डॉ. उल्हास कोल्हटकर |
इतिहास : वास्तविक पाहता ‘श्वासा’चे अनन्यसाधारण महत्त्व भारतीय दर्शनांनी विशेषत: योगाने फार पूर्वीच जाणले होते, असे म्हटल्यास ते वावगे ठरणार नाही. किंबहुना श्वास व त्याचे नियंत्रण (प्राणायाम) हा शरीर व मन यांना जोडणारा ‘सेतू’ आहे अशीच पूर्वसुरींची धारणा होती व म्हणून ‘श्वसनशुद्धी’ला अनन्यसाधारण महत्त्व होते. शरीराच्या विविध क्रियांपैकी काहींवर आपले ‘ऐच्छिक’ नियंत्रण असते तर काही आपोआप घडतात. (Reflex, Involuntary of Autonomous!!) हात हलवून चहाचा कप उचलणे ऐच्छिक (Voluntary) तर हृदयस्पंदने आपोआप (Involuntary) पण ‘श्वास’ ही सर्वसाधारणपणे एकच अशी क्रिया आहे, की जी एकाच वेळी ऐच्छिक नियंत्रणाखाली असू शकते (जसे आपण जलद श्वसन करू शकतो वा इच्छेप्रमाणे संथ, दीर्घ श्वसन करू शकतो.) वा जो पूर्णपणे प्रतिक्षित असू शकते (जसे आपण घाबरल्यास श्वसन आपोआप जलद होते व ध्यानास बसल्यास श्वसन आपोआप संथ व खोल होते.) श्वसनाच्या या खासियतेमुळेच योगशास्त्र, जे एक सवरेत्कृष्ट ‘शरीर-मनोवैद्यक’ 'Body mind Medicine' आहे ते प्राणायामाच्या माध्यमातून उत्कृष्ट श्वसनोपचार साधते व मनावर नियंत्रण आणू पाहते. अन्य प्रतिक्षिप्त क्रिया या पूर्णत: आपल्या ऐच्छिक नियंत्रणाच्या बाहेर असतात; पण श्वसन हीच एक क्रिया इच्छावर्ती व अनिच्छावर्ती अशा दोन्ही मज्जासंस्थांच्या नियंत्रणाखाली असते व म्हणून त्या माध्यमातून संपूर्ण ‘मेंदूवर नियंत्रण आणण्याचा मानवाने प्रयत्न केला आहे. योगी हृदयगती कमी-जास्त करू शकतात वा ‘भूक’ ताब्यात ठेवू शकतात त्याचे हेच रहस्य आहे. मन आणि शरीर, तसेच श्वास-शरीर आणि मन यांचा हा संबंध जसजसा दृगोच्चर होऊ लागला आहे तसतसे चुकीच्या श्वसनाचे विविध दुष्परिणाम स्पष्ट होऊ लागले आहेत व म्हणूनच या विषयातले तज्ज्ञ आज आपणास श्वसनप्रक्रिया (विशेष करून उच्छ्वास) परत शिकण्यास सांगतात.
शास्त्रीय बैठक : अगदी छोटय़ा बाळांमध्ये आपल्याला उरोश्वसन (Chest berathing) आणि उदरश्वसन (Abdominal berathing) अशा दोन्ही क्रिया सहजपणे व तालबद्धरीत्या चाललेल्या दिसतात; पण आपण हळूहळू या दोहोंतील ताल विसरत जातो, तसेच प्रामुख्याने उरोश्वसन व तेही उध्र्व उरोश्वसन (Upperchest Brcathina) करीत राहतो साहजिकच श्वसनाच्या ‘उथळ’ पातळीवरच राहतो व या अशा दीर्घकालीक चुकीच्या श्वसनामुळे अनेक बिघाडांना उदा. सततची दमणूक, डोकेदुखी- मानदुखी- पाठदुखी, ताणतणाव, नाहक चिंताग्रस्तता इ. इ. जन्म देतो, असे या विषयातले तज्ज्ञ सांगतात. ताण वाढला, की माणूस अधिकाधिक उरोश्वसन करतो, असेही आढळून आले आहे. या सर्व गोष्टींमुळे शरीरातील कार्बनडाय ऑक्साइड वायू हा अधिक प्रमाणात बाहेर फेकला जातो, त्याचे रक्तातील प्रमाण कमी झाल्याने रक्त अधिक अल्कलाइन होते. रक्ताची आम्लता कमी झाल्याने Bohr effect मुळे हिमोग्लोबीनपासून ऑक्सिजन सुटून पेशींना उपलब्ध होण्याच्या क्रियेत अडथळा होतो, तसेच रक्तवाहिन्या आकुंचित होऊन, विविध अवयवांना व पेशींना होणारा रक्तपुरवठाही कमी होतो. याचा अधिक परिणाम ऑक्सिजन व ग्लुकोज वर अतिरिक्त प्रमाणात अवलंबून असणाऱ्या मेंदूवर होतो व त्याचे कार्य बिघडते. या सर्व दुष्परिणामांना `Brain Fog' असे संबोधण्यात येते. या धुक्याने ग्रस्त मेंदूमुळे आपली संवेदनशीलता कमी होते; ‘मूड’ सतत बिघडत राहतो व परिघ मज्जासंस्था (Peripheral Nervous system) अतिसंवेदनशील होऊन सतत मुंग्या येणे, दुखणे अशा तक्रारी निर्माण होतात; स्नायू लवकर दमतात, पोटाच्या स्नायूंवर परिणाम झाल्याने वारंवार शौचाची भावना होते. (Irritable Bowel syndrome) एखाद्या विशिष्ट अन्नघटकाची अॅलर्जी वाढीस लागते व श्वसनाच्या स्नायूंवर अतिरिक्त ताण आल्याने मान, खांदे व वरची पाठ दुखू लागते, असे या विषयातले तज्ज्ञ सांगतात. काही वेळा या 'Brain Fog' चे पर्यवसन घबराटीत (Panic attacks) किंवा फोबियातही होताना दिसते. हे सर्व टाळावयाचे असेल तर आपल्या श्वसनाच्या गुणवत्तेत बदल घडवून आणावयास हवा, असे हे तज्ज्ञ सांगतात. चुकीच्या श्वसनामुळे निर्माण होणाऱ्या या सर्व शरीरमनाच्या बिघाडांना श्वसन अकृतीबंधातील बिघाड Breathing Pattern Disorders (B.P.D.) असे संबोधण्यात येतो.
नेमके काय करावयास हवे?
श्वसन सुधारण्याचा एक उत्तम उपाय म्हणजे ‘प्राणायाम’ तंत्र शिकणे. (अर्थात योग्य श्वसन हा प्राणायामाचा फक्त एक आयाम आहे हे येथे प्रकर्षांने ध्यानात घ्यावे.) या व्यतिरिक्त शरीरातील विविध भागांचे, अवयवांचे शिथिलीकरण करून, श्वासावर लक्ष केंद्रित करून, श्वसन सुधारण्याची अनेकविध तंत्रे आज उपलब्ध आहेत. तज्ज्ञांच्या मार्गदर्शनाखाली व आपापल्या प्रकृतीनुसार व आवडीनुसार आपण यांचा अवलंब करू शकतो.
* प्राणायाम : प्राणायाम म्हणजे काही मर्यादित अर्थाने, नियंत्रित श्वासोच्छ्वास! जाणीवपूर्वक श्वासोच्छ्वासाची प्रक्रिया बदलणे म्हणजे प्राणायाम. योगाच्या भाषेत श्वास आत घेण्याच्या क्रियेला पूरक, उच्छ्वासाच्या क्रियेला रेचक तर दोहोंच्या मध्ये खास थांबविण्याच्या प्रक्रियेला कुंभक म्हणतात. या पूरक रेचकाच्या तालावर नियंत्रण आणून, आपण श्वासोच्छ्वास ज्या नाकपुडय़ांतून करतो त्यांच्या बदलावर नियंत्रण आणून (उजवी, डावी किंवा दोन्ही नाकपुडय़ा) प्राणायाम साधता येतो. थोडक्यात अतिशय शास्त्रोक्त पद्धतीने आपण प्राणायामाच्या रुपाने श्वसन प्रशिक्षण घेऊन श्वसन सुधारू शकतो. अर्थात या संज्ञा येथे श्वासोच्छ्वासाच्या भाषेत समजाविल्या असल्या तरी सूक्ष्म अर्थाने त्यांचा अंतिम संबंध प्राणशक्तीशी म्हणजे चैतन्य शक्तीशी व प्राणमय कोशाशी आहे हे ध्यानात ठेवणे महत्त्वाचे.)
* श्वसन प्रशिक्षण : चुकीची श्वसन पद्धती आपल्या इतकी अंगवळणी पडलेली असते, की ती विसरून योग्य पद्धत शिकण्यासही कित्येक वेळा सहा-सहा महिने लागू शकतात. यात मुख्य भर हा पूर्ण उच्छ्वासावर असतो, तसेच श्वसनाचे मुख्य तसेच पूरक स्नायू शिथिलीकरणावर व ‘श्वसनभान’ आणण्यावरही भर दिला जातो. अशीच एक साधी-सोपी पद्धत वर चौकटीत दिली आहे
‘साँसों की जरूरत है जिंदगी के लिये..’ असे एका गाजलेल्या हिंदी गाण्यात म्हटले आहे ते किती खरं आहे व त्या दृष्टीने श्वासोपचारांचे महत्त्व एव्हाना वाचकांच्या ध्यानात आले असेलच.
श्वसन व्यायाम
* हात असलेल्या एखाद्या खुर्चीवर आरामात बसा. आपले हात खुर्चीच्या हातांवर सहजपणे विसावू द्या.
* कोपराने बाहूंवर हलकासा दाब द्या, यामुळे श्वासोच्छ्वास करताना मानेचे वा खांद्याचे स्नायू तुम्ही साहजिकच वापरू शकणार नाही.
* नेहमीप्रमाणे श्वास घेतल्यावर ओठ अलगद विलग करा आणि हळुवारपणे तोंडाने उच्छ्वास करा.
* ओठ परत बंद करा, क्षणभर थांबा आणि सावकाश श्वास आत घ्या.
* उच्छ्वास पूर्ण व दीर्घ झाला, की श्वास आपोआपच खोल व पूर्ण घेतला जातो.
* उच्छ्वास, श्वासापेक्षा दीर्घ असणे आवश्यक (व योग्यही!) असते.
* हे सकाळ/संध्याकाळ वीस-वीस वेळा करा.
* सुरुवातीस योग्य मार्गदर्शनाखाली व अगदी घडय़ाळ लावून हा श्वसन अभ्यास करावा. हळूहळू ते सहज साधले जाईल.---- Ayurveda, Vastu shastra, healthy Food, Healthy Living, Abstract India, Shree Balaji Tambe, India, Yoga, Meditation, Life Style, Marathi Blog
No comments:
Post a Comment