Sunday, September 4, 2011

मंगलमूर्ती व यशाचा मंत्र

डॉ. श्री बालाजी तांबे
कोणतेही काम यशस्वी व्हावे, यासाठी सुरवातीला श्री गणेशाची प्रार्थना करण्याची पद्धत असते. श्री गणेश ही मूलाधारचक्राची देवता होय. मूळ आणि आधार या दोन शब्दांपासून मूलाधार शब्द तयार झालेला आहे. कोणत्याही गोष्टीचे मूळ पक्के असले, आधार भक्कम असला, की ती तडीला नेणे शक्‍य असते. अर्थातच मूळ रोवण्यासाठी, मजबूत आधारासाठी पृथ्वी महाभूतासारखे दुसरे तत्त्व नाही. म्हणूनच मूलाधार चक्रात पृथ्वीतत्त्वाचे अस्तित्व असते.

कोणतेही काम यशस्वी व्हावे, यासाठी सुरवातीला श्री गणेशाची प्रार्थना करण्याची पद्धत असते. श्री गणेश ही मूलाधारचक्राची देवता होय. मूळ आणि आधार या दोन शब्दांपासून मूलाधार शब्द तयार झालेला आहे. कोणत्याही गोष्टीचे मूळ पक्के असले, आधार भक्कम असला की ती तडीला नेणे शक्‍य असते. अर्थातच मूळ रोवण्यासाठी, मजबूत आधारासाठी पृथ्वी महाभूतासारखे दुसरे तत्त्व नाही. म्हणूनच मूलाधार चक्रात पृथ्वीतत्त्वाचे अस्तित्व असते.

आपले शरीर पंचमहाभूतांपासून बनलेले आहे हे आपण जाणतोच. पृथ्वीमहाभूताच्या गुणांना साजेसे असे जे काही भाव आहेत. उदा. नखे, हाडे, दात, मांसधातू, त्वचा, मळ, केस, स्नायू, घ्राणेंद्रिय यांना "पार्थिव' शरीरभाव म्हटले जाते. कोणत्याही गोष्टीला आकार देण्याचे कामही पृथ्वी महाभूताचे असते. त्यामुळे शरीरातील अवयवांवर उदा. फुप्फुसे, यकृत, गर्भाशय वगैरेंवरसुद्धा पृथ्वी महाभूताचा प्रभाव असतो. आणि या सर्व शरीरभावांवर मूलाधारचक्राचे नियंत्रण असते. याशिवाय मेरुदंडाच्या टोकाचा खालचा भाग, कंबरेचे हाड, गुप्तेंद्रिये, गर्भाशय, अंडाशय, मलविसर्जनासाठीचे गुद, मलाशय हे भाग मूलाधाराच्या आधिपत्याखाली येतात. मूलाधार चक्रात दोष उत्पन्न झाला तर या अवयवांच्या कार्यात असंतुलन उत्पन्न होऊ शकते. त्याचप्रमाणे या सर्व अवयवांचे आरोग्य व्यवस्थित राहण्यासाठी प्रयत्न केले नाहीत, तर त्यामुळे मूलाधार चक्र असंतुलित होऊ शकते.

गणेशोत्सवाच्या निमित्ताने मूलाधार चक्राशी संबंधित अवयवांचे आरोग्य नीट राहण्यासाठी काय प्रयत्न केले पाहिजेत, हे आपण पाहू या. ज्याच्या आधारे शरीर ताठपणे उभे राहते, त्यात हाडे मुख्य असतात. हाडांमध्येसुद्धा मेरुदंड व कंबरेचे हाड हे अधिकच महत्त्वाचे असतात. मेरुदंडातील मणक्‍यांची झीज झाली किंवा त्यांच्यातील अंतर कमी-जास्ती झाले, तर त्याचा संपूर्ण शरीरावर परिणाम होतो. कंबरेचे हाड झिजले किंवा कंबरेचे हाड व मांडीचे हाड यांच्या सांध्याच्या ठिकाणी झीज झाली, तर उठणे, बसणे, चालणे वगैरे सर्व क्रियांवर मर्यादा येतात, वेदनाही खूप होतात. आयुर्वेदात हाडांवर पृथ्वी, वायू व अग्नी या महाभूतांचा प्रभाव असतो असे सांगितले आहे. दोषांचा विचार करता, हाडे हे वाताचे स्थान असते. म्हणूनच हाडांचे आरोग्य नीट ठेवायचे असेल तर वातशामक आणि पृथ्वीमहाभूतप्रधान अन्नपदार्थ, औषधी द्रव्यांची योजना करावी लागते. त्या दृष्टीने आहारात गहू, खारीक, बदाम, डिंक, दूध, लोणी, तूप यांचा समावेश असणे चांगले असते. अंगाला नियमित तेल लावणे, हेसुद्धा हाडांच्या, सांध्यांच्या मजबूतीसाठी उत्तम असते. शरीरात उष्णता अति प्रमाणात वाढणेसुद्धा हाडांसाठी चांगले नसते. अंगात ताप मुरला किंवा तापाची कसर शरीरात शिल्लक राहिली तर त्यामुळे सांधे दुखू लागतात. उष्णता नियंत्रणात ठेवण्यासाठी पादाभ्यंग, प्रवाळपंचामृत किंवा पित्तशामक व पृथ्वीप्रधान मोती-शंख भस्मापासून बनविलेले कॅल्सिसॅनसारखी औषधे घेणे फायदेशीर ठरते. याउलट उष्णता वाढविणाऱ्या कॅल्शियमच्या गोळ्या घेण्याने हाडातील अग्नी महाभूत बिघडण्याची शक्‍यता अधिक असते. केस, दात, नखे हे बाकीचे शरीरभाव हाडांशी संबंधित असतात. त्यामुळे हाडांची नीट काळजी घेतली की या सर्व गोष्टी निरोगी राहतात.

मांसधातू हा दुसरा पृथ्वीमहाभूतप्रधान शरीरभाव होय. पृथ्वीतत्त्व जसे स्थिर, दृढ, मजबूत असते, तसेच संपन्न मांसधातू, स्नायू, शरीराला स्थिरता, दृढता देण्याचे काम करत असतो. गहू, बदाम, दूध, लोणी, पंचामृत वगैरे आहारद्रव्ये, कवचबीज, शतावरी, अश्‍वगंधा वगैरे औषधद्रव्ये मांसधातूपोषणासाठी उत्तम असतात. त्वचा हा मांसधातूचा उपधातूच असल्याने, या सर्व गोष्टी त्वचेलाही पोषक असतात.

जडत्वाची, स्थिरत्वाची आवश्‍यकता
स्त्रियांच्या बाबतीत गर्भाशय, बीजाशय (ओव्हरी) हे प्रजननसंस्थेतील महत्त्वाचे अवयव मूलाधारचक्राशी संबंधित असतात. आयुर्वेदात गर्भाशयाला जमिनीची उपमा दिलेली आहे. जमिनीत पेरलेल्या बीजापासून जसा वृक्ष तयार होतो, त्याचप्रमाणे गर्भाशयात गर्भाचा विकास होऊन बालक तयार होते. गर्भाशयाचा आकार जरी लहान असला तरी त्याच्यात प्रसरण पावण्याची क्षमता खूप मोठी असते. बाळाचे वाढणारे वजन पेलवण्याची क्षमताही खूप असते. यावरून गर्भाशयाचा आणि पृथ्वीमहाभूताचा संबंधही स्पष्ट होतो. दोन बीजाशयांतून प्रत्येक महिन्याला एक एक बीजांड तयार होत असते. म्हणूनच बीजाशयाचे कामही पृथ्वीमहाभूताच्या संतुलनाशी संबंधित असते. बीजांड तयारच न होणे, वेळेवर तयार न होता उशिरा तयार होणे, गर्भधारणेसाठी सक्षम नसणे या तक्रारी सध्या वाढताना दिसत आहेत.

यावर पृथ्वीमहाभूताची शुद्धी, मूलाधारचक्राचे संतुलन यांसारख्या उपचारांचा उत्कृष्ट उपयोग होताना दिसतो.
मलमूत्रविसर्जनाची क्रियासुद्धा मूलाधारचक्राशी संबंधित असते. मल ज्या ठिकाणी साठतो ते मलाशय, जेथून बाहेर पडतो तो गुदभाग, तसेच मूत्राशय व मूत्रेंद्रिय या सर्वांवर पृथ्वी महाभूताचा प्रभाव असतो. बद्धकोष्ठ, निरनिराळे मूत्रविकार यांचा संबंध मूलाधार चक्राशी संबंधित असू शकतो. म्हणूनच पोट साफ ठेवणे, मूत्रप्रवृत्ती साफ असण्याकडे लक्ष ठेवणे, हे मूलाधाराच्या संतुलनासाठी आवश्‍यक असते.

पृथ्वी महाभूताचा "जड' हाही एक गुण असतो. अमुक मर्यादेपर्यंत जडत्वाची (ग्राउंडिंग), स्थिरत्वाची आवश्‍यकता असते हे खरे; पण या चक्रात दोष उत्पन्न झाला तर आळस, अनुत्साह, कंटाळा वगैरे मानसिक दोषही उत्पन्न होऊ शकतात. याचीच दुसरी बाजू म्हणजे अति चंचलपणा, अस्थिरता, एकाग्रतेचा अभाव वगैरे दोषही उत्पन्न होऊ शकतात.

शरीराचा आकार, शरीरावयवांचा आकार, हासुद्धा पृथ्वी महाभूताशी संबंधित असतो. हृदयाचा आकार वाढणे, मूत्राशय, पित्ताशयासारखे अवयव सुकणे, आकसणे, गाठी येणे यांसारखे दोषही पृथ्वी महाभूतातील बिघाडाचे निदर्शक असतात.
---- Ayurveda, Vastu shastra, healthy Food, Healthy Living, Abstract India, Shree Balaji Tambe, India, Yoga, Meditation, Life Style, Marathi Blog

No comments:

Post a Comment

ad