Friday, July 24, 2009

अन्नयोग - वडे

औषध कितीही उत्कृष्ट असले तरी ते योग्य आहाराशिवाय रोग बरा करू शकत नाही. म्हणूनच आहाराला "महाभैषज्य' किंवा "मोठे औषध' असे म्हटलेले आहे.
आरोग्यरक्षण आणि रोगनिवारण हे आयुर्वेदाचे दोन मुख्य हेतू होत. हे दोन्ही हेतू साध्य करण्यासाठी अन्नयोग महत्त्वाचा असतो. कारण योग्य आहार, योग्य प्रकारे बनविलेले अन्न आरोग्य तर टिकवितेच, शिवाय अनेक रोगांमध्ये औषधाप्रमाणे उपयोगीही असते. काश्‍यपसंहितेत खालील सूत्र याला दुजोरा देणारे आहे,
भेषजो न उपपन्नो अपि निराहारो न शक्‍यते ।
तस्मात्‌ भिषग्भिः आहारो महाभैषज्यं उच्यते ।।
...काश्‍यपसंहिता
औषध कितीही उत्कृष्ट असले तरी ते योग्य आहाराशिवाय रोग बरा करू शकत नाही. म्हणूनच आहाराला "महाभैषज्य' किंवा "मोठे औषध' असे म्हटलेले आहे.
अर्थात औषध म्हणून उपयोगी पडणारे अन्न आयुर्वेदिक संकल्पनेतून बनवलेले हवे. यासाठी आयुर्वेदाने अन्नयोग सांगितला. घटकद्रव्यांचे गुणधर्म माहिती करून घेणे ही अन्नयोगाची पहिली पायरी, तर घटकद्रव्यांवर योग्य संस्कार करून त्यापासून खाण्यास योग्य अन्न तयार करणे ही अन्नयोगाची दुसरी पायरी होय. आयुर्वेदात तयार अन्नाला "कृतान्न' असे म्हटले आहे. कृत म्हणजे संस्कृत, तेव्हा संस्कारांनी तयार झालेले अन्न म्हणजे "कृतान्न'- जे सेवन करण्यास योग्य असते.
आज आपण काही निवडक आयुवदोक्‍त कृतान्नाची माहिती घेणार आहोत.

वटक (वडे)
पिष्टिकां युक्‍तां लवणाद्रकहिंगुभिः ।
कृत्वा विदध्यात्‌ वटकांस्तांस्तैलेषु पचेत्‌ शनैः ।।
संचूर्ण्य निक्षिपेत्‌ तक्रे भृष्टजीरकहिंगुभिः ।
लवणं तत्र वटकान्‌ सकलानपि मज्जयेत्‌ ।।
...भावप्रकाश
उडदाच्या पिठात मीठ, आले, हिंग व पाणी टाकून पीठ मळावे. त्याचे गोल वा चपटे वडे तयार करावे व तेलात तळावेत. तळलेले वडे बारीक करून ताकात टाकावेत व बारीक केलेले जिरे, हिंग, मीठ मिसळून खावेत.
असे वडे मुगाच्या पिठाचेही बनवता येतात. उडदाचे वडे शुक्रजनक, बलकारक, वातनाशक, कफकारक व दाह करणारे असतात. मुगाचे वडे मात्र उडदाच्या वड्यापेक्षा पचायला सोपे असतात, त्रिदोषांचे शमन करतात व गुणाने थंड असतात.

कुष्मांडवटक
कुष्माण्डं कर्षयित्वास्य जलं निष्कास्य यत्नतः ।
कस्तुम्बुरुनिशामाषचूर्णं सतिलसैन्धवम्‌ ।।
निक्षिप्य वटकाः कार्या आतपे शोषयेत्ततः ।
...भावप्रकाश
कोहळा बारीक चिरून त्याचे पाणी काढून टाकावे. कोहळ्याच्या तुकड्यांमध्ये धणे, तीळ, हळद, उडदाचे पीठ, मीठ ही द्रव्ये योग्य प्रमाणात घालून पीठ घट्ट मळावे. तयार झालेल्या पिठाचे लहान सुपारीच्या आकाराचे वडे तयार करून उन्हात वाळवावेत.
हे वाळलेले वडे तेलात तळले असता रुचकर लागतात. ते वातशामक असतात.

चंद्रहासा लापशी
तप्ते घृते तत्समानं सितं गोधूमचूर्णकम्‌ ।
क्षिप्त्‌वा दर्व्या सुनिर्वर्त्य तत्समां क्षीरशर्कराम्‌ ।।
गालितां शुद्धवस्त्रेण तस्मिश्‍चूर्णे विनिक्षिपेत्‌ ।
न्दाग्नौ विपचेत्‌ तावत्क्षीरं पीत्वा घृतं क्षरेत्‌ ।।
पश्‍चात्‌ चंद्रमरीचैलाचूर्णं क्षिप्त्‌वा विलोडयेत्‌ ।
उत्तार्यं भक्षितो ।
...निघण्टु रत्नाकर
तापलेल्या साजूक तुपात सम प्रमाणात गव्हाचा शुभ्र रवा घालून परतावा. रवा व तुपाच्या सम प्रमाणात साखर दुधात मिसळावी व ते दूध वस्त्रातून गाळून घ्यावे. परतलेला रवा दुधात टाकून मंद अग्नीवर शिजण्यास ठेवावे. दूध आत जिरून तूप सुटे होऊ लागेपर्यंत अग्नीवर ठेवावे. नंतर त्यात वेलची, मिरी, केशर, कापूर वगैरे द्रव्यांचे चूर्ण टाकून खाली उतरवून खायला द्यावे.
ही चंद्रहासा लापशी शुक्रपोषक, कामोत्पादक, बलदायक, धातुवर्धक, कफकारक असते, पित्त व वातदोषाचा नाश करते, पचायला जड असते.

दधिपूपक
तण्डुलानां पिष्टिकां तु दध्ना संमर्द्य कारयेत्‌ ।
वटकान्वर्तुलाकारान्घृते पक्‍त्वोद्धरेत्‌ ततः ।।
ज्जयेत्‌ शर्करापङ्‌के ते वृष्या धातुवर्धकाः ।
रुचिदा वातपित्तघ्नाः कफपुष्टिप्रदा मताः ।।
...निघण्टु रत्नाकर
तांदूळ धुऊन घ्यावेत. वाळले की त्यांचे पीठ करावे. या पिठात दही घालून मळावे व वडे करून तुपात तळावे. तळलेले वडे साखरेच्या पाकात बुडवावेत व खावेत.
हे दधिपूपक शुक्रवर्धक, कफकारक व वजन वाढविणारे आहेत. हे अतिशय रुचकर असतात आणि वात व पित्तदोष कमी करतात.
डॉ. श्री बालाजी तांबे

No comments:

Post a Comment

ad