Tuesday, December 16, 2008

प्रश्‍नोत्तरे


प्रश्‍नोत्तरे - डॉ.श्री. बालाजी तांबे

(१)सायंकाळी जेवणाऐवजी सूप प्यावे, असा उल्लेख आपण बऱ्याचदा करता. सांधेदुखीचा त्रास असला तर नेमके कशाचे सूप घ्यावे? ते रोज घेतले तर चालेल का? मंद पचनशक्‍ती व मधुमेह असल्यास ते घेता येईल का? तसेच कोणत्या वयोगटासाठी घेता येईल? कृपया खुलासा करावा.
- सौ. जयश्री शिरसीकर, पुणे............
उत्तर - रात्रीचे जेवण पचायच्या दृष्टीने जितके सोपे असेल तितके आरोग्य चांगले राहते. संध्याकाळी जेवणाऐवजी सूप घेणे सर्वांसाठी फायद्याचेच असते. मंद पचनशक्‍ती, मधुमेह, स्थौल्य वगैरे विकारात तर विशेष उपयोगी असते. बैठे काम असणाऱ्यांसाठी, रात्री उशिरा जेवावे लागणाऱ्यांसाठी तसेच एकंदर वयानुसार पचनशक्‍ती मंदावते, अशा वेळी सूप घेणे उत्तम होय. सूप घेतल्यास पोट भरत नाही असा गैरसमज आढळतो. पण सूप द्रवस्वरूपातील आहार असल्याने व पचायला हलका असल्याने पोट भरून घेता येते व त्यामुळे पोट जड न होता उलट पोट भरल्याचे समाधान अनुभवता येते. सांधेदुखीच्या त्रासावरही मुगाची डाळ, कुळीथ, रवा, दुधी-पालक-गाजर किंवा इतर प्रकृतीनुरूप भाज्या यांचे सूप बनवता येते. रुचिपालट म्हणून यांचे मिश्रण करूनही सूप बनवता येते. उदा. दुधी-मूग डाळ सूप, भाज्यांचे मिक्‍स सूप, पालक-मूग डाळ सूप. सूप म्हटले की सर्वसाधारणपणे टोमॅटो सूप डोळ्यांसमोर येते. पण या पद्धतीने बनविलेले सूप रुचकर तर असतेच, शिवाय आरोग्यासाठी हितकरही असते.

--------------------------------------------------------------------
(२)मी ३४ वर्षांची आहे. तीन वर्षांपासून मला फिट्‌सचा त्रास आहे. ऍलोपॅथीची औषधे चालू आहेत; पण डोस जराही कमी केला किंवा चुकला की मला लगेच त्रास होतो. टेन्शन आले तरीसुद्धा त्रास होतो. फीट येऊन गेली की खूप अशक्‍तपणा येतो. खूप गर्दी, कोलाहल असलेल्या ठिकाणी गेले की काही क्षणासाठी डोके सुन्न होते. ऍलोपॅथीच्या औषधांमुळे वजन वाढते आहे. इतरही दुष्परिणाम दिसत आहेत. या गोळ्या बंद करता येतील का? कृपया मार्गदर्शन करावे.
- सौ. रूपाली पारसवार

उत्तर - योग्य निदान करून आयुर्वेदिक औषधे चालू केली असता हळूहळू सध्या चालू असलेली औषधे कमी करता येऊ शकतील. एक महत्त्वाची गोष्ट अशी, की सध्याची औषधे फक्‍त फीट येऊ नये म्हणून काम करतात. म्हणूनच एकदाही डोस चुकला तर लगेच त्रास होतो. आयुर्वेदिक औषधे मुळातील असंतुलन दूर करण्यासाठी उपयुक्‍त असतात. आयुर्वेदिक औषधांमुळे मेंदूची कार्यक्षमता पूर्ववत होऊ लागली की मगच सध्याची औषधे हळूहळू कमी करता येतील. मेंदूच्या विकारांवर प्रत्यक्ष तपासून योग्य निदान करूनच औषधे घेणे चांगले असते. तत्पूर्वी "संतुलन ब्रह्मलीन घृत', "संतुलन ब्रह्मलीन (डिव्हाईन) सिरप' घेण्यास सुरुवात करता येईल. रोज रात्री झोपण्यापूर्वी पादाभ्यंग करण्याचा, नाकात "नस्यसॅन घृता'चे ३-४ थेंब टाकण्याचा तसेच संपूर्ण अंगाला "संतुलन अभ्यंग तेला'सारखे वातसंतुलन करणारे तेल लावण्याचाही चांगला उपयोग होईल. वैद्यांच्या सल्ल्याने औषधे सुरू करावी. आवश्‍यकतेनुसार शरीरशुद्धी, शिरोबस्ती, उत्तरबस्ती यांसारखे उपायही करून घेणे श्रेयस्कर होय.

--------------------------------------------------------------------
(३)एरंडेल तेलाचे सेवन कितपत योग्य आहे? मेनोपॉजच्या काळात हाडे झिजतात, त्यावर उपाय काय?
- सौ. उज्ज्वला कुलकर्णी

उत्तर - घरच्या घरी दर पंधरा दिवसांनी पोट साफ करण्यासाठी तसेच आमदोषयुक्‍त वातावर नियंत्रण आणण्यासाठी एरंडेल तेल उत्तम असते. पचन चांगले राहिले की एकंदर आरोग्य उत्तम राहते, हे सर्वांना माहीत आहेच. १५ दिवसांतून एकदा रात्री झोपण्यापूर्वी प्रकृतीनुरूप आवश्‍यक तेवढे म्हणजे साधारण ३-५ चमचे एरंडेल तेल घेतले तर दुसऱ्या दिवशी सकाळी २-३ जुलाब होऊन पोट साफ होते व पचन चांगले राहते. हा उपाय घरातल्या लहान मुलांपासून ते ज्येष्ठ व्यक्‍तींपर्यंत सर्वांना करता येण्याजोगा आहे. मेनोपॉजच्या काळात हाडे झिजू नयेत यासाठी अगोदरपासूनच दूध नियमित पिण्याची सवय ठेवावी. याशिवाय डिंकाचे लाडू, खारीक, नाचणीचे सत्त्व या गोष्टी हाडाच्या मजबुतीसाठी आहारात असू द्याव्यात. "सॅन रोझ (शांती रोझ)', "मॅरोसॅन', "कॅल्सिसॅन गोळ्या' घेणेही हाडांसाठी व एकंदर स्त्रीसंतुलनासाठी उत्तम असते.

--------------------------------------------------------------------
(४)तळपाय सतत दुखतात, यावर काय उपाय करता येईल?
- सौ. मीना देवभानकर

उत्तर - तळपाय दुखणे हे शरीरशक्‍ती कमी झाल्याचे लक्षण आहे. शरीरशक्‍ती वाढविण्याच्या दृष्टीने रोजच्या आहारात शतावरी कल्प घालून दूध, घरचे साजूक तूप यांचा पुरेसा समावेश असू द्यावा. रात्री झोपण्यापूर्वी पादाभ्यंग करावा. शरीरशक्‍ती वाढण्यासाठी "सॅन रोझ (शांती रोझ)', "मॅरोसॅन'सारखे रसायन काही दिवस नियमितपणे सेवन करावे. संपूर्ण अंगाला "संतुलन अभ्यंग तेला'चा अभ्यंग करण्याने वाताचे संतुलन झाले की त्यामुळेही शरीरशक्‍ती वाढून होत असलेला त्रास कमी होईल.
--------------------------------------------------------------------

No comments:

Post a Comment

ad