Monday, August 10, 2009

अन्नयोग


मुळा हा कोवळा असताना खावा. मोठ्या मुळ्यापेक्षा लहान मुळा खाणे अधिक चांगले. बीट हे मूळचे भारतीय नाही. ते पचायला जड असते. त्यामुळे ते वाफवून घ्यावे. साबूदाणा हा धातू वाढवतो. मात्र तो योग्य मात्रेतच घ्यायला हवा.
मुळा
मुळा कोवळा असतानाच खावा, असे आयुर्वेदात सांगितले आहे. जून किंवा शिळा मुळा खाणे अयोग्य होय. तसेच मोठ्या मुळ्यापेक्षा लहान मुळा खाणे अधिक प्रशस्त समजले जाते.
लघुमूलं कटुष्णं स्यात्‌ रुच्यं लघु च पाचनम्‌ ।
दोषत्रयहरं स्वर्यं ज्वरश्‍वासविनाशनम्‌ ।।
...भावप्रकाश
लहान मुळा चवीने तिखट व वीर्याने उष्ण असतो, रुचकर असतो, पचण्यास हलका असतो व पाचकही असतो, त्रिदोषांचे शमन करतो, आवाज सुधारतो, ताप, दमा वगैरे विकारात हितावह असतो.
महत्तदेव रुक्षोष्णं गुरू दोषत्रयप्रदम्‌ ।
स्नेहसिद्धं तदेव स्यात्‌ दोषत्रयविनाशनम्‌ ।।
...भावप्रकाश
मोठा मुळा रुक्षता वाढवतो, वीर्याने उष्ण असतो, पचण्यास जड असतो व तिन्ही दोषांना बिघडवू शकतो. मात्र हाच मोठा मुळा तेलासह शिजवला तर त्रिदोषांना शामक असतो.
मुळ्याची शेंग डिंगरी नावाने मिळते. ती किंचित उष्ण वीर्याची असून कफदोष व वातदोषाला कमी करते.
बीट
बीट हे मूळचे भारतीय नाही व त्यामुळे त्याचा आयुर्वेदीय ग्रंथात उल्लेख नाही. मात्र इतर कंदमुळांप्रमाणे बीट पचायला जड असते. विशेषतः त्यात असणारे धागे पचायला जड असतात. त्यामुळे कोशिंबीर म्हणून बीट खायचे झाले तरी ते वाफवून घेणे चांगले असते. बीट चवीला गोड व किंचित कडवट, तुरट असते. बिटापासून पाश्‍चिमात्य देशांत साखर केली जाते. मात्र ती साखर पचायला जड असते.
साबूदाणा
उपवासासाठी साबूदाणा प्रसिद्ध आहे. टॅपिओका नावाच्या वनस्पतीच्या कंदापासून साबूदाणा तयार होतो. कंद वाफवून वाटला जातो व चाळणीतून तापलेल्या तव्यावर पाडून साबूदाणा तयार करतात. साबूदाणा चवीला गोड असतो, वात-पित्तदोष कमी करतो व कफदोष वाढवतो. साबूदाण्यामुळे धातूंची शक्‍ती वाढते. योग्य मात्रेत म्हणजे पोट जड होणार नाही एवढ्या प्रमाणात साबूदाणा खाण्याने त्रास होताना दिसत नाही. मात्र भूक नसताना, जुलाब होत असताना, अंगावर सूज येण्याची प्रवृत्ती असणाऱ्यांनी, वजन जास्त असणाऱ्यांनी, मधुमेही व्यक्‍तींनी साबूदाणा न खाणेच चांगले.

कोणतेही कंदमूळ पचण्यास जड असते.
पत्रे पुष्पे फले नाले कंदे च गुरुता क्रमात्‌ ।।
...अष्टांगहृदय सूत्रस्थान
पाने, फुले, फळे, नाल व कंद हे उत्तरोत्तर पचायला जड असतात. कंद पचायला सर्वांत जड असतात.
म्हणूनच कंदमुळे शिजवून खाणे चांगले असते. गाजर, बीट वगैरे कंदमुळे असल्याने ती वाफवून सेवन करणेच योग्य असते.
कंदमुळांनंतर आपण काही फूलभाज्यांचे गुणधर्म पाहणार आहोत.

केळफूल
म्हणजे केळ्याचे फूल. कोवळ्या केळफुलाची भाजी करण्याचा प्रघात आहे.
पुष्पं कदल्याः सुस्निग्धं मधुरं तुवरं गुरू ।
ग्राहि तिक्‍तं च अग्निदीप्तिकरं वातविनाशनम्‌ ।।
किंचित उष्णे च वीर्ये स्यात्‌ रक्‍तपित्तं क्षयं कृमीन्‌ ।
...निघण्टु रत्नाकर
केळफूल चवीला गोड, तुरट व कडवट असते, पचायला जड असते, गुणाने स्निग्ध असते, मलप्रवृत्ती बांधून होण्यास मदत करते, वीर्याने किंचित उष्ण असते, अग्नी प्रदीप्त करते, वातशामक असते, रक्‍तपित्त, क्षयरोग, कृमी वगैरे व्याधीत हितकर असते.
हादग्याची फुले
अगस्तिपुष्पं तुवरं तिक्‍तं किंचित्‌ च शीतलम्‌ ।
पाके कटु च विज्ञेयं वातलं परिकीर्तितम्‌ ।।
नक्‍ताध्यं च प्रतिश्‍यायं ज्वरं चातुर्थिकं कफम्‌ ।
पित्तं च नाशयति तदित्यमुक्‍तं महर्षिभिः ।।
...निघण्टु रत्नाकर
हादग्याची फुले तुरट, किंचित कडवट असतात, वीर्याने थंड असतात व विपाकाने तिखट असतात, वात वाढवितात. ही फुले रातांधळेपणा, सर्दी, ताप, कफ व पित्तदोष कमी करतात.
शेवग्याची फुले
पुष्पं कटुष्णं तीक्ष्णं च चक्षुष्यं स्नायुरोगनुत्‌ ।
कृमिशोथप्लीहवातगुल्मविद्रधीश्‍लेष्महृत्‌ ।।
...निघण्टु रत्नाकर
शेवग्याची फुले चवीला तिखट, उष्ण वीर्याची व तीक्ष्ण असतात. ही फुले डोळ्यांसाठी हितकर असतात, कृमी, सूज, गुल्म, प्लीहावृद्धी, गळू, वात-कफदोषात हितकर असतात.
डॉ. श्री बालाजी तांबे

No comments:

Post a Comment

ad