Showing posts with label किचन. Show all posts
Showing posts with label किचन. Show all posts

Sunday, October 31, 2010

वास्तुप्रथा : किचन (भाग ४) - शेगडीची मांडणी

संजय पाटील
पूर्वा, रोहिणी, पुष्य, तिन्ही उत्तरा, अश्विनी यापैकी नक्षत्रात आणि शुक्रवार, गुरुवार व बुधवार यापैकी दिवशी शेगडीची स्थापना करावी. शेगडी ज्या वारी बसवता त्याप्रमाणेफळं मिळतील.
 शुक्रवार     - अन्नधान्याची प्राप्ती
 गुरुवार    - लक्ष्मीप्राप्ती
 बुधवार    - लाभ
 शनिवार     - दारिद्रय़
 मंगळवार    - स्त्रीनाश
 सोमवार    - धननाश
 रविवार    - आजारपण
किचनमध्ये सर्वात महत्त्वाची असते शेगडी. शेगडी अंतरिक्षपदात ठेवावी, असं मयमतमनं नेमकेपणानं सांगितलंय. अंतरिक्षपद (नभ) कुठे येतो ते एकाशितीपद वास्तुमंडळाची आकृती बघितल्यानंतर तुमच्या लक्षात येईल. (वास्तुमंडळ समजून घेण्यासाठी दि. २९मे २०१० चा वास्तुरंगचा अंक पाहावा.)
(संदर्भ- अंतरिक्षे भवेचुल्ली सत्यके स्यादुखुलम- मयमतम अध्याय २७, श्लोक १००)
जर किचन आग्नेयेलाच असेल तर संपूर्ण घराचं वास्तुमंडळ गृहीत धरून हे पद काढावं. मात्र जर किचन अन्य दिशांत असेल तर फक्त किचनच्या रूमसाठी वास्तुपदमंडळ आखून त्याप्रमाणे अंतरिक्षपद(नभ) काढावं. (आकृती १ पाहा)

किचन ईशान्येत असेल तर मात्र शेगडी किचनच्या अंतरिक्षपदात न ठेवता शिखी किंवा पर्जन्य या पदात ठेवावी. किचन वायव्येला असेल तर शेगडी रोगपदात ठेवावी.
फेंगशुईत शेगडीच्या नॉबची दिशा गृहस्वामीच्या सर्वोत्तम दिशेत ठेवावी असा नियम आहे. गॅस थोडा तिरका बसवून ही सर्वोत्तम दिशा साधता येत असेल तर जरूर करावं. याचे रिझल्ट फार चांगले मिळतात असा प्रॅक्टिकल अनुभव आहे.
सर्वोत्तम दिशा काढण्याचा फॉम्र्युला सांगतो. सोप्पं आहे. जन्मतारखेच्या सालाची बेरीज करा. तिचं रुपांतर एक आकडी संख्येत करा. ही एक आकडी संख्या ११ तून वजा करा. राहिलेली बाकी म्हणजे कुआ नंबर. उदाहरण देतो. जयेश आणि जयश्री हे जुळे भाऊ-बहिण आहेत.   जन्मतारीख आहे २६.०५.१९६९. पहिल्यांदा जयेशचा कुआ नंबर काढुया.  तारखेतील फक्त सालाची चार आकडी संख्या घेऊन त्या सर्व आकडय़ांची बेरीज  करा. ती येईल २५. आता २५ चं रुपांतर सिंगल आकडय़ात करायचं म्हणजे,  २+५=७ .  आता ११ मधून ७ वजा करा. बाकी राहील ४. म्हणजे जयेशचा कुआ नंबर आला ४.
महिलांचा कुआ नंबर काढण्याची पध्दत थोडी वेगळी आहे. आता जयश्रीचा कुआ नंबर कसा काढायचा ते पाहू. तिच्याही जन्मसालाची बेरीज करा. ती येईल ७. आता ही बेरील ४ मध्ये मिळवा. आणि उत्तराचं रुपांतर करा एक आकडी संख्येत. म्हणजे ७+४=११, १+१=२. म्हणजे जयश्रीचा कुआ नंबर आला २. जेव्हा  कुआ नंबर ५ येतो तेव्हा तो पुरुषांसाठी २ पकडावा आणि महिलांसाठी ८ पकडावा.
मात्र चायनीज वर्ष जानेवारी किंवा फेब्रुवारीपासून सुरू होत असल्यानं या महिन्यात जन्म झालेल्यांचा कुआ नंबर काढताना गडबड होऊ शकते. समजा हेतलची जन्मतारीख २९ जानेवारी १९७० अशी  आहे. पण त्या वर्षी चायनीज वर्ष ५ फेब्रुवारीला सुरू झालं. त्यामुळे कुआ नंबरच्या गणितासाठी हेतलचं जन्मवर्ष १९६९ घ्यावं लागेल.  जानेवारी व  फेब्रुवारी या दरम्यान जन्म असणाऱ्यांनी चायनीज कॅलेंडर रेफर करावं किंवा मला मेल पाठवावा.
 प्रत्येक कुआ नंबरसाठी चार दिशा शुभ असतात तर चार अशुभ. सोबतचा तक्ता पाहा. प्रत्येक कुआ नंबरच्या शुभ दिशा उतरत्या क्रमानं त्यात दिल्यायत.
घरातील कर्त्यां पुरुषाच्या शुभ दिशेकडे  शेगडीचे नॉब जातील अशाप्रकारे  शेगडी ठेवता आलं तर पाहावं. खूप चांगले परिणाम मिळतात.  उदाहरण देतो. अजयची जन्मतारीख आहे ६ जून १९६५. त्याचं किचन आहे घराच्या ईशान्येला. त्याचा कुआ नंबर येईल ८. या कुआ नंबरची सर्वोत्तम दिशा आहे नैऋत्य. जेव्हा किचन ईशान्येला असतं त्यावेळी शेगडी अग्नी किंवा पर्जन्य पदात ठेवावी लागते हा नियम आहे. या केसमध्ये मी  शेगडी अग्नी पदात तिरकी ठेवेन म्हणजे   तिचे नॉब नैऋत्येकडे जातील. (आकृती २ पाहा.)
शेगडी कोणत्या दिवशी स्थापन करावी यासाठी नियम आहे. तो पुढीलप्रमाणं..
        पूर्वाद्रारोहिणी पुष्ये उत्तरात्रितयेश्चिमे
        स्थितिर्महानसस्येष्टा गृहोपस्करण: सह
        शनिवारे दरिद्रत्व शुक्रन्नं धनमेव च
        गुरुवारे लभलक्ष्मीर्बुधे लाभोभवेसदा
        भौमवारे मृतिर्नार्या: सोमे धनक्षयो भवेत्
        रविवारे भवेद्रोगी चुल्लोस्थापनकर्मणि
             (मुहूर्त प्रकाश)
अर्थात.. पूर्वा, रोहिणी, पुष्य, तिन्ही उत्तरा, अश्विनी यापैकी नक्षत्रात आणि शुक्रवार, गुरुवार व बुधवार यापैकी दिवशी शेगडीची स्थापना करावी.
  शुक्रवारी शेगडी बसवल्यास अन्नधान्याची प्राप्ती, गुरुवारी लक्ष्मीप्राप्ती व बुधवारी लाभ अशी फळं मिळतील. शनिवारी शेगडी बसवल्यास दारिद्रय़, मंगळवारी स्त्रीनाश, सोमवारी धननाश, रविवारी आजारपण अशी फळं मिळतील.
शेगडीच्या  बर्नरची संख्या विषम असावी. मयमतमच्या २७व्या अध्यायातील हा श्लोक पाहा-
    इद्वग्निभूतमुनिनन्दकरुद्र संख्याशूल्यो।
    नृणाममरधाम्नि समासमा: स्यु:।।
    सर्वा: सुरावनिसुरावनिपेषु योग्या:।
    शेषेषु तत्तदुदिताश्च मता यमीन्द्रे: ।।१०४।।
             (मयमतम)
अर्थात.. चुलींची संख्या विषम असावी.
मॉडर्न जमान्यात चुली हद्दपार झाल्यायत. त्यामुळे शेगडीचा एक बर्नर म्हणजे एक चूल असं समजावं. हल्ली सरसकट चार नॉबचं हब वापरलं जातं. ते एक्सेंज करून तीन बर्नरची शेगडी तुम्हाला आणावी लागेल. ते शक्यच नसेल तर एक बर्नरची दुसरी शेगडी किंवा क्लीक्सचा गॅस बाजूला ठेवावा लागेल जेणेकरून बर्नरची संख्या  होईल पाच.
 लॉफ्ट किंवा बीमच्या खाली शेगडी येऊ नये. चिमणी बीमसदृश्य परिणाम देते. म्हणून शक्यतो टाळावी. वायुविजनाचा टोकाचा प्रॉब्लेम असेल तरच चिमणी लावा. येऊ द्या ना घरभर अन्न शिजवण्याचा झमझमीत वास. घरात अन्नाचा वास नको असेल तर कसला हवा.. टॉयलेटचा?   वायुविजनाची कसलीच समस्या नसताना फक्त विशिष्ट शेजाऱ्याच्या   घरात वास जाईल याच्या काळजीनं चिमणी बसवणारे मी अनेकजण पाहिलेयत.   अतिचांगुलपणाही वाईटच नाही का?  भांडल्यासारख्या आवाजात हा विशिष्ट शेजारी गप्पा मारतो किंवा दरवाजा सताड उघडा ठेवून जोरजोरात टीव्ही लावतो, तेव्हा  तुमचा विचार करत नसेल तर तुमचा चांगुलपणा अनाठायीच नाही का ?
सेकंड हँड शेगडी वापरू नये. कुणावर परिस्थितीच्या रेटय़ामुळे भांडीकुंडी विकण्याची वेळ आली तर अशा ठिकाणी जाऊन शेगडी व तिजोरी या दोन गोष्टींची खरेदी कदापि  करू नये. (क्रमश:)

इलेक्ट्रोमॅग्नेटिक रेडिएशन (मायक्रोवेव्ह) यांचा वापर करून स्वयंपाक शिजवू नये, असं माझे गुरू आणि अमेरिकेतील बाऊ बायोलॉजीचे प्रणेते आर्किटेक्ट हेल्मुट झीई मला नेहमी सांगत. गॅस किंवा लाकूड-कोळशासारखे इंधन यांचाच वापर अन्न शिजवण्यासाठी करावा. डाव्या बाजूचं सफरचंद गॅसवर तर उजव्या बाजूचं मायक्रोवेव्हमध्ये शिजवण्यात आलंय. नंतर किरलीन कॅमेऱ्याच्या साहाय्यानं त्यांची ऑरा फोटोग्राफी केली असता असे परिणाम मिळाले. गॅसवर शिजवलेल्या पदार्थाचा ऑरा निकोप होता तर मायक्रोवेव्हमध्ये शिजवलेल्या पदार्थाचा ऑरा डागाळलेला होता. पुण्याच्या एमआयटीत ऑरा फोटोग्राफिची सोय आहे.

---- Ayurveda, Vastu shastra, healthy Food, Healthy Living, Abstract India, Shree Balaji Tambe, India, Yoga, Meditation, Life Style, Marathi Blog

Monday, October 25, 2010

वास्तुप्रथा ४३ : किचन ओटय़ाची रचना (भाग ३)



sanjuspatil@hotmail.com 
ओटय़ांची विभागणी आपल्या सोयीसाठी अशी करता येईल. ज्या ओटय़ावर पिण्याचं पाणी, सिंक यांची योजना असते तो वॉटर प्लॅटफॉर्म. ज्या ओटयावर मिक्सर, ज्युसर, गाइंडर, ओव्हन अशी इलेक्ट्रिकल उपकणं ठेवली जातात ते वर्क स्टेशन किंवा स्टोरेज प्लॅटफॉर्म. आणि ज्या ओटय़ावर शेगडी ठेवली जाते तो मुख्य प्लॅटफॉर्म.
किचनसाठी आग्नेय ही दिशा प्रमुख असली तरी ईशान्य, वायव्य, नैर्ऋत्य, पूर्व आणि उत्तर या दिशाही चालतात हे मागील भागात आपण पाहिलं.  आता किचनची अंतर्गत मांडणी ढोबळमानानं पाहू.

प्रथम आग्नेयेच्या किचनकडे वळू. या किचनमध्ये सी शेप, एल शेप किंवा सिंगल अशा तिनही प्रकारे  जागेच्या उपलब्धतेनुसार ओटय़ाची रचना करता येईल. ओटा सी शेप असेल तर उत्तरभिंतीवरील ओटय़ाचा वापर वॉटर प्लॅटफॉर्म म्हणून करावा. म्हणजे सिंक व पिण्याच्या पाण्याची योजना या ओटय़ावर करावी. दक्षिण भिंतीवरील ओटा  स्टोरेज प्लॅटफॉर्म असेल. त्याचा वापर वर्क स्टेशन  म्हणून करावा. तेथे आग्नेय कोपऱ्याकडे सरकवून मिक्सर, ओव्हन व तत्सम इलेक्ट्रॉनिक उपकरणं ठेवावीत.   पूर्वेकडील ओटा हा मुख्य प्लॅटफॉर्म असेल. त्यावर शेगडी ठेवावी. भाजी चिरणं, कापणं, पीठ मळणं वगैरे स्वयंपाकाची पूर्वतयारी म्हणून केल्या जाणाऱ्या गोष्टी शक्यतो याच ओटय़ावर कराव्यात.  (आकृती १ पाहा)

एल शेप प्लॅटफॉर्म बनवण्याइतकीच जागा असेल तर उत्तर भिंतीलगत व पूर्व भिंतीलगत ओटा बनवावा.   या केसमध्ये पूर्व भिंतीच्या ओटय़ाचा वापर (मुख्य प्लॅटफॉर्म) शेगडीसाठी आणि वर्क स्टेशन म्हणून करावा तर उत्तर भिंतीलगतच्या ओटय़ाचा वापर (वॉटर प्लॅटफॉर्म) वरीलप्रमाणेच सिंक व पाण्यासाठी करावा. (आकृती २ पाहा) सिंगल ओटा करण्याइतकीच जागा असेल तर  एकाच ओटय़ाचा वापर वॉटर प्लॅटफॉर्म, स्टोरेज व मुख्य प्लॅटफॉर्म म्हणून करावा लागेल. . या केसमध्ये सिंक अगदी इशान्येच्या कोपऱ्यात न घेता थोडं अंतर ठेवून घ्यावी. अगदी डाव्या कोपऱ्याचा वापर पिण्याचं पाणी ठेवण्यासाठी किंवा वॉटर प्युरिफायर लावण्यासाठी े करावा.  या केसमध्ये शेगडी व सिंक यातील अंतर कमी होतं. म्हणून या दोघांमध्ये लाकडाची एखादी वस्तु म्हणजे पोळपाट-लाटणं वगैरे आवर्जून ठेवावी.  त्यानंतर शेगडी ठेवावी. उजव्या बाजूच्या कोपऱ्याचा वापर मिक्सर आदी ठेवण्यासाठी करावा. (आकृती ३ पाहा) किचनसाठी लागणारं स्टोरेज दक्षिण किंवा पश्चिमेला करावं. उत्तरेला स्टोरेज करायचंच असेल तर अगदी गरजेपुरतं करावं.  किचनला लागणारे मसाले व अन्य पदार्थाची साठवण आग्नेय व दक्षिणेकडे करावे. क्रोकरी व काचेच्या भांडय़ांची मांडणी उत्तरेत करावी.
किचन आग्नेय, पूर्व, उत्तर, पश्चिम या दिशांत असेल तर वर दिलेल्या रचना सर्वसाधारणपणे वापरता येतील. मात्र किचन वायव्येत किंवा इशान्येत असताना अशी रचना करणं साफ चुकीचं ठरेल कारण वायव्येच्या किचनमध्ये शेगडी रोगपदात तर ईशान्येत असताना शेगडी  पर्जन्य वा अग्नी या पदात ठेवावी लागते.
वायव्य (आकृती ४ ) व इशान्य (आकृती ५) दिशेतील किचनच्या आकृत्या सोबत दिल्या आहेत. वायव्य दिशेत सी शेप प्लॅटफॉर्म असेल तर पश्चिम भिंतीवरील ओटय़ाचा वापर स्टोरेज प्लॅटफॉर्म म्हणून, उत्तर भिंतीवरील ओट्याचा वापर मुख्य प्लॅटफार्म म्हणून  तर पूर्व भिंतीवरील ओटय़ाचा वापर वॉटर प्लॅटफॉर्म म्हणून करावा. शेगडी आकृतीत दाखविल्याप्रमाणे कोपऱ्यात म्हणजे रोगपदात ठेवावी.
किचन ईशान्येत असेल तेव्हा मुख्य ओटा पूर्वेकडे किंवा उत्तरेकडे घेता येईल. मात्र शेगडी ईशान्येच्या  अगदी कोपऱ्यात म्हणजे अग्नी या पदात किंवा पूर्व -ईशान्येला कोपऱ्यापासून थोडं अंतर ठेवून म्हणजे पर्जन्य या पदात ठेवता येईल.
किचन आग्नेयेत किंवा नैर्ऋत्येतअसेल तर मुख्य प्लॅटफॉर्म पूर्वेकडे ठेवावं.  किचन वायव्येत असेल तर मुख्य प्लॅटफॉर्म उत्तरेकडे ठेवावं. किचन उत्तरेत किंवा ईशान्येत  असेल तर मुख्य प्लॅटफॉर्म उत्तरेकडे किंवा पूर्वेकडे ठेवता येईल.
प्लॅटफॉर्मसाठी ग्रॅनाईटचा वापर करणं शक्यतो टाळावं. ग्रॅनाईट आरोग्याला चांगलं नसल्याचं मॉडर्न सायन्स सांगतं. मार्बल किंवा अन्य नॅचरल स्टोन वापरावेत. रंग त्या त्या दिशेतील कारकत्वाप्रमाणे निवडावा. म्हणजे -
* आग्नेयेचं किचन असेल तर हिरवा मार्बल किंवा यलो जैसलमेर
* पूर्वेच्या किचनसाठी हिरवा मार्बल
* ईशान्येच्या-उत्तरेच्या किचनसाठी पांढरा मार्बल
* वायव्येच्या किचनसाठी करडय़ा रंगाचा कोटा किंवा इटालियन मार्बल
* पश्चिमेच्या किचनसाठी पिवळा जैसलमेर
* नैऋत्य व दक्षिणेच्या किचनसाठी पिवळा जैसलमेर किंवा गुलाबी मार्बल.  क्रमश:

आठवडय़ाची टिप
हा विस्मयकारी उपाय आहे. क्रिस्टल बाऊल ज्या कोपऱ्यात ठेवाल तेथील गुण वृध्दींगत करेल. मात्र तो रिकामा असावा आणि ओपन असावा. म्हणजे त्याच्या आत काही ठेवू नये.  आणि त्याच्यावर वरून  काही नसावं.  तो कपाटात ठेवू नये. तीनचार शेल्फची रॅक असेल तर मधल्या शेल्फवर न ठेवता अगदी वरच्या शेल्फवर ठेवावा. नैऋत्य कोपऱ्यात तो ठेवल्यास नातेसंबंधात मोकळेपणा येतो. आग्नेय कोपऱ्यात ठेवल्यास लक्ष्मी आकर्षित करतो. ईशान्य कोपऱ्यात ठेवल्यास ज्ञानार्जनात फायदा होतो. वायव्य कोपऱ्यात ठेवल्यास मित्रांकडून मदत मिळते, भागीदारीत यश मिळतं. मात्र बाऊल क्रिस्टलचाच असावा. क्रिस्टल सदृश्य काचेचा चालणार नाही.


    ---- Ayurveda, Vastu shastra, healthy Food, Healthy Living, Abstract India, Shree Balaji Tambe, India, Yoga, Meditation, Life Style, Marathi Blog

    Monday, October 18, 2010

    वास्तुप्रथा- : किचन अंन्य़ दिशांतही चालतं 2





    sanjuspatil@hotmail.com This e-mail address is being protected from spambots. You need JavaScript enabled to view it
    किचन आग्नेयेला असावं हे एका ओळीचं ज्ञान मला वाटतं शंभर टक्के वाचकांना आहे. थोडा ग्रंथांचाही सपोर्ट घेऊया.
    पूर्वस्या भोजनस्थानमाग्नेया तु महानसम।
    (कामिका आगम)
    स्नानस्य पाकशयनास्त्रभुजेश्च
    धान्यभाण्डारदैवत गृहाणिच पूर्वत: स्यू
    (विश्वकर्मा विद्याप्रकाश)
    अंतरिक्षे भवेचुल्ली सत्यके स्यादुलूखलम
    (मयमतम)
    ऐशान्या देवगृहं महानसं चापि कार्यमाग्नेय्याम
    (बृहत्संहिता)
    पूषाश्रितंभोजनमंदिरंचमहानसं वान्हीदिशाविभोग
    (राजवल्लभ)
    पूर्वस्यां श्री गृहं प्रोक्तमाग्नेय्यां स्यान्महानसम
    (बृहद्वास्तुमाला)
    आग्नेया पाकसदनं
    (विश्वकर्मा प्रकाश)
    अर्थात.. प्रत्येक ग्रंथात किचनसाठी प्रथम प्राधान्य आग्नेयेला देण्यात आलंय, पण याचा अर्थ असा अजिबात नव्हे की, अन्य दिशांचं ग्रंथकारांना वावडं होतं. विशेष म्हणजे आग्नेयेशिवाय अन्य दिशांतही किचन चालतं, असं सांगणारे ग्रंथ हे प्रमुख ग्रंथ आहेत.
           ग्रंथकार काय म्हणतात?
    वास्तुशास्त्रातील सर्वात महत्त्वाचा ग्रंथ ‘मयमतम’  काय म्हणतोय ते प्रथम पाहू. या ग्रंथातील २७व्या अध्यायातील १००वा श्लोक असा-
               ऐशान्या पचनस्थानं सर्वेषा देहिं हितम्।
    अर्थात.. ईशान्येतील स्वयंपाकघर सर्वासाठी (चारही वर्णासाठी) चांगलं.
    ‘मानसारम’ या ग्रंथात ३६व्या अध्यायातील १३वा श्लोक असा-
                उत्तरेशानपर्जन्ये सर्वेषा पचनालयम।।
    अर्थात.. स्वयंपाकघरासाठी उत्तर, ईशान्य व विशेषत: ईशान्येतील पर्जन्य कप्पा प्रशस्त होय.
    ‘मनुष्यालय चंद्रिका’ या ग्रंथातील एक श्लोक असा-
       पर्जन्ये पचनालयं शिखिनि वा मेषे वृषे वानिले
               (अध्याय ७ श्लोक २६)
    अर्थात.. किचन ईशान्येचा पर्जन्य व शिखी (अग्नी) किंवा वायव्य कोपऱ्यात किंवा मेष व वृषभ राशीत ठेवता येईल. मेष व वृषभ राशीचा विस्तार पूर्वेच्या जयंत ते भृष पदापर्यंत असतो. म्हणजेच किचन ईशान्येत, वायव्येत किंवा पूर्वेत ठेवता येईल, असं मनुष्यालय चंद्रिकाचं मत आहे. (आकृती १ पाहा)
    ‘कामिका आगम’ या ग्रंथानं याच्याही पुढे जाऊन चारही उपदिशेत किचन ठेवता येतं, असा विचार मांडलाय. कोणत्या दिशेत कोणत्या वर्णासाठी किचन ठेवणं  लाभदायक याचा सूक्ष्म विचार याच ग्रंथानं केलाय. तो श्लोक असा:
             ऐशान्या पचनस्थानं ब्राह्मणानां विधीयते।
             आग्नेयां पचनस्थानं क्षत्रियाणां प्रशस्यते।।
             नैर्ऋत्यां पचनस्थानं वैश्यानां तु प्रशस्यते।
    वायव्यां पचनस्थानं शूद्राणां संप्रशस्यते।।
    अर्थात.. ईशान्येतील किचन ब्राह्मणांसाठी (बुद्धिजीवी वर्गासाठी) लाभप्रद ठरतं. आग्नेयेचं किचन क्षत्रियांसाठी (राज्यकर्ते, शासक, राजकारणी, पुढारी, पोलीस अधिकारी, महसूल अधिकारी, सरकारी अधिकारी, सैनिक वगैरे) लाभप्रद असतं. नैर्ऋत्येचं किचन व्यापारीवर्गासाठी तर वायव्येचं किचन चतुर्थ श्रेणीचं (लेबर क्लास) काम करणाऱ्यांसाठी लाभप्रद ठरतं.
    थोडक्यात काय तर किचनसाठी आग्नेय ही दिशा प्रमुख असली तरी ईशान्य, वायव्य, नैर्ऋत्य, पूर्व आणि उत्तर या दिशाही चालतात. (आकृती २ पाहा) आशा करतो की, या लेखामुळे फ्लॅट संस्कृतीत राहणाऱ्या वाचकांना दिलासा मिळाला असेल.
    पश्चिम व दक्षिण दिशांत किचन चालतं, असं सागणारे किंवा या दिशेतील किचनचा निषेध करणारे संदर्भ मला अद्याप  सापडले नाहीत. त्यामुळे सध्या तरी त्यावर भाष्य करणार नाही. (फेंगशुईत दक्षिण ही दिशा अग्नी तत्त्वाची सांगितलेय. त्यामुळे किचन दक्षिणेलाच असावं असं फेंगशुई म्हणते. विशेषत हॉटेलचं किचन दक्षिणेला असेल तर ते हॉटेल खाद्यपदार्थाच्या चवीमुळे नावारूपाला येते अशी धारणा चीनमध्ये आहे.)
    आग्नेयेला किचनचं महत्त्व थोडंसं जास्त असलं तर याचं कारण फक्त इतकंच आहे की त्यामुळे अग्नी तत्त्वात अग्नी वसवला जातो. एकदा किचन आग्नेयेत आलं की तेथे टॉयलेट येणार नाही. अर्थात आग्नेय भ्रष्ट होणार नाही. पण फक्त अग्नी तत्त्वात अग्नी आणण्यासाठी तेथे किचनच असायला हवं अशी गरज अजिबात नाही. त्रिकोणी पोवळं, ऱ्हीं बीज पिरॅमिड, तीन मुखी रुद्राक्ष, तांबं, रेडय़ाची प्रतिमा, स्त्रुवा (अग्निदेवाचं शस्त्र), तुपानं भरलेली पळी अशा प्रतीकात्मक वस्तूंचा वापर करूनही या कप्प्यात अग्निदेवाचा अंश तयार करता येतो.
    तुम्ही फ्लॅट सिस्टीममध्ये राहत असाल आणि तुमचं किचन आग्नेयेला नसेल तर घाबरू नका, बावरू नका. अर्धवट वास्तुतज्ज्ञांच्या नादी लागून खर्चीक तोडफोड करू नका. लक्षात ठेवा की, किचन हे टॉयलेटसारखं निगेटिव्ह एनर्जीचं स्थान नाही. उत्तर, पूर्व, ईशान्य, वायव्य, नैर्ऋत्य या दिशांतही किचन असणं चांगलं हे ग्रंथांचे दाखले घेत आपण पाहिलंच आहे.  ग्रंथांनी भाष्य न केलेल्या म्हणजे पश्चिम व दक्षिण दिशांतील किचनही तुमचं नुकसान करेल (आय मीन वाट्टोळं करेल) अशी शक्यता नाही, कारण किचन हे निगेटिव्ह एनर्जीचं स्थान नाही.   
    ---- Ayurveda, Vastu shastra, healthy Food, Healthy Living, Abstract India, Shree Balaji Tambe, India, Yoga, Meditation, Life Style, Marathi Blog

    Sunday, October 17, 2010

    वास्तुप्रथा-४१ : किचन अंन्य़ दिशांतही चालतं






    sanjuspatil@hotmail.com This e-mail address is being protected from spambots. You need JavaScript enabled to view it
    माझ्या एका मित्राचा खूप वर्षांनंतर फोन आला. अरे तुझी आठवण आली म्हणून सहज फोन केला.. त्याची कॅसेट सुरू झाली. आठवण आणि सहज हे दोन शब्द संभाषणात आले की मी सावध होतो.  मुळात ज्यांना तुमची आठवण येते ते तुमच्या नेहमीच टचमध्ये असतात.  फार वर्षांनंतर फोन करायची पाळी त्यांच्यावर येत नाही. आणि अशी माणसं सहज फोन तर नक्कीच करीत नाहीत. मित्राचं इकडचं तिकडचं सुरू होतं. माझी वेळ घाईची होती. हा बाबा कधी मुद्दय़ावर येतोय असं मला झालं होतं. शेवटी तो मुद्दय़ावर आला. त्याच्या आत्याच्या  घरी मी जावं अशी इच्छा त्यानं बोलून दाखवली. मी हो ला हो करत सुटका करून घेतली. त्यानंतरच्या दोन चार दिवसात गेल्या १५ वर्षांत केले नसतील इतके फोन त्यानं  केले. हे कमी म्हणून की काय, आत्याबाईंचेही फोन सुरू झाले.  आत्याबाई कोलगेटमध्ये उच्च पदावर काम करीत होत्या. वर्सोव्याला समुद्रकिनारी काही करोड रुपये किमतीचा आलिशान फ्लॅट त्यांनंी खरेदी केला होता. तो बघण्यासाठी मी लवकरात लवकर यावं, अशी त्यांची विनंती होती. बाईंचा सूर चिंतेचा होता. 
    त्यानंतर पंधरवडय़ातच मी चारबंगल्याला माझ्या मैत्रिणीकडे  गणपतीसाठी म्हणून गेलो होतो. नेमका त्याचवेळी आत्याबाईंचा पुन्हा फोन आला.  बाप्पांच्या समोर बसलेला असताना टोलवाटोलवी करणं शक्य नव्हतं. मग तशीच वाट वाकडी करून त्यांच्या घरी गेलो एकदाचा.
    फ्लॅट काळजीपूर्वक बघितला. आणि तो चांगला असल्याचं प्रमाणपत्र देऊन टाकलं. बाईंच्या चेहऱ्यावर आनंद वगैरे पसरणं दूर तो आणखी प्रश्नार्थक झाला.  या बुवाला वास्तुशास्त्रातलं नक्की काही कळतं ना, असे काहीसे भाव त्यांच्या चेहऱ्यावर उमटले.(कुणीही   कुणाचाही चेहरा वाचू शकतं.) त्यांच्या मनात काही तरी घोळतंय हे स्पष्ट दिसत होतं. शेवटी त्यांनी थेट किचनबद्दल विचारलं आणि त्यांच्या चिंतेचा उलगडा झाला. किचन चुकीच्या ठिकाणी आहे का, तोडावं लागेल का, असा प्रश्न त्यांनी केला. त्या फ्लॅटचं किचन ईशान्येला होतं. ईशान्येचं किचन चांगलं, असं ऋषीमुनी सांगतात. मी ऋषीमुनींच्या परंपरेतला अभ्यासक असल्यानं तुमचं किचन उत्तम ठिकाणी आहे, तोडण्याची मुळीच गरज नाही, असं आत्याबाईंना ठामपणं सांगितलं. तेव्हा कुठे  त्यांचा जीव भांडय़ात पडला.
    झालं असं होतं की, कुण्या नवशिक्या वास्तुतज्ज्ञाला त्यांनी कन्सल्टन्सीसाठी बोलावलं होतं. त्या तज्ज्ञानं ईशान्येचं किचन अगदी वाईट. पहिल्यांदा ते तोडा आणि आग्नेयेला घ्या नाही तर तुमचं वाट्टोळं होईल, असं सांगून बाईंना घाबरवून टाकलं होतं. (‘तुमचं वाट्टोळं होईल' हा शब्द परवलीचा बनलाय ज्योतिष, वास्तु आणि विशेषत  कर्मकांडात.  देवांच्या वतीने बोलणारे तथाकथित पंटर ते सर्रास वापरतात. आणि तुम्हीही त्यांना घाबरून जाता. हे चित्रं बघितलं की असं वाटतं की देव म्हणजे कुणी गुंड आहे, आणि तुमच्या हातून पूजा वगैरे करताना बारीकशी चूक राहिली की तुम्हाला शिक्षा करण्यासाठी तो टपून बसलाय. टीव्हीवर एक ज्योतिषी कम वास्तुशास्त्री येतो. इतक्या भितीदायक पध्दतीनं भविष्य सांगतो की विचारू नका. ‘बेटा सो जा नहीं तो गब्बर आएगा' या पुराण्या जमान्यातील डायलॉगऐवजी आधुनिक मातांना ‘बेटा सो जा नहीं तो वास्तुशास्त्री आएगा' असा नविन डायलॉग म्हणावा लागेल.  असो!)
    त्या फ्लॅटची रचना अशी होती की किचन आग्नेयेला घेतलं असतं तर त्या महागडय़ा फ्लॅटची रया जात होती. (आणि नसतं घेतलं तर वाट्टोळं वगैरे पण होणार होतं..) म्हणून आत्याबाई टेन्शनमध्ये होत्या. यानिमित्त वाचकांना पुन्हा सांगतो की, काहीच जमत नाही म्हणून वास्तु कन्सल्टन्सीचं दुकान थाटून बसलेले मुंबईच्या गल्लोगल्ली आहेत. रेल्वे स्टेशनांवर मिळणारी पुस्तकं चाळून, काही तरी तिरपागडे तर्क लढवून काहीबाही सांगणारे लोक हेच. वास्तुशास्त्रावरचा  लोकांचा विश्वास कमी व्हायला कारण हेच. ज्योतिषशास्त्राचं ज्ञान नाही, प्राचीन ग्रंथांना हातही लावलेला नाही, मंत्र-तंत्राची माहिती नाही, अध्यात्माची बैठक नाही, मुहूर्तशास्त्राची माहिती नाही, इंटिरियर डिझायनिंग- आर्किटेक्चरचा गंध नाही तरीही हे वास्तु कन्सल्टन्ट म्हणून मिरवणार. थोडक्यात काय तर, ‘चले मुरारी हीरो बनने’..
    आत्याबाईंकडून त्या तज्ज्ञाचा फोन नंबर घेतला आणि त्याला फोन करून विचारलं की, ईशान्येचं किचन वाईट हे तू कुठून शिकलास? त्यानं सांगितलं की, एका संप्रदायाच्या स्वयंघोषित प्रमुखानं वास्तुशास्त्रावर लिहिलेलं एक पुस्तक विकत मिळतं, त्या पुस्तकात हे लिहिलंय. मला आश्चर्य वाटलं. अध्यात्मात अधिकारी असलेल्या व्यक्तीनं वास्तुशास्त्रात घुसखोरी करण्याचं कारण काय? की विकलं जातंय म्हणून?.. राहवलं नाही म्हणून एक पुस्तक विकत घेतलं. ईशान्येचं किचन वाईट, ताबडतोब तोडून टाका वगैरे.. काहीबाही त्यात लिहिलं होतं. ती व्यक्ती अध्यात्मातली अधिकारी असली तरी वास्तुशास्त्रात कच्ची आहे हे पुस्तक वाचताना लक्षात आलं. दुर्दैवाची गोष्ट अशी की, स्वपुण्याई नसली तरी सद्गुरूंची पुण्याई पाठीशी असल्यानं त्या व्यक्तीच्या शब्दाला किंमत आहे. ते पुस्तक म्हणजे ओव्हर कॉन्फिडन्सचा प्रकार होता. मला अध्यात्मातलं कळतं म्हणजे सर्वच विषयांवर बोलण्यास मी पात्र झालो, असा समज काहींचा होतो. सचिन तेंडुलकर जगातला सर्वोत्तम फलंदाज आहे. पण त्याला असा दर्प झाला की, मी क्रिकेट उत्तम खेळतो म्हणजे कोणताही खेळ उत्तमच खेळेन आणि त्या दर्पातून तो बॉक्सिंगच्या रिंगणात उतरला तर त्याचं जे होईल नेमकं तेच अशांचं होतं. मुळात आपला विषय नसलेल्या गोष्टीवर अधिकारवाणीनं बोलू नये याचंही भान नसलेल्या माणसाच्या आध्यात्मिक उंचीबद्दलच कुणी शंका घेतली तर ती चुकीची आहे, असं कसं म्हणता येईल?
    किचनसाठी आग्नेय ही दिशा प्रमुख असली तरी ईशान्य, वायव्य, नैर्ऋत्य, पूर्व आणि उत्तर या दिशाही चालतात. कशा ते पुढील भागात पाहू. आशा करतो की या लेखांमुळे मध्यमवर्गीय फ्लॅटधारकांना दिलासा मिळेल..                                     (क्रमश)
    ---- Ayurveda, Vastu shastra, healthy Food, Healthy Living, Abstract India, Shree Balaji Tambe, India, Yoga, Meditation, Life Style, Marathi Blog

    ad