Monday, June 16, 2008

रसक्रिया, घन आणि अवलेह

रसक्रिया, घन आणि अवलेह


(डॉ. श्री बालाजी तांबे)
चूर्णापेक्षा अधिक कार्यक्षम, अधिक तीक्ष्ण अशा रसक्रिया, घन, अवलेह आदी कल्पनांचाही आयुर्वेदीय औषधकल्पनांत समावेश आहे. ही औषधे कशी तयार केली जातात? त्यांचा वापर करताना काय काळजी घ्यावी? याची माहिती... .......
आयुर्वेदातील औषधसंकल्पनांचा अभ्यास करताना स्वरस, काढे, फांट इत्यादींची माहिती आपण यापूर्वी घेतलेली आहेच. त्या व्यतिरिक्त आहारीय घटकांचा औषध म्हणून कसा उपयोग केला जातो, उपचारांसाठी चूर्णे कशी महत्त्वाची ठरतात, हे ही आपण पाहिले आहे. स्वरस आणि काढे यांवर अधिक अग्निसंस्कार करून पुढे रसक्रिया आणि अवलेह तयार केले जातात. त्यांची माहिती आता घेऊ.

क्वाथादीनां पुनः पाकाद्‌ घनत्वं या रसक्रिया ।
सो।वलेहश्‍च लेहः स्यात्तन्मात्रा स्यात्पलोन्मिता ।।
... शारंगधर

काढा, स्वरस वगैरे कल्पनांचा अग्नीच्या साहाय्याने पुन्हा पाक केला जातो व तयार झालेल्या घट्ट पाकाला रसक्रिया वा अवलेह म्हटले जाते. रसक्रिया आणि अवलेह यातला फरक असा की रसक्रिया नुसता काढा किंवा स्वरसापासून बनवली जाते तर अवलेह हा काढ्यात, रसात साखर किंवा गूळ टाकून बनवला जातो.

साहजिकच रसक्रिया अवलेहापेक्षा अधिक तीव्र असते, त्या त्या द्रव्याचा सारांश असल्याप्रमाणे असते. रसक्रिया घट्ट पाकाच्या स्वरूपात तयार केली जाते. पण बऱ्याचदा घट्ट पाक उन्हात वाळवून त्याचे चूर्ण किंवा गोळी तयार केली जातो. यालाच घन असे म्हणतात. साध्या चूर्णापेक्षा घनाची कार्यकारी शक्‍ती अधिक असते, शिवाय चूर्णापेक्षा घन अल्प मात्रेत काम करू शकतो. अनेक आयुर्वेदिक औषधांमध्ये चूर्णाऐवजी किंवा चूर्णाच्या बरोबरीने घनाचा वापर केलेला सापडतो. घन किंवा रसक्रियेचा रंग साधारणतः गडद असतो, ज्या द्रव्याचा घन बनविला जातो त्या द्रव्याची उत्कट चव व गंध घनाला येतो.

घनाची काही उदाहरणे याप्रमाणे होत.

रसांजन
दारुहळद नावाची एक वनस्पती असते, तिचे कांड आणून भरड केली जाते. तयार भरड चूर्ण रात्रभर पाण्यात भिजवले जाते व दुसऱ्या दिवशी त्याच्यात सोळा पट पाणी घालून मंदाग्नीवर काढा केला जातो. एक सोळांश पाणी शिल्लक राहिले की काढा गाळून घेऊन काढ्याच्या एक चतुर्थांश बकरीचे दूध मिसळून पाक केला जातो.

दार्वीक्वाथमजाक्षीरं पादं पक्वं यदा घनम्‌ ।
तदा रसाञ्जनं ज्ञेयं तन्नेत्रयोः परम हितम्‌ ।।
... आयुर्वेदप्रकाश

दुधासह काढ्याचा पाक घट्ट व्हायला आला की अग्नी देणे बंद केले जाते आणि मोठ्या थाळीमध्ये पसरवून काही दिवस उन्हामध्ये सुकवले जाते. याला रसांजन म्हणतात व ते डोळ्यांसाठी अत्यंत हितावह असते.

नेत्ररोगामध्ये रसांजनाची वर्ती डोळ्यात फिरवली जाते. तर सिरावेध करून रक्‍तमोक्षण केल्यानंतर अधिक रक्‍तस्राव झाला तर तो थांबवण्यासाठी उडीद, जव, गव्हाच्या पिठासह रसांजनाचा लेप रक्‍तस्राव होणाऱ्या ठिकाणी दाबून लावला जातो. बाजारात तयार रसांजन मिळते. पण, त्याच्या पाठाविषयी व शुद्धतेविषयी खात्री करून घेणे आवश्‍यक असते.

काळा बोळ
कोरफडीच्या गरापासून तयार केलेली रसक्रिया म्हणजे काळा बोळ होय. कोरफडीच्या ताज्या पानातील गर वेगळा केला जातो. हा गर लोखंडाच्या कढईत घेऊन त्याला मंदाग्नी दिला जातो. जेव्हा तो घट्ट, चिकट व्हायला लागतो तेव्हा मोठ्या ताटामध्ये पसरवून १० दिवस कडक उन्हात सुकविला जातो. तयार झालेला काळा बोळ दिसायला चकचकीत काळा व तोडल्यास सहज तुटणारा असतो. चांगल्या प्रतीच्या काळ्या बोळाला तीक्ष्ण चव व तीक्ष्ण वास असतो.

काळा बोळ सेवन करताना जिभेला किंवा दाताला लागू देऊ नये, असा वृद्ध वैद्य आदेश आहे. त्यामुळे गर्भाशयाची शुद्धी करण्यासाठी, बाळंतपणानंतर काळा बोळ देतात तो गुळाने वेष्टलेला असावा लागतो.

उंबराची रसक्रिया
उंबराच्या पानांपासून वरील पद्धतीने तयार केलेली रसक्रिया व्रण भरून येण्यासाठी अतिशय प्रभावी औषध होय. जखमेमुळे सूज आली असता किंवा मुका मार लागल्यामुळे वेदना होत असता, गळू, नखुरडे वगैरे झाले असता त्यावर रसक्रिया मलमाप्रमाणे लावल्यास किंवा पाण्यात मिसळून त्याची घडी ठेवल्यास वेदना शमतात, सूज उतरते, गळू वगैरे नवीन असल्यास बसून जातात, अन्यथा फुटून बरे होतात.

गुडूची घन
ताज्या हिरव्या गुडूचीचे अंगठ्याएवढे जाड कांड घ्यावे, स्वच्छ धुवावे व त्याचे छोटे तुकडे करून बारीक करून घ्यावे. लोखंडाच्या भांड्यात गुडूचीच्या सोळा पट पाणी घेऊन ते एक चतुर्थांश उरेपर्यंत उकळून काढा करावा. काढा तयार झाला की भांडे अग्नीवरून उतरवून ठेवावे आणि काढा गार झाला की हाताने कुस्करून गुळवेल काढून टाकावी. उरलेला काढा गाळून घ्यावा. काढा घट्टसर होऊ लागला की ताटात काढावा, उन्हामध्ये वाळवून गोळ्या तयार कराव्यात. किंवा घन चूर्ण तयार करावे.

याचप्रकारे शतावरी, अश्‍वगंधा, गोक्षुर अशा अनेक वनस्पतींचा घन बनविता येतो. जी द्रव्ये मृदू व सुगंधी असतात, ज्या द्रव्यांना उष्णता देता येत नाही, अशा द्रव्यांचा घन बनवला जात नाही. घन कल्पना चूर्णापेक्षा अधिक कार्यक्षम असते, तशीच चूर्णापेक्षा अधिक तीक्ष्णही असते. त्यामुळे लहान मुलांना, नाजूक प्रकृतीच्या व्यक्‍तींना घन देताना योग्य प्रमाणात देण्याची खबरदारी घ्यावी लागते.

- डॉ. श्री बालाजी तांबे

No comments:

Post a Comment

ad