Monday, December 28, 2009

शरीर-मनाचे संतुलन म्हणजेच स्वास्थ्य

डॉ. हिमांशू वझे

आरोग्य म्हणजे नुसताच आजारांचा अभाव नव्हे. या शब्दात "रोग' हा शब्द असल्यामुळे बऱ्याचदा आरोग्य शब्दाचा अर्थ समजण्यात गल्लत होते. इंग्रजीमध्ये Health हा शब्द आहे. या शब्दाचा उगम ग्रीक भाषेतून आहे. यात परिपूर्णतेचा अनुभव अभिप्रेत आहे. संस्कृत व मराठीमध्ये "स्वास्थ्य' हा शब्द "आरोग्य' या शब्दाला पर्यायवाचक म्हणून वापरला जातो. वस्तुतः "स्वास्थ्य' हा शब्द अधिक मूलगामी व अर्थाच्या दृष्टीने परिपक्व आहे. जो "स्व'मध्ये स्थित आहे, अशा स्वस्थ माणसाच्या अवस्थेला स्वास्थ्य असं म्हणता येईल. स्वास्थ्याची ही व्याख्या आध्यात्मिक वाटण्याची शक्‍यता आहे; पण संपूर्ण स्वस्थता हाच स्वास्थ्याचा आधार आहे. कुठल्याही प्रकारची अस्वस्थता ही भविष्य, भूत किंवा वर्तमानातल्या व्याधीचे निदर्शक आहे. म्हणूनच उत्तम स्वास्थ्य टिकविणे प्रत्येकासाठी आवश्‍यक आहे.

स्वास्थ्य बिघडण्याची कारणे
* शारीरिक गरजांकडे दुर्लक्ष करणे, शरीराचा अयोग्य वापर उदा. सतत बैठेकाम किंवा एखाद्या विशिष्ट स्थितीत शरीर जास्त वेळ राहणे, ठराविक हालचाली सतत करत राहणे. त्यामुळे शरीराच्या काही भागांवर अतिरिक्त ताण निर्माण होतो. आहार, निद्रा आदी प्राथमिक गरजांची हेळसांड.
* दिनचर्येतील अनियमितता स्वास्थ्याला बाधक ठरते. शरीरातल्या घड्याळाचा अवमान व्याधींना निमंत्रण देतो.
* ऋतुमानाप्रमाणे आपल्या आहारविहारात बदल करणे आवश्‍यक असते. ते न केल्याने शरीराचे संतुलन बिघडते.
* शरीराची स्वच्छता न राखणे, वातावरणातील बाह्य घटकांचा शरीरात प्रादुर्भाव होऊ नये म्हणून योग्य त्या खबरदाऱ्या न घेणे म्हणजे संसर्गजन्य आजारांना आमंत्रण.
* माणूस कुटुंबवत्सल आहे. नातेसंबंधातील ताणतणाव सतत भीतीची किंवा असुरक्षिततेची भावना, इंद्रियोपभोगातील अतिरेकीपणा अति महत्त्वाकांक्षा स्वास्थ्याच्या मुळावरच घाव घालते.

स्वास्थ्यासाठी जीवनाची रहस्ये
निरामय दीर्घायुष्यासाठी स्वतःच्या स्वास्थ्याची गुरुकिल्ली सापडावी लागते. वयाची शंभरी ओलांडलेल्या अनेक स्त्री-पुरुषांच्या जागतिक पातळीवर केलेल्या सर्वेक्षणातून अडकलेल्या काही ठळक सामाईक बाबी पुढीलप्रमाणे :

* आहार वैविध्यपूर्ण असतो. ताज्या पदार्थांच्या सेवनावर भर. मिताहारी स्वभाव. पोटभर न्याहारी. मुख्यतः शाकाहार, दूध व फळांचा आहारात मुबलक समावेश.
* नियमित व्यायाम. व्यायामाला वयाची अट नाही. दररोज मोकळ्या हवेत भ्रमंती.
* शारीरिक कष्टानंतर नियमित व पुरेशी विश्रांती.
* साधी राहणी. स्वतःच्या क्षमतेला अनुकूल अशा उपजीविकेची निवड.
* हॅपी गो लकी' व्यक्तिमत्त्व, नर्मविनोदी स्वभाव, फार उंच महत्त्वाकांक्षा नाही, सरळ वर्तणूक.
* आरोग्यदायी पेयपान, व्यसनांपासून लांब.
* उत्कंठावर्धक (stimulants) व निद्राकारक (sedatives) पदार्थ वर्ज्य.
* दररोज एकदा मलविसर्जन
* लैंगिक सुखाचा मर्यादेत उपभोग.
* कुठलीही औषधे-गोळ्या दीर्घकाळासाठी नाही. किरकोळ आजारांसाठी योग्य ते उपचार.

स्वास्थ्यमंडपाचे महास्तंभ
स्वतःचं स्वास्थ्य स्वतःलाच टिकवावं लागतं. संतुलित आहार, योग्य व्यायाम, व्यवस्थित ढब, पुरेशी विश्रांती, श्‍वासाशी सतत अनुसंधान, प्राणायामाचा अभ्यास, सम्यक दृष्टिकोन आणि मनःशांतीसाठी नेटाने आणि नियमितपणे केलेली साधना या गोष्टी स्वास्थ्यसंयोजनासाठी महत्त्वाच्या आहेत.
योग्य आहार :
* आहार हा सर्व इंद्रियांनी सेवन केला जातो. त्यातले अन्न हे प्रमुख.
* अन्न हे ताजे, घरी तयार केलेले व पचावयास हलके असावे.
* रोजच्या जेवणात गोड, तिखट, आंबट, खारट, कडू, तुरट या सहाही चवींचा समावेश असावा.
* पाककृतीजन्य (स्वयंपाकघरात तयार केलेले) व नैसर्गिक अन्न (उदा. फळं, फळभाज्या, पालेभाज्या, कडधान्ये इ.) यांचा आहारात समतोल असावा.
* तळलेले पदार्थ, मीठ जास्त घातलेले पदार्थ, मिठाया, मैद्याचे पदार्थ, चॉकलेट्‌स, जंक प्रॉडक्‍ट यांचे सेवन कमीत कमी करावे.
* बाहेर खाण्याची वेळ आल्यास शिजविलेल्या पदार्थांना प्राधान्य.
* भूक लागल्याशिवाय खाऊ नये. जेवल्यानंतर पोटात थोडी जागा शिल्लक ठेवावी.
* प्रसन्न चित्ताने, सावकाश खावे.
* अन्न संपूर्ण बेचव होईपर्यंत चावावे आणि मगच गिळावे.
* जेवताना संपूर्ण लक्ष जेवणातच हवे.
* भरपूर न्याहारी, दुपारचे जेवण मध्यम व रात्रीचे जेवण सगळ्यात हलके ठेवावे.
* रात्रीचे जेवण व झोप यात किमान दोन तासांचे अंतर हवे.
* लघवी रंगहीन असेल इतके पाणी प्यावे. जेवणाअगोदर पाणी पिण्याचे टाळावे.
* अन्न गरजेहून थोडे कमी घ्यावे व पाणी गरजेपेक्षा थोडे जास्त घ्यावे.
* नियमितपणे ताकदीचे व्यायाम करणाऱ्या व्यक्तींच्या आहारात चांगल्या दर्जाची प्रथिने हवीत. अशी प्रथिने दूध, मोड आलेली कडधान्ये, डाळी, सोया, उकडलेल्या अंड्याचा पांढरा भाग इत्यादींमधून मिळतात.

योग्य व्यायाम
* व्यायाम याचा अर्थ विशेष आयाम. शरीरापुढे नियमितपणे विशिष्ट आव्हान उभे करत गेल्यास शरीराचे सामर्थ्य वाढते व असलेले टिकून राहते.
* व्यायाम आपल्या आवडीचा, नियमित करता येण्याजोगा आणि वैविध्यपूर्ण असावा.
* दररोज ठराविक वेळेस किमान अर्धा ते जास्तीत जास्त दीड तास व्यायाम करावा.
* व्यायामात ताकद, लवचिकता व दमछाक या तीन निकषांवर शरीराचा कस लावावा.
* सूर्यनमस्कार हा निर्विवादपणे सर्वांगसुंदर व्यायाम आहे. मात्र फक्त सूर्यनमस्कारच घालत असल्यास रोज किमान 20 मिनिटे तरी घालावेत.
* व्यायामाला अजिबात वेळ न मिळाल्यास कामाच्या ठिकाणी चालत जाणे, लिफ्टऐवजी जिन्याचा वापर करणे, घरातली शारीरिक कष्टाची कामे स्वतः करणे इत्यादी करावे.
* व्यायाम करण्याअगोदर योग्य वॉर्म-अप, व्यायाम करून झाल्यानंतर कूलिंग डाऊन महत्त्वाचे असते.
* दमछाकीचे व्यायाम करताना घामावाटे शरीराबाहेर टाकले जाणारे पाणी हे व्यायामानंतर एका तासात शरीराला परत दिले पाहिजे.
* कुठल्याही व्यायामात प्रत्येक हालचालीची पूरक हालचाल करण्यास विसरू नये. उदाहरणार्थ, पुढे वाकल्यानंतर मागे वाकणे.
* व्यायाम करताना सांध्यातून होणाऱ्या वेदनेकडे कधीही दुर्लक्ष करू नये.

व्यवस्थित ढब
* बसताना, उभे राहताना पाठीचा कणा नैसर्गिकरीत्या ताठ असावा. पार्श्‍वभाग मागे व पोट हलके पुढे ताणल्याने पाठीचा कणा नैसर्गिक अवस्थेत राहण्यास मदत होते.
* पाठीच्या वरच्या भागात कुबड नको. त्यासाठी छाती पुढे घेऊन खांदे मागे व किंचित वर उचललेले असावेत.
* उभे राहताना दोन्ही पायांमध्ये खांद्याइतके अंतर असावे व दोन्ही पायांवर समान वजन देऊन उभे रहावे. पुढे वाकताना गुडघ्यात वाकावे.
* संगणकापुढे काम करताना स्क्रीन डोळ्यांच्या रेषेत असावा. कोपरे शरीराला चिकटलेली असावीत. मानेच्या सांध्याची कमीत कमी हालचाल करावी.
* दुचाकी चालविताना अथवा रिक्षात बसताना शरीराचे वजन हॅंडेल, बारवर टाकून कोपरे न वाकविता रेलून बसावे.

पुरेशी विश्रांती
* प्रत्येकाला 6 ते 8 तास झोपेची गरज असते.
* वाढत्या वयात, गरोदर स्त्रियांमध्ये, लहान बाळांमध्ये ही गरज जास्त वाढते.
* वृद्धापकाळी कमी झोप पुरते.
* झोपेसाठी दिल्या जाणाऱ्या औषधांनी येणारी झोप नैसर्गिक नसल्याने त्यांचे सेवन करणे हितकारक नाही.
* शरीरशुद्धी, हलका मसाज, दिवसभरात किमान एक तास शारीरिक कष्ट, झोपेपूर्वी हलका आहार घेणे व मन उत्तेजित करणाऱ्या सर्व गोष्टी टाळणे शांत झोपेसाठी आवश्‍यक आहे.
* दुपारची झोप आरोग्यदायी असली तरी ती एक तासाहून अधिक नसावी.

श्‍वास व प्राणायाम
* नैसर्गिक श्‍वास हा पोटाने चाललेला आहे. तो छातीने चालणे हे मानसिक तणावाचे लक्षण आहे.
* पोटाच्या साह्याने संथ गतीने चालू असलेले दीर्घश्‍वसन हे चिरस्वास्थ्यदायी आहे.
* तज्ज्ञ व अनुभवी व्यक्तींच्या मार्गदर्शनानुसार अनुलोम विलोम, कपालभाती, भस्त्रिका, भ्रामरी, उज्जयी इत्यादी प्राणायामप्रक्रियाचा केलेला अभ्यास व सराव स्वास्थ्य वृद्धिंगत करतो.

दृष्टिकोन व साधना
* मानसिक स्वास्थ्य टिकविण्यासाठी याची नितांत गरज आहे. मुळात मन व शरीर या एकाच नाण्याच्या दोन बाजू असल्याने मनामध्ये होणाऱ्या प्रत्येक गोष्टीचा परिणाम शरीरावर होतो.
* मनाची धाव सतत भूत किंवा भविष्यकाळात असते. मनाचा हा व्याप कमी करण्यासाठी कायम वर्तमानात राहण्याचा सराव करावा.
* कुठल्याही प्रसंगी शीघ्र प्रतिक्रिया देण्याचा किंवा अनुमान काढण्याचा मनाचा स्वभाव अस्थिरता निर्माण करतो. त्याकरिता प्रतिक्रियारहित राहता येणं महत्त्वाचं असतं. त्यासाठी संयमाची जरुरी असते.
* कुठल्याही घटनेकडे बघण्याचा सकारात्मक दृष्टिकोन स्वास्थ्यावरही सकारात्मक परिणाम घडवितो. 
 
Ayurveda, healthy Food, Healthy Living, Abstract India, Shree Balaji Tambe, India, Yoga, Meditation, Life Style, Marathi Blog

No comments:

Post a Comment

ad