Saturday, March 6, 2010

काळजी करीत राहणे

डॉ. ह. वि. सरदेसाई

काळजी वाटणे हे स्वाभाविक आहे. निरामय मनात आलेल्या काळजीचा उपयोग करून अनेक संकटांचा मुकाबला करता येतो. याचा सर्वात उत्तम मार्ग म्हणजे ज्याची काळजी वाटते आहे त्यासंबंधी नेमके काय करावयाचे, हे ठरवून त्याप्रमाणे कार्यवाही लगेच सुरू करणे. 
योग्य प्रमाणात काळजी वाटणे आवश्‍यक असते. अशी भावना उपयुक्त असते. याला यू-स्ट्रेस (Eustress) म्हणतात. आपली शारीरिक व मानसिक कार्यक्षमता अशा योग्य प्रमाणातील काळजीमुळे वाढते. याला काळजी घेणे असे आपण म्हणतो. वेळेवर काळजी घेण्याने आपण आजार टाळू शकतो. अपघातापासून आपला बचाव करू शकतो. मोठ्या आर्थिक नुकसानीचे प्रसंग किंवा सामाजिक प्रतिष्ठा गमावण्याची शक्‍यता टाळू शकतो. आपल्या परिसरातील कोणत्याही संकटसदृश परिस्थितीशी मुकाबला करण्याच्या तयारीला युद्ध अथवा पलायनाची (Fight or Flight Reqetion) तयारी म्हणतात. चिंता हा या युद्ध अथवा पलायनाच्या तयारीचा प्राथमिक भाग आहे. एकदा युद्ध करावयाचे का पलायन करावयाचे, याचा निर्णय झाला व कार्यवाही सुरू झाली, की चिंतेचे कार्य संपते. आता चिंता नाहीशी होते. परीक्षेच्या आधी वाटणारी सगळी काळजी प्रश्‍नपत्रिका हाती येऊन उत्तरे लिहावयास सुरवात केल्याबरोबर नाहीशी होते. महत्त्वाच्या व्यक्तीला भेटण्यापूर्वी वाटणारी छातीतील धडधड भेटल्यावर शमते. व्याख्यान देण्यापूर्वी नवख्या व्याख्यात्याला वाटणारी मंचावरील भीती (Stage Fright) व्याख्यानाच्या ओघात वाटेनाशी होते. असे होणे निरामय मानसिकतेचे लक्षण आहे.

जेव्हा चिंता अतिरेकी होते तेव्हा तो आजार होतो. त्याला डिस्‌स्ट्रेस (Dis-stress) म्हणतात. आपल्या मेंदूतील व मज्जासंस्थेतील अनैच्छिक केंद्रांना (Autonomic Nervous Systems) अतिरेकी चालना मिळू लागते. श्‍वास जलद होऊ लागतो, छातीत धडधड जाणवते, नाडीची गती वाढते, हातपाय थंड पडतात, घाम सुटतो, तोंड कोरडे पडते, घशात काहीतरी अडकले आहे अशी भावना येते (lump in Throat), मळमळते, पोटात "कसेतरी' होत राहते (Buterflies in Stomach), सारखे लघवीला जाण्याची भावना येऊ लागते, "चक्कर' येते (पण गोल फिरल्याची भावना नसते), अंधारी येते, डोके दुखते, कापरे भरते, भीती वाटते, क्षुल्लक गोष्टींनी दचकायला होते, झोप लागायला वेळ लागू लागतो, इत्यादी तक्रारी केवळ चिंतेच्या अतिरेकाने येऊ लागतात. या तक्रारींकडे रुग्णाचे लक्ष जाते व "मला असे का होत आहे' अशी नव्याने चिंता निर्माण होते. या दुष्टचक्रातून बाहेर पडण्याकरता रुग्णाला मदत लागते. जरी चिंता ही एक मानसिकता असली तरी कधी कधी त्याचे मूळ शारीरिक व्याधीत असू शकते. काही औषधांनी चिंता निर्माण होते. चहा, कॉफी इत्यादींचे अतिरेकी सेवन व दमा ताब्यात आणणाऱ्या औषधांचा परिणाम असा होऊ शकतो. झोप येणारी औषधे किंवा मद्यपान अकस्मात बंद झाले तरी मन खूप सचिंत बनते. थायरॉइड ग्रंथींचे आजार, रक्तातील साखर कमी होणे, मायग्रेन नावाची डोकेदुखी, काही फिट्‌स (E{nboßgr - Epilepsy) चे प्रकार, डोक्‍याला इजा होणे (Head Injury), मेंदूचे व मनाचे अनेक विकार, यात चिंता हे प्रमुख लक्षण असू शकते. चिंता शारीरिक आजाराचा भाग तर नाही ना, याचा विचार करून मगच मानसोपचाराकडे वळणे इष्ट असते. अर्थात बहुतेक वेळा चिंता निर्माण होण्याचे कारण परिस्थितीतून निर्माण झालेला तणाव, हे असते. काही औषधे, समुपदेशन, व्यायाम, योगासने व मानसिक आरोग्याबद्दल मार्गदर्शन यांनी चिंता घालविता येते.

काळजी वाटणे हे स्वाभाविक आहे. निरामय मनात आलेल्या काळजीचा उपयोग करून अनेक संकटांचा मुकाबला करता येतो. याचा सर्वात उत्तम मार्ग म्हणजे ज्याची काळजी वाटते आहे त्यासंबंधी नेमके काय करावयाचे, हे ठरवून त्याप्रमाणे कार्यवाही लगेच सुरू करणे. परीक्षेची काळजी वाटत असल्यास अभ्यास करावयास लागणे. संभाव्य प्रश्‍नांची यादी तयार करून उत्तरे शोधून ठेवणे. आपल्या बोलण्यात काही दोष असला (अडखळणे, तोतरे बोलणे, उच्चार स्पष्ट नसणे, फार भरभर बोलणे, आवाज फार मंद असणे, इत्यादी) तर प्रयत्नपूर्वक (मोठ्याने वाचून, मित्र-मैत्रिणींशी बोलून किंवा वाचा-उपचारतज्ज्ञ (Speech Therapist) यांचा सल्ला घेऊन ही अडचण दूर करणे, खेळात प्रावीण्य मिळविण्यासाठी किंवा कलेच्या आविष्कारासाठी सतत रियाज करणे, अशा प्रकारे प्रयत्न करणे, हा चिंतेवर मात करण्याचा प्रभावी मार्ग होय. केवळ विचार करण्याने चिंता दूर होणार नाही; उलट वेळ वाया गेल्याची आणखी चिंता निर्माण होईल. मानवी मनात चिंता जाण्याकरता अनेक प्रतिकारात्मक प्रक्रिया होऊ शकतात. आनुवंशिकता आणि कौटुंबिक नैतिक मूल्यांची जडणघडण यातून मनाची कणखरता ठरते.

असे कणखर मन चिंतेचे रूपांतर काही उपयुक्त मानसिक प्रतिसादात करू शकते. तसे न झाल्यास शारीरिक किंवा मानसिक अस्वास्थ्य आणि विकार यांना आमंत्रण मिळते. कधी कधी मानसिक ताण खरोखरीच इतका मोठा असतो, की संपूर्ण चिंताविरहित स्थिती अव्यवहार्य बनते. चिंता अतिरेकी झाली तर काही औषधे वापरणे आवश्‍यक असते. अशा औषधांचा वापर (Anxiolytic Agents, Tranquillers, Mood Elevators) त्या विषयातील तज्ज्ञांच्या नजरेखालीच करावा. या औषधांनी गंभीर दुष्परिणाम होणे संभवते. नियमाने व्यायाम करणे, पायी चालणे, खेळ खेळणे, मित्र-मैत्रिणींशी मनमोकळे बोलणे, श्रद्धा जोपासणे, जीवनाचे ध्येय ठरविणे इत्यादींनी आपली मानसिक व शारीरिक तंदुरुस्ती सांभाळणे, हा अतिरेकी MqVm होण्याविरुद्ध प्रभावी मार्ग होय.
ज्यांना जमेल त्यांनी नियमाने योगासने करावीत व मन केंद्रित करण्याचा सराव करावा. हा मार्ग (ध्यान) सर्वांसाठी नसतो. श्रद्धा जोपासणे व शारीरिक क्रियांमध्ये मन गुंतवणे त्यामानाने सुलभ असते

Ayurveda, healthy Food, Healthy Living, Abstract India, Shree Balaji Tambe, India, Yoga, Meditation, Life Style, Marathi Blog

1 comment:

  1. खुप चांगला हा लेख आहे.

    ReplyDelete

ad