शरीरातील घड्याळ
| |
- डॉ. श्री. बालाजी तांबे (www.balajitambe.com)
|
अन्नाद्भवन्ति भूतानि पर्जन्यादन्नसम्भवः । यज्ञाद्भवति पर्जन्यो यज्ञः कर्मसमुद्भवः ।।
यज्ञातून प्रकट झालेली परमात्मशक्ती मनुष्याला कार्यप्रवृत्त करते. त्यातून ऋतुचक्र निर्माण होऊन ऋतुचक्रापासून पर्जन्य आणि पुढे पावसापासून अन्न निर्माण होते. अन्नापासून "शिते तेथे भुते‘ या म्हणीप्रमाणे अन्नामागे धावणारी माणसे! आणि मग पुन्हा उत्क्रांतीसाठी यज्ञ आणि पुन्हा पुन्हा, पुन्हा पुन्हा कायम फिरणारे असे हे निसर्गचक्र.
श्रीमद्भगवद्गीतेतही म्हटलेले आहे की -
एवं प्रवर्तितं चक्रं नानुवर्तयतीह यः । अघायुरिन्द्रियारामो मोघं पार्थ स जीवति ।।
वरील निसर्गचक्राचे जो प्राणी पालन करत नाही, त्या निसर्गचक्राला अनुसरून वागत नाही आणि जो अहंकार व स्वार्थप्रेरित इंद्रियांच्या (ही इंद्रिये असतात माणसाची पण ती वश असतात बाह्यजगतातील चमक दमक असलेल्या द्रव्याला) स्वाधीन होऊन निसर्गचक्राचे उल्लंघन करतो त्यालाच पापी म्हणतात व त्याचे आयुष्य व्यर्थच जाते.
जीवनचक्राचा अनुभव आपण नेहमीच घेत असतो. याच चक्रसंकल्पनेच्या मदतीने माणसाने काळ आणि त्याची मापनपद्धती शोधून काढून घड्याळ बनवले. बरीच माणसे हातावर बांधलेल्या घडाळ्याच्या फारच स्वाधीन राहतात व वेळ पाळणे हेच जणू एक मोठे कार्य आहे याचा गाजावाजा करतात. पण हे लोक शरीरातील घड्याळाची, जे जीवनचक्राशी जोडलेले आहे, काळजी घेत नाहीत. वेळ पाळणे हे जेवढे महत्त्वाचे तेवढेच त्यामागची भूमिका, होणारे कार्य आणि अंतिमतः अनुभवता येणारी शांती महत्त्वाची गोष्ट आहे हे कधीही विसरून चालत नाही. आपण जरी शरीराचे घड्याळ विसरायचा प्रयत्न केला, तरी शरीर घड्याळाप्रमाणे चालत राहते. सर्व वनस्पती, जलचर, भूचर, प्राणी, पक्षी निसर्गाच्या चक्राला धरूनच जीवनक्रम जगतात. मनुष्याला मात्र वेळेवर झोपणे, वेळेवर उठणे, वेळेवर खाणे-पिणे व नैसर्गिक क्रीडा-मैथुन का जमू नये? इंद्रियांना रथाच्या घोड्याची उपमा दिलेली आहे. जो दशरथी हा रथ चालवतो, त्याचा जर इंद्रियांवर ताबा राहिला नाही, तर शरीरातील घडाळ्याचे सेकंद, मिनीट, तास, गजर हे सर्व काटे उलट सुलट फिरू लागतात. वेळी अवेळी गजराच्या घंटा शरीर ऐकवते आणि त्याकडेही लक्ष दिले नाही, तर शेवटी शरीररूपी घड्याळ बंद पडते.
आपण बाहेर जाणार असलो तर व्हिडिओ रेकॉर्ड प्लेअर वर वेळ प्रोग्रॅम करून ठेवल्यास आपला आवडता कार्यक्रम आपण आपल्या अनुपस्थितीत जसा रेकॉर्ड करू शकतो तसेच मेंदू ठराविक वेळेला शरीरात संदेश पाठवून भूक लागणे, शौच विसर्जन करणे, झोपणे, झोपेतून जागे होणे या क्रिया करवत असतो. मनुष्य ज्या वेळी याच्या विपरीत वागतो तेव्हा तो शरीरव्यवस्थेत संप्रेरकांच्या उत्पादन व कार्यव्यवस्थेत अडथळे आणून आजारपणास आमंत्रण देत असतो.
आयुर्वेदाने ऋतुचक्र व शरीरातील घड्याळ यांचा संबंध प्राचीन काळीच दाखवून दिला. वात-पित्त-कफ यांचा शरीरातील घड्याळाशी असलेला संबंध आणि दिवस-रात्र-पावसाळा-उन्हाळा यांचा निसर्गचक्राशी असलेला संबंध अभ्यासून कोणत्या वेळी कोणत्या ऋतूत काय करावे, काय खावे ह्याचे मार्गदर्शन केले आहे. आणि त्यातूनच ब्राह्ममुहूर्तावर ध्यान, सूर्योदयापूर्वी शौचविसर्जन, दुपारी पित्ताचा प्रभाव असताना जेवण, सायंकाळचे हलके भोजन आणि रात्रीच्या पित्तप्रकोपाच्या काळात जाग्रण न करता घेतलेली झोप हे आरोग्याचे मार्ग सुचवले आहेत. वीर्यधातूची शरीरातील प्रभावाची वेळ ओळखून स्त्री-पुरुष संबंधांचे काळवेळ सुचवले. अर्थात अवेळी व चुकीचे कार्य करणाऱ्या व्यक्तींना शक्तिनाशाचा भुर्दंड सोसावा लागतोच.
एखादा मनुष्य कार्यरत असला किंवा फालतू कामात वेळ घालवत असला, झोपला, उठला, त्याने काहीही केले किंवा तो थांबला तरी बाहेरचा काळ व निसर्गाचे घड्याळ चालूच राहते. प्रत्येक माणसाचे हे कर्तव्यच आहे की, त्याने स्वतःच्या हातावर बांधलेल्या किंवा भिंतीवर टांगलेल्या घडाळ्यावर लक्ष देताना शरीरातून टिकटिक-टिकटिक अशी जाणीव करून देणाऱ्या घडाळ्याकडे पण लक्ष ठेवावे व बाहेरील व आतील संतुलन साधल्याने आरोग्यप्राप्ती, कार्यसिद्धी व सुख मिळवावे.
डॉ. श्री बालाजी तांबे
आत्मसंतुलन व्हिलेज, कार्ला 410 405
No comments:
Post a Comment