Showing posts with label गुढीपाडव. Show all posts
Showing posts with label गुढीपाडव. Show all posts

Monday, March 31, 2014

आरोग्यदायी कडुनिंब

- डॉ. श्री बालाजी तांबे



भारतीय वर्षाच्या पहिल्याच दिवशी कडुनिंबाची पाने, फुले, डहाळी या सर्वांची आवश्‍यकता असते. यावरूनच त्याचे महत्त्व लक्षात येऊ शकते. कडुनिंबाचे पाने, फुले, फळे, मूळ व खोड हे सर्व भाग औषधी गुणांनी युक्‍त असतात. उष्णतेचे आजार व त्वचारोगांवर गुणकारी औषध असलेला कडुनिंब हा एक बहुउपयोगी औषधी वृक्ष आहे. 

चवीला कडू असला तरी गुणाने उत्कृष्ट असा कडुनिंब सर्वांच्या परिचयाचा असतो. चैत्रातील प्रतिपदा म्हणजे भारतीय कालगणनेनुसार वर्षाचा पहिला दिवस. वर्षाच्या पहिल्या दिवशी कडुनिंबाची पाने, फुले, डहाळी या सर्वांची आवश्‍यकता असते. यावरूनच त्याचे महत्त्व लक्षात येऊ शकते. कडुनिंबाच्या झाडाच्या आसमंतात हवा शुद्ध राहते, जंतुसंसर्गाला प्रतिबंध होऊ शकतो. म्हणूनच घराच्या अंगणात कडुनिंब लावण्याची पद्धत असते.

कडुनिंबाचा वृक्ष मोठा असला तरी त्याचे पंचांग म्हणजे पाने, फुले, फळे, मूळ व खोड हे सर्व भाग औषधी गुणांनी युक्‍त असतात. कडुनिंब फक्‍त भारतात सर्वत्र उगवतो, पण फार पाऊस असणाऱ्या ठिकाणी कडुनिंब सहजासहजी येत नाही. कडुनिंबाचा वृक्ष जसा जसा जुना होईल, तसतसा त्याच्या खोडातील आतील गाभा सुगंधित होत जातो. कडुनिंबाचे लाकूड बांधकामासाठीसुद्धा उत्तम असते. कारण त्याला कीड लागण्याची भीती नसते. शेतातील जमिनीत कडुनिंबाची झाडे लावण्याने जमिनीचा कस कायम राहतो, शिवाय जंतुसंसर्गाला प्रतिबंध होऊ शकतो.

शुभ्र फुले माळून नटती... याचा वृक्ष 8-10 मीटर उंच होतो. मुख्य खोड सरळ असते व त्याच्या चारीही बाजूंनी फांद्या फुटतात. पाने छोटी व मधल्या दांड्याच्या दोन्ही बाजूंना जोडीजोडीने असतात. टोकाचे पान मध्यात असते. फुले लहान व पांढऱ्या रंगाची असतात. त्यांना मंद सुगंध असतो. फळ कच्चे असताना हिरवे व टणक असते, मात्र पिकले की पिवळे व मऊ बनते. फळांना सामान्य भाषेत निंबोळी असेही म्हटले जाते. फळाच्या आत एक बी असते. बीच्या आत मगज असतो. या मगजापासून तेल काढले जाते. कडुनिंबाची पाने हिवाळ्यात गळतात. वसंताची चाहूल लागली की कोवळी पालवी फुटते आणि वसंताच्या अखेरीपर्यंत झुपक्‍यांनी फुले येऊ लागतात. कडुनिंबाचे गुणधर्म "भावप्रकाशा'त पुढीलप्रमाणे सांगितले आहेत,
निम्बः शीतो लघुर्ग्राही कटुस्तिक्ताऽग्निवातकृत्‌ ।
अहृद्यः श्रमतृट्‌कास ज्वरारुचि कृमिप्रणुत्‌ ।। ...भावप्रकाश

कडुनिंब गुणाने लघू म्हणजे पचायला हलका, चवीने कडू व तुरट, विपाकाने तिखट असतो, मात्र वीर्याने शीतल असतो. मुख्यत्वे कफदोष व त्यामागोमाग पित्तदोषाचे शमन करतो, मात्र वात वाढवतो. कडुनिंब चवीमुळे नकोसा वाटला तरी अग्नीला प्रदीप्त करणारा असतो. योग्य प्रमाणात सेवन केल्यास श्रमांमुळे झालेल्या अशक्‍ततेला भरून आणतो, तहान शमवतो; खोकला, ताप, अरुची (तोंडाला चव नसणे) व जंत या सर्व विकारांत उपयुक्‍त असतो.

जखमेवर पानांचा लेप कडुनिंब जखम भरून येण्यासाठी उपयुक्‍त असतो. जंतुसंसर्ग झाला असला तर कडुनिंबाच्या पानांच्या काढ्याने जखम अगोदर धुऊन घेऊन नंतर कडुनिंबाची पाने मधासह वाटून तयार झालेला लगदा जखमेवर बसवून पाटा बांधून टाकला जातो. या प्रकारे काही दिवस रोज केल्याने हळूहळू जखम भरून येते. शरीरातील उष्णता कमी करण्यासाठी कडुनिंबाची पाने उपयुक्‍त असतात. कडुनिंबाच्या पानांचा रस खडीसाखरेबरोबर काही दिवस घेतल्याने कडकी कमी होते.
आग होणाऱ्या सुजेवर पानांचा लेप करण्याने लगेच बरे वाटते. कडुनिंबाची पाने बारीक करून पाण्यात मिसळून व्यवस्थित फेटली की पाण्यावर फेस तयार होतो. हा फेस अंगाला लावला असता दाह कमी होतो. विशेषतः पित्तामुळे आलेल्या तापात त्वचेचा दाह होतो, तो शांत करण्यासाठी हा फेस उपयुक्‍त असतो.
नखुरडे झाले असता तुपावर परतलेला कडुनिंबाचा पाला बांधून ठेवण्याचा उपयोग होतो.
स्नानाच्या पाण्यात याच्या पाल्याचा काढा मिसळल्याने त्वचारोग बरे होण्यास- विशेषतः खाज कमी होण्यास मदत मिळते. गोवर, कांजिण्या वगैरे संसर्गजन्य रोगांमध्ये अंग पुसून घेण्यासाठी पानांचा काढा मिसळलेले पाणी वापरणे हितावह असते, तसेच या रोगात स्नानाच्या पाण्यात कडुनिंबाची पाने टाकण्याची पद्धत असते. विषबाधेवर, विशेषतः सापाच्या विषावर कडुनिंबाचा पाला अतिशय प्रभावी असतो. कडुनिंबाची पाने चावून खाल्ली व तरीही कडू लागली नाही तर त्याचा अर्थ साप चावून विषबाधा झाली आहे, अशा परीक्षा प्रचलित आहे व यावर पाल्याचा रस देण्याची पद्धत आहे. कडुनिंबाचा पाला वाटून तयार केलेला लहान सुपारीच्या आकाराचा गोळा त्यात हिंग मिसळून काही दिवस नियमित सेवन करण्याने जंतांचा नाश होतो.
रक्तदोषावर फुलांची चटणी
फुले वाळवून तयार केलेले चूर्ण रोज रात्री गरम पाण्याबरोबर घेण्याने शौचास साफ होते व शक्‍ती वाढण्यास मदत होते.
कडुनिंबाची फुले वाटून तयार केलेला लेप पापणीवर व डोळ्यांच्या आसपास लावण्याने नेत्ररोग बरे होतात.
रसोनिम्बस्य मञ्जर्याः पीतश्‍चैत्रे हितावहः ।
हन्ति रक्‍तविकारांश्‍च वातपित्तं कफं तथा ।।
चैत्र महिन्यात कडुनिंबाच्या ताज्या फुलांचा रस पिण्याने सर्व प्रकारचे रक्‍तदोष दूर होतात, म्हणूनच गुढी पाडव्याच्या दिवशी कडुनिंबाच्या कोवळ्या पानांची व फुलांची चटणी खाण्याची परंपरा आहे.

शीतगुणी साल तापावर कडुनिंबाच्या सालीचा काढा घेण्याची पद्धत आहे. ताप येणे बंद झाले तरी नंतर चांगली भूक लागेपर्यंत व तापामुळे आलेली अशक्‍तता भरून येईपर्यंत असा काढा घेत राहणे हितावह असते. सालीच्या आतमध्ये असलेला गाभा सुगंधित व शीत गुणाचा असतो. दीर्घकालीन ताप, गोवर, कांजिण्या, कावीळ वगैरे कोणत्याही कारणाने शरीरात मुरलेली कडकी दूर करण्यासाठी गाभा उगाळून तयार केलेले गंध खडीसाखरेबरोबर घेतले जाते. बाळंतिणीला वाफारा देण्यासाठी सालीचा काढा वापरणे उत्तम असते. यामुळे वातशमन तर होतेच, पण जंतुसंसर्ग होण्यासही प्रतिबंध होतो. कडुनिंबाची साल डोळे येतात त्यावरही उपयुक्‍त असते,
निम्बस्य चोदुम्बरवल्कलस्यएरण्डयष्टिमधुचन्दनस्य ।
पिण्डी विधेया नयने प्रकोपितेकफेन पित्तेन समीरणेन ।।
कडुनिंबाची साल, उंबराची साल, एरंड मूळ, ज्येष्ठमध व चंदन हे सर्व बारीक वाटून तयार केलेला लेप बंद पापण्यांवर लावण्याने कफ, पित्त किंवा वात या कशामुळेही डोळे आले असले तरी शांत होतात.

निंबोळीचे उपयोग कडुनिंबाच्या फळामध्ये असणारी बी बारीक करून लावण्याने खरूज बरी होते. डोक्‍यामध्ये उवा, लिखा झाल्या असल्यासही बिया बारीक करून डोक्‍यावर बांधून ठेवल्याने उपयोग होतो. बियांपासून काढलेले तेल त्वचारोगांवर खूपच उपयुक्‍त असते. हे वरून लावण्याने खाज कमी होते, त्वचा पूर्ववत होण्यास मदत मिळते व रक्‍तदोषामुळे काळवंडलेली त्वचा किंवा डागही नष्ट होतात. कडुनिंबाच्या बियांचे तेल नस्यासाठीही वापरता येते.
निम्बस्य बीजानि हि भावितानिभृस्य तोयेन तथाऽशनस्य ।
तैलञ्च तेषां विनिहन्ति नस्यात्‌ दुग्धान्नभोक्‍तुं पलितं समूलम्‌ ।।
बियांना माक्‍याच्या रसाच्या व असाणा वृक्षाच्या काढ्याच्या भावना द्याव्यात. पुरेशा भावना देऊन झाल्या की या बियांमधून तेल काढावे. या तेलाचे नस्य घेण्याने व केवळ दूध-भातावर राहण्याने पलित रोग नष्ट होतो, केस पांढरे होणे थांबते.
निंबोणी ताजी असताना खाण्याने जंतांचा नाश होतो. प्रमेहावरही ती उपयोगी असते.
पंचनिंब चूर्ण नावाचे एक औषध त्वचारोगावर सांगितले आहे. यात कडुनिंबाचे मूळ, पाने, फुले, फळे व साल अशी पंचांगे त्या त्या ऋतूत गोळा करून एकत्र करायची असतात. यात इतर रक्‍तशुद्धिकर औषधे मिसळून त्याला माक्‍याच्या रसाची, खदिराच्या काढ्याची भावना देऊन औषध तयार केले जाते. हे औषध सर्व प्रकारच्या त्वचारोगांवर प्रभावी असते.

पानांचा धूप हवा शुद्ध करण्यासाठी, जंतुसंसर्गाला प्रतिबंध होण्यासाठी घरात, तसेच ठिकठिकाणी धूप करण्यास सुचवला जातो. या प्रकारच्या धूपात कडुनिंबाच्या पानांचा समावेश अवश्‍य असतो.
निम्बपत्रैः कृतं चूर्णः लोध्रचूर्णसमन्वितम्‌ ।
वस्त्रबद्धं जले क्षिप्तं पूरणं नेत्र रोगनुत्‌ ।।
कडुनिंबाची पाने व लोध्र यांच्या समभाग चूर्णाची पुरचुंडी बांधावी. ही पुरचुंडी पाण्यात काही वेळ भिजत ठेवावी. हे पाणी डोळ्यांत टाकण्याने नेत्ररोग दूर होतात.
निम्बस्य पत्राणि सदा घृतेनधात्रीविमिश्राव्यथवा प्रयुञ्जात्‌ ।
विस्फोटकोठक्षतशीतपित्तंकण्ड्‌वस्रपित्तं सकलानि हन्यात्‌ ।।

कडुनिंबाची पाने तुपासह सेवन करण्याने किंवा कडुनिंबाची पाने व आवळा यांचे समभाग चूर्ण घेण्याने अंगावर पित्त उठणे, फोड येणे, खाज येणे वगैरे त्रास नष्ट होतात. अशा प्रकारे कडुनिंब हा एक बहुउपयोगी औषधी वृक्ष आहे. वर्षाच्या पहिल्या दिवशी गुढी उभारताना त्याला भारतीय संस्कृतीने इतके महत्त्वाचे स्थान देणे किती यथार्थ आहे, हे लक्षात येऊ शकते. 
Ayurveda, Vastu shastra, healthy Food, Healthy Living, Abstract India, Shree Balaji Tambe, India, Yoga, Meditation, Life Style, Marathi Blog, Marriages, Love

कडू चवीचे गोड औषध कडुनिंब

- डॉ. श्री बालाजी तांबे


केवळ गुढीपाडव्याच्या दिवशी कडुनिंबाची चटणी खायची असे नसून, वर्षाच्या सुरवातीला महत्त्वाच्या गोष्टीची आठवण राहावी अशा हिशेबाने कडुनिंबाची चटणी खायला सुचविलेली आहे. कडुनिंबाच्या झाडाची सावली हीसुद्धा शीतल असते. कडुनिंबाच्या झाडाच्या वातावरणात अंगावर उठणारी खाज, त्वचाविकार वगैरे विकारांवर आराम मिळू शकतो. कडुनिंबाच्या सालीचा व फुलांचाही खूप उपयोग होतो.

क डुनिंबाचा वृक्ष हा जणू कल्पवृक्षच आहे. या झाडाच्या पानांची, फळांची, फुलांची चव कडू असली तरी त्याचा उपयोग अत्यंत गोड म्हणजे कल्याणकारी असतो. आरोग्याच्या बाबतीत तर कडुनिंबाला तोड नाही. कडुनिंबाच्याच अंगाखांद्यावर खेळणारी वनस्पती म्हणजे गुळवेल. गुळवेलही अत्यंत कडू असते, परंतु वर्षाच्या सुरवातीला येणाऱ्या गुढीपाडव्याच्या दिवशी गुळवेलीची आठवण न येता कडुनिंबाची आठवण येण्याचे कारण म्हणजे या ऋतूत गुळवेलीवर पाने नसतात, तर नुसतेच झाडाला लपेटलेले खोड दिसते. कडुनिंबाचेच अपत्य असल्यासारखी गुळवेल ही सर्वोत्तम मानली जाते आणि तिला "अमृता' असेही म्हटले जाते. ज्या कडुनिंबाने गुळवेलीला वाढवले, पोसले तो कडुनिंबही अमृतासमान नसला तरच नवल. दत्तक दिलेली ही गुळवेल एखाद्या दुसऱ्या झाडावर पोसली गेली तर ती तेवढी गुणकारी ठरत नाही. उन्हाळा भरपूर आहे अशा ठिकाणी आणि ज्या ठिकाणी जमिनीत पाणी थांबून राहत नाही अशा ठिकाणी कडुनिंबाची झाडे विपुल प्रमाणात दिसतात व त्या मर्यादेत अशा ठिकाणी गुळवेलही अधिक प्रमाणात असल्याचे दिसते. आयुष्यात जर मधुररसाची प्राप्ती हवी असेल तर वर वर कडू वाटणाऱ्या या दोन वनस्पतींची मदत घेतल्याशिवाय काम भागणार नाही.

म्हणून वर्षांच्या पहिल्याच दिवशी कडुनिंबाची आठवण होते. याचा वृक्ष छान मोठा डेरेदार असतो. "चंदामामा चंदामामा भागलास का, निंबोळीच्या झाडामागे लपलास का?' हे गीत प्रत्येकाने लहानपणी अनेकदा ऐकलेले असते. निंबोळ्या छान पिवळ्याधमक व आकर्षक असतात. त्या कडू असल्या तरी मनुष्यमात्राच्या उपयोगी ठरणाऱ्या असतात.

बहुउपयोगी कडुनिंब सुंठ व आल्याच्या उपयोगाने जसे वेगवेगळ्या प्रकारचे रोग बरे होऊ शकतात, तसेच अनेक रोग कडुनिंबानेही बरे होऊ शकतात. कडुनिंब वीर्याने शीतल असतो, तो कफदोष व पित्तदोषाचे शमन करतो व अग्नीला म्हणजेच हॉर्मोनल सिस्टिमला उपयुक्‍त असतो. खोकला, ताप, तोंडाला चव नसणे, जंत, त्वचारोग अशा अनेक विकारांमध्ये उपयोगी असणारा हा वृक्ष.

भारतात कडुनिंब सर्वत्र उगवलेला दिसतो, पण अति पाऊस असलेल्या ठिकाणी व जमिनीत पाणी थांबत असलेल्या ठिकाणी कडुनिंब उगवणे व जगवणे अवघड असते. कडुनिंबाच्या लाकडाला तर कीड लागत नाहीच, पण तो जंतावर औषध म्हणूनही मदत करतो. कडुनिंबाचे झाड पर्यावरणाची शुद्धी करून घरात जंतुसंसर्ग थांबविण्यासाठी मदत करते. कडुनिंबाची पाने अंथरुणावर पसरून त्यावर चादर घालून झोपणे उत्तम असते. कडुनिंबाच्या पानांचा काढा स्नानाच्या पाण्यात टाकून स्नान करणे चांगले असते.

एकूणच, कडुनिंबाचे महत्त्व कल्पवृक्षासमान असल्यामुळे वर्षाच्या सुरवातीच्या दिवशी म्हणजेच गुढीपाडव्याच्या दिवशी याच्या पानांची चटणी सेवन करून जणू कडुनिंबाचा सत्कार केला जातो. कडुनिंबाच्या पानांत सैंधव, मिरी, जिरे, ओवा, हिंग, चिंच व गूळ घालून चटणी केली जाते. कडुनिंबाचा रस घेण्याऐवजी या प्रकारे चटणी करून घेणे अधिक चांगले असते. ही चटणी चैत्र, वैशाख या दोन महिन्यांत रोज खाल्ली तर वर्षभर लाभ होऊ शकतो.

शीतल सावली मधुमेह असणाऱ्यांनी हे दोन महिने रोज कडुनिंबाच्या पानांची चटणी खावी. यानंतर गुळवेलीच्या वेलाची बोटाएवढ्या जाडीची व बोटभर लांबीची कांडी जराशी चुरून रात्रभर पाण्यात भिजवून ते पाणी सेवन करावे (दोन-तीन दिवस परत परत तीच कांडी वापरता येते). हा प्रयोग दोन-तीन महिने केल्यास मधुमेहावर उपचार होतो का याचा अंदाज घेता येतो. अंतःस्रावी ग्रंथीचा त्रास असणाऱ्यांनाही हा प्रयोग करायला हरकत नाही. प्रतिकारशक्‍ती कमी असणाऱ्यांनी किंवा ज्यांच्या शरीरात पांढऱ्या व लाल पेशींचे गणित चुकते आहे, त्यांनीही हा प्रयोग करायला हरकत नसावी.

भारतासारख्या देशात पोटात जंत होण्याचे प्रमाण खूप असते, त्यांनाही कडुनिंबाच्या चटणीची दोन महिने योजना केल्यावर फायदा व्हावा. कडुनिंबाच्या झाडाची सावली हीसुद्धा शीतल असते. कडुनिंबाच्या झाडाच्या वातावरणात अंगावर उठणारी खाज, त्वचाविकार वगैरे विकारांवर आराम मिळू शकतो. कडुनिंबाच्या सालीचा व फुलांचाही खूप उपयोग होतो. कडवट वाटल्या तरी आम्ही लहानपणी निंबोळ्या खात असू.

अशा प्रकारे एकूणच कडुनिंबाचे महत्त्व सर्व वनस्पतींमध्ये खूप वरच्या स्थानावर दिसून येते. रोज कडुनिंबाची चटणी खाणे जमले नाही, तर कडुनिंबाची पाने व आवळकाठीचे चूर्ण यांचे मिश्रण रोज पाण्याबरोबर घ्यायला हरकत नाही. यामुळेही त्वचारोग, अंगावर खाज सुटणे वगैरेंत उपयोग होऊ शकेल. केवळ गुढीपाडव्याच्या दिवशी कडुनिंबाची चटणी खायची असे नसून, वर्षाच्या सुरवातीला महत्त्वाच्या गोष्टीची आठवण राहावी अशा हिशेबाने कडुनिंबाची चटणी खायला सुचविलेली आहे. हे लक्षात घेऊन आपण कडुनिंबाचा उपयोग आपले आयुष्य निरामय व सुखी करण्यासाठी करून घेता येईल.
 
Ayurveda, Vastu shastra, healthy Food, Healthy Living, Abstract India, Shree Balaji Tambe, India, Yoga, Meditation, Life Style, Marathi Blog, Marriages, Love

ad