Friday, July 24, 2009

कामला काम नको, हवी विश्रांती!

मनुष्याचा देह जरी पाच तत्त्वांचा बनलेला असला, तरी त्यात पृथ्वी आणि जल तत्त्वाचे आधिक्‍य व महत्त्व असते. "अन्नात भवन्ति भूतानि' असे म्हटलेले आहे. अन्न पचून त्याचे शरीर - पृथ्वीतत्त्वात रूपांतरण व्हावे लागते आणि त्यासाठी पृथ्वीतत्त्वाच्या पिवळ्या रंगाशी साधर्म्य असणारे पित्त उपयोगी पडते. सप्तरंगापैकी सर्वांत मधला रंग असतो हिरवा. हिरव्याच्या खाली पृथ्वी असायलाच पाहिजे आणि तिचा रंग असतो पिवळा.
खोल खणल्यावर मिळतो पृथ्वीच्या पोटातील धगधगीत नारंगी रंगाचा अग्नी. हिरव्याच्या वर मिळतो निळा आणि तोच नंतर पारवा होऊन जांभळ्यापर्यंत पोचतो. असे हे शक्‍तीचे चक्र अनेक आवर्तने घेत पुरे होते.
शरीरात पचन करणारे, दृष्टीला ताकद देणारे, सर्व जीवनाची उमेद वाढविणारे असते पिवळे पित्त व त्यात असलेला अग्नी. जठराग्नी जसा पित्ताच्या मदतीने पचनाला मदत करतो तसे पित्तातील सूक्ष्मत्व दृष्टीला प्रकाश व ज्ञान देते. पित्ताचे मुख्य स्थान आहे यकृत. अन्न सेवन केल्यानंतर पित्त संतुलित असेल तरच अन्न गिळता येते. अन्न गिळण्यापूर्वीच त्यात पित्ताचे काही पाचक रस मिसळले जातात.
अन्न पुढे आतड्यात जाण्यापूर्वी यकृताच्या पाचक पित्तामुळे संस्कारित होते. पित्त जरासे जरी कमी झाले तरी तोंडात घास घोळायला लागतो वा पित्त वाढल्यास उलटीसारखे वाटायला लागते. अशा त्रासावर उपाय करणे तुलनेने सोपे असते; पण यकृताचे कार्य मंदावण्यामुळे वा जलद होण्यामुळे, यकृतात भोके पडल्यामुळे त्रास उत्पन्न झाला, तर अन्न पचेनासे होऊन हातापायांच्या काड्या होतात.
यकृताला झालेल्या जंतुसंसर्गामुळे पण कावीळ होते. तेव्हा त्यास संसर्गजन्य लक्षण समजून काळजी घ्यावी लागते. कावीळ झाली असता डोळे हलके हलके पिवळे होतात, सर्व गोष्टी पिवळ्या दिसायला लागतात, त्वचा पिवळी दिसायला लागते व घामामुळे कपडेही पिवळे होऊ लागतात.
अस्वच्छ पाणी प्यायल्याने जंतुसंसर्ग होऊन काविळीला तोंड द्यावे लागते.
आधुनिक वैद्यकाप्रमाणे काविळीचे ५-६ प्रकार वर्णन केलेले दिसतात. कावीळ झालेल्या रुग्णापासून फार सांभाळून राहावे लागते; कारण त्याची लागण एकाकडून दुसऱ्याला लगेच होऊ शकते. कावीळ झालेल्या व्यक्‍तीचे रक्‍त प्रयोगशाळेत तपासणीसाठी आले असता तपासणाऱ्याचा कावीळ होऊन मृत्यू ओढविल्याच्या घटनाही ऐकिवात आहेत.
चष्मा लावावा तसे जग दिसते असे म्हणतात. कावीळ झाली असता सर्व पिवळे दिसायला लागते. हा पीलिया रोग ज्या घरात झालेला असतो, त्या घरातल्यांचे मात्र डोळे पांढरे व्हायची वेळ आलेली असते.
कावीळ बरी करण्याचा प्रयत्न केला तरी ती पुन्हा उलटू शकते.
पथ्य व विश्रांतीच्या बाबतीत नीट काळजी घेतली नाही तर हा रोग उलटतो. या रोगाचे अनेक प्रकार असतात. प्रकारानुसार वेगवेगळ्या पद्धतीने इलाज करावे लागतात व औषधयोजनाही व्यवस्थित करावी लागते. कावीळ बरी झाल्यानंतर काही महिन्यांपर्यंत कावीळ उलटणार नाही, याकडे लक्ष द्यावे लागते.
काविळीवरचा अत्यंत साधा व सोपा इलाज म्हणजे कपभर निरशा गाईच्या दुधात ५-६ एरंडाच्या ताज्या पानांचा रस मिसळून सकाळी सूर्योदयापूर्वी ३-४ दिवस घेणे, यामुळे काविळीला उतार पडतो. ही औषधयोजना चालू असताना दूध-भातासारखा साधा आहार ठेवावा. याने खूप जणांना बरे वाटते. असा अनुभव असला तरी काविळीचा प्रादुर्भाव झाला तर आधुनिक वैद्यकानुसारही तपासणी अवश्‍य करून घ्यावी. अशा तऱ्हेचा घरगुती उपचार करत असताना डॉक्‍टरांनी रोग्यावर नीट लक्ष ठेवून अपेक्षित परिणाम न दिसल्यास इतर उपचार करावेत. इतर उपचार करत असतानाही पथ्य व विश्रांती महत्त्वाची असतेच.
एकूणच यकृताच्या आरोग्यासाठी बेलाचा मुरांबा वा काढा किंवा सॅन्युदरसारखे आसव घेणे खूप महत्त्वाचे असते. या गोष्टी घेण्याने यकृताची ताकद वाढून काविळीसारखे रोग होत नाहीत. एकूणच यकृताचा अग्नी मंद (डल लिव्हर) होऊ नये किंवा यकृताला जाड्य (फॅटी लिव्हर) येऊ नये म्हणून किंवा पित्ताचा त्रास होणाऱ्यांनी, भूक न लागणाऱ्यांनी अधूनमधून सॅन्युदर आसव, पुनर्सन आसव घेण्याने काविळीला प्रतिबंध करता येऊ शकतो.
कावीळ होण्यास प्रतिबंध होण्यासाठी हात न धुता काही खाऊ नये. वास्तविक नेहमीच, विशेषतः पावसाळ्यात पाणी उकळून, गाळून पिणे इष्ट असते. बऱ्याच वेळी हा रोग साथीसारखा पसरताना दिसतो, अशा वेळी काळजी घेणे खूप आवश्‍यक असते.
एकूणच, सातत्याने रात्रीची जागरणे, तेलकट-तुपकट पदार्थांचे सेवन अति प्रमाणात करणे, अपचन झाले असतानाही खात राहणे असे वागत राहिल्यास काविळीच्या रोगाला आमंत्रण देण्यासारखे असते. बऱ्याच वेळी मांसाहारासारखे जडान्न सवय नसतानाही खात राहण्याने काविळीचा प्रादुर्भाव होऊ शकतो.
बाळ गर्भात असताना आईने चुकीचा आहार घेण्याने किंवा दूषित पाणी पिण्याने बाळाला जन्मतः किंवा जन्मानंतर काविळीचा त्रास होऊ शकतो. मनुष्याचे कर्तृत्व व पुरुषार्थ ज्या पित्तावर अवलंबून असतो त्या पित्ताशी खेळणे फारसे चांगले नसते, म्हणून कावीळ होऊ नये इकडे लक्ष देण्याबरोबरच कावीळ झालीच तर ताबडतोब उपाययोजना करणे आवश्‍यक असते.
- डॉ. श्री. बालाजी तांबे

No comments:

Post a Comment

ad