Saturday, January 2, 2010

बदल करण्याची वृत्ती महत्त्वाची

- डॉ. संज्योत देशपांडे, मानसतज्ज्ञ

'तुमच्या आयुष्याला वळण देणारा क्षण कोणता,' असा प्रश्‍न कोणी विचारला, तर मन अनेक गोष्टींचा मागोवा घेऊ लागतं. भूतकाळात घडलेल्या अनेक घटनांचे पडसाद मनात उमटायला लागतात आणि लक्षात येतं, की आयुष्य हे कायमच वळणावळणांचं होतं. फक्त "त्या' वळणापाशी आपल्याला काहीतरी उमगलं. काय ते कदाचित नाही सांगता येणार; पण तेव्हापासून आपण बदललो. तोच तो "टर्निंग पॉईंट'. आयुष्य बदलून जाण्याचा...
आपण असे कितीतरी बदलाचे क्षण, टर्निंग पॉइंट वैयक्तिक आणि सामाजिक पातळीवर अनुभवलेले असतात, पाहिलेले असतात, ऐकलेलेही असतात.

एकूणच मानवजातीचे आयुष्य आमूलाग्र बदलून टाकणारे असे "टर्निंग पॉइंट' तरी कोणते?
* कोणे एके काळी चाकाचा शोध लागला आणि माणसाच्या जगण्याला गती मिळाली.
* एडिसनने विजेचा शोध लावला आणि जगभर प्रकाश पसरला.
* राइट बंधूंनी लावलेल्या विमानाच्या शोधामुळे माणसाचं आकाशात उडण्याचं स्वप्न पूर्ण झालं.
* संगणकाचा शोध लागला आणि सरकारी कार्यालयांपासून सर्वांचा चेहरामोहराच बदलला.
* दूरदर्शन आणि त्यावर 24 तास सुरू असणाऱ्या अनेक वाहिन्या बसल्याजागी जगाची भटकंती घडवून आणू लागल्या.
* ट्रिंग ट्रिंग वाजणारा पारंपरिक फोन मागे पडून आता वेगवेगळ्या ट्यून वाजविणारा मोबाइल फोन झाला. तो क्षणार्धात इकडून तिकडे संदेश पाठवू लागला.
* इंटरनेटमुळे माहितीचा विस्फोट झाला आणि जग अधिकच जवळ आलं.
* गर्भनिरोधक गोळ्यांच्या क्रांतीमुळे अनेकांच्या मनावरचं दडपण दूर झालं.
* क्रेडिट आणि डेबिट कार्डच्या जमान्यात खिशात किती पैसे आहेत, ही चिंताच दूर झाली.
* कृष्ण-धवल चित्रपटातील नायकापासून चार हात दूर राहून "माझा होशील का?' असं म्हणणारी नायिका आज बारा राजपुत्रांसमवेत जाहीरपणे स्वयंवर मांडू लागली.
* त्या नादमधुर, अर्थपूर्ण. "श्रवणीय' गाण्यांचा जमाना गेला आणि आज आपण जी नवी गाणी "पाहतो' त्या गाण्यांचा जमाना आला...
* एकत्र कुटुंबपद्धती पडद्याआड गेली आणि विभक्त कुटुंबपद्धती अवतरली.

बदल झाले आहेत, ते असे झाले आहेत. अशा अनेक सामाजिक, व्यक्तिगत बदलांचे आपण साक्षीदार आहोत. त्यातील सहभागी आहोत.
याचाच अर्थ आपण अशा जगात राहतो की जिथे एकच गोष्ट शाश्‍वत आहे, ती म्हणजे बदल.
हा बदल फक्त तांत्रिक गोष्टींमध्ये झालेला नाही, तर तो माणसांच्या वृत्तीत, नातेसंबंधांत, राहणीमानात आणि जीवनशैलीतही दिसायला लागला आहे.
गेल्या वीस वर्षांत झालेले बदल, गेल्या दहा वर्षांत झालेले बदल आणि गेल्या पाच वर्षांत झालेले बदल हे टप्पे पाहिले, तर या बदलांची प्रचंड वाढती गती, अफाट वेग लक्षात येईल. जे बदल घडण्यासाठी पूर्वी कदाचित पिढ्यांचं अंतर जावं लागायचं, तेच बदल आता काही वर्षांतच होताना दिसतात. आपल्यापेक्षा पाच-दहा वर्षे लहान असणाऱ्यांकडे पाहिल्यानंतरही "आपल्यात "जनरेशन गॅप' आहे की काय,' असा प्रश्‍न पडतो. म्हणूनच श्‍वासाप्रमाणेच आपल्या रोजच्या जगण्याचा अविभाज्य भाग असलेल्या या बदलांना आपण कसे सामोरे जात असतो? जाणार आहोत? आपली मानसिकता बदलांना सहजासहजी सामोरे जाण्याची असते का? आपण हे बदल अल्पावधीत आत्मसात करतो का? असे प्रश्‍न विचारल्यावर काय चित्र दिसते...?

समजा मी तुम्हाला म्हटलं, की
* आज तुम्ही नेहमीच्या जागेवर झोपू नका.
* ऑफिसला जाताना नेहमीच्या ठरलेल्या वाटेपेक्षा आज वेगळ्या वाटेने जा.
* ऑफिसमध्येही जागा बदलून बसा...
इत्यादी इत्यादी...

तर ?
तर... काही नाही; या गोष्टींचा विचार केला, तरी लक्षात येईल, की आपलं मन हे बदल स्वीकारण्यासाठी तयार नाही. ते आतून विरोध करतंय!
याचाच अर्थ असा, की कोणताही बदल आपण सहजासहजी स्वीकारत नसतो. आपल्या मनाचा बदलांना विरोध असतो. तो विरोध अनेक गोष्टींमधून निर्माण होतो.

आपण काही उदाहरणं पाहू :
1) आपल्याला आपला "कम्फर्ट झोन' सोडायचा नसतो. आता आहे त्या गोष्टीत किंवा स्थितीतच आपल्याला सुरक्षित वाटत असतं. बदल झाल्यामुळे निर्माण होणारा त्रास सहन करण्याची आपली मानसिकता नसते. "मला कोणताच त्रास नको आहे,' ही मनाची धारणा असते.

2) काही जणांच्या मनात बदलांविषयीचीच भीती असते. आपण बदललो, तर तो बदल टिकून राहील का? आपल्यातील बदलांमुळे लोकांच्या आपल्याकडून असलेल्या अपेक्षाही बदलतील. त्या आपण पूर्ण करू शकू का? त्यामध्ये आपल्याला अपयश आलं तर? अशा अनेक शंकांमुळे अनेकांच्या मनात वेळेवर पोचण्याची भीती, "कमिटमेंट' देण्याची भीती, गुणवत्ता असलेलं काम करण्याची भीती, अशा अनेक गोष्टी निर्माण होतात आणि आपलं मन बदलाला विरोध करत राहतं.

मुळात कोणातही बदल म्हटलं, की ताणतणाव येतातच. त्यामुळेच बदलांना सामोरं जायचं असेल, तर शरीराची आणि मनाची तयारी करावी लागते. "मला बदल हवा; पण तो विनासायास हवा,' असं काही शक्‍य होत नसतं. दुसरं म्हणजे बदल हवा; पण तो आपल्या मनासारखाच हवा, असंही अनेकांना वाटतं.

आपल्या मनाच्या अशा धारणा आणि आपली त्रास सहन करण्याची (कमी किंवा जास्त) क्षमता या बदलांच्या राज्यात महत्त्वाची भूमिका पार पाडताना दिसतात. याच बरोबरीने आपले विचार किती आग्रही आहेत, हट्टी आहेत किंवा लवचिक आहेत, यावर आपण या बदलांना सामोरे जाताना किती ताण निर्माण होतात, ते अवलंबून असतं.
आजच्या काळात आपल्या आजूबाजूच्या परिसरात, समाजात जे बदल होताना दिसतात, त्यांच्याकडे आपण तटस्थतेनं पाहायचं ठरवलं, तर ते खरंच जमणार आहे का ? आपण या सतत बदलणाऱ्या जगात कोरडे, अलिप्त राहू शकणार आहोत का?

आपण तसंच अलिप्त किंवा कोरडं राहायचं ठरवलं, तर या बदलत्या जगात आपणच बाहेर फेकले जाणार आहोत. आपण बदललो नाही, तर त्याचा फक्त आपल्यावरच नाही, तर आपल्या जगण्यावर, मुला-बाळांवरही परिणाम होणार आहे, याची सखोल जाणीव निर्माण व्हायला हवी. ती तशी होणार नाही, तोपर्यंत आपण बदल स्वीकारायला तयार होऊ शकणार नाही.

आपल्या रोजच्या जगण्याशी निगडित असणारे हे काही सोपे प्रश्‍न आहेत. त्यांची उत्तरंच आपल्याला बदलाविषयी काय ते सांगून जातील. रोजच्याच जगण्यातील उदाहरणे-स्वतःला समोर ठेवून- घेऊया...

* मी पाणी वाचवायला शिकलो नाही, तर माझ्या पुढच्या पिढ्या काय करतील?
* ओल्या आणि सुक्‍या कचऱ्याचं शास्त्र मी वापरलं नाही, तर या पृथ्वीचं काय होईल?
* मी मतदानाचा हक्क बजावला नाही, तर माझ्या देशाला सांभाळणारे नेते मिळतील का?
* मी वाहतुकीचे नियम पाळले नाहीत, तर माझं जीवन धोक्‍यात येईलच; पण मी माझ्या मुलांना या नियमांचं महत्त्व सांगू शकेन का?
* माझ्या हक्कांबाबतची जागरूकता माझ्याच मनात नसेल, तर मी कोणाला प्रश्‍न विचारेन?
* विजेचा वापर योग्य पद्धतीनं केला नाही, तर काय होईल?
आणि सर्वांत महत्त्वाचं -
* काळाची पावलं आणि गती ओळखून मी जर माझ्या विचारांमध्ये, कृतीमध्ये बदल केला नाही, तर माझं काय होईल?

या सतत बदलणाऱ्या जगात आपण एखाद-दुसऱ्याच्या तालावर नाचणाऱ्या बाहुलीसारखे आहोत, असं समजून जगण्यापेक्षा आपण काय काय करू शकतो, याचा विचार केला, तर उत्तरं सापडू शकतील.

आपल्या मनातलं जग हवं असेल, तर त्यासाठी आपण स्वतःमध्येही काही बदल आवर्जून करायला हवेत, याची जाणीव निर्माण होणं महत्त्वाचं आहे.
शरीरात झालेला एक बदल "साक्षात्कारी' असू शकतो, याचं बोलकं उदाहरण आपण आपल्या जवळच पाहत असतो. आपल्यात होणारे बदल जगण्याला वेगळी दृष्टी देणारेही असू शकतात, त्यासाठीच आपली वृत्ती महत्त्वाची! 
 
Ayurveda, healthy Food, Healthy Living, Abstract India, Shree Balaji Tambe, India, Yoga, Meditation, Life Style, Marathi Blog

No comments:

Post a Comment

ad