Saturday, April 26, 2008

नादानुसंधान

नादानुसंधान


(डॉ. श्री बालाजी तांबे)
शारीरिक, मानसिक, आत्मिक असे सर्व प्रकारचे आरोग्य मिळविण्याचे मुख्य साधन आहे नादयोगातील ॐकार. थोडी मेहनत करून आवाजाचे आरोग्य सुधारायचे आणि ॐकार उपासना करून पुन्हा आपले आरोग्य चांगले ठेवायचे, असे एक सुंदर चक्र चालू ठेवल्यास नादानुसंधान अनुभवणे शक्‍य आहे. .......
जरा काही कुठे खुट्ट झाले की लगेचच हृदयाचे ठोके आपोआप वाढतात. नादापासून सर्व विश्‍वाची उत्पत्ती झालेली आहे असे केवळ भारतीयच नव्हे तर जगातील बहुतेक सर्व संस्कृतीत समजले जाते. हेही खरेच आहे की मनुष्य आहे म्हणून जग आहे व जग आहे म्हणून मनुष्य आहे. मनुष्य आहे असे केव्हा म्हणायचे तर त्याच्या छातीची धडधड सुरू असली तर! म्हणूनही कदाचित म्हटले जात असावे की या आवाजामुळे सर्व जग तयार झाले. मनुष्याचे अस्तित्व आवाजावरच आहे. हा नित्य चालणारा आवाज अनाकलनीय, अद्वितीय व अनादी अशा स्पंदनातून तयार झालेला आहे.

आवाजाविषयी शाळेत शिकत असताना फोर्क दाखविला जातो. फोर्कवर आघात केल्यावर तो स्पंदित होतो, असा स्पंदन पावणारा फोर्क टेबलावर टेकविला तर एक विशिष्ट आवाज येतो, पाण्याच्या ग्लासवर टेकविला तर वेगळा आवाज येतो आणि पाण्यामध्ये स्पंदने दिसू लागतात.

प्राणस्पंदन म्हणजे जगाच्या मुळाशी असलेला जो प्राण, जी ऊर्जा, जी शक्‍ती ती स्वतःचे अस्तित्व स्पंदनरूपाने सांगू इच्छिते. ही सवय शेवटी प्रत्येक प्राणिमात्रात येते. जन्माला आलेले बालक जोपर्यंत ट्यां।।हां असे रडून "मी आलो' असे सांगत नाही तोपर्यंत बाकीच्यांचे श्‍वास अडकलेले असतात, त्यांच्या तोंडातून शब्द फुटत नाही. एकदा का बालकाने आवाज काढला की सर्वांना हायसे होते. दुसऱ्याशी आवाजाच्या माध्यमातून संपर्क साधण्यासाठी मूल रडते. स्वतःचे अस्तित्वाची इतरांनी दखल घ्यावी या हेतूने या आवाजाची योजना झालेली दिसते. म्हणून आवाजाला खूप महत्त्व आहे.

माणसाला नाद उत्पन्न करताच आला नाही व हा उत्पन्न केलेला नाद संपर्कासाठी उपयोगात आणता आला नाही तर त्या आवाजाला काही महत्त्व नाही. तसेच, त्या माणसालाही काही महत्त्व नाही. आपले म्हणणे काय आहे हे मांडण्यासाठी बोलावे लागतेच. एखाद्याला "पुन्हा, असे करशील तर सांगून ठेवतो' असे दरडावत असतानाचा आवाज स्त्रीआवाजासारखा बारीक आणि चिरका असला तर त्या वाक्‍याला काही अर्थ राहणार नाही. अशा दरडावणीला कोणी विचारणार नाही, उलट हसतीलच. तेव्हा आवाज शक्‍तीचे निदर्शनही करत असल्यामुळे तो दमदार, भरदार, व्यक्‍तिमत्वाला शोभेल असा असावा. लहान मूल घोगऱ्या आवाजात बोलायला लागले किंवा एखादा म्हातारा मनुष्य बारीक, चिरक्‍या आवाजात बोलायला लागला तर विनोदी ठरते.

म्हणून आवाजाचे आरोग्य फार महत्त्वाचे आहे. माणसाला जन्मतः कंठ उत्तम असणे आवश्‍यक आहे. त्याचे आरोग्य टिकावे यासाठी सुरुवातीपासूनच प्रयत्न करणे आवश्‍यक असते. आवाज म्हणजे आत असलेल्या श्क्‍तीचे स्पंदन आहे हे लक्षात ठेवणे सर्वात महत्त्वाचे आहे. म्हणून शक्‍ती कमी झाल्यावर आवाज क्षीण होतो, बोलवत नाही व अशा वेळी डोळे आकाशाकडे लागले तर कुणाला नवल वाटण्याचे कारण नाही. आवाज शक्‍तीवर अवंलबून असतो तसेच एकूण आवाजाचा दमदारपणा व तो प्रगट करण्याची कालमर्यादा फुप्फुसांवर अवलंबून असते. म्हणून फुप्फुसे मजबूत असणेही आवश्‍यक असते. सर्वात मोठा आवाज म्हणजे भुभुःकार. हा भुभुःकार वानरांपासून वा वानरांची देवता असलेल्या हनुमंतापासून येतो. हनुमंत ही देवता शक्‍तीची आहे हेही सर्वांना माहीत असते. शक्‍ती कमवणे हे आवाजाचे आरोग्य टिकविण्याचे एक मोठे साधन आहे. स्त्री व पुरुषांचे कंठ वेगळ्या तऱ्हेने निर्माण झालेले असतात. पुरुषांचा स्वर स्त्रियांच्या स्वराच्या साडेतीन मात्रा खाली असतो. पुरुषी किंवा बायकी आवाजाची गुणवत्ता वेगळी असल्यामुळे, पुरुषाचा बायकी आवाज वा बाईचा पुरुषी आवाज असणे अनैसर्गिक समजले जाते.

किती वेळ सातत्याने बोलता येईल हेही महत्त्वाचे असते. अगदी दोन मिनिटे बोलल्यावर कंठशोष होऊ नये आणि अर्ध्या तासाच्या संभाषणात २५ वेळा पाण्याचा घोट घ्यायला लागू नये. सध्या सर्वात चलतीचा विषय आहे राजकारण. राजकारणही आवाजावरच चालते. लोकांना खरी-खोटी आश्‍वासने देताना उपयोगी पडतो तो आवाजच. तो आवाज लोकांचा विश्‍वास बसेल, असा असला पाहिजे. गायक, नट, प्रवचनकार यांच्यासाठी जसा आवाज महत्त्वाचा आहे त्याचप्रमाणे राजकारण्यांसाठीही आवाज महत्त्वाचा आहे. निवडणुका जवळ आल्या की आवाज उ त्तम असायला पाहिजेच. आवाजाच्या जातीप्रमाणे आवाजाचे आरोग्य सांभाळण्याची आवश्‍यकता असते. नुसता शब्द प्रकट झाला म्हणजे आवाज चांगला आहे, असे म्हणता येणार नाही. लावणी, पोवाडा हे प्रकार गाणाऱ्यांचे आवाज तर वेगळे असावेतच परंतु प्रेमगीत, भावगीत, भक्‍तिगीत गाणाऱ्यांचेही आवाज वेगळे असावे लागतात. त्या आवाजाचे आरोग्यही तसेच सांभाळावे लागते.

लहानपणी जर स्तोत्रे, परवचे तोंडपाठ करण्याचा प्रयत्न केलेला असला तर आवाजाचे आरोग्य चांगले राहण्यासाठी उपयोग होतो. आवाज चांगला राहण्यासाठी कफदोष नसावा, तसेच वातदोषही नसावा. एकूणच तिन्ही दोष आवाजावर परिणाम करणारे ठरतात. पण कफ- वातदोषयुक्‍त आवाज दुसऱ्याला भीती उत्पन्न करणारा किंवा शंका उत्पन्न करणारा असतो. पित्तदोषाचा आवाजातून आततायीपणा किंवा "मी म्हणतो तेच खरे' असा ठामपणा जाणवतो. एकूण त्रिदोषांचे समत्व असेल तर आवाज व त्यासाठी कंठ उत्तम तयार असावा. सराव करण्याने आवाज सुदृढ होतो, कंठ तयार होतो. वीर्यधातूशी आवाजाचा संबंध असल्यामुळे अति मैथुनाने आवाज बिघडतो, तर वीर्यसंवर्धनामुळे आवाज कर्णमधुर होतो.

ताकद देणारे पदार्थ सेवन करण्याने, तूप, मध वगैरे सेवन करण्याने आवाज सुधारायला मदत होते. गरम पाण्यात पुदिना, मध, सुंठ घालून पिण्यानेही आवाजाचे आरोग्य सुधारते. कंकोळ तोंडात धरण्याने आवाजाचे आरोग्य सुधारते. नको ते पदार्थ खाण्याने, सारखे पोट बिघडलेले असल्याने, अति मद्यपान करण्याने वा धूम्रपान करण्याने कंठाला सूज आल्याने आवाज खराब होतो.

आवाज हे विचार प्रकट करण्याचेही साधन आहे. म्हणजेच प्रथम विचार स्पष्ट असणे आवश्‍यक असते. विचार स्पष्ट नसणाऱ्या व्यक्‍तीत जिव्हादोष नसला तरी बोलण्यात ततपप... वा आ, उं... ची बाराखडी असलेली आढळते. एखादी कल्पना सांगताना स्वतःला शंका व ज्याला ऐकवले जात आहे तो ऐकत आहे की नाही व त्यानुसार वागेल की नाही याची शंका असली तर आवाज नीट उमटत नाही. बोलणे नीट होण्यासाठी विचार सुस्पष्ट असावे लागतात. विचार सुस्पष्ट असण्यासाठी योग्य वाचन व शिक्षण असावे लागते, स्वतःविषयी आत्मविश्‍वास असावा लागतो तसेच दुसऱ्यांविषयी प्रेम असावे लागते. बेंबीपासून उत्पन्न होणारा एकच आवाज, व तो म्हणजे "ॐ'. नुसते आवाजाचे आरोग्य नाही तर सर्व अवयवांचे, शारीरिक, मानसिक, आत्मिक असे सर्व प्रकारचे आरोग्य मिळविण्याचे मुख्य साधन आहे, नादयोगातील ॐकार. म्हणून थोडी मेहनत करून आवाजाचे आरोग्य सुधारावयाचे व सुधारलेल्या आवाजाने ॐकार उपासना करून पुन्हा आपले आरोग्य चांगले ठेवायचे असे चक्र चालू ठेवल्यास जीवनातील गंमत अनुभवताना नादानुसंधान व शांती अनुभवणे शक्‍य आहे.

- डॉ. श्री बालाजी तांबे

No comments:

Post a Comment

ad