Showing posts with label हृदय. Show all posts
Showing posts with label हृदय. Show all posts

Monday, February 15, 2010

हृदयरोग व उपचार

रसवहस्रोतस, प्राणवहस्रोतस किंवा महास्रोतसात बिघाड झाला, तर त्याचा परिणाम म्हणून हृदयात विकार उत्पन्न होऊ शकतात. कारणानुरूप जो दोष बिघडेल त्यानुसार हृदयरोगाची लक्षणे बदलतात. आधुनिक तंत्रज्ञानाने नेमके निदान करता येते. त्यानंतर नेमका कोणता दोष कारणीभूत आहे हे पाहून उपचारांची दिशा ठरवावी लागते. हृदयरोगातील लक्षणांचा निश्‍चित अभ्यास करून व नाडीपरीक्षा करून हृद्रोगाबाबतचा निर्णय वैद्याने घ्यायचा असतो. एखाद्या लक्षणावरून हृदयविकार झाला असे समजून घाबरून जाऊ नये.
तसे पाहता सर्वच शरीरावयव महत्त्वाचे असतात. पण काही अवयवांवर इतर अवयवांपेक्षा खूप मोठी जबाबदारी असते. असाच एक शरीरातील अतिशय महत्त्वाचा अवयव म्हणजे हृदय. संपूर्ण शरीराला रात्रंदिवस शुद्ध रक्‍ताचा पुरवठा करणाऱ्या हृदयाचे कार्य होण्यासाठी कोणकोणते घटक जबाबदार असतात हे आपण 15 जानेवारीच्या "फॅमिली डॉक्‍टर' पुरवणीत पाहिले. हृदयात बिघाड काय कारणांनी होऊ शकतो आणि त्याची लक्षणे काय असतात याबद्दलची माहिती आपण येथे घेणार आहोत.

आयुर्वेदात "स्रोतस' नावाची एक विशेष संकल्पना आहे. शरीरात महत्त्वाची अशी तेरा स्रोतसे असतात. प्रत्येक स्रोतसाची काही विशिष्ट कामे असतात. उदा. अन्नवहस्रोतसाचे काम अन्न स्वीकारणे, ते पचवणे, नंतर उरलेला मलभाग शरीरातून टाकून देणे असते. प्राणवहस्रोतसाचे काम श्‍वासामार्फत आलेला प्राण स्वीकारून उच्छ्वास बाहेर टाकण्याचे असते. स्रोतसाचे असे विशिष्ट अवयव असतातच, पण प्रत्येक स्रोतसाची दोन मुळे असतात. ही मुळे प्रत्यक्ष स्रोतसापासून शरीरात शारीरिकदृष्ट्या दूरही असू शकतात. पण स्रोतसाच्या कार्यकारित्वाच्या दृष्टीने खूप महत्त्वाची असतात. हदय हे रसवहस्रोतसाचे व प्राणवहस्रोतसाचे मूळ असते. म्हणूनच या दोन स्रोतसांमधला बिघाड हृदयाला बाधक ठरू शकतो आणि हृदयातील दोषामुळे या दोन स्रोतसांचे कार्य व्यवस्थित होऊ शकत नाही.

प्राणवहस्रोतसाचे एक मूळ हृदय असते, तर दुसरे मूळ असते महास्रोत म्हणजे मुखापासून ते गुदापर्यंतचा भाग. स्रोतसाचे एक मूळ बिघडले तर त्याचा परिणाम दुसऱ्या मुळावर होणेही स्वाभाविक असते. थोडक्‍यात, रसवहस्रोतस, प्राणवहस्रोतस किंवा महास्रोतसात बिघाड झाला तर त्याचा परिणाम म्हणून हृदयात विकार उत्पन्न होऊ शकतात.

या तीन स्रोतसांमध्ये, पर्यायाने हृदयामध्ये बिघाड कोणत्या कारणांनी होतो हे पुढील श्‍लोकांवरून समजते.

प्राणवहस्रोतस व हृदय क्षयात्‌ सन्धारणात्‌ रौक्ष्यात्‌ व्यायामात्‌ क्षुधितस्य च।
प्राणवाहिनि दुष्यन्ति स्रोतांस्यन्यैश्‍च दारुणः ।।...चरक विमानस्थान
धातूंचा क्षय झाल्याने, मल-मूत्र वगैरे वेगांचे धारण करण्याने, रुक्ष वस्तूंचे अति प्रमाणात सेवन करण्याने, भूक लागली असतानाही व्यायाम करण्याने व स्वशक्‍तीच्या आवाक्‍याबाहेर कार्य करण्याने प्राणवहस्रोतस बिघडते आणि त्याची परिणाम हृदयावर होतो.

स्रोतस व हृदय
अतिमात्रस्य चाकाले चाहितस्य च भोजनम्‌ । अन्नवाहिनी दुष्यन्ति वैगुण्यात्‌ पावकस्य च ।। ...चरक विमानस्थान
अवेळी अति प्रमाणात भोजन करण्याने, प्रकृतीला अहितकर भोजन करण्याने व अग्नीतील बिघाडामुळे पचनसंस्थेत बिघाड होतो व त्याचा परिणाम म्हणून हृदयात विकार उत्पन्न होऊ शकतात.

रसवहस्रोतस व हृदय
गुरुशीतमतिस्निग्धं अतिमात्रं समश्‍नताम्‌। रसवाहिनी दुष्यन्ति चिन्त्यानां चाति चिन्तनात्‌ ।। ...चरक विमानस्थान
पचण्यास जड, अति थंड, अति स्निग्ध पदार्थ खाण्याने, अति मात्रेत भोजन करण्याने व अति चिंता करण्याने रसवहस्रोतस बिघडते. रसवहस्रोतसाचे मूळ हृदय व हृदयातून निघणाऱ्या धमन्या असल्याने रसवहस्रोतस बिघडले की त्याचा परिणाम सरळ हृदयावर होताना दिसतो.

माधवनिदानात हृद्रोगाची कारणे पुढीलप्रमाणे दिलेली आहेत.
अत्युष्ण-गुर्वन्न-कषाय-तिक्‍त-श्रमाभिघाताध्यशनप्रसंगैः । सचिन्तनैः वेगधारणैश्‍च ।।...माधव निदान
अति उष्ण, पचण्यास जड, तुरट, कडू चवीचे भोजन करण्याने, अति श्रम, अति भोजन, शारीरिक वा मानसिक आघात, अति मैथुन, अति चिंता व मलमूत्रादि वेगांचे धारण या कारणांनी हृद्रोग होऊ शकतो.

हृद्रोगाची संप्राप्ती म्हणजे हृदयरोग कसा होतो हे पुढील सूत्रावरून समजते,
दूषयित्वा रसं दोषा विगुणं हृदयं गताः। हृदिबाधा प्रकुर्वन्ति हृद्रोगं तं प्रचक्षते ।।...माधव निदान
कारणानुरूप ज्या कोणत्या दोषात बिघाड होतो तो दोष रसधातूला बिघडवतो. बिघडलेला रसधातू हृदयात पोचला की त्या ठिकाणी बाधा उत्पन्न करतो आणि हृद्रोग होतो. यावरून एक गोष्ट लक्षात येते, की कारणानुरूप जो दोष बिघडेल त्यानुसार हृद्रोगाची लक्षणे बदलतात. नेमका कोणता दोष कारणीभूत आहे हे पाहून उपचारांची दिशा ठरवावी लागते. हृद्रोगातील लक्षणांचा निश्‍चित अभ्यास करून व नाडीपरीक्षा करून हृद्रोगाबाबतचा निर्णय वैद्याने घ्यायचा असतो. एखाद्या लक्षणावरून हृदयविकार झाला असे समजून घाबरू नये.

वातामुळे होणाऱ्या हृद्रोगाची लक्षणे * हृद्‌शून्यभाव - हृदयात पोकळी असल्यासारखे वाटणे.
* हृद्‌द्रव - छातीत धडधडणे. व्यायाम वा काही उत्सुकता असली की सुद्धा छातीत धडधडते पण त्या धडधडण्यापेक्षा हे धडधडणे वेगळे असते. मुख्य म्हणजे हृद्रोगात काहीही कारण नसताना अचानक धडधड सुरू होते.
* हृत्शोष - छातीत, हृदयात शोष पडण्यासारखे वाटणे, कोरडेपणा वाटणे.
* हृन्भेद - हृदयाच्या ठिकाणी फुटल्याप्रमाणे तीव्र वेदना होणे.
* हृत्स्तंभ - हृदयाचे कार्य एकाएकी थांबले आहे असे वाटणे.
* हृदयोद्वेष्टन - छातीत पिळवटल्याप्रमाणे वेदना होणे.
* हृत्तोद - छातीत टोचल्याप्रमाणे दुखत राहणे.
* दीनता-भय-शोकप्रतीती - एकाएकी, विशेष असे कारण नसतानाही दीन, खिन्न होणे, भीती वाटणे, शोकग्रस्त होणे.
* शब्दासहिष्णुता - मोठा आवाज, गोंगाट, गडबड सहन न होणे.
* वेपथुः - सर्वांगाला कापरे भरणे.
* श्‍वासरोध - श्‍वास घेण्यास व सोडण्यास त्रास होणे.
* अल्पनिद्रता - झोप कमी येणे.
वातकाळात म्हणजे जेवण पचल्यावर, अगदी पहाटे वा सूर्यास्तानंतर छातीत वेदना होणे.

पित्तामुळे होणाऱ्या हृद्रोगाची लक्षणे
* हृद्‌दाह - छातीत जळजळणे.
* तिक्‍तास्यता - तोंडात कायम कडवट चव जाणवणे.
* अम्लोद्‌गार - आंबट ढेकर येणे.
* क्‍लम - अकारण थकवा वाटणे.
* शोष - पाणी प्यायले तरी तहान न शमणे.
* मूर्च्छा - घेरी / चक्कर येऊन खाली पडणे.
* भ्रम - गरगरणे.
* स्वेद - अकारण, एकाएकी घाम फुटणे.
* अम्लच्छर्दि - आंबट चवीची उलटी होणे.
* धूमक - हृदयातून धूर येत असल्यासारखे वाटणे.
* तमःप्रवेश- डोळ्यासमोर अंधारी येणे.
* ज्वर - शरीरतापमान वाढणे.
जेवणानंतर थोड्या वेळाने, भूक लागली असता वा मध्यरात्री त्रास होणे.

कफदोष वाढल्यामुळे होणाऱ्या हृद्रोगाची लक्षणे
* हृद्‌भार - छातीत जडपणा जाणवणे.
* हृत्स्तंभ - हृदयात जखडल्यासारखे वाटणे.
* तंद्रा - आळस, तंद्रीत असल्यासारखे वाटणे.
* अरुची - तोंडाला चव नसणे.
* अग्निसाद - भूक न लागणे, अग्नीचे काम मंदावणे.
* अतिनिद्रा - अति प्रमाणात झोप येणे.
* आस्यमाधुर्य - तोंडात गोडसर चव राहणे.
जेवणानंतर लगेच वा सकाळच्या वेळेस अस्वस्थ वाटणे.

हृद्रोग झालेल्या व्यक्‍तींना प्रत्यक्ष तपासताना सहसा वात-पित्ताची, पित्त-कफाची वा वात-कफाची अशी एकत्रित लक्षणे दिसतात. हृदयातून धूर येत असल्यासारखे वाटणे, अकारण दीन-खिन्न वाटणे, छातीवर दगड ठेवल्यासारखे वाटणे वगैरे काही लक्षणे वाचायला वा ऐकायला विचित्र वाटली तरी काही रुग्ण अगदी याच शब्दात वर्णन करताना दिसतात.

हृद्रोगाचे निदान करताना लक्षणे विचारात घ्यावी लागतातच, पण लक्षणे कशामुळे वाढतात, कधी कमी होतात हेही बघावे लागते. उदा. छातीत धडधडणे हे हृद्रोगातले बहुधा सगळ्यांमध्ये आढळणारे लक्षण असते, पण ते मल-विसर्जनानंतर वाढत असल्यास वातामुळे असते. ताण आल्याने वाढत असले तर त्याचा संबंध रसधातूशी आणि मनाशी अधिक असतो.

पाळीच्या आधी जाणवत असल्यास तर बरोबरीने स्त्रीसंतुलनासाठी प्रयत्न करावे लागतात. धूम्रपानाने वाढत असले तर हृदयाच्या बरोबरीने फुप्फुसांवरही काम करावे लागते. अर्थातच निदान जितके अचूक, तितका उपचार यशस्वी ठरत असल्याने या सर्व गोष्टी लक्षात घेण्याचा खूप फायदा होत असतो. सध्या बहुतेक वेळेला आधुनिक पद्धतीने नेमके निदान करून हृद्रोगी आयुर्वेदिक तज्ज्ञांकडे येत असतो.

हृदयातले शारीरिक बदल वा हृदयाची एकंदर कार्यक्षमता आधुनिक निदानपद्धतीमुळे नेमकी समजू शकत असली तरी त्याचे आयुर्वेदिकदृष्ट्या वात-पित्त-कफदोषांच्या आधारे नेमके वर्गीकरण करून घ्यावे लागते किंवा प्राणवहस्रोतस, महास्रोत, रसवस्रोतसांपैकी कुठे दोष आहे, कोणत्या कारणामुळे दोष उत्पन्न झालेला आहे, पुन्हा असा त्रास होऊ नये यासाठी काय काळजी घ्यायला हवी याकडे लक्ष द्यावे लागते आणि त्यानुसार त्या त्या व्यक्‍तीमध्ये प्रकृतीविशिष्ट, दोषस्रोतस-धातु-विशिष्ट उपचार करावे लागतात.
क्रमशः

- डॉ. श्री बालाजी तांबे आत्मसंतुलनव्हिलेज, कार्ला 410 405 Ayurveda, healthy Food, Healthy Living, Abstract India, Shree Balaji Tambe, India, Yoga, Meditation, Life Style, Marathi Blog

प्रेमाचे स्थान : हृदय

डॉ. श्री बालाजी तांबे
हृदय हे ओज, प्रेम व प्रेरणा यांचे मुख्य स्थान असते. मेंदू व मनाचा संबंध आहे असे आपल्याला वाटते, पण प्रत्यक्षात मनाचा व हृदयाचा संबंध असतो. मनावर झालेले सर्व आघात हृदयावर परिणाम करतात. आपण हृदय विकसित केले तर जन्माचे कल्याण होते.
हृदय-फुफ्फुसे या जोडीतील फुफ्फुसे पुरुषासारखी व हृदय स्त्रीसारखे असते. हृदय तसेही मातृज असते. शरीरातून आलेले अशुद्ध रक्‍त फुफ्फुसांमध्ये येते व त्या ठिकाणी श्‍वासातून आलेला प्राणवायू व प्राण ही शक्‍ती मिळवून शुद्ध झालेले रक्‍त हृदयाकडे पाठवले जाते. पुरुष सर्व जगभर फिरून अनेक उद्योग करून चरितार्थासाठी लागणारी शक्‍ती मिळवितो, परंतु स्त्री शक्‍तीवर व अन्नावर संस्कार करून घरातील सर्व मंडळींना, पै-पाहुण्याला व येणाऱ्या-जाणाऱ्याला ताजेतवाने करून स्वतःच्या कार्यास प्रवृत्त करते. हृदय रक्‍ताचा स्वीकार करून पुन्हा ते सर्व शरीराला पोचविण्याचे काम करते आणि हृदय हे ओज, प्रेम व प्रेरणा यांचे मुख्य स्थान असते.

शरीररूपी गाडी चालायला आवश्‍यक असणारे पेट्रोल म्हणजे वीर्य. पेट्रोल गाडीच्या इंजिनात गेल्यावर तेथे हवेच्या विशिष्ट दाबाखाली येऊन ठिणगी पडली की ते भपकन पेटून शक्‍ती तयार होते. या तयार झालेल्या शक्‍तीने पिस्टन पुढे-मागे होतो व गाडी चालायला लागते. तसे हृदयातल्या कप्प्यात रक्‍त आल्यावर ठिणगी पडली की हृदयातून रक्‍त सर्व शरीराकडे पोचविण्याची क्रिया (डिलिव्हरी सिस्टीम) सुरू होते. हृदयाच्या ठिकाणी चेतना असते व हृदयाच्या ठिकाणी असलेले ओज वीर्यातून तयार झालेले असते. ओज हा एक स्वतंत्र विषय आहे. ओज हृदयात राहते, या कारणाने हृदयाला ओजाचे स्थान म्हटले जाते. पण मेंदूलाही ओजाची आवश्‍यकता असतेच. मेंदू, हृदय यांना ओजाची अधिक आवश्‍यकता असते. मेंदू व हृदयाने ओज घेतल्यावर उरलेल्या ओजाच्या द्वारा शरीर इतर कार्य करू शकते. अतिमैथुनात व्यस्त झालेल्या मंडळींच्या हृदयाला व मेंदूला ओजाची व वीर्याची पूर्ती नीट न झाल्याने ही मंडळी लवकर थकतात, ही माणसे निरुत्साही असू शकतात, त्यांच्यात जोश कमी असू शकतो.

शरीरात अभिसरण होणारे रक्‍त शरीराद्वारा वापरले गेले की अशुद्ध होते, त्यातील शक्‍ती निघून जाते. सर्व शरीरातील अशुद्ध रक्‍त हृदयाच्या एका कप्प्यात येते. हृदयाचे आकुंचन झाले की हे अशुद्ध रक्‍त फुफ्फुसात येते. फुफ्फुसात आलेले अशुद्ध रक्‍त प्राणवायूच्या संपर्कात येते व शुद्ध होते. हे शुद्ध आलेले रक्‍त पुन्हा हृदयाच्या एका कप्प्यात येते व हृदयाच्या आकुंचनामुळे ते सर्व शरीरभर पोचवले जाते. अशा तऱ्हेने हृदय पंपासारखे काम करत असते.

हृदय हे प्रेमाचे व मनाचे स्थान आहे, हे ज्या भारतीयांनी शोधले त्यांचे कौतुक करण्यासारखे आहे. हृदयात प्रेमाचे स्थान असते. मनुष्यमात्राला काही अडचण आहे का, त्यांना आपण काही देऊ शकतो का, वगैरे भावना हृदयात निर्माण होते. प्रेमाचे प्रतीक दाखवायचे असेल तर आपण हृदयाचे चित्र काढत राहतो. हृदयातच प्रेमाचा वास असतो. हृदयातच भक्‍तीचा वास असतो. हृदयातच एखाद्या मनुष्यासाठी असलेले समर्पण असते.

याच संदर्भात रामायणात एक कथा आहे. हनुमान म्हणाले, ज्या गोष्टीत राम नाही ती गोष्ट मला नको. स्वतःच्या छातीत राम आहे हे दाखविण्यासाठी हनुमंतांनी स्वतःची छाती फाडून दाखविली. असे जर आपण हृदय विकसित केले तर जन्माचे कल्याण होते, अन्यथा जन्माला आला व मरून गेला, एवढेच घडते. रक्‍ताचे शुद्धीकरण होत राहते, शरीर रक्‍त वापरत राहते. या कार्यात महिनोन्‌ महिनेच काय, वर्षानुवर्षे काहीही फरक पडत नाही.
आपल्या शरीरात जेवढी म्हणून शक्‍तीची केंद्रे आहेत, त्यांना कमळाची उपमा दिलेली आहे. हृत्पद्म, सहस्रदलपद्म वगैरे.

हृदय हे उलट्या ठेवलेल्या कमळासारखे असते व ते छातीच्या मध्यभागी असून, एका बाजूला किंचित कललेले असते. हृदयरूपी कमळातून निघालेल्या दांड्या वरच्या बाजूने निघालेल्या असतात. दांड्या वर असल्याने उलट्या ठेवलेल्या कमळाची उपमा दिलेली आहे. कमळ जसे उमलते व बंद होते तसे हृदयही उघडते व बंद होते, म्हणजे त्याचे आकुंचन व प्रसरण होत असते. निसर्गातील कमळाच्या फुलाबद्दल एक आश्‍चर्याची गोष्ट म्हणजे कमळाच्या फुलावर प्रकाश पडेपर्यंत ते उघडे राहते, प्रकाश पडायचा बंद झाला की ते बंद होते. म्हणून कमळ सकाळी उमलते व सूर्यास्ताच्या सुमाराला बंद होते. शिवाय कमळाच्या पाकळ्या उघड-बंद होताना त्यांची रचना बिघडलेली दिसत नाही.

आपल्या हृदयाला सांभाळणे आपले काम आहे. ते सहसा तक्रार करत नाही हे लक्षात ठेवून त्याची काळजी लक्षपूर्वक घेणे आवश्‍यक असते.
हदयाची उघडझाप अविरतपणे चालू असते, पण त्यात अडथळा का निर्माण होतो, हे पाहणे आवश्‍यक आहे. हृदयाचा हृत्कमल असा उल्लेख सर्व भारतीय वाङ्‌मयात, आयुर्वेदात, योगशास्त्रात सापडतो. आपले हृदय सतत कार्यरत असते. हृदय हेच मनाचे व प्रेमाचे स्थान आहे. मेंदू व मनाचा संबंध आहे असे आपल्याला वाटते, पण प्रत्यक्षात मनाचा व हृदयाचा संबंध असतो. मनावर झालेले सर्व आघात हृदयावर परिणाम करतात. रात्रंदिवस कार्यरत असलेल्या हृदयाला अचानक असे काय होते, की ज्यामुळे आपले जीवन संपुष्टात येऊ शकते. सहसा हृदय तक्रार करत नाही, त्याने तक्रार केली तरी आपण तिकडे लक्ष देत नाही, त्यामुळे हृदयाचे दुखणे विकोपाला जाते, आपल्याला त्रास होतो व आपण जागे होतो.

आपल्या शरीरातील इतर चक्रांनाही कमळाचीच उपमा दिलेली असते. मणिपूर चक्राच्या ठिकाणचे सूर्यकमळ, ब्रह्मरंध्राच्‌?ा ठिकाणचे सहस्रदलपद्म वगैरे. सहस्रदलपद्म वर उमलणारे आहे व त्याची व्याप्ती सर्व शरीरभर असते. याला हजार पाकळ्या आहेत असे म्हणत असताना खरोखरच आपल्या मेंदूत हजारो नाड्या कार्यरत असतात, असे आढळते.

हृदयात रक्‍त आत येणे, हृदयाच्या आकुंचनाबरोबर सर्व रक्‍त शुद्ध करण्यासाठी फुफ्फुसांकडे पोचविणे, फुफ्फुसांकडून आलेले शुद्ध रक्‍त हृदयाच्या आकुंचनाबरोबर सर्व शरीरभर पोचविणे, हे काम अविरतपणे होत असते. यात अडथळा का येतो, हेही समजून घेण्यासारखे आहे.

- डॉ. श्री बालाजी तांबे आत्मसंतुलनव्हिलेज, कार्ला 410 405 Ayurveda, healthy Food, Healthy Living, Abstract India, Shree Balaji Tambe, India, Yoga, Meditation, Life Style, Marathi Blog

Thursday, January 21, 2010

हृदय आणि हृदयविकार

शरीरातील अतिमहत्त्वाच्या अवयवांपैकी एक महत्त्वाचा अवयव म्हणजे हृदय होय. हृदय कार्यरत असणे हे जिवंतपणाचे लक्षण समजले जाते. यावरूनच हृदयाचे महत्त्व लक्षात येऊ शकते. अगदी गर्भावस्थेतही गर्भाची जडणघडण व्यवस्थित होत आहे का नाही, हे पाहताना हृदयाचे ठोके महत्त्वाचे समजले जातात.

शोणितकफप्रसादजं हृदयम्‌ ।
असे हृदयाचे वर्णन केलेले आहे. रक्‍तधातूच्या व कफाच्या प्रसादभागापासून म्हणजेच सारभागापासून हृदय तयार होते. या ठिकाणी लक्षात घेण्याजोगी गोष्ट म्हणजे कफाच्या मागे दोष हा शब्द लावलेला नाही. म्हणजे शरीरधारणेचे काम करणारा, स्थिरता, शक्‍ती देण्याचे काम करणारा जो प्राकृत कफ आहे, त्याच्या सारभागापासून आणि रक्‍ताच्याही उत्तम अशा सारभागापासून हृदय बनत असते.
हृदय हा मातृज अवयव असतो. म्हणजेच हृदयावर आईच्या प्रकृतीचा प्रभाव अधिक असतो. म्हणून गर्भधारणेपूर्वी स्त्रीचे रक्‍त, स्त्रीचा कफ प्राकृत असणे, उत्तम स्थितीत असणे आवश्‍यक असते. गर्भधारणेनंतरही गर्भाचे हृदय तयार होत असताना रक्‍तवर्धक, कफपोषक आहार-औषधद्रव्ये घेणे जरुरीचे असते.

प्राण-मनाचे अधिष्ठान
गर्भ तयार होत असताना स्पंदनाच्या रूपात हृदयाचे अस्तित्व बरेच आधी समजत असले, तरी प्रत्यक्ष अवयव म्हणून हृदयाची अभिव्यक्‍ती होण्यासाठी चौथा महिना उजाडावा लागतो. गर्भहृदय अभिव्यक्‍त झाले, की गर्भवतीला डोहाळे लागतात, जे पूर्ण करणे गर्भाच्या एकंदर आरोग्यासाठी महत्त्वाचे असते. हृदय हे रक्‍ताभिसरणाचे, अशुद्ध रक्‍त स्वीकारून, फुफ्फुसांच्या मदतीने शुद्ध करून, शुद्ध रक्‍ताचा संपूर्ण शरीराला पुरवठा करण्याचे काम करत असतेच; पण हृदय हे चेतनेचे, प्राणाचे; तसेच मनाचेही स्थान असते.

तद्विशेषेण चेतसः स्थानम्‌। ...सुश्रुत शरीरस्थान
चेतना विशेषत्वाने राहण्याचे स्थान म्हणजे हृदय.

दशप्राणायतनेषु एकम्‌। ...चरक सूत्रस्थान
प्राण शरीरात ज्या दहा ठिकाणी राहतो, त्यांतील एक ठिकाण म्हणजे हृदय.

मनो।धिष्ठानम्‌।। ...अष्टांगहृदय सूत्रस्थान
मनाचे अधिष्ठानही हृदयच होय.

या सर्व वर्णनावरून हृदयाचे महत्त्व अधिकच पटते. हृदयावर आघात झाला असता ताबडतोब प्राण नष्ट होतात म्हणून हृदयाला "सद्यःप्राणहरमर्म' असेही म्हटले जाते.
मनाचे आरोग्य टिकवायचे असेल, तर ते ज्या ठिकाणी राहते ते हृदय नीट असावेच लागते, प्राणशक्‍ती वाढवायची असेल, तर ती ज्या हृदयात प्रामुख्याने राहते ते हृदय मजबूत असणे आवश्‍यक असते आणि चैतन्याचा अनुभव घ्यायचा असला, तरी चेतनास्थान असणाऱ्या हृदयाची काळजी घेणे भाग असते.

एकंदरच फक्‍त शरीराच्या आरोग्यासाठीच नव्हे, तर चैतन्यपूर्ण व उत्साही जीवन जगण्यासाठी, उत्तम मानसिक आरोग्यासाठीही हृदयाची काळजी घेणे खूपच आवश्‍यक असते. आयुर्वेदात निरोगी हृदयासाठी गर्भावस्थेपासून काय काळजी घ्यावी, हृदयाचे कार्य कसे चालते, हृदयाचे आरोग्य टिकविण्यासाठी काय काळजी घ्यावी येथपासून ते हृदयरोग कशामुळे होऊ शकतात, ते कोणकोणत्या प्रकारचे असतात, त्यांच्यावर काय उपचार करायचे या सर्व गोष्टी अतिशय समर्पकपणे समजावल्या आहेत आणि त्यांचा प्रत्यक्षात खूप चांगला उपयोगही होताना दिसतो.

वाताच्या गतीने चाले
सर्वप्रथम आपण हृदयाशी संबंधित दोष, धातू, मलांविषयी माहिती करून घेऊ या.

प्राणवायू : वाताच्या पाच प्रकारांपैकी प्राण हा पहिला; तसेच महत्त्वाचा असतो आणि हृदयामध्ये राहत असतो.
शिरः कण्ठचरोबुद्धिहृदयेन्द्रियचित्तधृक्‌। ...अष्टांगहृदय सूत्रस्थान
शिर, कंठ या ठिकाणी संचरण करणारा प्राणवायू बुद्धी, हृदय, इंद्रिये, मन यांचेही धारण करतो. म्हणूनच मनाचे स्थान असणाऱ्या हृदयात प्राण विशेषत्वाने राहत असतो.

उदानवायू : प्राण व उदान हे श्‍वसनाचे काम जोडीने करत असतात.

उरःस्थानमुदानस्य । ...अष्टांगहृदय सूत्रस्थान
म्हणजे हृदय हे उदानाचे स्थान असते.
व्यानवायू : वाताच्या पाचही प्रकारांपैकी अतिशय वेगवान व बलवान असा हा वायू असतो.

व्यानो हृदि स्थितः कृत्स्न देहचारी महाजवः। ...अष्टांगहृदय सूत्रस्थान
व्यान हृदयात राहतो आणि तो महावेगवान असल्याने संपूर्ण देहात संचरण करतो. हृदयाद्वारे रक्‍ताभिसरणाचे जे महत्त्वाचे कार्य घडते ते या व्यान वायूच्या जोरामुळेच होय. व्यान वायूची शक्‍ती कमी पडली किंवा व्यान वायूच्या गतीत कुठेही अडथळा आला, तर त्यामुळे रक्‍ताभिसरणात दोष उत्पन्न होऊन अनेक समस्या निर्माण होऊ शकतात.

अपानवायू : अपानवायूचे कार्यक्षेत्र, राहण्याचे ठिकाण नाभीच्या खाली असते त्यामुळे अपानाचा हृदयाशी प्रत्यक्ष संबंध नसतो; मात्र अपानाची गती अवरुद्ध झाली म्हणजे पोट फुगणे, वात व सरणे असे त्रास झाले असता छातीत जडपणा जाणवू शकतो. अपानातील बिघाडामुळे हृदयरोग होऊ शकतात, असे उल्लेख ग्रंथांतही सापडतात.

समानवायू : अपानाप्रमाणेच समानाचाही हृदयाशी प्रत्यक्ष संबंध येत नाही; कारण समान नाभीच्या ठिकाणी, जठराग्नीजवळ राहतो; पण समानाचा संचार संपूर्ण कोठ्यात होत असतो.

अर्थातच हृदय हा कोठ्यातील एक अवयव असल्यामुळे समानाचा हृदयाशी संबंध असतो. समानवायू बिघडल्याने पचन बिघडले, तर त्याचा परिणाम म्हणून हृदयात वेदना वगैरे होताना आढळते ते याचमुळे. शिवाय अन्नापासून आहाररस तयार झाला, की तो हृदयापर्यंत नेण्याचे काम समानवायू करत असल्यानेही समानवायूचा व हृदयाचा संबंध असतो.

कफ करी गतिसंतुलन
प्राण, उदान व व्यान यांच्या प्रत्यक्ष सहभागाने व समान; तसेच अपानाच्या अप्रत्यक्ष संबंधाने हृदय अविरत, अगदी जन्माला येण्याअगोदरपासून ते मृत्यूपर्यंत सातत्याने काम करत असते. वाताची गती हृदयाची गती चालू राहण्यासाठी आवश्‍यक असतेच; पण हृदयाची गती संतुलित राहण्यासाठी हृदयाच्या ठिकाणी कफाचीही आवश्‍यकता असते. म्हणूनच हृदयात अबलंबक व श्‍लेषक कफ राहतो.

अवलंबक कफ :
हृदयस्यान्नवीर्याच्च तत्स्थएवाम्बुकर्मणा । ...अष्टांगहृदय सूत्रस्थान
अवलंबक कफ छातीत राहून स्ववीर्याने हृदयाचे, अन्नाचे आणि वीर्याचे धारण करतो. पाणी ज्याप्रमाणे तृप्तीचे, पोषणाचे काम करते त्याप्रमाणे अवलंबक कफ हृदयाचे पोषण करतो, हृदयाची ताकद कायम ठेवतो.

श्‍लेषक कफ : कफाचा हा प्रकार सांध्यांच्या ठिकाणी राहून तेथील लवचिकता कायम ठेवण्यास पर्यायाने काम व्यवस्थित होण्यास मदत करत असतो. सर्वसाधारणपणे सांधे म्हटले, की हाडांचे सांधे, उदा.- गुडघे वगैरे डोळ्यांसमोर येतात; पण हृदयाच्या ठिकाणीही मण्डल संधी नावाचे विशेष संधी असतात असे आयुर्वेदात सांगितलेले आहे. आधुनिक परिभाषेनुसार ज्याला हृदयाच्या झडपा (व्हॉल्व्ह्‌ज) म्हटले जाते तेच संधी या ठिकाणी अभिप्रेत असावेत. हृदयातील हे संधी कडक होऊ नयेत यासाठी हृदयातही श्‍लेषक कफाची योजना केलेली असते.

साधक पित्त
वात व कफाच्या प्रकारांप्रमाणे पित्ताचेही पाच प्रकार असतात. यातील साधक पित्त हा प्रकार हृदयात राहतो.
बुद्धिमेधाभिमानाद्यैरभिप्रेतार्थं साधनात्‌।
साधकं हृद्‌गतं पित्तम्‌ ।। ...अष्टांग हृदय सूत्रस्थान
साधक पित्त हृदयात राहते आणि बुद्धी, आकलनशक्‍ती, अभिमान, स्मरण करण्याचे काम करत असते. म्हणूनच हृदयावर आघात झाला, एकाएकी मानसिक धक्का बसला, तर मनुष्याची बुद्धी भ्रष्ट होताना दिसते.

चेतनेचे गाव
ओजाचे शरीर हे सप्तधातूंपासून (टिश्‍यूपासून) म्हणजे रस, रक्‍त, मांस, मेद, अस्थी, मज्जा व शुक्र यांच्यापासून बनलेले असते आणि प्रत्येक अवयवात एका विशिष्ट धातूचे प्राधान्य असते. हृदयाशी संबंधित धातू खालीलप्रमाणे होत.

रसधातू : सर्व शरीरावयवांना तृप्ती देण्याचे काम रसधातूचे असल्याने हृदयाचा रसधातूशी संबंध असतोच; पण रसधातू हृदयाकरवी सर्व शरीरावयवांपर्यंत पोचत असल्याने त्याचा हृदयाशी अधिकच घनिष्ट संबंध असतो. रसक्षय म्हणजेच रसधातू आवश्‍यकतेपेक्षा कमी झाला तर हृदयात धडधडणे, अकारण भीती वाटणे वगैरे त्रास होताना दिसतात तेही याच कारणामुळे होय.

रक्‍तधातू : रक्‍तधातूच्या प्रसादभागापासून हृदयाची उत्पत्ती होते हे आपण वर पाहिले. रसाबरोबरच रक्‍ताचेही संपूर्ण शरीरभर संवहन हृदयातून होत असते. हृदयाचे पोषण करण्याचे कामही रक्‍तधातू करत असतो.

मांसधातू : हृदय हा अवयव मांसपेशींपासून तयार झालेला असतो. हृदयातून निर्माण होणाऱ्या; तसेच हृदयापर्यंत येणाऱ्या सर्व धमन्या, शिरा यांना आधार देण्याचे व धरून ठेवण्याचे काम हृदयातील मांसधातूमुळे होत असते. रात्रंदिवस सातत्याने आकुंचन-प्रसरण पावण्याचे सामर्थ्यही मांसधातूमुळेच मिळत असते.

शुक्रधातू : शुक्रधातू संपूर्ण शरीराला व्यापून असतो. सर्व महत्त्वाच्या अवयवांचे काम व्यवस्थित होण्यासाठी महत्त्वाचे योगदान करत असतो. म्हणूनच हृदयातही शुक्रधातू असतो. शुक्राच्या वेगाचा अवरोध केल्यास वेदना उत्पन्न होतात किंवा मैथुनाच्या अतिरेके हृदयात कंप निर्माण होतो यावरून हृदयाचा शुक्राशी संबंध असतो हे स्पष्ट होऊ शकते.

ओज : सर्व धातूंचे सार म्हणजे ओज होय.
हृदयस्थमपिव्यापि देहस्थिती निबन्धनम्‌। ...अष्टांगहृदय सूत्रस्थान
सर्व देहाला व्यापून असणाऱ्या ओजाचे (चेतनेचे) राहण्याचे मुख्य स्थान हृदय असते, असा स्पष्ट उल्लेख आहे. हृदयात ओज असते म्हणून हृदयाचे महत्त्व इतके जास्त असते. ओज जोवर आहे तोवर शरीर टिकून असते, ओजक्षय झाला तर सर्वच संपते.

असे महत्त्व असणारे ओज हृदयात राहत असल्याने हृदयाची काळजी घेणे खूप महत्त्वाचे होय. हृदयाच्या रचनेत या प्रकारे दोष व धातूंचा महत्त्वाचा सहभाग असतो; पण कार्याचा विचार करता मलांचा व हृदयाचाही संबंध असतो.

पुरीष (विष्ठा) : मलरूप पुरीष शरीराबाहेर विसर्जित होणे महत्त्वाचे असतेच; पण जोवर याला मलरूपता आलेली नसते तोवर ते शरीरधारणाचे काम करत असते. पुरीषक्षय झाला म्हणजे मलरूपता न आलेले पुरीष शरीराबोहर गेले, तर हृदयात वेदना निर्माण होतात असे उल्लेख सापडतात.

मूत्र : मूत्राचा व हृदयाचा प्रत्यक्ष संबंध नसला, तरी मूत्रवहस्रोतसाचे मूळ असणारे मेढ्र (लिंग) व हृदय यांना जोडणारा एक बंध शरीरात असतो, असे आयुर्वेदात सांगितलेले आहे. मूत्रवहस्रोतसातील दोषामुळे होणाऱ्या मधुमेहाचा परिणाम म्हणून हृदयरोग होऊ शकतो असे संदर्भ आयुर्वेदिक ग्रंथात सापडतात व प्रत्यक्षही दिसतात. अशा प्रकारे हृदय तयार कसे होते, हृदयाची रचना कशी असते याविषयीची माहिती आपण घेतली. यानंतर आपण हृदयरोग कशामुळे होतो, कसा होतो वगैरेची माहिती पाहणार आहोत.
(क्रमशः)

- डॉ. श्री बालाजी तांबे Ayurveda, healthy Food, Healthy Living, Abstract India, Shree Balaji Tambe, India, Yoga, Meditation, Life Style, Marathi Blog

हृदयसंक्रांत

ओज ही हृदयाने तयार केलेली विजेसारखी शक्‍ती आहे. ती एका क्षणात पायाच्या अंगठ्यापासून ते मेंदूपर्यंत सगळीकडे पोचते. ही शक्‍ती आपल्या शरीरात आहे म्हणून आपली सर्व कामे होतात.

संक्रांत हा सण भांडणे मिटवून गोड व प्रेमाचे संबंध प्रस्थापित करण्यासाठी असतो. यासाठी हृदय या अवयवाची विशेष आवश्‍यकता असते; कारण प्रेमासाठी मेंदूपेक्षा हृदयालाच अधिक जबाबदारी घ्यावी लागते.

हृदय हा अत्यंत महत्त्वाचा अवयव आहे. अनेक वेळा आपण पाहतो, की कुठल्याही तऱ्हेची पूर्वसूचना न देता व्यक्‍तीला हार्ट ऍटॅक येतो. माझ्या माहितीतले एक उदाहरण आहे. एका डॉक्‍टर मुलीचे डॉक्‍टर मुलाशी लग्न झाले. मुलीचे वडील मोठ्या कंपनीत मोठ्या हुद्‌द्‌यावर होते. रात्री लक्ष्मीपूजन वगैरे झाले. सर्व मंडळी झोपी गेली. दुसऱ्या दिवशी मुलीचे वडील थोडे लवकर उठले, ड्रॉइंग रूममधील इकडेतिकडे पडलेली फुले जरा झाडून टाकावीत, या हेतूने झाडू घेऊन ओणवे झाले ते गेलेच.

घरी लग्नाची धामधूम चाललेली आहे, लग्नाच्या दोन दिवस आधी मुलीच्या वडिलांना हृदयाचा झटका आल्याने सर्व जण चिंतेत पडले, की आता काय करावे? लग्नाच्या आधी घरच्या कुणाला हार्ट ऍटॅक वगैरे आल्यास लग्न लांबणीवर टाकता येतेच असे नाही; कारण नंतर एक-दोन महिन्यांत लग्नाचा हॉल कोठे मिळणार?

लग्नतारखेच्या आसपास जवळच्या व्यक्‍तींपैकी असे कुणाला झाल्यास त्यात सामाजिक भागही लपलेला असतो. माझ्या माहितीत एका मुलाचे लग्न ठरले होते. लग्नाच्या तीन-चार दिवस आधी मुलाच्या वडिलांना हार्ट ऍटॅक आला, त्यांना हॉस्पिटलमध्ये नेले. नवरा मुलगा व त्याचा एक मित्र माझ्याकडे विचारायला आले, ""ही मुलगी पांढऱ्या पायाची व अपशकुनी आहे की काय? मी हे लग्न करू की नको?''
मला असेही एक उदाहरण माहीत आहे, की एका व्यक्‍तीला हार्ट ऍटॅक आला. त्याची बाहेरगावी राहणारी बहीण त्याला पाहायला येऊ शकली नाही, तर त्यांच्यात जन्माचे वितुष्ट आले.
सांगायचा अर्थ असा, की काहीही पूर्वसूचना न देता हार्ट ऍटॅक आल्यास अनेक प्रकारचा घोटाळा होऊ शकतो. काहीतरी वाईट झाले म्हणजे आपण त्यावर संक्रांत आली असे म्हणतो; पण संक्रांतीचा उपयोग चांगल्यासाठीही करून घेता येतो. योग्य मार्गदर्शनाखाली योग्य ती काळजी घेतली, की हृदयावर येणारी संक्रांत टळते.

आयुर्वेदिक दृष्टिकोनातून वैद्यकीय भाषेत हृदयाचे कार्य, त्याचे भाग वगैरे माहिती आपण नंतर पाहू; पण आधी सर्वसामान्य माहिती घेऊ.
आपल्या शरीराचे चार भाग असतात...

* मानेवरचे डोके, ज्याच्यावाचून आपले चालत नाही. खांद्यावर नुसते डोके असून चालत नाही, तर त्यात असलेला मेंदू कार्यक्षम असणेही आवश्‍यक असते.
* दुसरा - छातीचा फुफ्फुस व हृदयाचा भाग. सर्व शरीराला रक्‍ताभिसरण या भागातून होते.
* तिसरा पोटाचा भाग. अन्न पचवायचे व शक्‍ती बनवायची हे या भागाचे कार्य.
* चौथा कंबरेच्या खालचा भाग. यात पाय, उपस्थ हे अवयव येतात. चालणे व मैथुन हे या भागाचे कार्य.
* माणसाचे स्वभाव; पण असे चार प्रकारचे असू शकतात. काही माणसे बुद्धिवादी असतात, ती खूप कष्ट करतात. यात म्युनिसिपालटीच्या दिव्याखाली अभ्यास करून वकील किंवा डॉक्‍टर होणारी मंडळी असतात. मला बुद्धी होती; पण मला आई-वडिलांनी काही सुविधा पुरवली नाही किंवा आज म्युनिसिपालटीच्या दिव्याचा उजेड जरा कमी आहे, अशा तक्रारी ही माणसे करत बसत नाहीत. अशी माणसे समाजासाठी व स्वतःसाठी विधायक कार्य करताना दिसतात.
* समाजात व्यवस्थापन करणारी (ऍडमिनिस्ट्रेटिव्ह) काही मंडळी असतात. ही मंडळी मोठ्या जबाबदारीचे काम पार पाडतात.
* तिसऱ्या प्रकारची मंडळी व्यापारी मंडळी. तुम्ही मला हे द्या, मी तुम्हाला ते देतो या तऱ्हेचे काम ही मंडळी करतात.
* चौथ्या प्रकारची मंडळी बुद्धीच्या, शिक्षणाच्या मागे लागत नाहीत. जे काही निसर्गतः असेल त्यावर ही मंडळी जगतात. उदा.- एखाद्याला निसर्गाने बाहुबल दिलेले असले तर हमाली करू व जगू असे म्हणत आनंदाने जगतात.
शरीरातील पाय व कंबरेच्या खालच्या संस्थेला जरा काही अडचण झाली तर चालत नाही, त्यांना लगेच अडचण येऊ शकते. जरा एखादे दिवशी जास्त चालणे झाले तर पाय दुखायला लागतात, कोणाकडून तरी दाबून घ्यावे असे वाटते. मैथुन झाल्यावर लगेच एक प्रकारचा थकवा जाणवतो. त्यामुळे या अवयवांना झालेला त्रास लगेच कळतो.

पोटाची संस्था व्यापाऱ्यासारखी असते. तुम्ही जसे अन्न द्याल तसे पचवून ते आपल्याला शक्‍ती देतात. भलते सलते काही पोटात टाकले, तर ते दुसऱ्या मिनिटाला तक्रार नोंदवत नाही; पण एक-दोन दिवसांत पोट दुखायला लागते. लहान मूल रडायला लागले तर पोटावर तेल लावून शेकून त्याला बरे वाटते आहे का हे नेहमी पाहावे. आत्ताच्या क्षणी मूल रडते आहे; कारण काल त्याच्या आईने खाल्लेल्या जडान्नाने मुलाला आज अपचन झाले असावे, असा अंदाज बांधता येतो. मला काही त्रास होत आहे, मला थोडे बरे नाही अशी तक्रार ही संस्था थोडी उशिरा नोंदवते.
तिसरी संस्था असते व्यवस्थापनासारखी. हृदय व फुप्फुसे या प्रकारे काम करतात. शहराचे नियोजन वा सैन्यात वगैरे काम करणारी मंडळी सर्व व्यवस्था पाहतात. जिथे जे आवश्‍यक आहे तेथे ते पुरवितात. त्याप्रमाणे संपूर्ण शरीराला रक्‍ताभिसरण व प्राण या दोन इंद्रियांद्वारे पोचविण्याची व्यवस्था होते. संपूर्ण शरीराला लागणारा प्राण हा प्राणवायूतून मिळतो व प्राणवायू श्‍वासोच्छ्वासाद्वारे मिळतो. हृदय व फुफ्फुसे रात्रंदिवस जागरूक असतात, रात्रंदिवस काम करत राहतात व शरीराची सुव्यवस्था पाहतात. समजा रस्त्यात वाहतूक खोळंबली, तर पोलिस स्वतःला होणाऱ्या त्रासाकडे लक्ष न देता प्रथम ठप्प झालेली वाहतूक पुन्हा नीट सुरू करण्यामागे लागतो. ज्याच्यामुळे वाहतुकीला अडथळा आला आहे ते शोधून काढून त्याला कोर्टात नेणे वगैरे काम नंतरचे असते.

तसेच, आपल्या बेताल वागण्यामुळे हृदयाला त्रास व्हायला लागला, तर हृदय लगेच आपला त्रास नोंदवत नाही. स्वतःला होणारा त्रास ते बिचारे भोगत राहते व काम निपटण्याचा प्रयत्न करत राहते. त्रास हाताच्या बाहेर गेल्यासही ते तक्रार करत नाही; पण एक दिवशी ते कोलमडून पडते. पाय व पोट लगेच तक्रार करतात म्हणून त्याच्याकडे लगेच लक्ष दिले जाते. हृदय मात्र उच्च पातळीवर व जबाबदारीच्या पदावर असल्याने ते तक्रार करत नाही. आपण पाहतो, की मोठ्या हुद्‌द्‌यावर असलेला व्यवस्थापक त्याच्या हाताबाहेर गोष्टी गेल्यास एक दिवस राजीनामा देऊन मोकळा होतो; तसेच हृदयावर अत्याचार होत राहिल्यास ते एक दिवस बंद पडते. कुणाला शाबासकी दिली तर बरे वाटते; पण हृदयाला आपण शाबासकीही देत नाही. आपण त्याच्यावर सारखे लोड टाकत राहतो. एक दिवस ते कंटाळते व बंद पडते. त्यामुळे हृदयाने तक्रारी केल्या तर सोयीचे होईल. वैतागलेला प्रत्येक मनुष्य राजीनामा देतो असे नाही. तो आपली तक्रार वरिष्ठांकडे नोंदवतो; तसेच ओव्हरलोड झालेले प्रत्येक हृदय बंद पडते असे नाही, तर काही वेळा काही व्यक्‍तीमध्ये हृदय तक्रार नोंदवतेसुद्धा; पण लोक बहुधा त्याच्याकडे लक्ष देत नाहीत.

जसे म्युनिसिपालटीने बोर्ड लावून लोकांना आवाहन केले, की तुम्ही सर्व कचरा एकत्र टाकल्याने आमचे नियोजन कोलमडले आहे, तेव्हा ओला कचरा, कोरडा कचरा, काचेचे तुकडे वगैरे कचरा वेगवेगळ्या बॅगमध्ये भरावा, म्हणजे शहराचे व्यवस्थापन करणे सोपे होईल. अशा नोटिशीकडे लोक बघतात कुठे? कालांतराने संपूर्ण व्यवस्था कोलमडून पडते; तसेच काही लोक हृदयाने दिलेल्या पूर्वसूचनांकडे पूर्णपणे दुर्लक्ष करतात व केव्हा तरी संपूर्ण व्यवस्था कोलमडून पडते. यामुळेच परदेशात निघालेले असता विमानात बसल्यावर ऍटॅक येणे, परदेशात कुठेतरी ऍटॅक येणे असे घडताना दिसते. कुठल्या तरी प्रगत देशात असताना त्रास झाला, तर सेवा उत्तम मिळते; पण बिल येते भारतातील बिलाच्या दसपट आणि कुठल्यातरी लहान देशात गेले असले तर उपचारांची सोय होऊ शकत नाही.

तेव्हा मुळात आपल्याला या अवयवांनी काही सूचना दिल्या तर त्याकडे दुर्लक्ष करणे बरोबर नाही. मी नेहमी म्हणतो, की हिमालयाच्या यात्रेला गेले असता आजारी पडू नये; कारण तेथे काही त्रास सुरू झाल्यास डोंगरात डॉक्‍टर वा वैद्य मिळणे अवघड असते; तसेच तेथे जवळच्या हॉस्पिटलमध्ये न्यायला एक-दोन दिवसही लागू शकतात; पण खूप वेळा काही सूचना न मिळता ऍटॅक येतो. या अचानक येणाऱ्या संकटामुळे लोकांच्या मनात हार्ट ऍटॅकबद्दल धसका असतो.

याच्याच पलीकडे असतो मेंदू. तो तर पूर्वसूचना अजिबात देत नाही. मेंदू म्हणजे आपल्या शरीरातील ब्रह्मसत्ता आहे. मेंदूचे कार्य म्हणजे एखादे गाव चालविण्यासारखे नाही, तर सर्व जग चालविण्यासारखे आहे. मेंदूला फक्‍त आपले शरीर चालवायचे नसते, तर त्याला बाहेरच्या जगाशी संबंध ठेवायचा असतो. मेंदूला काही देणे-घेणे नसते, तो ब्रह्मदेव आहे. ब्रह्मदेव सर्व गोष्टी उत्पन्न करत राहतो, त्याची काहीही अपेक्षा नसते. मेंदूचेही तसेच असते. मेंदू कधीच तक्रार करत नाही. यदाकदाचित त्याने सूचना दिली तर ती चार मिनिटांची असते. चार मिनिटांत सर्व संपते. हृदयाला ऍटॅक आला तर मेंदूला रक्‍त मिळत नाही. ऍटॅक आल्यावर हृदयाला दूान, मसाज वगैरे करण्यासाठी अर्धा तास मिळू शकतो; पण मेंदूचा रक्‍तपुरवठा बंद पडला तर चार मिनिटांत मेंदू खलास होतो. त्यामुळे प्रयत्नांती हृदय सुरू झाले, तरी मेंदूचा मात्र खूपसा भाग निकामी झालेला असू शकतो.

या सर्व कारणांनी हृदयाबद्दल सगळ्याच्या मनात धास्ती असते. हृदय रक्‍ताभिसरण करते; पण मुळात हृदय स्फुल्लिंगाचे (स्पार्क) ठिकाण आहे. त्या स्फुल्लिंगामुळे जे ओज तयार होते त्याची सर्व शरीराला आवश्‍यकता असते. जनित्र (जनरेटर) चालू केले, की एका विशिष्ट क्षणी त्यातून वीज निर्माण होते, दिवे एक क्षणभर बारीक होऊन एकदम लख्ख पेटतात. एका वेळी सगळीकडे वीज जाते.

असेच हृदयाचेही असते. ओज ही हृदयाने तयार केलेली विजेसारखी शक्‍ती आहे. ती एका क्षणात पायाच्या अंगठ्यापासून ते मेंदूपर्यंत सगळीकडे पोचते. ही शक्‍ती आपल्या शरीरात आहे म्हणून आपली सर्व कामे होतात. व्यायाम करून शक्‍ती मिळते असे आपण म्हणतो; पण मुळात व्यायाम करायला मुळात शक्‍ती असणे आवश्‍यक असते. हृदय व फुप्फुसे ही जोडी स्त्री-पुरुषाच्या जोडीसारखी आहे. स्त्री-पुरुषाची जोडी नीट असली, तर जीवनाचा रथ नीट चालतो; तसेच हृदय-फुफ्फुसांची जोडी शरीराला शक्‍ती देण्याचे काम करते.

- डॉ. श्री बालाजी तांबे Ayurveda, healthy Food, Healthy Living, Abstract India, Shree Balaji Tambe, India, Yoga, Meditation, Life Style, Marathi Blog

ad