराविक वेळेला वाढण्याचे आणि नंतर आपोआप कमी होण्याचे चक्र आपल्या शरीरात अविरत, रोजच्या रोज चालू असते.आपला दिनक्रम या चक्राच्या अनुरूप ठेवला, तर शरीराच्या अनेक क्रिया सुरळीत चालतात. अर्थात, संतुलन कायम राहते. याउलट या चक्राकडे दुर्लक्ष करून स्वतःची मनमानी करत राहिल्यास आज ना उद्या त्याचे दुष्परिणाम सहन करावेच लागतात. वात शरीरात गती व हालचाल करू शकणारे तत्त्व होय. झोपेतून उठण्याची क्रिया अर्थातच वाताच्या कार्यक्षेत्रातील आहे. वर पाहिल्याप्रमाणे सकाळी सहा वाजता वाताचा काळ संपतो. सहज उठायचे असेल तर वाताच्या काळातच उठायला हवे. एकदा का सहा वाजल्यानंतर कफाचा काळ सुरू झाला, की उठणे अधिकाधिक अवघड होत जाते. सकाळी लवकर उठण्याचा दुसरा महत्त्वाचा फायदा म्हणजे वाताच्या काळात मलमूत्र विसर्जन सुलभ व योग्य प्रकारे होऊ शकते, कफाचा काळ सुरू झाला की विसर्जनाची क्रिया पूर्ण होणे अवघड होते. 

आधुनिक विज्ञानामुळे झोपेसाठी, उठण्यासाठी, अन्नग्रहण किंवा शौचविसर्जनासाठी शरीरात काय घडते, कुठली केमिकल्स व हार्मोन्स काम करतात हे दाखवून दिले व शरीरातील घड्याळाचा व जैविक परिक्रमेच्या कल्पनेचा स्वीकार केलेला आहे. पित्त हे पचनाचे कार्य करणारे तत्त्व आहे, त्यामुळे पित्ताच्या काळात अर्थात दुपारी १२ ते १ च्या दरम्यान जेवल्यास अन्नाचे पचन सहज होऊ शकते. पित्ताचा काळ असूनही उपाशी राहिल्यास काही काम नसलेले पित्त शरीरात अतिरिक्त उष्णता वाढवते. पित्ताचा काळ उलटून गेल्यानंतर जेवल्यास अन्न पचन करणाऱ्या पित्ताच्या अभावी पचू शकत नाही. म्हणून मध्यानी जेवणेच आरोग्यासाठी हितकर समजले जाते.

झोपण्याच्या बाबतीतही त्रिदोषांचे हे चक्र ध्यानात घ्यावे लागते. झोप येते ती कफामुळे. कफाचा काळ रात्री १०-११ वाजेपर्यंत असतो. त्यामुळे या वेळेपर्यंत झोपल्यास झोप लगेच लागते व ती झोप शांत असते. याउलट रात्री ११ च्या पुढेही जागत राहिले, म्हणजे पित्ताचा काळ सुरू झाला, की त्याने शरीरात पित्तदोषाचे असंतुलन व्हायला सुरवात झाल्याने अंग गरम होते; डोळ्यांची, हातापायांच्या तळव्यांची आग होणे, डोके दुखणे, केस गळणे वगैरे विविध तक्रारींना आमंत्रण मिळते. रात्रपाळी करणाऱ्या किंवा विमानात काम करणाऱ्या असंख्य व्यक्तींचा हा अनुभव आहे.

बऱ्याच वेळा दवाखान्यात मला काही रुग्ण सांगतात, की सायंकाळी ६-६।। च्या सुमारास पोटात खड्डा पडतो आणि काही खावेसे वाटते. तसेच, काही जण सांगतात की रविवार असल्याने छान उशिरापर्यंत झोपायचे ठरवून आदल्या शनिवारी रात्री उशिरापर्यंत टी.व्ही. बघत बसलो, तरी रविवारी सकाळी सहा वाजताच जाग आली. नंतर तासभर अंथरुणात लोळण्याचा प्रयत्न केला तर उठल्यावर अंग दुखू लागल्याने सगळा रविवारचा मूडच गेला. अशा प्रकारे सायंकाळी पित्ताचा काळ संपताना भूक लागल्यास काहीतरी (तळलेले पदार्थ सोडून) अवश्‍य खावे. जैन धर्माप्रमाणे तर अजूनही सूर्यास्तानंतर काहीही खात नाहीत.

अशाच प्रकारे आयुर्वेदाने बाह्य ऋतुचक्राचा व शरीरप्रकृतीच्या घड्याळाचा त्रिदोषांशी संबंध दाखवून दिला. लहान मुले, तरुण किंवा वृद्धांनी सकाळ, दुपार, संध्याकाळी, रात्री; तसेच सहा ऋतूंपैकी कोठल्या ऋतूत काय खावे, काय खाऊ नये, कोठले काम करावे आदी आहार-विहाराचे उत्कृष्ट मार्गदर्शन केलेले आहे. अर्थात, त्याचबरोबर कोठला रोग कोणत्या ऋतूत बळावण्याचा किंवा बरा होण्याची शक्‍यता असते हे दाखवून दिलेले आहे.

अशा प्रकारे मनुष्यमात्र जर या कालचक्रात किंवा घड्याळाला अनुसरून चालेल, म्हणजेच इतरांना दिलेल्या भेटीच्या वेळा सांभाळण्याबरोबरच जर परमेश्वराला म्हणजेच निसर्गाला दिलेली वेळ पाळेल; तर संतुलित, निरोगी व शांत आयुष्याची गुरुकिल्ली देव आपल्या हाती देईल.


Ayurveda, Vastu shastra, healthy Food, Healthy Living, Abstract India, Shree Balaji Tambe, India, Yoga, Meditation, Life Style, Marathi Blog, Marriages, Love

Wednesday, December 21, 2011

ऊब व्यायामाची


डॉ. श्री बालाजी तांबे
व्यायामाची ऊब व्यक्‍तीला घडवते. शरीराचे स्नायू बळकट करण्यासाठी व नंतर येणारा जीवनाचा भार सहन करण्यासाठी शरीराला स्थैर्य लागते. जीवनात कितीही अडचणी आल्या तरी पळून जाता येत नाही. त्या अडचणींना सामोरे जावेच लागते. अडचणींना सामोरे जाण्याचे स्थैर्य व धैर्य व्यायामाने मिळते. व्यायामाने रक्‍ताभिसरण वाढते. हात, मांड्या, छाती, पाय यांचे स्नायू घट्ट होऊन त्यांना सुंदर आकार येतो. एकदा सकाळी व्यायाम झाला, की साधारणतः दिवसभर थंडीचा लवलेश जाणवत नाही. तेव्हा व्यायामामुळे स्वतःला तर ऊब मिळतेच, परंतु आवश्‍यक असणाऱ्यांना संरक्षणाची व मायेची ऊबही देता येते. 

"तरुणपणी तरी प्रत्येकाने व्यायाम करावा' असे बऱ्याच वर्षांपासून अनेक जण सांगत आहेत. पण "इच्छा असूनही तसे जमलेच नाही' असे सांगणारेही अनेक जण आहेत. उशिरा उठण्याची सवय असणाऱ्यांना व्यायाम जमणार तरी कसा? कारण उशिरा उठल्याने त्यांना शाळेला, कॉलेजला, कामावर जायची घाई होते. "अनेकांनी सांगून पाहिले, परंतु व्यायामाला काही मुहूर्त लागत नव्हता. पण आता नक्की ठरवले, की या थंडीत व्यायाम नक्की करायचा,' असा निश्‍चय अनेक जण दर वर्षी करताना दिसतात.

थंडीचा व व्यायामाचा संबंध काय? एक संबंध म्हणजे व्यायाम करणाऱ्याने भरपूर व पौष्टिक खावे, छान मलईसहित दूध प्यावे असा रिवाज असल्याने थंडीच्या दिवसांत छान पौष्टिक आहार करता येईल, अशा समजाने थंडीत व्यायामाला सुरवात करण्याचे ठरविले जाते. दुसरा व्यायामाचा व थंडीचा संबंध असा, की थंडीत खाऊन-पिऊन जाड पांघरूण वा रजई घेऊन झोपले तर ऊब मिळते, वजनही वाढते, पण घाम येत नाही. व्यायामाचा उपयोग ऊब मिळण्यासाठी, शरीर गरम होण्यासाठी तर होतोच, पण व्यायामाने छानपैकी घाम निघून गेला, की नंतर शरीराला ताजेतवाने वाटण्यासाठीही होतो.

प्रत्येकाला ऊब हवी असते, हे आपण जाणतोच. त्यातली व्यायामाची ऊब व्यक्‍तीला घडवते. शरीराचे स्नायू बळकट करण्यासाठी व नंतर येणारा जीवनाचा भार सहन करण्यासाठी शरीराला स्थैर्य लागते. जीवनात कितीही अडचणी आल्या तरी पळून जाता येत नाही. त्या अडचणींना सामोरे जावेच लागते. अडचणींना सामोरे जाण्याचे स्थैर्य व धैर्य व्यायामाने मिळते. खूप पैसे मिळतात म्हणून चित्रपटात काम करणारे नट व्यायामशाळेत म्हणजे जिममध्ये जाऊन शरीराचे पट दाखवता येतील इथपर्यंत घटवितात. मग काही तरुण मुले मात्र भाव मारण्यासाठी त्यांचेच नुसते अनुकरण करण्याचा प्रयत्न करतात.

मुळात शरीराला एक घाट पाहिजे, खाण्या-पिण्याच्या सवयी चांगल्या पाहिजेत आणि व्यायामाची सवय पाहिजे. 50 वर्षांपूर्वी, भाव मारण्यासाठी म्हणून नव्हे, तर प्रकृती सुदृढ राहावी, आरोग्यवान राहता यावे व जीवनाला सहजतेने सामोरे जाता यावे म्हणून सर्वच मुले व्यायाम करत असत. दंड-बैठका, सूर्यनमस्कार हे अत्यंत आवडते व प्रचलित व्यायामप्रकार बहुतेक सर्व घरी होत असत. काही जण आखाड्यात जाऊन वजन उचलणे, डंबेल्स फिरवणे, मल्लखांब खेळणे किंवा कुस्ती लढणे असे व्यायाम करत असत. अर्थात कुस्तीसाठी दंड-बैठकांची आवश्‍यकता असतेच.

काय घडले ते कळायला मार्ग नाही, परंतु व्यायामाची आवड मध्यंतरीच्या काळात कमी झाली. कस नसलेले अन्नधान्य हे यासाठी कारण असावे कदाचित. "व्यायाम करा, शरीर कमवा' असे कोणी सांगितले तर "आम्ही शांतताप्रिय आहोत, आम्हाला कुठे लढायला जायचे आहे?' अशा तऱ्हेचे विचार ऐकू येऊ लागले. परंतु लढाईला जायचे नसले तरी स्वसंरक्षण किंवा अबलांचे-दुर्बलांचे संरक्षण करावेच लागते. तसेच देशाच्या सीमा जागृत ठेवण्यासाठी सुदृढ सैनिकांची आवश्‍यकता असते.

पूर्वीच्या काळी गावात हनुमानाचे मंदिर असे व मंदिरापुढे कुस्तीसाठी हौदा व इतर व्यायाम करण्यासाठी जागा असे. अत्यंत अल्प खर्चाच्या अशा व्यायामशाळा गावोगावी असत. एखाद्या शहरात सुदृढ शरीराला महत्त्व देणारे, सामाजिक जाण असलेले किंवा धनिक व्यक्‍तिमत्त्व असले तर त्या ठिकाणी व्यायामाची इतर साधने, पोहण्यासाठी तलाव अशा इतर सुविधा असत. बडोद्यासारख्या ठिकाणी श्री. माणिकरावजी यांचा आखाडा प्रसिद्ध व सर्वांच्या परिचयाचा होता.

सकाळी उघड्या हवेत मैदानावर व्यायाम करणे, मैदानावर पळणे, तेथे थोडी परेड करणे आणि हुतूतू, खोखो असे व्यायामाला पूरक खेळ खेळले जात असत. पण अलीकडे जिम (व्यायामासाठी यंत्रशाळा) ठिकठिकाणी सुरू होईपर्यंत व्यायामाचे महत्त्व जणू कोणाला समजतच नाही. अर्थात शर्टाची वरची दोन बटणे उघडी ठेवण्याची फॅशन आल्याचा एक फायदा झाला, की उघड्या शर्टातून दिसणारी छाती भरदार आहे हे लोकांना दिसावे, या हेतूने तरुण मुले पुन्हा व्यायाम करू लागली.

व्यायामाने रक्‍ताभिसरण वाढते. हात, मांड्या, छाती, पाय यांचे स्नायू घट्ट होऊन त्यांना सुंदर आकार येतो. एकदा सकाळी व्यायाम झाला, की साधारणतः दिवसभर थंडीचा लवलेश जाणवत नाही. तेव्हा व्यायामामुळे स्वतःला तर ऊब मिळतेच, परंतु आवश्‍यक असणाऱ्यांना संरक्षणाची व मायेची ऊबही देता येते. 

---- Ayurveda, Vastu shastra, healthy Food, Healthy Living, Abstract India, Shree Balaji Tambe, India, Yoga, Meditation, Life Style, Marathi Blog, Marriages, Love

हिवाळ्यातील उबेसाठी व्यायाम


डॉ. श्री बालाजी तांबे
व्यायाम हा आपल्या दिनक्रमातील अविभाज्य भाग असायला हवा; मात्र हिवाळ्यात तरी व्यायाम करायलाच पाहिजे. शरीराबरोबरच मनालाही प्रफुल्ल करणारा, शरीरातील अग्नी प्रदीप्त करून आतून ऊब देणारा आणि एकंदर शरीरसामर्थ्य वाढवण्यास मदत करणारा व्यायाम नेमका कोणता करायचा, किती करायचा, कधी करायचा या सर्व गोष्टी माहिती असायला हव्यात. 

थंडीच्या दिवसात ऊब मिळविण्यासाठी अनेक उपाय योजावे लागतात. लोकर विणून तयार केलेले स्वेटर्स, पायमोजे, शाल, कानटोपी किंवा स्कार्फ, रात्री झोपताना ऊबदार रजई वगैरे साधनसामग्री हिवाळ्यात हाताशी असावी लागते. थंड प्रदेशात तर उबदार हवेचा झोत सोडणाऱ्या हीटर्सची किंवा पायाखालची फरशी ऊबदार राहावी यासाठी विशेष योजना करावी लागते. थंडीपासून संरक्षण होण्याच्या दृष्टीतून या सर्व गोष्टी आवश्‍यक असतातच, पण याशिवाय ऊब मिळविण्यासाठी आपल्या हातात असणारा, सोपा पण प्रभावी उपाय म्हणजे व्यायाम. वास्तविक व्यायाम हा आपल्या दिनक्रमातील अविभाज्य भाग असायला हवा; मात्र हिवाळ्यात तरी व्यायाम करायलाच पाहिजे. शरीराबरोबरच मनालाही प्रफुल्ल करणारा, शरीरातील अग्नी प्रदीप्त करून आतून ऊब देणारा आणि एकंदर शरीरसामर्थ्य वाढवण्यास मदत करणारा व्यायाम नेमका कोणता करायचा, किती करायचा, कधी करायचा या सर्व गोष्टी माहिती असायला हव्यात.

व्यायामाचे साध्य
व्यायामाचे अनेक प्रकार आहेत. चालणे, पळणे, जॉगिंग करणे, पोहणे, योगासने करणे, सायकल चालवणे, जोर काढणे, दंड बैठका काढणे वगैरे. सध्या मल्लखांब, कुस्तीसारखे व्यायाम जास्त प्रचारात दिसत नाहीत, त्याऐवजी ऍरोबिक्‍स, जिममध्ये जाऊन व्यायाम करणे, पुल-अप्स करणे वगैरे आधुनिक प्रकार अधिक रूढ होत आहेत. व्यायामाच्या प्रकारानुरूप त्याचे फायदे निरनिराळे असतात. त्यामुळे व्यायामातून आपल्याला काय साध्य करायचे आहे, याचा विचार करून कोणता व्यायाम करायचा हे ठरवायला लागते.

शरीरयष्टी पिळदार करण्याच्या दृष्टीने व्यायाम करायचा असल्यास वेटलिफ्टिंग, दंडबैठका, जोर काढणे वगैरे प्रकार उपयुक्‍त ठरू शकतात. "बॉडी बिल्डिंग" हा जो प्रकार सध्या तरुण पुरुष वर्गाचा आवडता विषय आहे, त्यासाठी असे प्रकार उपयुक्‍त असतात. मात्र त्याचा अतिरेक होणार नाही, व्यायाम करताना दमछाक होऊन फायद्याऐवजी नुकसान होणार नाही, याकडे लक्ष ठेवायला लागते. धावणे, पोहणे, सायकल चालवणे, ऍरोबिक्‍स यांसारख्या व्यायामाने रक्‍ताभिसरण प्रक्रिया सुधारण्यास मदत मिळते, स्नायू लवचिक राहतात, हृदय व फुप्फुसांची कार्यक्षमता वाढते, शरीर ऊबदार राहण्यास मदत मिळते. योगासने, चालणे या प्रकारच्या व्यायामाने शरीर लवचिक राहते; शरीरासह मनाचाही ताण नाहीसा होण्यास मदत मिळते; रक्‍ताभिसरण संस्थेसह, मज्जासंस्थेचे कार्य सुधारते आणि प्राणायाम, भस्रिकासारख्या श्‍वसनक्रियांमुळे शरीरात प्राणशक्‍तीचा संचार अधिक चांगल्या प्रकारे होण्यास मदत मिळते; शरीर, मन, इंद्रिये सर्वच गोष्टी प्रफुल्लित होण्यास मदत मिळते. प्राणायामामुळे वाताला प्रेरणा मिळाली की अग्नी सुधारण्यास, पर्यायाने शरीराला आवश्‍यक ऊब मिळणसही मदत मिळते.

व्यायाम किती व कोणता?
वय, प्रकृती आणि व्यायामाचा उद्देश ध्यानात घेऊन व्यायामाचा प्रकार निवडायला हवा. उदा. प्राणायाम, योगासने, चालणे, पोहणे यासारखे व्यायामप्रकार बहुधा कोठल्याही प्रकृतीला मानवणारे असतात. मात्र बॉडी बिल्डिंगचे व्यायामप्रकार आपल्या प्रकृतीसाठी जड नाहीत ना, याचा विचार करूनच सुरू करावेत.

व्यायाम किती प्रमाणात करावा याविषयी आयुर्वेदात सांगितलेले आहे,
अर्धशक्‍त्या निषेव्यस्तु ।....अष्टांगहृदय 
म्हणजेच स्वतःच्या शक्‍तीच्या निम्म्या प्रमाणातच व्यायाम करावा. थकून जायला होईल एवढ्या प्रमाणात व्यायाम करणे आरोग्यासाठी हितावह नाही. शक्‍तीच्या निम्म्या प्रमाणात व्यायाम झाला हे कसे ओळखायचे, हेही आयुर्वेदशास्त्र सांगते.

हृदिस्थानस्थितो वायुः यदा वक्‍त्रं प्रपद्यते ।
व्यायामं कुर्वतो जन्तोस्तद्बलार्धस्य लक्षणम्‌ ।।.....सुश्रुतसंहिता


म्हणजे तोंडाने श्‍वास घ्यायची आवश्‍यकता भासू लागली व कपाळावर घाम येण्यास सुरवात झाली, की शक्‍तीच्या निम्म्या प्रमाणात व्यायाम झाला असे समजावे व व्यायाम थांबवावा. व्यायाम करण्यास सुरवात केली, की कदाचित सुरवातीच्या 10-15 मिनिटांतच ही लक्षणे दिसावयास सुरवात होऊ शकते; मात्र व्यायामाची नियमितता जसजशी राखली जाईल तसतसा हा कालावधी वाढत जातो. व्यायामाचे फायदे मिळण्यासाठी किमान 30-35 मिनिटे तरी व्यायाम करणे आवश्‍यक आहे. त्यातही कफप्रकृतीच्या व्यक्‍तींना, वजन जास्ती असणाऱ्या व्यक्‍तींना किंवा दिवसभर बैठे काम करणाऱ्यांना, वजन वाढण्याची प्रवृत्ती असणाऱ्यांना याहीपेक्षा थोडा अधिक व्यायाम करणे चांगले असते.

व्यायामाचे फायदे
व्यायाम करण्याचे फायदे काय असतात, हेही आयुर्वेदाच्या ग्रंथात अतिशय समर्पकपणे सांगितलेले आहे.

लाघवं कर्मसामर्थ्यं दीप्तोऽग्निर्मेदसः क्षयः।
विभक्‍तघनगात्रत्वं व्यायामाद्‌ उपजायते ।।
.....अष्टांगहृदय सूत्रस्थान


- शरीर व मनाला हलकेपणा येतो.
- ताजेतवाने होते.
- शरीरशक्‍ती वाढते, एकंदर स्टॅमिना वाढतो.
- अग्नी प्रदीप्त होतो, त्यामुळे पचनशक्‍ती सुधारते.
- शरीर रेखीव, पिळदार व घट्ट होते.
- शरीरबांधा व शरीरयष्टी व्यवस्थित राखायला मदत मिळते.

शरीरोपचयः कान्तिर्गात्राणां सुविभक्‍तता ।
स्थिरो भवति मांसं च व्यायामाभिरतस्य च ।।
...सुश्रुत सूत्रस्थान 

योग्य व्यायामाने शरीरउपचय उत्तम होतो, म्हणजे शरीराला सौष्ठव, सुडौलत्व प्राप्त होते. बाह्यतः मांसपेशी, स्नायू संविभक्‍त दिसू लागतात व मुख्य म्हणजे मांसधातू स्थिर राहतो. अर्थातच स्थिर मांसधातूमुळे शक्‍ती-स्फूर्ती वाढतात, वय वाढले तरी तारुण्याचा अनुभव घेता येतो. अर्थात हे सगळे फायदे मिळण्यासाठी व्यायाम करण्यात नियमितता नक्की हवी. दोन दिवस उत्साहाने व्यायाम केला व नंतर आठवडाभर काहीच केले नाही, तर व्यायामाचा फारसा उपयोग होत नाही.

खेळा आणि ताण घालवा
व्यायामामध्ये खेळाचाही समावेश करता येतो. खेळाने व्यायामाबरोबरच मनावरचा ताणही नाहीसा होतो. मनाची एकाग्रता, अचूकता, चतुरता, त्वरित निर्णय घेऊन त्याप्रमाणे कार्यवाही करण्याची क्षमता वाढते. क्रिकेट, बॅडमिंटन, लॉन टेनिस, फूटबॉलसारख्या मैदानी खेळांमुळे शारीरिक ताकद वाढते, स्टॅमिना वाढतो. रक्‍ताभिसरणाला मदत मिळाली, की शरीराला आपोआप ऊबही मिळते.

अति प्रमाणात व्यायाम सर्वांसाठीच वर्ज्य आहे. मात्र त्यातही आयुर्वेदाने विशेषतः पुढील परिस्थितीत विशेष काळजी घ्यायला सांगितली आहे.

वातपित्तामयी बालो वृद्धोऽजीर्णो च तं त्यजेत्‌ ।
......अष्टांगहृदय सूत्रस्थान


वात वा पित्त प्रकृती असणाऱ्यांनी किंवा वातदोष-पित्तदोषाचे असंतुलन असणाऱ्यांनी, लहान वयात म्हणजे साधारणतः 15-16 व्या वर्षांपर्यंत, तसेच वृद्धांनी म्हणजे 70-75 वर्षांनंतर व्यायाम जपून करावा. व्यायाम करण्याचा सर्वांत चांगला ऋतू म्हणजे हिवाळा. हिवाळ्यात शरीरशक्‍ती सर्वाधिक असल्याने मनसोक्‍त व्यायाम करून स्टॅमिना वाढवणे या ऋतूत शक्‍य असते. व्यायाम सुरू करण्याची इच्छा असणाऱ्यांसाठीही हा ऋतू उत्तम आहे. हिवाळ्यात यथाशक्‍ती, पण सर्वाधिक प्रमाणात व्यायाम करता येतो. उन्हाळ्यात मध्यम प्रमाणात, तर पावसाळ्यात कमीत कमी व्यायाम केलेला चांगला असतो. ऋतूनुसार व्यायामाचे प्रमाण कमी-अधिक केले तरी व्यायाम करण्यात नियमितता हवी.

थोडक्‍यात, आरोग्य टिकवण्यासाठी व्यायामाला पर्याय नाही. कामाचा कितीही ताण असला, वेळेची कितीही कमतरता असली तरी व्यायामासाठी काढलेला अर्धा-पाऊण तास शरीर-मनाला बरेच काही देऊन जाईल. शारीरिक आरोग्य, मानसिक उत्साह आणि उत्तम व्यक्‍तिमत्त्व या सगळ्या गोष्टी एकत्रित साध्य करायच्या असतील, जीवनात संतुलन हवे असेल तर दिनक्रमात व्यायामाला अंतर्भूत करायला हवे.

स्निग्धतेसाठी आहार व्यायाम करताना एक महत्त्वाची गोष्ट आयुर्वेदशास्त्र सांगते, ती म्हणजे व्यायाम करून शरीर पिळदार बनवण्याची इच्छा असणाऱ्यांनी बरोबरीने आहारात स्निग्ध आणि पौष्टिक पदार्थांचा समावेश असू द्यावा.

अर्धशक्‍त्या निषेव्यस्तु बलिभिः स्निग्धभोजिभिः ।
.....अष्टांगहृदय सूत्रस्थान 

या ठिकाणी स्निग्ध पदार्थांचा अर्थ तेलकट तळकट असा नसून दूध, तूप, लोणी, बदाम, खजूर, खारीक इत्यादी शरीरोपयोगी पदार्थ असा आहे. गूळ-तूप, सुंठ-खारीक टाकून उकळलेले दूध वगैरेंचा आहारात समावेश केला, तर शरीराला स्निग्धता मिळते, तसेच आवश्‍यक असणारी ऊबही मिळते.






---- Ayurveda, Vastu shastra, healthy Food, Healthy Living, Abstract India, Shree Balaji Tambe, India, Yoga, Meditation, Life Style, Marathi Blog, Marriages, Love

Friday, January 22, 2010

तरुणांची स्वास्थ्याबद्दल जागरुकता

- डॉ. आरती दिनकर
होमिओपॅथी तज्ज्ञ, समुपदेशक, पणजी-गोवा

उदास, खिन्न राहून स्वतःवरच दया, कीव करायची व मानसिक संतुलन बिघडवून घ्यायचं, असे अनेक तरुण बघण्यात येतात. विशेषतः तरुणांमध्ये निरुत्साह जाणवतो. आजच्या तरुणांना स्वामी विवेकानंदांसारखी निष्ठा, जागृती व जोम यांची आवश्‍यकता आहे.

आजच्या तरुणाला गरज आहे ती योग्य मार्गदर्शनाची. वेळेवर योग्य मार्गदर्शन मिळालं नाही, तर तरुण वयात अनेक विकृतींमध्ये तरुण गुरफटला जातो. मन विकृत असेल किंवा स्वतःमध्ये मोठा काहीतरी दोष आहे, असा विचार मनात आणला, तर आपण आयुष्यात आनंद उपभोगू शकणार नाही. उदास, खिन्न राहून स्वतःवरच दया, कीव करायची व मानसिक संतुलन बिघडवून घ्यायचं, असे अनेक तरुण बघण्यात येतात. विशेषतः तरुणांमध्ये निरुत्साह जाणवतो. आजच्या तरुणांना स्वामी विवेकानंदांसारखी निष्ठा, जागृती व जोम यांची आवश्‍यकता आहे.

निनाद- कॉलेजमध्ये जाणारा मुलगा. अशक्त, निरुत्साही. क्‍लिनिकमध्ये आला तेव्हा संकोचाने बोलतच नव्हता. "मी...मला ' असं त्याचं चाललेलं. "हं, बोल ना, काय होतंय?' "नाही.... कसं सांगू, याचा विचार करतोय.' "तू सांगितल्याशिवाय मला तुझा प्रॉब्लेम कसा कळणार? तू असं कर, बाहेर थांब. मनाची तयारी कर. मनात पक्कं ठरव काय बोलायचं ते. तोपर्यंत मी दुसरा पेशंट घेते,' असं मी त्याला म्हटलं. तेव्हा तो दबकतच म्हणाला, "नाही, सांगतो ना. मला झोपेत वीर्यपात होतो. बहुतेक वेळा रोजचं. अभ्यासात लक्ष लागत नाही. अतिशय थकवा जाणवतो.' एका दमात तो बोलला. "तुला स्वप्नं पडतात?' मी. "हो.' तो. "कसली?' निनाद गप्पच. "सांग ना तुला स्वप्न कशाविषयी पडतात?' निनाद खाली जमिनीकडे बघून सांगू लागला. "मला, कॉलेजमधील एक मुलगी आवडते. मी तिला आवडतो की नाही, ते माहीत नाही. आम्ही भेटतो, बोलतो. घरी आलो, की वारंवार तिचा विचार मनात येतो.'

निनादचा प्रॉब्लेम माझ्या लक्षात आला. मी म्हटलं "निनाद, तुला असं वाटत नाही का, की तुझं लक्ष अभ्यासावर केंद्रित व्हायला हवं. तुझं शिक्षण अजून पूर्ण व्हायचं आहे. मग व्यवसाय किंवा नोकरी, त्यात स्थिरस्थावर होणं, मग संसार. हे जीवनातले टप्पे आहेत. मन चांगल्या उद्योगात गुंतव. अभ्यास तर करच. त्याचबरोबर चांगली पुस्तकं वाच. थोर महात्म्यांची चरित्र वाच. स्वामी विवेकानंद, रामकृष्ण परमहंस, लोकमान्य टिळक वगैरे; तसंच मूड बदलेल असं विनोदी साहित्य वाच. असं वाचन तुझ्या मनावर चांगला परिणाम करील. मी तुला त्यावर होमिओपॅथिक औषधं देते; पण रात्री लवकर झोप, सकाळी लवकर ऊठ. व्यायाम, सूर्यनमस्कार घाल. मुख्य म्हणजे तुझ्या मनोवृत्तीला समर्थन मिळेल, असं प्रेरणात्मक वाचन कर. वेळ मिळत नाही, अशी फुटकळ कारणं सांगू नकोस. टीव्हीसमोर बसून वेळ जातोच ना. असा कितीतरी वेळ दिवसभरात वाया जातच असतो.'

तरुण वयात असं होणं हे नैसर्गिक आहे; पण वारंवार वीर्यपात होत असेल तर मात्र अशक्तपणा, निरुत्साह जाणवतो. बरेचदा अनेक तरुणांना इच्छेविरुद्ध वीर्यपात होतो, तर काहींना स्वप्नं पडून, तर काहींना झोपेत स्वप्नाशिवायही वीर्यपात होतो; तसंच जंत, शौचास साफ न होणं, अजीर्ण, ताप, हस्तमैथुनासारख्या सवयी त्याला कारणीभूत आहेत.

निनादनं विचारलं, "होमिओ औषधांचे साइड इफेक्‍ट होणार नाहीत ना? किंवा वीर्य कमी होणार नाही ना?' मी म्हटलं, "अजिबात नाही. जे नैसर्गिक आहे, त्याविरुद्ध होमिओ औषधं कार्य करीत नाहीत. त्यामुळे वीर्य कमी होणार नाहीत व या औषधांचे साइड इफेक्‍ट्‌सही नाहीत, हे सर्वश्रुत आहे. तू काळजी करू नकोस. सगळं नीट होईल. तरुण वयात असं घडणं साहजिक आहे; पण फार प्रमाणात असं होऊन आरोग्यावर परिणाम होऊ शकतो. म्हणून तर होमिओपॅथी औषधं देते, ती घे.'

ओम व्यवसायानं आर्किटेक्‍ट आहे. नुकताच स्वतःचा व्यवसाय सुरू केलाय. अजून लग्न व्हायचंय; पण आताच केस पांढरे व्हायला लागलेत. अपचनाच्या तक्रारी, गॅस, पोट फुगतं, भयंकर भूक लागते. भुकेच्या वेळी काही खाल्लं नाही, तर पोटात जळायला लागतं. भगभगतं, तहान खूप लागते. थोडे श्रम केले तरी थकवा येतो. कोणत्याही ऋतूत तळपायाला, तळहाताला, केसात घाम येतो. व्यवसाय नुकताच सुरू केल्यामुळे टेन्शन असतं. आई-वडील म्हणत होते नोकरी कर; पण स्वतःचा व्यवसाय करायचा असा माझा हट्ट; पण आता खूप टेन्शन येतं. रात्री कधी झोप येते, कधी नाही. ओमनं विचारलं, खूप केस पिकलेत, त्याचं प्रमाण कमी होईल ना? केस काळे होतील ना. मी हसत म्हटलं, तू मनावर घेतलंस तर... म्हणजे होमिओ औषधांबरोबर तुझ्या खाण्याच्या सवयी बदलायला हव्यात. वेळच्या वेळी खायला हवं. जागरणं नकोत. तुझे केस पांढरे होण्याचं मुख्य कारण कळलं. औषधं सुरू केल्यावर ओमची पचनशक्ती सुधारली. घाम येणं कमी झालं. आता थकवा येत नाही. कामात उत्साह आहे. होमिओ औषधांबरोबर त्याच्या खाण्याच्या सवयी, आहारविहार योग्य ठेवला, त्यामुळे त्याला लवकर गुण आला.

पूर्वी म्हाताऱ्या लोकांना पांढऱ्या केसांचा अभिमान असायचा. त्यानुसार अनुभवाचं मोजमाप केलं जायचं. म्हातारी माणसंही "माझे केस अनुभवांनी पांढरे झालेत' हे अभिमानानं सांगायची. म्हातारपणी केस पांढरे होणे नैसर्गिक आहे; पण आजकाल मात्र काही तरुण-तरुणींचे केस पांढरे होताना दिसतात. आता या तरुणांना तरुण वयातच केस पांढरे झाल्यामुळे अनुभव सांगायची सोय उरली नाही. आरोग्याबाबतची जागरूकता वाढली, तरी त्याबाबतचे नियम जाणिवेतून उणिवेकडे गेलेले आढळतात. केसांना तेल लावा, मालिश करा असे उपाय सांगितले, तर ते वेळेचे कारण देतात; पण वेळ मात्र कुणासाठी थांबत नाही. काळ पुढे जातो. त्यामुळे आरोग्याच्या तक्रारी वाढतात. ज्याला वेळेवर वेळेचं गणित साधायचं कळतं, तो आरोग्य जपतो. आधुनिकपणाच्या नावाखाली तेलाशिवाय केस कोरडे ठेवले, तर ते राठ होऊन गळू लागतात. केस पांढरे होऊ लागतात; तसेच अन्नात लोह, प्रथिनांची कमतरता केस गळणं, केस पांढरे होण्यास कारणीभूत ठरू शकते.

काही पेशंट्‌स विचारतात, डॉक्‍टर मी खात्रीनं बरा होईन ना? तेव्हा मला पेशंटना सांगावंसं वाटते. अरे, आपल्या आयुष्यात इतक्‍या घटना घडतात. पुढे पाच मिनिटांनी काय होईल, माहीत नसतं. त्याची कोण गॅरंटी देतं? मी पेशंटना सांगते, गॅरंटी द्यायला हे कुठल्या वस्तूचं दुकान नाही. हे "प्रोफेशन' आहे. इथे गॅरंटी, वॉरंटी नाही. विश्‍वासानं औषधं वेळच्या वेळी घ्या. डॉक्‍टर सांगतात त्याप्रमाणे आहार-विहार करा. तुमच्या निरोगी जीवनाची गॅरंटी तुमच्याच हातात आहे. मग तुम्हाला बरं होण्यास कितीसा वेळ लागणार?

वीर्यपतन किंवा स्वप्नावस्था यावर काही होमिओपॅथिक औषधं देत आहे; पण ती डॉक्‍टरांच्या सल्ल्यानुसार घेणं योग्य.

1) चायना - अत्यंत वीर्यनाश होऊन अशक्तपणा येतो.
2) नक्‍सव्हॉमिका- पचनाच्या तक्रारी असतात. अनेक वेळा स्वप्नावस्था होऊन कंबर दुखते. थोड्याशा वाचनानं डोकं दुखतं.
3) सेलिनियम - एकाच दिवशी एकाहून अधिक वेळा स्वप्नावस्था होते. शौचास साफ होत नाही. शौचाच्या वेळी कुंथल्यावर वीर्यपात होतो.
4) फॉस्फरस- कामुक स्वप्नं न पडता स्वप्नावस्था होते. इंद्रियाचं वारंवार उत्थापन होतं व वेदना होतात.

याशिवाय सल्फर बर्याटाकार्ब, थुजा, बेलीस पेरीन्नीस, जल्सेमियम, ऍसिडफॉस, पिकरिक ऍसिड ही औषधंही लक्षण साधर्म्यानुसार देता येतील; पण लक्षात ठेवा डॉक्‍टरांच्या मार्गदर्शनाशिवाय औषधं घेऊ नयेत.
Ayurveda, healthy Food, Healthy Living, Abstract India, Shree Balaji Tambe, India, Yoga, Meditation, Life Style, Marathi Blog

Thursday, December 3, 2009

तुमचा दिनक्रम ठरवा (सुखी व्हा हसत-खेळत)

- ओरिसन स्वेट मॉर्डेन
आजपासून तुम्ही सर्व काळजी फेकून द्या. रात्री झोपाल तेव्हा चिंता बिछान्यावर नेऊ नका. मन शांत करून स्वतःला सूचना द्या की "तुला पहाटे चार वाजता उठायचे आहे.' चार वाजता बरोबर उठा. प्रातःर्विधी आटोपून मोकळ्या हवेत पळायला व फिरायला जा. त्यामुळे रक्तशुद्धी होते.

व्यायाम व स्नान आटोपल्यानंतर त्या दीनदयाळू परमेश्‍वराचे ध्यान करा. त्यानेच तर तुम्हाला या जगात पाठविले आहे. ईश्‍वराचे ध्यान व स्मरण झाल्यावर तुम्ही तुमचे उपजीविकीचे कार्य सुरू करू शकता.

तुम्ही जर शांत मनाने कामाला लागला तर कामामुळे तुम्ही थकणार नाही. तुम्हाला कामात गोडी वाटत असेल तर त्यातून तुम्हाला आनंदही मिळेल. दिवसभराचे काम संपल्यावर काही वेळ क्रीडेसाठी व मनोरंजनासाठी राखून ठेवा. दीर्घायुष्यासाठी याची जरूरी आहे. आपल्या मुलाबाळात व कुटुंबात बसून गप्पागोष्टी व हास्यविनोद करा. कुटुंबांचे संध्याकाळचे जेवण तरी एकत्र व्हावे. जेवताना मन प्रसन्न व शांत हवे. रागावल्यानंतर, काळजी असल्यानंतर भोजन घेतले तर त्यातून शक्ती मिळत नाही. रागात असताना भोजन घेतले तर ते विषारीसुद्धा होते.
संध्याकाळचे जेवण झाल्यावर थोडेसे मोकळ्या हवेत फिरा. रात्री एखादे पुस्तक वाचा. मनात चांगले विचार असतानाच झोपी जा व सकाळी निश्‍चित वेळेवर उठा. हे नियम पाळल्यास तुम्ही नेहमी निरोगी राहाल. तुमचे तारुण्य टिकून राहील आणि तुम्ही दीर्घायुषी व्हाल. मनात तुम्ही विश्‍वास बाळगा की म्हातारपणाचा व माझा संबंध नाही, मी नेहमीच तरुण राहणार आहे.

Ayurveda, healthy Food, Healthy Living, Abstract India, Shree Balaji Tambe, India, Yoga, Meditation, Life Style, Marathi Blog

Wednesday, November 18, 2009

लवकर निजे, लवकर उठे -2

निसर्गचक्राला धरून केलेली प्रत्येक गोष्ट आरोग्यासाठी चांगली असते. वेळेवर झोपणे व वेळेवर उठणे हे निसर्गचक्राला धरून तर आहेच, शिवाय अतिशय सोपे व सर्वस्वी आपल्या हातात आहे. "लवकर निजे, लवकर उठे' असे म्हणताना त्यात पुरेशी झोप घ्यावी, हेही सांगितलेले आहे. आरोग्याच्या दृष्टीने दुपारची झोप किंवा जागरण टाळायला हवे.
- डॉ. श्री बालाजी तांबे


आरोग्यरक्षणासाठी शंभर टक्के आपल्या हातात असलेली आणि अगदी सहजपणे कोणालाही करता येईल अशी एकमेव गोष्ट म्हणजे लवकर झोपणे व लवकर उठणे. झोपणे व उठणे या दोन वेगवेगळ्या गोष्टी वाटल्या, तरी त्या परस्परसंबंधित असतात. लवकर उठले की लवकर झोप येते आणि लवकर झोपले की लवकर उठणेही सोपे जाते.

ब्राह्ममुहूर्तावर उठा
दिनचर्येची सुरवात अर्थातच उठण्याने होते. आयुर्वेदात नुसतेच लवकर उठावे एवढे सांगितलेले नाही, तर ब्राह्ममुहूर्तावर उठावे, असे सांगितले आहे.
रात्रेः उपान्त्यो मुहूर्तो ब्राह्मः ।
अहोरात्रीचा शेवटचा मुहूर्त म्हणजे ब्राह्ममुहूर्त. आयुर्वेद, ज्योतिषशास्त्र वगैरे प्राचीन भारतीय शास्त्रात मुहूर्त हे कालगणनेचे एक मान सांगितले आहे. 24 तासांचे जर 15 भाग केले, तर त्यातला एक भाग म्हणजे एक मुहूर्त. म्हणजेच एक तास 36 मिनिटे. रात्रीचा शेवटचा मुहूर्त असताना, म्हणजे साधारणपणे सूर्योदयापूर्वी दीड तास असताना उठणे म्हणजे ब्राह्ममुहूर्तावर उठणे. आयुर्वेदात सांगितले आहे,

ब्राह्मे मुहूर्ते उत्तिष्ठेत्‌ स्वस्थो रक्षार्थमायुषः। तत्र सर्वाघशान्त्यर्थं स्मरेच्च मधुसूदनः।। ...अष्टांगसंग्रह सूत्रस्थान
आयुष्याचे रक्षण करण्यासाठी निरोगी मनुष्याने ब्राह्ममुहूर्तावर उठावे व सर्व पाप, सर्व संकटे दूर होण्यासाठी मधुसूदनाचे स्मरण करावे.
ब्रह्म शब्दाचा अर्थ आहे ज्ञान. ब्राह्ममुहूर्त हा ज्ञानोपासना करण्यासाठी सर्वोत्तम काळ समजला जातो. विद्यार्थ्याने अभ्यास करण्यासाठी, एखाद्या कलावंताने कलेची उपासना करण्यासाठी, तसेच साधकाने साधना करण्यासाठी ब्राह्ममुहूर्त उत्तम असतो. मन एकाग्र होणे, बुद्धी-स्मृती-मेधा वगैरे प्रज्ञाभेद सर्वाधिक कार्यक्षमतेने काम करणे साध्य होण्यासाठी ब्राह्ममुहूर्तावर उपासना, साधना करणे चांगले असते, असे समजले जाते.
ब्राह्ममुहूर्तावर उठल्यावर अजून एक गोष्ट आपोआप साध्य होते व ती म्हणजे मलविसर्जन व्यवस्थित होते. आयुर्वेदात सांगितले आहे,

जातवेगः समुत्सृजेत्‌। ...अष्टांगसंग्रह सूत्रस्थान

आयुष्याची इच्छा करणाऱ्या व्यक्‍तीने ब्राह्ममुहूर्तावर उठून वेग उपस्थित झाल्यास अडवू नये. मलविसर्जन ही क्रिया वाताच्या आधिपत्याखाली येते. निसर्गचक्रासारखेच शरीरातही वात-पित्त-कफदोषाचे एक चक्र असते. यात अहोरात्र- म्हणजे 24 तासांचे सहा विभाग केलेले असतात. सूर्योदयापासून ते सूर्यास्तापर्यंतच्या 12 तासांचे तीन भाग केले तर त्यातला पहिला भाग कफाचा, दुसरा पित्ताचा व तिसरा वाताचा असतो. म्हणजेच दिवसाच्या पहिल्या एक तृतीयांश भागात कफदोषाचे आधिक्‍य असते, मधल्या एक तृतीयांश भागात पित्तदोष विशेषत्वाने कार्यक्षम असतो तर शेवटच्या एक तृतीयांश भागात वातदोष अधिक उत्कट होत असतो. दिवसाचे हे चक्र रात्रीही याच क्रमाने पुन्हा होते.

विसर्जन क्रिया वाताच्या आधिपत्याखाली येत असल्याने ती क्रिया सकाळी कफाचा काळ सुरू होण्यापूर्वी, म्हणजे सूर्योदयापूर्वी होणे उत्तम असते. वाताच्या काळात वाताची क्रिया अधिक चांगल्या प्रकारे होत असल्याने सकाळी लवकर उठल्याने पोट साफ व्हायला खूपच चांगला हातभार लागत असतो. नियमितपणे रोजच्या रोज पोट साफ झाले तर त्यामुळे अनेक रोगांना प्रतिबंध होऊ शकतो व आरोग्य नीट राहू शकते हे सर्वज्ञात आहे.

पुरेशी झोप घ्या
"लवकर निजे लवकर उठे' असे म्हणताना त्यात पुरेशी झोप घ्यावी हेही सांगितलेले आहे. वय, प्रकृती, काम, हवामान वगैरे अनेक गोष्टींवर झोपेचे प्रमाण अवलंबून असते. उदा.- लहान मुलांना मोठ्यांपेक्षा जास्त झोप मिळणे आवश्‍यक असते. वात, तसेच पित्त प्रकृतीच्या व्यक्‍तींना स्वभावतःच झोप कमी असते, पण वास्तविक त्यांनी पुरेसे व शांतपणे झोपणे आवश्‍यक असते. शारीरिक श्रम, प्रवास करणाऱ्यांना झोप थोडी जास्त लागू शकते. तसेच शरीरशक्‍ती कमी असणाऱ्या ऋतूत झोपेची आवश्‍यकता वाढू शकते. योग्य वेळेला, योग्य प्रमाणात घेतलेली झोप आहाराप्रमाणेच शरीराचे पोषण करत असते, असे आयुर्वेदात सांगितले आहे.

आहारादिवत्‌ निद्रा देहस्थितिकारिणी तथा सुखदुःखे, पुष्टिकार्श्‍ये, बलाबले, वृषताक्‍लीबता ज्ञानाज्ञानं जीवितमरणं च निद्रायत्ते ।। ...चरक सूत्रस्थान
आहाराप्रमाणेच झोपसुद्धा देहस्थितीची कारक असते. योग्य झोपेमुळे सुख, पुष्टी, बल, वृषता, ज्ञान, जीवन या सर्व गोष्टी अवलंबून असतात; तर अयोग्य झोपेमुळे दुःख, कृशता, अशक्‍तता, नपुंसकता, अज्ञान, मरणसुद्धा येऊ शकते. बऱ्याच जणांना दुपारी झोपण्याची सवय असते, पण दिवसा झोपणे कफ-पित्त वाढविणारे असते. शिवाय त्यामुळे स्थूलता, आम्लपित्त, मधुमेह वगैरे अनेक विकारांना आमंत्रण मिळू शकते. शिवाय दिवसा झोपण्याने रात्री वेळेवर झोप येत नाही. म्हणजे "लवकर निजे लवकर उठे' सांभाळणे अवघड होऊन बसते.

जागरणाचे दुष्परिणाम
'लवकर निजे लवकर उठे' या उक्‍तीला नाट लागतो तो जागरणामुळे. जागरण झाले की सकाळी उशिरा उठणे ओघाने आलेच. बऱ्याचदा असे दिसते, की "जागरण करू नका' असे सांगितले की समोरची व्यक्‍ती "पण मी सकाळी उशिरा उठतो, माझी झोप पूर्ण होते,' असे सांगते. पण झोपेच्या बाबतीत पुरेशा तासांइतकेच महत्त्व योग्य वेळी झोप घेण्यालाही असते, हे लक्षात घ्यावे लागते. रात्रीच्या जागरणांनी अंगात रुक्षता वाढते, वात वाढतो, तसेच पित्तही वाढते. उशिरा उठल्याने अंग जड होते, उत्साह वाटत नाही, शौचाला साफ होत नाही.
अवेळी झोपण्याने शरीरावर काय दुष्परिणाम होतात, हे आयुर्वेदात सांगितलेले आहे...
अकालशयनात्‌ मोह-ज्वर स्तैमित्य-पीनस-शिरोरुक्‌-शोफ-हृल्लास-स्रोतोरोध-अग्निमंदता भवन्ति । ...अष्टांगहृदय सूत्रस्थान

अवेळी झोपल्याने, म्हणजेच रात्री उशिरा, जेवणानंतर लगेच, दुपारी दोनप्रहरी झोपणे वगैरे प्रकारे झोपण्याने :

* विचारांचा गोंधळ होतो.
* शरीर थिजलेले वाटते.
* वारंवार सर्दी, डोकेदुखीचा त्रास जाणवतो.
* अंगावर सूज येते.
* मळमळ होते.
* शरीरातील स्रोतसे अवरुद्ध झाल्याने शरीर आंबल्यासारखे वाटते.
* अग्नी मंद होतो.

निसर्गचक्राला धरून केलेली प्रत्येक गोष्ट आरोग्यासाठी चांगली असते हे सर्व जाणतातच. वेळेवर झोपणे व वेळेवर उठणे हे निसर्गचक्राला धरून तर आहेच, शिवाय अतिशय सोपे व सर्वस्वी आपल्या हातात आहे. तेव्हा "लवकर निजे लवकर उठे, त्यासी ऋद्धी-सिद्धी भेटे' या उक्‍तीचा अनुभव घेऊन पाहावा हे उत्तम!


योग्य व पुरेशा झोपेचे फायदे
पुरेशी व योग्य झोप मिळते आहे का, हे समजण्यासाठी आयुर्वेदाने योग्य झोपेचे सांगितलेले फायदे बघायला हवेत.
कालशयनात्‌ पुष्टिवर्णबलोत्साह अग्निदीप्तिअतंद्रा धातुसात्म्यानि भवन्ति।
...सुश्रुत चिकित्सास्थान
* शरीर पुष्ट होते. या ठिकाणी पुष्ट शब्दाचा अर्थ जाड होणे, असा अपेक्षित नाही, तर सर्व धातूंनी शरीर संपन्न असणे म्हणजे पुष्ट असणे.
* पुरेशा व योग्य वेळेला घेतलेल्या झोपेने कांती उजळते, शरीरवर्ण उत्तम राहतो.
* शरीराची ताकद, स्टॅमिना चांगला राहतो.
* उत्साह म्हणजे आपणहून काहीतरी छान करण्याची भावना तयार होते, सर्जनता वाढते.
* अग्नी प्रदीप्त होतो, पचन सुधारते.
* डोळ्यांवर झापड वगैरे येत नाही.
* सर्व धातू समस्थितीत राहतात.

- डॉ. श्री बालाजी तांबे
आत्मसंतुलनव्हिलेज, कार्ला 410 405

Friday, November 13, 2009

लवकर निजे, लवकर उठे; त्याला ऋद्धी-सिद्धी भेटे

झोप ही परमेश्‍वराची देणगी असल्यामुळे झोपेसाठी कुठल्याही बाह्य साधनांची आवश्‍यकता नसते. खरे तर झोप प्रत्येकाच्या स्वाधीन असावी व नैसर्गिक झोप मिळण्याचे भाग्य प्रत्येकास लाभावे. त्यासाठी "लवकर निजे, लवकर उठे' हा नियम पाळणे आवश्‍यक आहे.
- डॉ. श्री बालाजी तांबे

आमचे वडील रोज पहाटे साडेतीन वाजता उठत असत. नंतर दोन-अडीच मैल फिरायला जात असत. येताना कधी दंतमंजनासाठी व होम-हवनासाठी लागणाऱ्या गोवऱ्या बनविण्यासाठी शेण, कधी चार फुले गोळा करून आणत असत. साहजिकच ते रोज रात्री दहा वाजता झोपून जात असत. त्यांची दिनचर्या पाहून मनात विचार आला, की ते रोज सकाळी ऋद्धी-सिद्धीला भेटायला जात असावेत व त्यांना ऋद्धी-सिद्धी भेटतही असाव्यात. घराचा व वडिलांचा नियम व शिस्त म्हणून पहाटे उठणे आमच्या अंगवळणी पडलेले होतेच. वडील नियमाने रात्री दहा वाजता झोपत असत; पण बाकीच्यांना रात्री एवढे लवकर झोपणे जमत नसे. पिढीतले अंतर म्हणा वा नवीन पिढीच्या सवयी व कामकाजाच्या पद्धती म्हणा, पण रोज रात्री लवकर झोपणे आम्हा मुलांना जमत नसे. परंतु आम्हा "ऋद्धी-सिद्धी भेटे' या वचनाचे आकर्षण मात्र खूप होते. ऋद्धी-सिद्धी कोणाला नकोत?

यावर नीट विचार केल्यावर लक्षात आले, की अल्पशा उत्पन्नात सात माणसांचे कुटुंब व्यवस्थित चालवून, सर्व सण-वार, आला-गेला, पै-पाहुणा, देणे-घेणे वगैरे सर्व सांसारिक गोष्टी सांभाळून जीवन आनंदात जगण्यासाठी सिद्धीची आवश्‍यकता असणार. आम्हा मुलांना शिक्षणाची आवड लावून त्यांचे शिक्षण पुरे करणे आणि मुलांना पुढे त्यांचे जीवन व्यवस्थित जगता येईल अशी ऋद्धी-सिद्धींची शिदोरी त्यांना देणे, हे सर्व साध्य झालेले पाहिले, की "लवकर निजे, लवकर उठे; त्याला ऋद्धी-सिद्धी भेटे' हे खरे असावे, असे पटते.

परमेश्‍वर चर्मचक्षूंना दिसत नाही, त्यामुळे ऋद्धी-सिद्धी या देवता असल्याने त्याही डोळ्यांना दिसत नाहीत. परंतु या देवता सर्जनाच्या रूपाने प्रकट होतात. कर्म करत राहिले, की आपले हात व त्यात असलेले आपले कौशल्य आपल्याला दिसते. पण परमेश्‍वराचे ऋद्धी-सिद्धींच्या माध्यमातून मदतीला आलेले हात दिसत नसले, तरी कार्य पूर्ण झाल्यावर त्या यशात परमेश्‍वराच्या हाताचे अस्तित्व नक्कीच दिसू शकते. निसर्गचक्राला अनुसरून मनुष्य चालला तर यश मिळेल, यात काही शंका नाही.

सकाळी सूर्य उगवल्यानंतर आपसूक सर्व प्राणिमात्र जागे होतात, शक्‍तीचे उत्थापन होते, कामाला प्रेरणा मिळते व हलके हलके दिवस जसा जसा वर येतो तसतशी स्फूर्ती वाढते आणि सूर्य अस्ताला जाण्याच्या वेळी आपणही विसावा घ्यावा, अशी भावना उत्पन्न होते. म्हणून हे चक्र सांभाळण्यासाठी सकाळच्या प्रहरी उठणे आरोग्यासाठी हितकर ठरावे.

सूर्योदयापूर्वी उठल्यास उषःकाली सूर्यकिरणांमध्ये विशिष्ट प्रकारच्या शक्‍ती मनुष्याला मिळू शकतात. पहाटे एकूणच वातावरण शांत असते, आदल्या दिवसाचे गोंधळ घालणारे विचारतरंगही शांत झालेले असतात. म्हणून नवीन संकल्पना, प्रेरणा उत्पन्न होण्यासाठी या शांत वातावरणाचा फायदा होऊ शकतो. सकाळी उठून केलेला अभ्यास नीट स्मरणात राहतो.

साहजिकच पहाटे लवकर उठायचे असल्यास माणसाला आवश्‍यक असणारी सहा-सात तासांची झोप पूर्ण होण्यासाठी रात्री लवकर, 10-11 वाजता झोपणे आवश्‍यक आहे. तेव्हा लवकर उठणाऱ्याला लवकर झोपावे लागतेच वा ते आपसूक घडतेच. रात्रीच्या वेळी पित्ताची वेळ असल्याने त्या वेळी शरीरात वाढणारे पित्त व उष्णता कमी करण्यासाठीही लवकर झोपून लवकर उठण्याचा उपयोग होतो. यामुळे माणसाची प्रतिकारशक्‍ती वाढण्यासाठी उपयोग होतो आणि एकूणच मनःस्वास्थ्य मिळून यश व उत्कर्ष होतो.

दिव्याची चिमणी व कंदिलांच्या युगात अभ्यास करण्यासाठी पहाटेच्या प्रकाशाचा लाभ घेतला, की अभ्यास करणे व वाचन सोपे होत असे. त्यामुळे या काळी रात्री उशिरा जागून अभ्यास करण्याचा प्रश्‍न येत नसे. त्या काळी रात्री एकूणच अंधाराचे साम्राज्य असल्यामुळे चोर-चिलटे सोडून सर्व जण रात्री लवकर झोपून जात असत. सध्या आधुनिक काळात रात्री जागरण करण्यासाठी दिवे जाळावे लागत असल्याने विजेची मागणी वाढते, पर्यावरणाचा अतोनात ऱ्हास होतो. सूर्य उगवण्याच्या वेळेस वा सूर्य उगवल्यानंतर झोपून राहणे म्हणजे सर्व दिवे चालू ठेवून, मीटर चालू ठेवून झोपण्यासारखे आहे. अशा दृष्टीने विचार केला असताही "लवकर निजे लवकर उठे' या गोष्टीचा फायदा होऊ शकतो. वाहनांचे अपघात रात्रीच्या वेळी अधिक प्रमाणात होतात, रात्रपाळीत काम करणाऱ्या कामगारांकडून कमी काम केले जाते, त्यांचे कामावर लक्ष कमी असण्याचा संभव अधिक असतो.

परस्वाधीनता म्हणजे दुःख व स्वतःच्या आत्मप्रेरणेने सर्व घडणे म्हणजे सुख व स्वतंत्रता. झोप ही परमेश्‍वराची देणगी असल्यामुळे झोपेसाठी कुठल्याही बाह्य साधनांची आवश्‍यकता नसते. काही व्यक्‍तींना झोप येण्यासाठी पुस्तक वाचणे, टीव्ही पाहणे, संगीत ऐकणे यांची गरज भासते. काहींना तर झोपेच्या गोळ्या घेऊनही झोप येत नाही. खरे तर झोप प्रत्येकाच्या स्वाधीन असावी व नैसर्गिक झोप मिळण्याचे भाग्य प्रत्येकास लाभावे. त्यासाठी "लवकर निजे लवकर उठे' हा नियम पाळणे आवश्‍यक आहे. असा सर्व बाजूंनी विचार केला असता रात्र झोपण्यासाठी असते हे लक्षात येते. रात्रीचे जागरण करूनही त्रास न होणारी मंडळी लाखात एक-दोन असू शकतात. इतर सर्वांनी मात्र लवकर निजे लवकर उठे हा नियम पाळल्यास मानवजातीचे कल्याण होऊ शकेल. कारण त्यांच्या पाठीमागे उभ्या असतात ऋद्धी-सिद्धी!

- डॉ. श्री बालाजी तांबे

ad