Wednesday, February 3, 2016

स्रोतस सिद्धांत -1

एखाद्या तळ्यात कमळदलाचे जाळे इतस्ततः पसरलेले असते किंवा एखादी वेल तिच्या फांद्यांनी सर्वदूर पसरते, त्याप्रमाणे शरीरातही स्रोतसांचे जाळे सर्वत्र पसरलेले असते. शरीरात जेथे जेथे रिकामी जागा आहे, अवकाश आहे, जेथे शरीरभावांचे परिवहन होत असते, त्या सर्वांना स्रोतस समजले जाते.  

‘आयुर्वेद उवाच’ या सदरात आता आपण आयुर्वेदातील ‘स्रोतस’ या सिद्धांताची माहिती घेणार आहोत. चरकसंहिता, सुश्रुतसंहिता, अष्टांगहृदय, अष्टांगसंग्रह वगैरे सर्व महत्त्वाच्या आयुर्वेदाच्या ग्रंथांमध्ये स्रोतस ही संकल्पना समजावलेली आहे. शरीरातील विविध क्रिया कशा होत असतात आणि शरीरातील विविध संरचनांचा, अवयवांचा परस्परांशी कसा संबंध असतो, दोन शरीरभाव शारीरिकदृष्ट्या एकमेकांपासून दूर असले तरी कार्यामुळे कसे जोडलेले असतात, अशा अनेक गोष्टी ‘स्रोतस’ सिद्धांतामुळे समजू शकतात. 

‘स्रोतस’ शब्दाची निरुक्‍ती चरकसंहितेत ‘स्रवणात्‌ स्रोतांसि’ अशी केलेली आहे. म्हणजे ज्या मार्गातून सतत काहीतरी स्रवत असते त्याला ‘स्रोतस’ असे म्हणतात. चरकसंहितेमध्ये स्रोतस सिद्धांत पुढील सूत्राद्वारा समजावलेला आहे, 
यावन्तः पुरुषे मूर्तिमन्तो भावविशेषास्तावन्त एवास्मिन्‌ स्रोतसां प्रकारविशेषाः । 
सर्वे हि भावाः पुरुषान्तरेण स्रोतांसि अभिनिर्वर्तन्ते, क्षयं वा अपि अभिगच्छति । 
स्रोतांसि खलु परिणामआपद्यमानानां धातूनाम्‌ अभिवाहिनी भवन्ति अयनार्थेन ।

व्यक्‍तीच्या शरीरात जे जे मूर्तिमंत भावविशेष (म्हणजे आकारमान असणारे शरीरघटक) आहेत तेवढे शरीरात स्रोतसांचे प्रकार आहेत. स्रोतसांशिवाय शरीरातील भाव तयार होऊ शकत नाहीत किंवा क्षीणही पावू शकत नाहीत. शरीरातील सर्व धातू तयार होण्याचे काम; तसेच त्यांचे शरीरात वहन करण्याचे काम स्रोतसांकरवीच होत असते. या सूत्रावरून तीन महत्त्वाचे मुद्दे लक्षात येतात, 

१. व्यक्‍तीच्या शरीरात जेवढे म्हणून भावविशेष (शरीरघटक) आहेत, त्या प्रत्येकाचे आपापले असे एक-एक स्रोतस आहे. 
२. शरीरातील कोणत्याही घटकाची उत्पत्ती किंवा क्षय स्रोतसाच्या माध्यमातूनच होत असतो. 
३. धातूंचे परिणमन आणि धातूंचे परिवहनही स्रोतसांच्या माध्यमातून होत असते. 

अर्थात शरीरात असंख्य स्रोतसे आहेत, त्यांना संख्येत मोजता येणे अशक्‍य होय. स्रोतसाची संकल्पना स्पष्ट करण्यासाठी शरीरातील कोणकोणत्या रचनांना स्रोतस म्हणता येते हे चरकसंहितेत पुढील सूत्राद्वारा सांगितलेले आहे, 
स्रोतांसि, सिराः, धमन्यः रसायन्यः, रसवाहिन्यः, नाड्यः, पन्थानः, मार्गाः, शरीरच्छिद्राणि, संवृतासंवृत्तानि, स्थानानि, आशयाः, निकेताश्‍चेसि, शरीरधात्ववकाशानां लक्ष्यालक्ष्याणां नामानि भवन्ति। ...चरक विमानस्थान

सिरा, धमनी, रस वाहून नेणारी रसायनी, नाडी, पंथ, मार्ग, शरीरछिद्र, एका बाजूला बंद दुसऱ्या बाजूला उघडलेले किंवा दोन्ही बाजूंनी उघडलेले स्थान, आशय, दोन शरीरधातूंमधले डोळ्यांनी दिसणारे किंवा न दिसणारे अवकाश या सर्वांनाच स्रोतसात मोजता येते. 

थोडक्‍यात शरीरात जेथे जेथे रिकामी जागा आहे, अवकाश आहे, जेथे शरीरभावांचे परिवहन होत असते त्या सर्वांना स्रोतस समजले जाते. ज्याप्रमाणे एखाद्या तळ्यात कमळनालाचे जाळे इतस्ततः पसरलेले असते किंवा ज्याप्रमाणे एखादी वेल तिच्या फांद्यांनी सर्वदूर पसरते, त्याप्रमाणे शरीरातही स्रोतसांचे जाळे सर्वत्र पसरलेले असते. फक्‍त शरीरातील स्रोतसे आतून पोकळ असतात. कारण त्यातून शरीरातील भावपदार्थ वहन करत असतात. अशा प्रकारे वास्तविक शरीरात असंख्य स्रोतसे असतात. तरीही त्यात काही मुख्य स्रोतसे अशी असतात की त्यांना नाव देता येते. चरकसंहितेमध्ये अशी तेरा मुख्य स्रोतसे सांगितलेली आहेत.
  
प्राणोदकान्त-रस-रुधिर-मांसमेदोऽस्थि-मज्ज-शुक्र-मूत्र-पुरीष-स्वेदवहानि इति ।
प्राणवह स्रोतस, उदकवह स्रोतस, अन्नवह स्रोतस, रसवह, रक्‍तवह, मांसवह, मेदोवह, अस्थिवह, मज्जावह, शुक्रवह अशी सात धातूंची सात स्रोतसे, मूत्रवहस्रोतस, पुरीषवह स्रोतस आणि स्वेदवह स्रोतस अशी तेरा स्रोतसे नावाने सांगता येतात. ही स्रोतसे महत्त्वाची का आहेत हे आपण पुढच्या वेळी पाहूया.
Ayurveda, Vastu shastra, healthy Food, Healthy Living, Abstract India, Shree Balaji Tambe, India, Yoga, Meditation, Life Style, Marathi Blog, Marriages, Love

No comments:

Post a Comment

ad