दिवसाची सुरवात मलविसर्जनाने नीट झाली, की दिवसही चांगला जातो. नाहीतर, दिवसभर कोणतं तरी ओझं वागवल्यागत वावरावं लागतं. मलविसर्जनाचं प्राकृतिक प्रमाण कायम राहणं हे स्वास्थ्याचं निदर्शक आहे. बद्धकोष्ठ म्हणजे मलविसर्जनात अडथळा असणं. म्हणजेच बद्धकोष्ठता हे अनारोग्याचं लक्षण होय. वायुदोषामुळे उद्भवणारे हे लक्षण म्हणजे आरोग्याच्या पुढच्या काळातील समस्यांची सूचनाच असते. बद्धकोष्ठामागील कारणांचा व त्यावरील उपाययोजनेचा आयुर्वेदानं सविस्तर विचार केला आहे.
आयुर्वेदिक ग्रंथात मलावष्टंभ रोग म्हणून नाही, तर लक्षण म्हणून सांगितला आहे.
मलग्रह, मलावरोध, मलस्तंभ, मलबंधन, मलनिग्रह, मलसंग, बद्धकोष्ठ अशा विविध शब्दात आपण आज ज्याला कॉन्स्टिपेशन म्हणतो त्या कष्टदायक प्रकाराचे वर्णन केले आहे.
पुरीष, मूत्र आणि स्वेद हे शरीरातील तीन मुख्य मल. हे तीनही एका ठराविक काळानंतर शरीराबाहेर काढले जाणे अपेक्षित असते. त्यातील पुरीष व मूत्र उत्सर्जनाचे काम अपान वायूच्या हद्दीत येत असल्याने अपान वायूची ही जबाबदारी असते.
जाठराग्नीकडून आहाराचे पचन झाले की सार भाग व टाकून द्यायचा भाग (विसर्जित होण्याचा भाग) असे विभाजन समानवायू करवी होत असते. यातील उपयुक्त सारभाग मुख्यत्वे छोट्या आतड्यात शोषला जातो. निःसार भाग जसजसा पुढे सरकतो तसतसा त्यातील द्रवभाग शोषला जातो आणि त्याच वेळेस पुरीष म्हणजेच मळ आकाराला येऊ लागतो. मल मोठया आतड्यातून पुढे मलाशयात पोचतो, तेथे साठतो व मलप्रवृत्तीची संवेदना होऊन मलविसर्जनाची क्रिया घडते.
अशा प्रकारे मल तयार होण्यापासून विसर्जित करण्यापर्यंतची क्रिया बघितली तर एक गोष्ट लक्षात येते, की त्यात समान वायू व अपान वायू ह्या दोन वायूंचा संबंध आहे.
मल कसा असावा व मलप्रवर्तन कशा प्रकारे व्हावे याचे आयुर्वेदात वर्णन केले ते असे - मलप्रवृत्ती सहज, दिवसातून एक किंवा दोन वेळा, नियमित वेळेला व्हावी, मल बांधून तरीही मऊ म्हणजे सोललेल्या केळ्यासारखा असावा. मलविसर्जनानंतर पोट साफ झाल्याची भावना व्हावी, अंग हलके व्हावे व उत्साह वाटावा.
यामध्ये कोणत्याही प्रकारचा बदल झाल्यास तो समान-अपानाच्या कार्यात कुठेतरी अडथळा येत असल्याचा किंवा आहार-आचरणात काहीतरी बिघडत असल्याचा निर्देशक आहे असे समजावे. यालाच आयुर्वेदिक ग्रंथात मलावरोध, मलस्तंभ, मलनिग्रह वगैरे म्हटलेले आहे.
मलावष्टंभ हे एक लक्षण म्हणून सांगितले असल्याने विविध रोगांशी किंवा बिघाडाशी संबंधित असू शकतो. त्यामुळे मलावष्टंभावर योग्य उपचार करायचा असेल तर मूळ कारण व त्यातून निर्माण झालेले असंतुलन बरे करणे सर्वात महत्त्वाचे आहे.
मलावष्टंभ का होतो?
मलावष्टंभाची सर्वसाधारण कारणे याप्रकारे सांगता येतात -
* आहारात तिखट, कडू, तुरट रसांचा अतिरेक करणे.
* कोरडे म्हणजे ज्याच्यात उचित स्निग्धतेचा अभाव आहे व निःसत्त्व अन्न खाणे, उदा. तूप न लावता खाल्लेली भाकरी, पोळी; लोणी न लावलेला ब्रेड; चुरमुरे, चिवडा, पाणीपुरी सारख्या कोरड्या पदार्थांचा अतिरेक; शिळे अन्न
* शरीरास अनुकूल स्निग्ध पदार्थांचा अभाव. उदा. दूध, घरचे ताजे लोणी, साजूक तूप, आहारात तेल वगैरे स्निग्ध गोष्टी अजिबात न वापरणे किंवा अपुऱ्या प्रमाणात वापरणे.
* प्रकृतीला सहन होणार नाहीत असे उपवास करणे किंवा डाएटिंग करणे.
* वात वाढवणारी व पचायला जड असणारी कडधान्ये प्रकृतीचा विचार न करता खाणे, उदा. मटार, पावटा, चवळी, छोले, हरबरा वगैरे.
* आंबवलेले पदार्थ अधिक प्रमाणात खाणे.
* भूक लागलेली नसताना जबरदस्तीने खाणे.
* अगोदरचे अन्न पचण्याअगोदरच पुन्हा पुन्हा खात राहाणे.
* रात्री जागरणे करणे, तसेच दिवसा झोपणे.
* व्यायामाचा अभाव किंवा अतिरेक करणे.
* अति मानसिक चिंता करणे.
याखेरीज वयानुसार जसजसा वात वाढतो तसतशी आतड्यांची शक्ती कमी होत जाते व त्यांच्यात र?क्षता उत्पन्न होते. अशा वेळी बहुधा मलावष्टंभ हे लक्षण दिसते.
तसेच मलप्रवर्तनाची संवेदना जाणवल्यावरही जर त्याकडे दुर्लक्ष केले, अर्थात वेग अडवून ठेवला, तर त्यामुळेही मलावष्टंभ होतो. अष्टांगसंग्रहात म्हटले आहे,
आटोपशुलौ परिकर्तिका च संगः पुरीषस्य तथोर्ध्ववातः ।
मलप्रवर्तनाच्या वेगाचे जबरदस्तीने धारण केले तर त्याने पोटात वायू पकडतो, पोट दुखू लागते, गुदाच्या भागी कात्रीने कापल्याप्रमाणे वेदना होतात, ढेकर येऊ लागतात व मलावष्टंभ होतो.
अपानवायूचा अपराध
अत्यंत अनैसर्गिक व अवघड वाटणारी ही गोष्ट आज समाजातील अनेक लोकांकडून होते आहे, वेळेची कमतरता, कामाचा ताण, सोयीचा अभाव अशा एक ना एक अनेक कारणांनी हा 'अपराध" घडला की त्याची शिक्षा आज ना उद्या भोगावी लागतेच. याखेरीज "आनाह' या नावाने सांगितलेल्या वातरोगाच्या वर्णनातही मलावष्टंभ हे प्रमुख लक्षण आहे.
क्रमेण निचितमामं शकृत् वा भूयो विगुणानिलेन विबद्धं सत् यथामार्गं न प्रवर्तते स आनाहः ।
...सुश्रुत उत्तरतन्त्र
साचलेला आम (योग्य प्रकारे न पचलेला व शरीरात विषस्वरूप होऊन राहिलेला आहाररस) किंवा मल, वातदोष बिघडल्यामुळे घट्ट, कडक होतो व अपान वायूने मार्ग बंद केल्यामुळे गुदद्वारातून बाहेर जाऊ शकत नाही, बरोबरीने वातही न सरू शकल्याने पोट फुगते, धड ढेकर येत नाही, धड वायू सरत नाही आणि मलप्रवृत्तीही होत नाही. अशा अवघड अवस्थेला "आनाह" असे म्हणतात.
अशाच प्रकारे इतर अनेक वातव्याधींमध्ये, विशेषतः समान व अपानवायू बिघडून होणाऱ्या वातव्याधींमध्ये मलावष्टंभ हे लक्षण दिले आहे.
मलावष्टंभाचे दोन प्रकार
1. केवळ वातामुळे होणारा मलावष्टंभ - यात मल कडक, सुकलेला, खड्यासारखा किंवा गाठीप्रमाणे घट्ट असतो. या प्रकारात मलप्रवर्तन होताना दुखते, कडक मळामुळे गुदभागी जखम होऊन रक्तही पडू शकते. अत्यंत तीव्र अवस्थेत अक्षरशः हाताने मळ काढून टाकावा लागतो किंवा एनिमा दिल्याशिवाय मलप्रवर्तन होत नाही.
2. आमाच्या आणि कफाचा संबंध असलेला मलावष्टंभ - यात मल चिकट, चिखलासारखा असतो. या प्रकारात फार वेळ कुंथावे लागते. एकाच वेळेस पोट साफ झाले अशी भावना कधीच वाटत नाही. कैक वेळा चिकट्याच्या स्वरूपात प्राकृत कफ शरीराबाहेर जाऊ लागल्यास मलप्रवृत्तीनंतर थकवा येतो. काही व्यक्तींना तर नंतर झोपावेच लागते.
मलावष्टंभ फार दिवस राहिल्यास त्याचा परिणाम म्हणून बाकीही समस्या उद्भवू शकतात. उदा. डोके दुखणे, मूळव्याध, फिशर-फिश्च्युला, हर्निया, निद्रानाश, निरुत्साह, आळस, सर्वांग जड होणे, अंग दुखणे वगैरे.
म्हणूनच मलावष्टंभावर वेळीच व योग्य उपचार करावेत. केवळ पोट साफ होण्यासाठी औषध घेणे किंवा पोट साफ व्हावे म्हणून सकाळी तीन - चार लिटर पाणी पिणे म्हणजे मलावष्टंभावर उपचार केला, या भ्रमात न राहणेच चांगले होय. कारण अशा उपचारांनी मूळ मलावष्टंभात भर पडत असते व दिवसेंदिवस मलावष्टंभाची तीव्रता वाढत जाऊन असहाय अवस्थेला आमंत्रणच मिळत असते. एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे पोट साफ होणे हे वाताचे कार्य आहे हे आपण जाणतोच. तर मलप्रवर्तनाचे कार्य वाताच्या काळात जेवढे चांगले व पूर्णतः होईल तेवढे इतर वेळी होणार नाही हे नक्की. वाताचा काळ म्हणजे रात्रीचा अंतिम भाग व भल्या पहाटेचा सूर्योदयाच्या आसपासची वेळ. सकाळी सहा - साडेसहा पर्यंत उठून शौचाला जाण्याची सवय शरीराला लावली तर आपोआपच वाताच्या वेळात वाताचे कार्य होऊन जाईल. यामुळे मलाष्टंभाचा त्रास उद्भवणारच नाही. मलाष्टंभाचा त्रास असणाऱ्यांनीही ही सवय लावून घ्यावी आज ना उद्या त्याचा निश्चित फायदा होईल.
बद्धकोष्ठावरील उपाय* मलावष्टंभाची आपल्या आरोग्याच्या बाबतीतील कारणे शोधून काढून त्यानुसार आहार-आचरणात योग्य बदल करावेत.
* उकळलेले गरम पाणी पिणे हे कोणत्याही प्रकारच्या मलावष्टंभात एक उत्तम सहायक उपाय आहे.
* घरी बनवलेले साजूक तूप हेही यासाठी एक वरदानच होय. कारण ते अग्नीची ताकद वाढवते, समान वायूला संतुलित करून त्याची शक्ती वाढवते व अपान वायूला अनुलोमनाची गती देते त्यामुळे आहारात तर साजूक तुपाचा समावेश करावाच शिवाय रात्री झोपताना कपभर गरम पाण्यात दोन चमचे साजूक तूप व दोन चिमूट सैंधव मीठ टाकून प्यावे.
* वातप्रधान मलावष्टंभ असल्यास स्निग्ध द्रव्यांचा वापर करावा उदा. एरंडेल तेल, बहावा, मनुका, निशोत्तर वगैरे.
* सौम्य मलावष्टंभ असल्यास अविपत्तिकर चूर्ण, भिजवलेल्या मनुका, अंजीर वगैरे गोष्टी कामास येतात. तर तीव्र मलावष्टंभ असल्यास गंधर्वहरीतकी, सुखसारक चूर्ण वगैरे औषधांची मदत घ्यावी लागते.
* वातशामक औषधांनी सिद्ध तेलाचा बस्ती (आयुर्वेदिक एनिमा) हाही एक प्रभावी उपचार आहे.
* आम व कफाचा संबंध असणाऱ्या मलावष्टंभात आमपचनापासून सुरुवात करावी लागते त्यासाठी हिंग्वाष्टक चूर्ण, शंखवटी, आमपाचक वटीचा वापर केला जातो.तसेच आतील चिकटा काढून टाकण्यासाठी पिच्छिल म्हणजे बुळबुळीत द्रव्यांची मदत घेतली जाते. उदा. इसबगोल, अहळीव वगैरे. बरोबरीने त्रिफळा, हिरडा, सोनामुखी वगैरे मलप्रवर्तन करणाऱ्या वनस्पतीही वापरल्या जातात.
* पोटावर हलक्या हाताने तेल चोळल्यास वात सरून पोट साफ होण्यास मदत होते. वातशामक द्रव्यांनी सिद्ध तेल असल्यास उत्तमच अथवा एरंडेलही चालू शकते.
---- Ayurveda, Vastu shastra, healthy Food, Healthy Living, Abstract India, Shree Balaji Tambe, India, Yoga, Meditation, Life Style, Marathi Blog
No comments:
Post a Comment