Showing posts with label आहारशास्त्र - अन्नयोग. Show all posts
Showing posts with label आहारशास्त्र - अन्नयोग. Show all posts

Saturday, December 31, 2011

ऊब आहाराची - 2

डॉ. श्री बालाजी तांबे
भारतीय परंपरेतील सर्व सण-उत्सव, त्या उत्सवांच्या देवता, त्या सणाच्या देवतांना प्रसादरूपात अर्पण करायच्या वस्तू व पक्वान्ने या सर्वांचा हिशेब ऋतुमानाप्रमाणे व प्रकृतिमानाप्रमाणे केलेला असतो. थंडीच्या दिवसांत सूर्यध्यान व्हावे, या हेतूने सूर्याकडे पाहणे, पतंग उडवणे किंवा सूर्यप्रकाशात बसणे हे जेवढे महत्त्वाचे, तेवढेच तिळगूळ खाणे व गुळाची पोळी खाणे हे सणाशी संबंधित ठेवलेले आपण पाहतो. शरद पौर्णिमेला रात्री प्यावयाचे दूध असो, श्रावण महिन्यातील गोपालकाला असो, रामनवमीचा सुंठवडा असो- या सर्वांचा संबंध शरीराच्या तापमानाशी, आरोग्याशी जोडलेला दिसतो.

आ युर्वेद शास्त्राचा एक नियम आहे, की सम गुणांनी वृद्धी होते आणि विरुद्ध गुणांनी क्षय होतो. जसे मनुष्यप्रकृतीचे वात, पित्त, कफ असे स्वभाव असतात, तसेच प्रत्येक वस्तूचेसुद्धा वात, पित्त, कफ असे स्वभाव असतात. मनुष्याच्या प्रकृतीचे उष्ण प्रकृती, शीत प्रकृती असे प्रकार असतात, तसेच वस्तूंमध्ये उष्ण वीर्य, शीत वीर्याच्या वस्तू असतात. त्यामुळेच शरीरात उष्णता वाढावी असे वाटत असेल तर कोणत्या गोष्टींचे सेवन करावे, याचे नियोजन करता येते.

भारतीय परंपरेतील सर्व सण-उत्सव, त्या उत्सवांच्या देवता, त्या सणाच्या देवतांना प्रसादरूपात अर्पण करायच्या वस्तू व पक्वान्ने या सर्वांचा हिशेब ऋतुमानाप्रमाणे व प्रकृतिमानाप्रमाणे केलेला असतो. थंडीच्या दिवसांत सूर्यध्यान व्हावे या हेतूने सूर्याकडे पाहणे, पतंग उडवणे किंवा सूर्यप्रकाशात बसणे हे जेवढे महत्त्वाचे, तेवढेच तिळगूळ खाणे व गुळाची पोळी खाणे हे सणाशी संबंधित ठेवलेले आपण पाहतो. शरद पौर्णिमेला रात्री प्यावयाचे दूध असो, श्रावण महिन्यातील गोपालकाला असो, रामनवमीचा सुंठवडा असो- या सर्वांचा संबंध शरीराच्या तापमानाशी, आरोग्याशी जोडलेला दिसतो.

शीत गुणधर्माच्या वस्तूंमध्ये दुधाचा क्रमांक सर्वांत वरचा आहे. त्याचा रंग पांढरा असतो. वस्तू जसजशा उष्ण वीर्याच्या होत जातील तसतशा त्या लाल रंगाकडे झुकू लागतात. वात प्रकृतीच्या वस्तू निळ्या, काळ्या, गडद रंगाच्या असतात. जांभळ्या वा बैंगनी रंगाचे वांगे वातकारक आहे, असे वेगळे सांगावे लागत नाही. गडद हिरव्या रंगाचे वाटाणेही वातवृद्धी करतात. शीत गुणाच्या वस्तू मऊसर असतात व त्यात जलतत्त्वाचे प्रमाण अधिक असते.

वात गुणाच्या वस्तू कठीण, पोकळ व रसभाव कमी असलेल्या असतात. सिमला मिरची पोकळ असते व त्यातील बिया खुळखुळ वाजू शकतात, तिच्यावर आकाशतत्त्वाचा व वायुतत्त्वाचा प्रभाव अधिक असतो. लाल रंगाचे टोमॅटो, बीट, चिंच वगैरे द्रव्ये उष्ण स्वभावाची व पित्तकर असतात. गडद रंगाचा गहू पित्तकर असला तरी त्याचे पीठ केल्यावर त्याचा पित्तगुण कमी होतो व कफभाव वाढतो. गव्हापासून बनविलेला मैदा अतिसूक्ष्म असल्याने तो अधिक जागा व्यापतो, म्हणजे तो आकाशतत्त्वाशी जवळीक करतो, त्यामुळे वात वाढवतो. घडीच्या पोळीला पापुद्रे असणे इष्ट असले तरी ते पापुद्रे एकमेकांच्या जवळ असतात, जेणेकरून पोळी शरीराला पुष्ट करेल, पण वात वाढवणार नाही. रुमाली रोटी मैद्याची बनवलेली असते व ती बनवताना आकाशाकडे फेकून, तिला गती देऊन पातळ केलेली असल्याने ती पचायला जड असून वातकारक असते, हे सहज लक्षात येते. एखादे आंबट फळ उष्णता वाढविणारे व पित्तकर असू शकते, पण तेच फळ वाफवून शिजवल्यावर त्यात रसतत्त्व वाढल्यामुळे व मऊ झाल्यामुळे त्याचा पित्त गुण कमी होऊ शकतो. वस्तूचा स्वभाव व त्यांची पाककृती यांची विशेष योजना करून "आयुर्वेदिक अन्नयोगा'ची योजना केलेली असते. यामुळे पदार्थ पचनाला सोपे- हलके होतात.

"ऊब आहाराची" या विषयाचा विचार करत असताना आयुर्वेदिक अन्नयोगाचा विचार करून पदार्थ तयार केले तर थंडीला तोंड देणे सोपे होऊ शकते. त्याउलट चव व नावीन्य या नावाखाली कुठल्यातरी चार-पाच वस्तू एकत्र करून तयार केलेली पाककृती वाढताना आकर्षक दिसण्यासाठी त्यावर विशेष मेहनत घेण्यावर भर दिल्यास त्या वस्तू अन्नयोग संकल्पनेपासून दूर जाऊ शकतात.

आलेपाक, हळिवाचे लाडू, डिंकाचे लाडू, केळ्यावर मध घालून तयार केलेले पक्वान्न, केळ्यावर मध, लिंबू व साखर घालून तयार केलेले पक्वान्न, सुक्‍या मेव्यात तूप व इतर द्रव्ये घालून तयार केलेले पक्वान्न वगैरे अन्नयोगात सुचविलेल्या पाककृती पाहिल्या तर आरोग्याचा किती सुंदर विचार केलेला आहे, हे समजते.
---- Ayurveda, Vastu shastra, healthy Food, Healthy Living, Abstract India, Shree Balaji Tambe, India, Yoga, Meditation, Life Style, Marathi Blog, Marriages, Love

Wednesday, April 29, 2009

आयुर्वेदाचे आहारशास्त्र - अन्नयोग

आयुर्वेदात आहाराविषयी अतिशय परिपूर्ण असे मार्गदर्शन केलेले आढळते. आहार प्रकृतीनुरूप असावा ही आयुर्वेदाची मुख्य संकल्पना. अर्थात, ही अंमलात आणायची तर त्यासाठी स्वतःची प्रकृती माहीत असायला हवी व आहारातील प्रत्येक वस्तूचे गुण-दोष कळायला हवेत. रोजच्या जेवणात असायलाच हव्या अशा गहू, तांदूळ, मूग-तूरीपासून ते भाज्या, फळे, दूध, ताक वगैरे सर्व पदार्थांचे गुण, त्यांचा स्वभाव, त्यांचा दोषांवर होणारा परिणाम या सर्वांचे आयुर्वेदात विस्तृतपणे वर्णन केलेले आढळते.
आयुर्वेदाच्या अनेक ग्रंथांमध्ये "पाककृती' समजावल्या आहेत.
पाककृती ज्या घटकद्रव्यांपासून बनलेली असते त्यांचे आपापले स्वतंत्र गुणधर्म असतात पण त्यांचा संयोग झाल्यामुळे व पाककृती तयार करताना केल्या जाणाऱ्या संस्कारांमुळे तयार पदार्थांचे गुणधर्म विशेष असू शकतात. म्हणूनच पाककृती बनवताना कोणती घटकद्रव्ये कशा प्रकारे, किती प्रमाणात मिसळावीत या सर्वांचे एक शास्त्र असते. आयुर्वेदिक पाककृतींमध्ये याला खूप महत्त्व दिलेले आढळते. उदाहरणादाखल काही ग्रंथोक्‍त पाककृती याप्रमाणे सांगता येतील.
मोहनभोग
निघण्टुरत्नाकरात मोहनभोग या नावाची एक पाककृती दिलेली आहे. यात तूप, रवा, दूध, साखर ही मुख्य द्रव्ये आहेत. यांचे स्वतंत्र गुणधर्म असे होत.
तूप - शक्‍तिवर्धक, श्रमांचा परिहार करणारे, वात-पित्तशामक, शरीराची कांती वाढविणारे, शरीराला दृढ करणारे, वीर्यवर्धक.
गव्हाचा रवा - गहू हे स्निग्ध, धातुवर्धक, पौष्टिक व बलकारक असतात. पण पचयाला थोडे जड व कफकारक असतात. गव्हापासून तयार केलेल्या रव्यात गव्हाचे बाकीचे गुण आले तरी जडपणा व कफ वाढण्याची प्रवृत्ती कमी झालेली असते.
दूध - शीत गुणाचे, स्निग्धता देणारे, एकंदर जीवनशक्‍ती वाढविणारे, वात-पित्तशामक व बलवर्धक.
साखर - वात-पित्तशामक, शीत गुणाची, वीर्यशक्‍ती वाढविणारी, चक्कर व थकवा यांना दूर करणारी, दाह कमी करणारी.
मोहनभोगाची ग्रंथात सांगितलेली पाककृती अशी - तूप ताजे कढवावे व त्यात समप्रमाणात गव्हाचा बारीक रवा घालून पळीने ढवळावा. त्यात तुपाइतकेच दूध थोडे थोडे शिंपावे. रव्यामध्ये दूध जिरले व तूप सुटू लागले की रव्याइतकी साखर घालावी तसेच वेलची, लवंग, मिरे यांचे चूर्ण मिसळून नीट एकजीव झाले की विस्तवावरून खाली उतरावे.
तयार झालेल्या मोहनभोगाचे गुण पुढीलप्रमाणे सांगितलेले आहेत.
बल्यो वृष्यो गुरुः स्निग्धः कफकृत्‌ धातुवर्धनः ।
रसे पाके च मधुरो वातपित्तविनाशनः ।।
मोहनभोग ताकद वाढवतो, शुक्रधातूची शक्‍ती वाढवतो, पचायला जड, कफ करणारा असतो. स्निग्धता देतो. धातू वाढवतो, चवीला व विपाकाने मधुर असतो, तसेच वात-पित्तदोषांचे शमन करतो.
रसालाशिखरिणी
श्रीखंड या पक्वान्नाला आयुर्वेदात "रसालाशिखरिणी' म्हटलेले आहे. यामध्ये पाणी निथळून गेलेले दही म्हणजे चक्का, मध, तूप, साखर, दालचिनी, नागकेशर, वेलची, तमालपत्र, मिरे, सुंठ ही घटकद्रव्ये असतात. यांचे गुण पुढील प्रमाणे आहेत.
दही - कफवर्धक, पचायला जड, वातशामक, शरीराला स्निग्धता देणारे, पुष्टिकर.
मध - कफदोषशामक, पचायला हलके, आवाज सुधारणारे, प्रमाणापेक्षा अधिक असणाऱ्या मेदाला कमी करणारे, रुचकर, रुक्ष.
तूप - शक्‍तिवर्धक, श्रमांचा परिहार करणारे, वात-पित्तशामक, शरीराची कांती वाढविणारे, शरीराला दृढ करणारे, वीर्यवर्धक.
साखर - वात-पित्तशामक, शीत गुणाची, वीर्यशक्‍ती वाढविणारी, चक्कर व थकवा यांना दूर करणारी, दाह कमी करणारी.
दालचिनी, नागकेशर, वेलची व तमालपत्र ही चार द्रव्ये मिळून "चातुर्जात' गण तयार होतो. हा कफनाशक, रुचवर्धक, आमपाचक असा असतो.
मिरे व सुंठ - हे दोघेही चवीला तिखट, अग्निवर्धक, पाचक व कफनाशक असतात.
रसालाशिखरिणी बनविण्याची पद्धत
पाणी निथळून गेलेल्या दह्याच्या निम्म्या प्रमाणात साखर घ्यावी. मध व तूप साखरेच्या एक सोळांश प्रमाणात घ्यावा. चातुर्जातगणाची चारही द्रव्ये मधाच्या एक अष्टमांश प्रमाणात घ्यावीत तर मिरपूड व सुंठ मधाइतकीच घ्यावी.
हे सर्व एकत्र करावे, कापराच्या सुगंधाने सुवासिक केलेल्या भांड्यावर सुती स्वच्छ कापड बांधावे व त्यावर हळू हळू घासावे.
गुण - वातपित्तशामक, शुक्रवर्धक, बलवर्धक, रुचकर, स्निग्ध, पुष्टिकर, कांतिवर्घक
हे गुण पाहिले असता लक्षात येते की दही जरी कफ वाढविणारे असले तरी त्याबरोबरीने अशा पदार्थांची योजना केलेली आहे की त्यामुळे श्रीखंड कफवर्धक ठरत नाही. दह्यातील इतर गुण मात्र वृद्धिंगत होतात
- डॉ. श्री. बालाजी तांबे

ad