डॉ. श्री बालाजी तांबे
माणसाने
ऐकण्याची प्रवृत्ती वाढवावी, स्वतःचे कान हत्तीच्या कानाप्रमाणे मोठे
करून, हत्तीच्या हलणाऱ्या कानाप्रमाणे सतत जागरूक असावे. श्रुती, स्मृती
वाढवून बुद्धीला चालना दिल्यानेही बुद्धीची देवता असणाऱ्या गणपतीची उपासना
होऊ शकते. "गजानना'चे हत्तीचे डोकेही बरेच काही सांगून जाते. चेहऱ्याच्या
मानाने हत्तीचे डोळे खूप लहान असतात. अर्थात दूरदूर्शीपणा व परिस्थितीची
समजूत एका दृष्टिक्षेपात करून घेणे, हे डोळ्यांच्या आकारावर अवलंबून नसते
हेच खरे. तेव्हा डोळे लहान असले, तरी मायेच्या झगमगाटापुढे इंद्रियांना शरण
जावे लागणार नाही, व विवेक उत्तम राहील असा प्रयत्न करणे आवश्यक असते. भाद्रपद शुद्ध चतुर्थीला येणारे श्री गणेशाचे व्रत हे पार्थिव गणेशाचे व्रत. माघ शुद्ध चतुर्थी हा गणपती देवतेचा जन्मदिवस. परंतु भाद्रपदात मृत्तिकेचा गणपती बनवून त्यावर अ-थर्व-शीर्ष म्हणजे कंप न पावणारे, न थरथरणारे, चित्तवृत्ती शांत असणारे मस्तक स्थापन करून त्यात प्राणप्रतिष्ठा करण्याचा दिवस.
प्रत्येक मनुष्य हा पार्थिव पंचतत्त्वांतून तयार झालेले शरीर घेऊन येतो. पार्वतीनेसुद्धा स्व-मळातून या बालकाची निर्मिती केली. स्त्रीच्या शरीरात गर्भाशयात अशाच तऱ्हेने अपत्याची निर्मिती पंचमहाभूतांपासून होत असते. या देवतेची स्थापना पार्थिवापासून म्हणजे जडापासून झालेली असली आणि शरीरात राहणारी उष्णता तशीच राहिली तरी हरकत नसावी. पण माणसाचे डोके मात्र ठिकाणावर व थंड असले पाहिजे. इतर प्राण्यांचे शरीर व त्यांचा मेंदू यांची तुलना मनुष्याचे शरीर व त्याचा मेंदू याच्याशी केली असता, मनुष्याचा मेंदू इतर प्राण्यांच्या मेंदूच्या तुलनेत मोठा असतो.
माणसाने ऐकण्याची प्रवृत्ती वाढवावी, स्वतःचे कान हत्तीच्या कानाप्रमाणे मोठे करून, हत्तीच्या हलणाऱ्या कानाप्रमाणे सतत जागरूक असावेत. श्रुती, स्मृती वाढवून बुद्धीला चालना दिल्यानेही बुद्धीची देवता असणाऱ्या गणपतीची उपासना होऊ शकते. "गजानना'चे हत्तीचे डोकेही बरेच काही सांगून जाते. चेहऱ्याच्या मानाने हत्तीचे डोळे खूप लहान असतात. अर्थात दूरदूर्शीपणा व परिस्थितीची समजूत एका दृष्टिक्षेपात करून घेणे हे डोळ्यांच्या आकारावर अवलंबून नसते, हेच खरे. तेव्हा डोळे लहान असले, तरी मायेच्या झगमगाटापुढे इंद्रियांना शरण जावे लागणार नाही, व विवेक उत्तम राहील असा प्रयत्न करणे आवश्यक असते.
कुठलीही वस्तू खाण्यापूर्वी त्या वस्तूचा सुगंध घेणे, ती वस्तू आपल्याला योग्य आहे की नाही हे ठरविणे, हे काम हत्तीची सोंड करते व नंतरच त्या वस्तूचा स्वीकार करून वस्तू स्वतःच्या तोंडात घेतली जाते. मनुष्यानेही स्वतःच्या प्रकृतीला अनुकूल असलेले अन्न घेणे, तसेच अन्नाचा स्वीकार करण्यापूर्वी त्याची शुद्धता, स्वच्छता, पवित्रता पाहून स्वीकार करणे, हेही गणपतीचे पूजन व अनुकरणच होईल. त्याविरुद्ध कोणीतरी सांगितले म्हणून, डोळ्यांना आवडले म्हणून किंवा राहवत नाही म्हणून कुठेतरी व कसेतरी शिजवलेले अन्न सेवन करण्याने मनुष्याच्या आयुष्यात मंगलमूर्ती येणार नाही वा आनंदप्राप्ती होणार नाही.
पार्थिव गणपतीचे पूजन सतत शांत राहण्यासाठी, प्रत्येक निर्णय विचारपूर्वक कृतीत आणण्यासाठी व अभ्यासासाठी केले जाते. मन व मेंदू शांत राहावा म्हणून कपाळावर चंद्र धारण केल्यामुळे मिळविलेले गणपतीचे "भालचंद्र' हे विशेषण विशेष लक्षात ठेवण्यासारखे आहे.
गणपतीच्या एका हातात स्वतःला आवडणारा, आनंद देणारा मोदकरूपी प्रसाद असला, तरी दुसरा हात सर्व जगताला आश्वस्त करत असून, आशीर्वादमुद्रेत असतो, हेही लक्षात ठेवण्यासारखे आहे. वेळप्रसंगी दुर्जनाला व दुष्टाला शासन करता यावे या हेतूने एका हातात परशू धारण केलेला असला तरी दुसऱ्या हातात कमळ धारण केलेले असते. कमळ जसे चिखलातून वर आलेले असले, तरी ते अत्यंत सुंदर, पवित्र व सुगंधी असते, तसे वस्तूची निर्मिती कोठे झालेली आहे ह्याला महत्त्व देण्यापेक्षा, शरीरातील षट्चक्रांवर ज्यांचा ताबा आहे, अशा व्यक्ती आयुष्यात विजय व समृद्धी मिळून इतरांच्या उपयोगी पडतात, असे पाहण्यात येते.
एकूण मूलाधारचक्राची म्हणजेच ज्या ठिकाणी मेरुदंड कंबरेच्या हाडाला येऊन भेटतो, त्या ठिकाणी असलेल्या पृथ्वीतत्त्वाच्या प्राबल्याची जागा असणाऱ्या चक्राची ही देवता. या देवतेची समजून उमजून व्यवस्थित उपासना केली तर आरोग्य, मनःशांती, आनंद व समृद्धी मिळेल हे निश्चित.
मंगलमूर्ती या देवतेचे स्वरूपच रंजक आहे. प्रत्येकाच्या मनात आनंद व भक्तिभाव उत्पन्न होतील असेच या देवतेचे स्वरूप आहे. चार-चौघांना एकत्र आणणारा नटेश्वरांचा मुलगा गणपती आणि हे सर्व एकत्र आल्यानंतर सर्वांना एकाच वेळी मनाला शांती व आनंद देईल असे एकमेव साधन म्हणजे संगीत, नाटक, नृत्य, नकला, खेळ हेच खरे. अगदी मोठा कार्यक्रम नाही तरी मंगलमूर्तींच्या उत्सवातील दहा दिवसांत घराघरात संगीतमय आरत्या म्हणून मनरंजन करण्याचा कार्यक्रम असतोच. अधिक लोकांना या मनरंजनाच्या कार्यक्रमात भाग घेता येण्याच्या दृष्टीने सार्वजनिक गणपतीच्या ठिकाणी रंजनाचे कार्यक्रम केले जातात. लोकमान्य टिळकांनी एकूण सर्व समाजाचे प्रज्ञाजागरण, रंजन व त्या निमित्ताने सर्वांना एकत्र आणून सामाजिक प्रबोधन व एकता तयार करण्यासाठी सार्वजनिक गणेशस्थापनेची सुरवात मोठ्या प्रमाणावर केली. या उत्सवामध्ये आरोग्याचा विचार व्हायला हवा. तेव्हा आरोग्यरंजन म्हणत असता आरोग्यासाठी बोधप्रद मार्गदर्शन हवे, जीवनाच्या इतर अंगांसाठी मार्गदर्शन हवे, आरोग्यासाठी मदत करणाऱ्या अभिजात संगीताचे व स्वास्थ्यसंगीताचे कार्यक्रम हवेत.
सध्या, भलते संगीत व भलते कार्यक्रम वगैरे विकृती रंजनआरोग्याला ग्रहण लावू पाहत आहेत. शेजारच्या गल्लीतल्या मंडळाच्या स्पीकरपेक्षा माझ्या मंडळाचा स्पीकर व आवाज मोठा असावा अशी स्पर्धा निरोगी नाही. याचा रंजनआरोग्यासाठी काही उपयोग नाही. संगीत ऐकावे अशी इच्छा असल्यासच कानावर पडलेले संगीत उपयोगी पडते. बाजूच्या स्पीकरवरचे संगीत वा वक्त्याचे भाषण कर्णकर्कश असल्याने खिडक्या बंद करून, कानात कापसाचे बोळे घालून बसायची वेळ येत असल्यास त्या संगीताचा वा भाषणाचा उपयोग शून्य असतो. इतकेच नव्हे, तर त्यापासून त्रासच होत असतो. या प्रकारच्या विकृती टाळून गणेशोत्सवाच्या निमित्ताने "आरोग्यरंजना'ला जर सर्वांनी समजून घेतले, तर सर्वांनाच फायदा होईल.
मनरंजनाच्या या सर्व माध्यमांचा पाया आपण मंगलमूर्तीच्या निमित्ताने घातला हे आपल्याला लक्षात घ्यायला हवे. आरोग्यरंजनाचा या उत्सवाच्या निमित्ताने भरपूर वापर करून व्यक्तींचे, पर्यायाने समाजाचे आरोग्य सुधारण्यासाठी उपयोग होऊ शकतो.
---- Ayurveda, Vastu shastra, healthy Food, Healthy Living, Abstract India, Shree Balaji Tambe, India, Yoga, Meditation, Life Style, Marathi Blog
No comments:
Post a Comment