Friday, July 24, 2009

पावसाळा आणि दुखणी

योग्य आहार, विहार, स्वच्छता यामुळे पावसाळ्यातील रोगांवर आपण नियंत्रण ठेवू शकतो.

पावसाळ्यात कपडे ओले असतानाच बहुधा घातले जातात. ओलेपणामुळे डोक्‍यात फोड येणे, दाढीच्या केसांच्या जागी संसर्ग, अंगावर लहान फोड होऊन ते पसरणे, अस्वच्छता, खाज आदी आजार उद्‌भवतात. योग्य आहार, विहार, स्वच्छता यामुळे पावसाळ्यातील रोगांवर आपण नियंत्रण ठेवू शकतो.
पावसाळा हा खरे तर सुखावणारा ऋतू आहे. यामध्ये ना कडाक्‍याची थंडी असते ना उन्हाळ्यातील दाहक उष्णता. तरीही रोगराईच्या संदर्भात पावसाळा हा डॉक्‍टरमंडळींचा "सीझन' असतो! धरणीमातेस उल्हसित करणारा पण माणसांच्या चेहऱ्यावर आजारपण दर्शविणारा ऋतू आपणास सहजपणे जगता येऊ शकतो; पण त्यासाठी आपली मानसिक तयारी असावी लागते.
या काळात धान्य, फळे, भाजीपाला, पाणी- सारे काही नवे असते. या नवीनपणामुळेच हे सारेच पदार्थ तसे पचायला जड असतात. भूक आणि पचनशक्तीही कमी झालेली असते. सर्वत्र ओलसरपणा, चिखल, घाण, दूषित पाणी असे वातावरण असते. परिणामी, आपणास वेगवेगळ्या प्रकारच्या आजारांना तोंड द्यावे लागते. आव, पोटात मुरडा येणे, जुलाब, अंगावर पित्त येणे, पायांच्या पेरांत चिखल्या होणे, अंगावर फोड येणे, उलट्या, मळमळ, मलेरिया, सर्दी-पडसे, ताप यासारखे अनेक आजार होतात. यासाठी कधी कधी गंभीर अवस्थेत डॉक्‍टरांकडे जाऊन चिकित्सा घेतलीच पाहिजे, तर साधारणतः काही घरगुती चिकित्सा प्रयोग केल्यासही आराम पडू शकतो. योग्य दक्षता, स्वच्छता, दिनचर्येतील संयमितता, योग्य खाणे-पिणे यामुळे आपण स्वास्थ्य टिकवू शकतो.
अस्वस्थता, रोगांची प्राथमिक लक्षणे जाणवली, तर घरच्या घरीच घरगुती औषधोपचाराने आराम मिळू शकतो. आपण अशाच काही आजारांत घरीच काय करता येणे शक्‍य आहे, हे बघू या. पावसाळ्यात कपडे ओले असतानाच बहुधा घातले जातात. अस्वच्छता, ओलेपणा यामुळे त्वचेवर पुरळ येणे, खाज यासारखे आजार उद्‌भवतात. पावसाळ्यात स्नान हा अत्यंत महत्त्वाचा उपाय आहे. साबण आणि गरम पाण्याने स्नान करून त्वचा स्वच्छ करावी. नंतर अंग कोरडे करावे.
ओलेपणामुळे डोक्‍यात फोड येणे, दाढीच्या केसांच्या जागी संसर्ग, फोड, अंगावर लहान फोड होऊन ते पसरणे, आदी त्रास होतात. जांघेमध्ये येणारी खाज, पाय सतत पाण्यात राहिल्यामुळे बोटांच्या मध्ये चिखल्या, नखांचे रोग यांचे आक्रमण होते. हे टाळण्यासाठी स्वच्छ कपडे वापरावेत. खूप घाम येणाऱ्यांनी कपडे बदलावेत. ते सुती आणि मोकळे घालावे. अंतर्वस्त्रे सुती असावीत. पायाच्या जांघेच्यामधील पाणी स्वच्छ पुसावे. आवश्‍यक असेल तर योग्य औषधी पावडर, मलम डॉक्‍टरांच्या सल्ल्याने लावावे. आयुर्वेदिक गंधक रसायन गोळ्या पोटातून घ्याव्या किंवा करंजादी तेल, सोमराजी तेल लावावे. त्वचेला स्वच्छ व कोरडे ठेवणे या काळात आवश्‍यक आहे.
सर्दी-पडसे - ओलसर व थंड पाण्याच्या सतत संपर्काने सर्दी-पडसे होऊ शकते. त्यामुळे अंग कोरडे ठेवावे. पावसात भिजल्याने सर्दी न होता अंग बराच वेळ ओले राहिल्याने सर्दी होते. सर्दी-पडसे झाल्यास सतत गरम पाणी पिणे योग्य राहते. जेवण हलके व ताजे घ्यावे. निलगिरी तेलाचा वाफारा घ्यावा. त्रिभुवनकीर्ती, नागगुटी, गंधकरसायन या गोळ्या दिवसातून २ वेळा घ्यावा. आराम पडतो. डोकेदुखी कमी होते. सितोपलादी चूर्ण १-१ चमचा काही दिवस घेतल्यास खोकला, कफ, सर्दी, आवाज बसणे कमी होते.
मळमळ, उलटी - या काळात उलटी होणे, मळमळ होणे, अशी लक्षणे बऱ्याचदा असतात. अशा वेळी साधा सूतशेखरची १-१ गोळी घेतल्यास आराम पडतो. आलेरस व मध चाटणे योग्य राहते.
आव होणे - आव होणे, पोटात मुरडा होऊन चिकट मलप्रवृत्ती होणे, हा आजार पावसाळ्यात सामान्यपणे दिसून येतो. याचे महत्त्वाचे कारण पावसाळ्यात असणारे दूषित जल होय. त्यासोबत जेवणाच्या सवयी, शिळे, हॉटेलचे खाणे, उघड्यावरचे खाणे यामुळे पचनशक्ती कमजोर होते. मल आतड्यात पडून राहतो. त्यात आव तयार होते. त्यामुळे पोटात आवाज, पोट फुगणे, वेदना, मुरडा, पातळ मलप्रवृत्ती अशी लक्षणे होतात. यासाठी खाण्यापिण्यावर नियंत्रण असावे. पाणी उकळून, फिल्टरने गाळून घ्यावे. उघड्यावरचे खाऊ नये. बेलाचा मुरंबा करून ठेवणे पावसाळ्यासाठी अत्यंत योग्य असते किंवा बेलाचे चूर्ण करून ठेवावे व ते असा त्रास असताना साखर, बडीशेप, ओवा यांच्या चूर्णासोबत घ्यावे. निश्‍चित आराम पडतो. सुंठ, मिरे, पिंपळी आणि बेल किंवा कुडा या वनस्पतींचे चूर्ण घरात ठेवावे. एकत्र करून १-१ चमचा घेतल्यास त्वरित आराम मिळतो. पचनशक्ती योग्य राहावी म्हणून सुंठ, मिरे, पिंपळी जेवणापूर्वी अर्धा अर्धा चमचा घ्यावी. आराम पडतो. आव असताना मुगाची डाळ, खिचडी खावी.
शीतपित्त - पावसाळ्यात दूषित पाण्याशी संबंध आल्यास अंगावर लाल चट्टे येऊन ते गोल व लाल होतात. त्यास खाज सुटते. यालाच अंगावर पित्त उठणे असे म्हणतात. हे पित्त अंगावर उठते, काही वेळाने पुन्हा जाते, पुन्हा येते; पण खाजेमुळे मनुष्य बेचैन होतो. यासाठी अंगावर गेरू लावावा. मिरे आणि तूप एक-एक चमचा एकत्र पोटातून घ्यावे. सुंठ, मिरे, पिंपळीचे चूर्ण १-१ चमचा ३ वेळ घ्यावे. सूतशेखर (साधा) ची गोळी काही दिवस दिवसातून ३ वेळा घ्यावी. आंबट पदार्थ, दही खाऊ नये. शरीर स्वच्छ व कोरडे ठेवल्यास हा त्रास कमी होतो.
चिखल्या होणे - पावसाळ्यात पाण्याच्या संसर्गाने सतत पाय ओले राहिल्याने पायांच्या, हातांच्या बोटांच्या मध्ये या जखमा होतात. त्या चिघळतात व तेथे आग होते. सूज येते व वेदनाही होतात. हा साधारणपणे स्त्रियांना होणारा आजार आहे. यासाठी बोटांमधील जागा स्वच्छ व कोरडी ठेवावी. चिखलातून, पाण्यातून आल्यावर पाय स्वच्छ व कोरडे करावे. घरी स्लिपर वापरावी. मेंदी वाटून तिचा लेप बोटांच्या मध्ये लावावा. कापूर, तिळतेल एकत्र गरम करून लावावे. अशा प्रकारे अनेक प्रकारच्या आजारांत आपण घरच्या घरी उपचार करू शकतो. अर्थात गंभीर लक्षणे असताना डॉक्‍टरांना दाखविणे योग्य असते. योग्य आहार, विहार, स्वच्छता यामुळे पावसाळ्यातील रोगांवर आपण नियंत्रण ठेवू शकतो.

डॉ. रंजना वाघ्रळकर
एम.डी.पीएच.डी.

No comments:

Post a Comment

ad