Friday, July 24, 2009

अन्नयोग


आपण शिम्बी धान्याचे गुण पाहत आहोत. शिम्बी म्हणजे शेंग. शेंगेत तयार होणाऱ्या कडधान्यांचा व त्यापासून केलेल्या डाळींचा समावेश शिम्बी वर्गात होतो.
चवळी
संस्कृतात उडदाला माष म्हणतात तर चवळीला राजमाष म्हणतात.
राजमाषः सरो रुच्या कफशुक्राम्लपित्तनुत्‌ ।
तद्‌ स्वादुर्वातलो रुक्षः कषायो विशदो गुरुः ।।
...चरक सूत्रस्थान
चवळ्या पचायला जड, रुक्षता उत्पन्न करणाऱ्या व वात वाढविणाऱ्या असतात, शुक्रधातूचा क्षय करतात, कफदोषही कमी करतात, चवीला गोड, तुरट असून रुचकर असतात, तसेच सारक असतात.
ओला हरभरा
आमस्तु चणकः शीतो रुच्यश्‍च तुवरो मधुः ।
तपर्णो कफकरो धातुवृद्धिकरो गुरुः ।।
किञ्चित्कटुस्तृषादाहशोषाश्‍मरिविनाशकः।
...निघंटु रत्नाकर
ओला म्हणजे ताजा हरभरा रुचकर, चवीला गोड, किंचित तुरट असतो, वीर्याने शीत असतो, पचायला जड असतो मात्र कफ वाढवतो, धातूंची वृद्धी करतो, शरीराला तृप्त करतो, तहान, दाह, शोष व मूतखडा यांचा नाश करतो.
चणे
वाळलेले हरभरे म्हणजे चणे मात्र शरीरात रुक्षता उत्पन्न करतात.
चणको वातलः शीतो लघु रुक्षः कषायकः ।
विष्टम्भी मधुरो रुच्यो वर्ण्यो बल्यो ज्वरापहः ।।
चणे वात वाढवितात, मलावष्टंभ करतात, चवीला गोड व तुरट असतात, रुचकर असतात, वीर्याने शीत असतात, पचले असता ताकद वाढवितात. चण्याचे पीठ बाह्यतः वापरले असता वर्णासाठी हितकर असते.
चण्याची डाळ
चण्याची डाळसुद्धा वात वाढविणारी असते.
चणकानां दलं चाम्लं किञ्चित्‌ वातप्रकोपणम्‌ ।
स्तंभकरं रुच्यं तर्पणं चाग्निकारकम्‌ ।
कफनाशकरं प्रोक्‍तम्‌ ।।
चण्याची डाळ किंचित आंबट असते, वाताचा प्रकोप करते, मलावष्टंभ करते, कफाचा नाश करते, रुचकर असते, अग्नी वाढविते, शरीराला तृप्त करते.
सुके चणे भाजले की फुटाणे तयार होतात. हे वीर्याने उष्ण असतात, चण्यांपेक्षा पचायला सोपे असतात; मात्र शरीरात रुक्षता उत्पन्न करतात व वाताचाही प्रकोप करतात.
वाटाणे
कलायो वातलो रुच्यः पुष्टिकृत्‌ शीतलो मतः ।
पाके च मधुरः प्रोक्‍तः तुवरश्‍चामदोषकृत्‌ ।
वाटाणे वातुळ, रुचकर, शरीराला पुष्टी देणारे असतात. वीर्याने शीतल व विपाकानंतर मधुर असले तरी आमदोष वाढविणारे असतात.

- डॉ. श्री बालाजी तांबे

No comments:

Post a Comment

ad