Tuesday, December 8, 2009

जुलाब होणे

मलप्रवृत्ती वारंवार होते व मळ पातळ असतो तेव्हा जुलाब झाले असे म्हणतात. जुलाब होण्याची बरीच कारणे असतात. काही जिवाणू व विषाणू यांचे दाह होणे ही कारणे प्रामुख्याने असतात. जुलाब होत असताना अधिक तंतू (चोथा) असणारे अन्नघटक टाळावेत. उलटपक्षी, मलावरोध होत असताना फळे व भाज्या विपुल घ्याव्यात. मसाले व मिरची टाळणे उत्तम.
- डॉ. ह. वि. सरदेसाई.


चांगल्या प्रकृतीत माणसाला शौचाला होताना मळ बांधून विसर्जित होतो, तो 250 ग्रॅम्स एवढा असतो. जेव्हा मळ 250 ग्रॅम्सपेक्षा जास्त असतो, मलप्रवृत्ती वारंवार होते व मळ पातळ असतो तेव्हा जुलाब झाले असे म्हणतात. जुलाब होण्याची बरीच कारणे असतात. काही जीवाणू व विषाणू यांचे दाह होणे (Bacterial and vival lifections) ही कारणे प्रामुख्याने असतात. आपल्या जठरात हायड्रोक्‍लोरिक ऍसिड तयार होते. काहीही कारणाने हे हायड्रोक्‍लोरिक ऍसिड कमी निर्माण झाले, की हे जीवाणू व विषाणू लहान आतड्यात जातात व आजार होतात. जठराच्या अनेक आजारांत व ऍसिड तयार होऊ नये म्हणून वापरलेल्या औषधांमुळे (रॅमिटिडीन ओमेप्रेझॉल) असे घडते.

जुलाबामुळे शरीरातून पाण्याचा निचरा होणे स्वाभाविक आहे. असा निचरा प्रमाणाबाहेर झाल्यास मोठाच धोका निर्माण होतो. लहान मुलांत (अर्भक) होणाऱ्या मृत्यूच्या कारणांत जुलाबामुळे निर्माण झालेली पाण्याची कमतरता (डी-हायड्रेशन) हे महत्त्वाचे कारण असते. अशा वेळेस तोंडाने पाणी असणारे द्रव्य देणे (जल-संजीवनी) आवश्‍यक आहे. 20 ग्रॅम्स (पाच चमचे चहाचे) ग्लुकोज (किंवा 40 ग्रॅम साखर), पाऊण ते एक चमचा मीठ, 1.5 ग्रॅम्स पोटॅशियम क्‍लोराईड (किंवा एक लिंबू अथवा ताज्या फळाचा रस) व खाण्याचा सोडा अर्धा चमचा, असे एक लिटर उकळून थंड केलेल्या पाण्यात मिसळून चमचा चमचा तोंडाने भरवावे. ज्या वेळेस दर सहा तासांत 300 मिलिलिटर (125-400) लघवी होऊ लागते तेव्हा शरीरात पाण्याचा साठा पुरेसा झाला आहे, असे समजावे. भाताची पेज (कांजी) देणे उपयुक्त आहे. पाणी, फळांचे रस, नारळाचे पाणी, गाळलेले सूप (clear soups), मीठ, मधपाणी व गूळपाणी यांचा वापर हळू हळू सुरू करावा. डाळी, उसळी, मिरची, मसाले, पालेभाज्या, शेंगदाणे यांचा वापर काही काळ थांबवावा. दिवसभरात 1200 मिलिलिटर एवढी लघवी होऊ लागल्यास नेहमीचा आहार सुरू करता येतो.

जुलाब होण्याची बरीच कारणे असू शकतात. तीन-चीर दिवसांत जुलाब होणे थांबले नाही तर तपासण्या करण्यास पर्याय नाही. सुरवातीला मळाच्या नमुन्याची (Routine stool) तपासणी आवश्‍यक असते. आतड्यात होणाऱ्या परोपजीवी एकपेशीय जंतूंच्या दाहाचे निदान या तपासणीत कळते व त्यावर योग्य तो उपचार लगेच करता येतो. शौचात रक्त व आव सापडणे ही महत्त्वाची लक्षणे असतात. सहसा ताजे (लाल रंगाचे) रक्त व आव सापडणे ही मोठ्या आतड्याच्या आजाराची लक्षणे असतात. अशा रुग्णाला थोडी थोडी वारंवार शौचाला होते व पोटाच्या खालच्या उजव्या व डाव्या बाजूला कळा येतात. ऍमिबिक डिसेंट्री, जियार्डियामिक किंवा ट्रायकोमोनॉस जंतूमुळे हे त्रास होतात. मोठ्या प्रमाणात मळ बाहेर पडणे व दिवसातून दोन-तीन वेळाच मलप्रवृत्ती होणे, शौचाला कसर होणे, मळाला रंग पांढुरका असणे ही लहान आतड्याच्या आजाराची लक्षणे असतात. लहान आतड्यातून रक्तस्राव झाला तर तो मळाच्या ऑकल्ट बुड या तपासणीतून कळू शकतो. मोठ्या प्रमाणात (175 मिलिलिटरपेक्षा जास्त) रक्तस्राव झाल्यास (जठरातून किंवा लहान आतड्याच्या सुरवातीतून) मळाचा रंग डांबरासारखा काळाभोर होतो. मळ थोडा थोडा, बांधून, खड्यासारखा होणे हे आतड्याच्या शेवटच्या भागातील आजाराचे लक्षण असते. वारंवार परंतु पातळ मळ बाहेर पडणे, याला बरीच कारणे असतात.

मोठ्या आतड्याचा कर्करोग, अनेक जीवाणूंमुळे होणारे दाह, जंत, गव्हात असणाऱ्या ग्लुटेन नावाच्या प्रथिनाचे विघटन न होणे, दूध न पचणे, इत्यादी. वारंवार पाण्यासारखे जुलाब कोलायटिसच्या आजारात होतात. काही आतड्याच्या गाठीमुळे मोठ्या प्रमाणात पातळ जुलाब होतात. कधी कधी मलावरोध झालेल्या व्यक्तीला आतड्याच्या शेवटी खडे साचतात व त्याच्या बाजूने पातळ मळ सरकतो... स्पुरियस डायरिया (spurioun diarrhoy). अशा वेळी एनिमा देऊन सर्व खडे काढणे, हाच महत्त्वाचा उपाय ठरतो. अनेक औषधांनी जुलाब होणे शक्‍य असते. त्यात वेदनाशामक औषधे असू शकतात. स्वादुपिंडाच्या आजारात, आतड्यावर केलेल्या शस्त्रक्रियेनंतर व शरीराच्या इतर आजारांत (उदाहरणार्थ - थायरॉईड ग्रंथीचे कार्य वाढणे) जुलाब होणे संभवते.

इरिटेबल बॉवेल सिंड्रोम या आजारात रुग्णाला वारंवार जुलाब होतात, पोट फुगते. कधी जुलाब आणि अवरोध आलटूनपालटून होतात. पोटात कळा येतात. काही स्त्रियांना मासिक पाळी येण्यापूर्वी ओटीपोट फुगल्याचा त्रास जाणवतो. याचा इरिटेबल बॉवेल सिंड्रोमशी संबंध नसतो. योग्य पथ्य सांभाळणे, हा या विकाराचा उपाय होय. जुलाब होत असताना अधिक तंतू (चोथा) असणारे अन्नघटक टाळावेत. उलटपक्षी, मलावरोध होत असताना फळे व भाज्या विपुल घ्याव्यात. मसाले व मिरची टाळणे उत्तम. अनेकांना गहू पचत नाही, अशा व्यक्तींनी तांदूळ व ज्वारी सेवावी. काही रुग्णांना आतड्यात नेहमी असणाऱ्या जिवाणूंवर गोळ्यांचा उपयोग होतो. कधी कधी आतड्यातून शोषल्या न जाणाऱ्या प्रतिजैविकांचा (उदा.- रिफॅम्फिसिन) चांगला फायदा होतो, परंतु औषधांचे निर्णय तज्ज्ञ व अनुभवी फॅमिली डॉक्‍टरांनीच द्यावेत. या आजारात मानसिकतेचे फार महत्त्वाचे स्थान असते, हे सर्व संबंधितांनी जाणणे महत्त्वाचे असते. 
--
Ayurveda, healthy Food, Healthy Living, Abstract India, Shree Balaji Tambe, India, Yoga, Meditation, Life Style, Marathi Blog

1 comment:

  1. Nice & Thanks because I am Suffering from same Problem last 4 Months

    ReplyDelete

ad