पूर्वीच्या काळी पहारेकरी, सैनिक, दिवाबत्तीचं काम करणारे कर्मचारी, गुप्तहेर अशी अनेक मंडळी रात्रपाळी करीत. तो काळ एकंदरच सत्याचा, प्रामाणिकपणाचा असल्यानं ही मंडळी त्यांची सेवा रात्रभर जागून इमानेइतबारे बजावित असणार. या मंडळींनी डय़ुटी आटोपल्यानंतर दिवसा कुठल्या दिशेला झोपावं याचा वास्तुशास्त्रानं काही विचार केला असेल का, असा प्रश्न अनेक वेळा पडे. वास्तुशास्त्र म्हणजे सोलर आर्किटेक्चर. दिवसा आपल्याकडे दक्षिण आणि नैऋत्य दोन्ही तापतात. त्यामुळे या दिशांशिवाय अन्य दिशांचा विचार ऋषीमुनींनी नक्कीच केला असणार याची खात्री मला होती.
मंडनकृत राजवल्लभ हा ग्रंथ अभ्यासताना ऋषीमुनींचं सोलर आर्किटेक्चर पुन्हा एकदा समजलं. वास्तुप्रथेत अशी सोनेरी पानं असंख्य आहेत. ती हाती लागण्यासाठी अथक अभ्यास आणि संशोधन करावं लागतं. क्लासमध्ये बसून ती मिळत नाहीत. क्लाससंदर्भात विचारणा करणारे शेकडो मेल मला येतात. माझ्या नावाची कुणी अन्य व्यक्ती क्लासेस चालवत असेल. पण तो मी नव्हे! वास्तुशास्त्र किंवा ज्योतिषाचे क्लासेस मी कधीही घेतले नाहीत. इतका फावला वेळ माझ्याकडे नाही. वाचकांची दिशाभूल नामसाधम्र्यामुळे होऊ नये म्हणून हा खुलासा करतोय. असो! मूळ विषयाकडे वळतो. राजवल्लभमधील तो श्लोक पहिल्यांदा सांगतो आणि नंतर त्याचं विवेचन करतो.
प्राक्दग्धशिवदिक्सुरेश्वरदिशिज्वालाग्निदिग्धूमिता
सौम्यामस्ययुताचभास्करवाशाच्छांताश्चतरु परा
प्रत्येकप्रहारष्टकेनसवितासेवेतरात्र्यंतत
शांता सर्वशुभप्रश्चसकुनेदीप्ताभयादौशुभा
(अध्याय १४, श्लोक २)
अर्थात.. रात्रीच्या शेवटच्या प्रहराचा अर्धा भाग (दीड तास)आणि सूर्य पूर्वेत असताना चार घटिका (९६ मिनिटं किंवा सुमारे दीड तास) पूर्व दिशा ज्वाला असते. यावेळी ईशान्य दग्ध, उत्तर भस्म व आग्नेय धूम असते व अन्य दिशा शांत असतात.
आता या श्लोकाचं विवेचन करतो. वास्तु तीन प्रकारची असते. १) स्थिर वास्तु २) चर वास्तु ३) दैनिक वास्तु.
स्थिर वास्तु -स्थिर वास्तुचा उपयोग प्रामुख्यानं नगरररचना, मंदिररचना आणि घरांची रचना यासाठी केली जाते. १)पदविन्यास २) खण्डनिर्णय ३) विथी निर्णय असे स्थिर वास्तुचे तीन प्रकार पडतात. त्यापैकी पदविन्यासाची माहिती मागील एका लेखात (२९ मे, वास्तुरंग) दिली होती. खण्डनिर्णय व विथी निर्णय यांची माहिती पुन्हा केव्हातरी देईन.
चर वास्तु- बांधकामाला कोणत्या दिशेनं प्रारंभ करावा किंवा वाास्तुविषयक अन्य मुहूर्त काढण्यासाठी चर वास्तुचा वापर केला जातो. यात महिन्याप्रमाणे वास्तुपुरुषाचं मुख कोणत्या दिशेला असतं याचा विचार केला जातो. भाद्रपद, आश्विन, कार्तिक या महिन्यांत वास्तुपुरुषाचं मुख पूर्वेकडं, मार्गशीर्ष, पौष व माघ महिन्यात दक्षिणेला, फाल्गुन, चैत्र व वैशाखात पश्चिमेला आणि ज्येष्ठ, आषाढ व श्रावणात उत्तर दिशेला असतं. वास्तुपुरुषाचं मुख ज्या दिशेला असेल त्या दिशेला खणू नये किंवा त्या दिशेपासून खणायला सुरुवात करून बांधकामाचा प्रारंभ करू नये.अशी बांधकामं रखडतात.(फेंग-शुईतील ग्रँड डय़ुक ही संकल्पनाही साधारण अशीच आहे. )
दैनिक वास्तु- दिवसाच्या २४ तासांत म्हणजे आजच्या सूर्योदयापासून उद्याच्या सूर्योदयापर्यंत सूर्याचं भ्रमण कसं होतं आणि त्याचं दिशांच्या तापमानावर कसा परिणाम होतो याच्या अभ्यासावर दैनिक वास्तु बेतलेय. आपणाला माहीत आहे की सूर्य पूर्वेला उगवतो नंतर तो आग्नेय, दक्षिण असा प्रवास करीत पश्चिमेला मावळतो. जेव्हा सूर्य पूर्वेला असेल त्यावेळी घराचा पूर्व भाग तापेल, आग्नेयेला येईल तेव्हा आग्नेय भाग तापेल, दक्षिणेला जाईल तेव्हा दक्षिण भाग तापेल वगैरे. दिशासुध्दा सूर्याच्या भ्रमणाप्रमाणं तापतात किंवा थंड होतात. शांत, धूम, ज्वाला, दग्ध आणि भस्म अशा पाच अवस्थांतून त्या जातात. आणखी स्पष्ट करून सांगतो. समजा ,लाकडाचा एक तुकडा आपण जाळण्याचा प्रयत्न करताय. काय होईल? ते लाकूड थेट जळायला सुरुवात नाही करणार. प्रथम त्या लाकडातून नुसताच धूर निघेल. ही अवस्था म्हणजे धूम. लाकडाचं तापमान हळूहळू वाढत शेवटी ते जळू लागेल. ही अवस्था म्हणजे ज्वाला. लाकूड संपूर्ण जळालं की ज्वाळा विझतील आणि नुसताच निखारा उरेल. ही अवस्था म्हणजे दग्ध. हळूहळू त्या निखाऱ्यावर राख जमा होईल. ही राख गरम असेल. ही अवस्था म्हणजे भस्म. आणखी थोडय़ा वेळानं ही राख पण थंड पडेल. ही अवस्था म्हणजे शांत..! सूर्यामुळं तापणाऱ्या दिशा नेमक्या याच अवस्थांमधून जातात..
समजा की सूर्य पूर्व दिशेकडं निघालाय. काय होईल? पूर्वेचं तापमान हळूहळू वाढू लागेल. तेथील क्रियाशीलता वाढेल (धूम)..सूर्य प्रत्यक्षात जेव्हा पूर्वेत पोचेल त्यावेळी तेथील तापमान अत्याधिक असेल आणि क्रियाशीलताही अत्याधिक असेल (ज्वाला). आता सूर्य पूर्व सोडून आग्नेयेला जाईल. काय होईल? पूर्वेचं तापमान थोडंसं खाली येईल. तेथील क्रियाशीलताही थोडीशी कमी होईल (दग्ध). सूर्य आग्नेय सोडून दक्षिणेत जाईल, दक्षिण सोडून पश्चिमेत जाईल तसतशी ही दिशाही भस्म व शांत या अवस्थेत क्रमा-क्रमानं जाईल.. आलं लक्षात.?
सूर्योदयाच्या दीड तास अगोदर व दीड तास नंतर म्हणजे एकूण तीन तास पूर्व दिशा ज्वाला असते. अर्थात ईशान्य दिशा दग्ध, आग्नेय धूम, उत्तर दिशा भस्म आणि अन्य दिशा शांत असतील हे तुम्हाला आता समजलं असेल. दिशा २४ तासांत प्रदक्षिणा मार्गानं धूम, ज्वाला, दग्ध, भस्म व शांत या अवस्थांत दर तीन तासांनी जातात. (येथे सोयीसाठी सूर्योदयाची वेळ सकाळी सहाची घेतली आहे.)
सोबत दिलेल्या आकृत्या पाहा. म्हणजे कोणत्या वेळी कोणती दिशा कोणत्या अवस्थेत असेल ते समजेल.
बेडरूम अशाच ठिकाणी हवी की जी दिशा शांत असेल, म्हणजेच तेथील क्रियाशीलता कमी असेल. जेथे क्रियाशीलता जास्त असेल तेथे न चाळवता झोप येणार नाही. तक्त्यावरून आपल्या हे लक्षात येईल की संध्याकाळी साडेसात वाजल्यापासून दक्षिण आणि रात्री १०.३० पासून सकाळपर्यंत नैऋत्य शांत असते. अर्थात रात्री झोपण्यासाठी या दिशा उत्तम. पण दिवसा या दिशा क्रियाशील होतात. याउलट उत्तर व ईशान्य या दिशा दिवसा शांत असतात. तेथील क्रियाशीलता
कमीत कमी असते. अर्थात रात्रपाळी करून दिवसा झोपणाऱ्यांनी उत्तर व ईशान्येच्या बेडरूमचा वापर करावा.
समजा तुम्हाला जेवणखाण आटोपल्यानंतर दुपारी दोन वाजता ताणून द्यायची आहे. कोणती दिशा निवडाल?. तक्ता पाहा! यावेळी पूर्व, ईशान्य, उत्तर, वायव्य या दिशा शांत आहेत. म्हणजेच या दिशांतील बेडरूममध्ये झोपल्यास आपण नक्कीच तरतरीत व्हाल!
(क्रमश:) ---- Ayurveda, healthy Food, Healthy Living, Abstract India, Shree Balaji Tambe, India, Yoga, Meditation, Life Style, Marathi Blog
No comments:
Post a Comment