Wednesday, December 5, 2012

लग्न तुळशीचे


लग्न तुळशीचे
डॉ. श्री बालाजी तांबे
विवाह म्हणजे केवळ एक धार्मिक वा सामाजिक विधी नसून, स्त्री व पुरुष- दोघांना पूर्णत्वाचा अनुभव येण्यासाठी, दोघे एकरूप होऊन निसर्गचक्र चालू राहण्यासाठी हा विधी केला जातो. संस्कारांची व्यवस्थित जाणीव व्हावी आणि तुळशीपासूनचे आरोग्याचे फायदेही मिळावेत, या हेतूने तुळशीचे बाळकृष्णाबरोबर किंवा शालिग्रामरूपी विष्णूबरोबर लग्न लावून देण्याचा उत्सव सुरू करण्यात आला. तुळशीचे लग्न ही संकल्पना राबवून भारतीय संस्कृतीने खरोखरच लोककल्याण व आरोग्यशास्त्र यात आपले श्रेष्ठत्व अबाधित राखले आहे. 
आश्‍विन व कार्तिक हे शरद ऋतूचे दोन महिने संपत आले की हेमंत ऋतूचे आगमन होण्याचे व त्याबरोबर विवाहाचे मुहूर्त सुरू होण्याचे वेध लागतात. विवाह म्हणजे केवळ एक धार्मिक वा सामाजिक विधी नसून, स्त्री व पुरुष- दोघांना पूर्णत्वाचा अनुभव येण्यासाठी, दोघे एकरूप होऊन निसर्गचक्र चालू राहण्यासाठी हा विधी केला जातो. उत्तम संतानप्राप्तीसाठी योग्य वेळ मिळण्याच्या दृष्टीने हेमंत ऋतूची योजना केलेली असावी. उत्तम संतानप्राप्ती यावरून स्त्री-पुरुषांचे लक्ष उडून जाऊ नये व केवळ शरीरसुख, कामनातृप्ती एवढ्यावरच समाधान मानून स्त्री-पुरुषांनी एकत्र राहू नये, यासाठी संस्कारांचा बराच भर दिलेला दिसतो. या सर्वांची व्यवस्थित जाणीव व्हावी अशा हेतूने तुळशीचे बाळकृष्णाबरोबर किंवा शालिग्रामरूपी विष्णूबरोबर लग्न लावून देण्याचा उत्सव सुरू करण्यात आला.

प्रत्येक अणुरेणूत असलेली आदिशक्‍ती जागृत होण्याच्या दृष्टीने साध्या कृष्णमूर्तीत वा शालिग्राम शिळेत असलेले देवत्व व शक्‍ती प्रकट करण्यासाठी विविध वनस्पतींचा, तुळशीच्या झाडाचा उपयोग करून घेतला जातो. पुरुषाची व स्त्रीची कर्तृत्वशक्‍ती व असलेली सुप्त आत्मशक्‍ती दोघांच्या मिलनात एकमेकांना पूरक ठरून जागृत व्हावी असे सांगणारा हा तुळशीविवाहाचा उत्सव.

त्यामागची कथा अशी. वृंदा नावाच्या एका स्त्रीला श्रीकृष्णांशी लग्न करायचे होते, पण ती विवाहित होती. ""कलियुगात तू तुळशीच्या रूपात प्रकट होशील, तेव्हा तुझे माझ्याशी लग्न होईल,'' असा श्रीकृष्णांनी तिला वर दिला. म्हणून कार्तिक महिन्यात एकादशीपासून त्रिपुरारी पौर्णिमेपर्यंत श्रीकृष्ण व तुळस यांचे लग्न लावण्याची पद्धत रूढ आहे.

कन्यादानाचे पुण्य ही कथा हा विषय सविस्तर समजावत असली तरी आता पावसाचा मंदाग्नीचा ऋतू संपून शरदाच्या व हेमंताच्या आगमनाबरोबर स्त्री-पुरुषांच्या मिलनासाठी उत्तम काळ असल्याची सूचना हा उत्सव देतो. त्यातून पुढे अत्यंत नैसर्गिक पद्धतीने आरोग्यवान संतती प्राप्त होऊ शकेल, ही सूचनाही देतो. गर्भसंस्कारांना भारतीय परंपरेने, भारतीय आरोग्यशास्त्राने किंवा वेदासारख्या भारतीय जीवनशास्त्रांनी किती महत्त्व दिलेले आहे हे आपल्या सर्वांना माहिती आहेच.

कन्यादानाचे पुण्य मोठे असते व देणाऱ्याचा हात वर असतो, हे लक्षात घेतले तर स्त्रीचे महत्त्व किती जास्त आहे हे भारतीय परंपरेतील लग्नामुळे समजते. तसेच त्या निमित्ताने सर्व उत्सवांमध्ये हा एक मोठा प्रसंग प्रत्येकाला करता यावा म्हणून ज्यांना आपल्या घरात लग्नविधी करण्याचा योग नसेल त्यांच्यासाठी तुळशीचे लग्न करण्याची अमूल्य संधी असते.

सर्व व्हायरस, दुष्ट शक्‍ती, विषारी वायू, संकटे यांना बाहेर थोपवून धरणारी तुळस प्रत्येक भारतीयाच्या दारात उभी असते. शिवाय सर्दी, पडसे, ताप अशा बारीकसारीक तक्रारींवर उपयोगी पडणारी तुळस बहुमूल्य असून, ती पूजनीय ठरते. स्त्रियांच्या हॉर्मोनल संस्थेवर काम करत असल्याने तुळशीचे महत्त्व त्यांच्या लेखी अधिकच असते. त्यांना या वनस्पतीच्या सहवासाचा अधिक फायदा व अधिक परिणाम होत असावा असे वाटते.
मोठ्या चौसोपी वाड्यात मागच्या-पुढच्या अंगणात तुळशीवृंदावन असणे हे सौंदर्याचे व मांगल्याचे प्रतीक असते. पण दोन खोल्यांमध्ये राहणाऱ्यांसाठीसुद्धा दारासमोर छोट्या शिंकाळ्यात तरी तुळस लावलेली असते. साधारणतः तुळशीवर आम जनता प्रेम करताना दिसते.

तुळशीपत्राचे महत्त्व 

आरोग्य संतुलित ठेवण्यासाठीची तुळशीचे उपयोग सर्वज्ञात आहेत. त्या दृष्टीनेही दारात-अंगणात तुळशीचे झाड असणे महत्त्वाचे ठरते. अन्नावर तुळशीचे पान ठेवण्याने त्या ठिकाणी दुष्ट शक्‍तींचे तरंग व जीवजंतू येत नाहीत. म्हणून प्रसादावर तुळशीचे पान ठेवले जाते. दान देताना वर तुळशीपत्र ठेवण्याची पद्धत त्यातूनच रूढ झालेली आहे. एखादी व्यक्‍ती सर्व सोडून जेव्हा जाते तेव्हा त्या व्यक्‍तीने सर्व संपत्तीवर तुळशीपत्र ठेवले असे म्हटले जाते. याच्या मागे दुसरेही एक कारण असे, की श्रीकृष्णांची सुवर्ण व रत्न यांच्या वजनाने तूला करत असताना तुळशीच्या पानाचे महत्त्व संपत्तीपेक्षा अधिक असते, हे सिद्ध झाले. विष्णू ही देवता शरीरातील चेतासंस्थेशी संबंधित असते आणि म्हणूनच तुळशी विष्णूला व श्रीकृष्णांना प्रिय समजली जाते. तुळशीचे लग्न ही संकल्पना राबवून भारतीय संस्कृतीने खरोखरच लोककल्याण व आरोग्यशास्त्र यात आपले श्रेष्ठत्व अबाधित राखले आहे. 

Ayurveda, Vastu shastra, healthy Food, Healthy Living, Abstract India, Shree Balaji Tambe, India, Yoga, Meditation, Life Style, Marathi Blog, Marriages, Love

No comments:

Post a Comment

ad