Monday, December 28, 2009

कॅरोटिड अँजिओप्लास्टी

मेंदूला रक्तपुरवठा करणाऱ्या दोन वाहिन्या मानेतून जात असतात. या वाहिन्यांच्या आतील भिंतीवर अतिरिक्त प्रमाणात कोलेस्टेरॉल किंवा चरबी जमा झाली आणि त्यातील एखादा तुकडा तुटून तो मेंदूत गेल्याने ब्रेन ऍटॅक होऊ शकतो.

हृदयाकडे रक्त वाहून नेणाऱ्या रक्तवाहिनीमध्ये जर कोणत्याही प्रकारचे अडथळे निर्माण झाले, तर हृदयविकाराचा झटका येतो. त्याचप्रमाणे अर्धांगवायूचा झटका हा मेंदूला आलेला झटका असतो. साधारणपणे यामुळे हात, पाय किंवा शरीराच्या एका बाजूस, अर्धांगाला झटका येतो. कॅन्सर आणि हृदयरोगानंतर यामुळे सर्वाधिक प्रमाणात मृत्यू होत असतात.
स्ट्रोक किंवा ब्रेन ऍटॅक हे सर्वसाधारणपणे खालील दोन कारणांमुळे होतात :

1) ब्रेन हॅमरेज : यामध्ये मेंदूतील पेशींमध्ये रक्तस्राव होतो. मेंदूतील रक्तवाहिन्या फुटून ही घटना घडते. साधारणपणे अशी स्थिती ही उच्च रक्तदाब असणाऱ्या व्यक्तींमध्ये अधिक प्रमाणात दिसून येते.

2) ब्रेन ऍटॅक किंवा स्ट्रोक : हा कधी कधी गुठळ्या होण्यामुळेही येऊ शकतो. रक्तवाहिन्यांमध्ये जर कोणत्याही प्रकारे अडथळे निर्माण झाले तरीही हे घडू शकते. या वेळी ही गुठळी हृदयातून मेंदूमध्ये फेकली जाते किंवा कधी कधी अतिकोलेस्टेरॉलमुळे मानेच्या रक्तवाहिनीत गाठ निर्माण होते, यास कॅरोटिड आर्टरी असे म्हणतात.

मेंदूला रक्तपुरवठा करणाऱ्या दोन वाहिन्या मानेतून जात असतात. या वाहिन्या मानेच्या दोन्ही बाजूंना असतात. सर्वसाधारणपणे असे दिसून येते, की या वाहिन्यांच्या आतील भिंतीवर अतिरिक्त प्रमाणात कोलेस्टेरॉल किंवा चरबी जमा झाली आणि त्यातील एखादा तुकडा तुटून तो मेंदूत गेल्याने ब्रेन ऍटॅक होऊ शकतो. सर्वसाधारणपणे अर्धांगवायू झालेल्या पाचातील एका रुग्णामध्ये त्यांच्या या मानेतील वाहिनीमध्ये अडथळा निर्माण झालेला असतो, म्हणूनच झटका येऊ शकतो. याकरता तुमच्या डॉक्‍टरांना तुम्ही नेहमी मानेतील वाहिन्यांमधील अडथळे तपासण्यास सांगावे.

पुढच्या आजाराची नांदी
प्रथमतः जेव्हा अधिक प्रमाणात अडथळे नसतात, तेव्हा रुग्णाला कोणत्याही प्रकारे लक्षणे दिसून येत नाहीत आणि तो पूर्णतः बरा असतो. जसजसे अडथळे किंवा गुठळ्या वाढत जातात, तसतशी खालीलप्रमाणे लक्षणे दिसू लागतात.

1) थोड्या कालावधीसाठी एका बाजूला अशक्तपणा जाणवणे
2) थोड्या कालावधीसाठी हात किंवा पाय किंवा चेहरा बधीर होणे
3) बोलताना अडखळणे
4) थोड्या कालावधीसाठी समोर काहीही न दिसणे
5) तोल जाणे
6) अचानक चक्कर येणे किंवा डोळ्यांसमोर अंधारी येणे

ज्या वेळी चरबीचा एखादा तुकडा निघतो आणि तो मेंदूत जाऊन बसतो त्या वेळेस चेहरा, हात किंवा पायांचा अर्धांगवायू होण्याची शक्‍यता अधिक असते.
म्हणूनच रुग्णांनी अशा लक्षणांकडे दुर्लक्ष करू नये आणि लगेचच डॉक्‍टरांना भेटावे. विशेष करून वयाच्या साठीनंतर किंवा मधुमेह असणाऱ्यांनी, उच्च रक्तदाब असणाऱ्यांनी, हृदयरोग असणाऱ्यांनी किंवा अधिक प्रमाणात कोलेस्टेरॉल असणाऱ्यांनी यावर अधिक लक्ष द्यावे.
रक्तवाहिनीमध्ये अडथळे निर्माण झाले आहेत, याचे निदान डॉक्‍टर कसे करतात?

1) रुग्णाच्या इतिहासाचा सखोल अभ्यास करून, लक्षणे पाहून आणि नंतर तपासणी करून हे निदान करता येते. मानेजवळील रक्तवाहिनीतील नाडीच्या अभ्यासानंतर डॉक्‍टरांना हे कळू शकते की नाडीचे ठोके नियमित नसले की सुद्धा ते हे निदान करू शकतात.

2) कॅरोटिड आर्टरी करता विशेष अशा प्रकारची एक सोनोग्राफी चाचणी उपलब्ध असून, तिला कलर डॉपलर टेस्ट असे म्हणतात. त्यामुळे अडथळा असल्यास तो कोणत्या प्रकारचा व नक्की कोठे आहे, याची माहिती सहज मिळू शकते.

3) जर या सोनोग्राफीमध्ये असे दिसून आले, की रक्तवाहिनीमध्ये 60 टक्‍क्‍यांपेक्षा अधिक प्रमाणात गुठळ्या असतील किंवा यापेक्षा कमी गुठळ्या असूनही रुग्णाला त्रास होत असेल, तर ऍन्जोग्राफी करण्याची गरज असते. ऍन्जोग्राफीमध्ये हेही दिसून येते की हा अडथळा कोणत्या प्रकारच्या अल्सरमुळे आहे किंवा नाही, तसेच मेंदूच्या रक्तवाहिनीची अधिक माहितीही मिळू शकते.

कॅरोटिड आर्टरी आकुंचन पावणे घातक:
आता आपणाला हे माहिती झाले आहे, की ज्या वेळी ही रक्तवाहिनी 75 टक्‍क्‍यांपेक्षा अधिक प्रमाणात कमी झालेली असते, तेव्हा पहिल्या वर्षी अर्धांगवायूचा झटका किंवा मेंदूचा आजार होण्याची शक्‍यता दोन ते पाच टक्के इतकी असते.

पण जर 75 टक्‍क्‍यांपेक्षा अधिक प्रमाणात कमी झालेली रक्तवाहिनी असेल आणि रुग्णाला थोड्या कालावधीसाठी अशक्तपणा येणे यासारखी लक्षणे दिसू लागल्यास पहिल्या वर्षी झटका किंवा मेंदूचा आजार होण्याची शक्‍यता 12 ते 13 टक्‍क्‍यांपर्यंत वाढते.

या वेळी हे लक्षात घेणे महत्त्वाचे आहे, की ब्रेन ऍटॅकमुळे कायमचा अशक्तपणा किंवा शरीराच्या काही भागाला कायमचे अपंगत्व येऊ शकते, म्हणूनच रक्तवाहिनीतील अडसर वेळीच दूर करणे खूप गरजेचे असते.
जर अशा प्रकारे पुन्हा पुन्हा रक्तवाहिनीत अडसर राहिले तर पुन्हा पुन्हा ब्रेन ऍटॅकचा धोका उत्पन्न होऊ शकतो.

कॅरोटिड आर्टरीमधील अडसर कसे दूर करता येतात?
अभ्यासाअंती असे सिद्ध झाले आहे, की ऍस्पिरीन किंवा टायक्‍लोपिडीनसारख्या औषधांमुळे मेंदूवरील आघातांची शक्‍यता कमी करता येते. याचबरोबर हे ही महत्त्वपूर्ण आहे, की धोका कमी करण्यासाठी उच्च रक्तदाब, मधुमेह, उच्च कोलेस्टेरॉलची पातळी, धूम्रपान आणि वजन इत्यादींवर ताबा असणे खूप महत्त्वपूर्ण असते.
शस्त्रक्रियेचा उपाय ः आर्टरी नॅरोईंगसाठी पूर्वी फक्त शस्त्रक्रिया हा एकच उपाय होता. शस्त्रक्रियेदरम्यान या रक्तवाहिनीतील कोलेस्टेरॉलचा अडसर दूर केला जातो आणि रक्तपुरवठा नियमित केला जातो. ही एक मोठी शस्त्रक्रिया असून, ती लोकल ऍनेस्थेशिया देऊन केली जाते. या सर्जरीमुळे मृत्यूची, तसेच ब्रेन ऍटॅकची शक्‍यता पाच टक्के असते. तरीही सर्व रुग्णांसाठी ही शस्त्रक्रिया उपयुक्त नाही, कारण यामध्ये मोठा धोका असतो. 80 वर्षांवरील रुग्ण, हृदयरोग असलेले रुग्ण; किडनीचा, यकृताचा त्रास असणाऱ्या रुग्णांसाठीही घातक आहे.

कॅरोटिड अँजिओप्लास्टी : गेल्या काही वर्षांपासून कॅरोटिड आर्टरी नॅरोईंग आणि अडथळे दूर करण्यासाठी ही क्रांतिकारी पद्धती विकसित झाली आहे. या तंत्रज्ञानामुळे शस्त्रक्रिया न करता तसेच सर्व प्रकारच्या अडथळ्यांसाठी आणि सर्व वयोगटाच्या रुग्णांसाठी ही योग्य पद्धत आहे.

कॅरोटिड आर्टरी ऍन्जिओप्लास्टी कशी केली जाते?
लोकल ऍनेस्थेशिया दिल्यानंतर एक छोटी प्लास्टिकची नळी सुईबरोबर मांडीतून सोडली जाते. त्यानंतर एक लांब आकाराची ट्यूब पायाच्या रक्तवाहिनीमार्फत एक्‍सरेच्या मदतीने ती नळी मानेच्या रक्तवाहिनीपर्यंत नेली जाते. या वेळी रुग्ण पूर्णतः शुद्धीत असतो आणि डॉक्‍टर काय करत आहे, हे तो पाहू शकतो.

नंतर एक छोटी वायर या कॅरोटिड आर्टरीमध्ये प्लास्टिकचा फुगा असलेल्या छोट्या नळीतून सोडली जाते. नंतर हा फुगा फुगवला जातो व त्यामुळे कोलेस्टेरॉल आणि चरबीही कमी केली जाते. कारण हा फुगा फुगल्याने कोलेस्टेरॉल आणि चरबी बाजूला सारली जाऊन रक्तपुरवठा सुरळीत होतो. यानंतर एक स्वतःहून प्रसरण पावणारी नळी (स्टेंट) आतमध्ये सोडली जाते. हा स्टेंट नंतर रक्तवाहिनी प्रसरण पावलेल्या अवस्थेत ठेवून देतो. पण, यामुळे कधी कधी आतील कोलेस्टेरॉल हृदयात जाण्याची शक्‍यता असते.

या तंत्रज्ञानामुळे कॅरोटिड आर्टरीमध्ये अडथळे निर्माण होण्यावर असलेल्या उपायाला ऍन्जिओप्लास्टी आणि स्टेन्टिंग असे म्हणतात. हे सर्व झाल्यावर शेवटी मांडीतून घातलेल्या सर्व ट्यूब्ज काढून घेतल्या जातात आणि त्या ठिकाणी छोटे प्लास्टर घातले जाते.

ऍन्जिओप्लास्टी आणि स्टेन्टिंग करताना फार क्वचित वेळा कोलेस्टेरॉलचा तुकडा सुटून तो मेंदूत जाण्याची शक्‍यता असते. हे टाळण्यासाठी एका विशेष उपकरणाचा उपयोग केला जातो. त्यास एमोबुलस प्रोटेक्‍शन डिव्हाईस (ऍन्जिओगार्ड) असे म्हणतात. हे उपकरण म्हणजे दुसरे-तिसरे काही नसून, ती एक चहाच्या गाळणीसारखी चाळणी असते. ती वायरच्या एका टोकाला लावलेली असते. यामुळे हा तुटलेला तुकडा हे उपकरण पकडते आणि स्पेशल ऍन्जिओगार्डने पकडलेला तुकडा शेवटी ऍन्जिओगार्डबरोबर बाहेर काढला जातो. ब्रेन ऍटॅक(पॅरेलिसिस)ने आजारी असलेल्या सर्व रुग्णांनी नियमित चाचणी करून घेणे अतिशय आवश्‍यक असून, लक्षणे कायमस्वरूपी असोत किंवा थोड्या कालावधीसाठी असोत, नियमित तपासणी ही करून घेतलीच पाहिजे. तपासणीत जर रक्तवाहिनीची जाडी कमी झालेली आढळली, तर हे प्रमाण खूपच घातक असते. योग्य चाचण्या करून गरज पडल्यास काही रुग्णांमध्ये उपचार किंवा ऍन्जोप्लास्टी आणि स्टेन्टिंगची प्रक्रिया करणे गरजेचे असते.
- डॉ. शोएब एफ. पडारिया, हृदयरोगतज्ज्ञ, मुंबई.
--
Ayurveda, healthy Food, Healthy Living, Abstract India, Shree Balaji Tambe, India, Yoga, Meditation, Life Style, Marathi Blog

No comments:

Post a Comment

ad