Saturday, December 19, 2009

निषेध : बाटलीतील पाण्याचा

   Print E-mail
अनिल दांडेकर
विमानप्रवास, रेल्वे प्रवास, लहानमोठी दुकाने यातून आता सर्रास पिण्याच्या पाण्याच्या बाटल्यांची मोठय़ा प्रमाणात विक्री होऊ लागली आहे. पाणी विकत घेण्याची संकल्पना काही वर्षांपूर्वी स्वप्नातसुद्धा खरी वाटत नसे. कोणत्याही वाटसरूला घरात आलेल्या पाहुण्याला प्यायला पाणी सन्मानाने न मागता देणे बहुतेक सर्व संस्कृतींचा अविभाज्य भाग होता. आता कोणत्याही मोठय़ा, दर्जेदार, हॉटेलमध्ये गेल्यास वेटर आदबीने विचारणा करतो नळाचे साधे पाणी पाहिजे का बॉटल वॉटर. एका जगविख्यात समाजशास्त्रज्ञाचे उद्गार मननीय आहेत. वाढती लोकसंख्या, जमिनीतील पाणीसाठय़ांच्या अपरंपार वापर पाण्याचे जाणवणारे दुर्भिक्ष्य यामुळे तिसरे महायुद्ध ‘पिण्याच्या पाण्यावरून’ घडले तर आश्चर्य वाटायला नको.
बॉटल वॉटर किंवा आर्टिफिशियल वॉटर सगळीकडे सर्रास प्रचलित झालेले असताना ऑस्ट्रेलियातील एका लहान गावातून बॉटल वॉटरला संपूर्णपणे नेस्तनाबूत करून तडिपार केल्याच्या घटनेचे प्रतिसाद जगभर उमटले आहेत. एका छोटय़ा दुकानदाराने अशा प्रकारे निषेध करून कृत्रिम पाण्याच्या प्रथेचा संपूर्णपणे पराभव केला आहे. बॉटल वॉटर विकणाऱ्या अनेक मोठय़ा कंपन्यांना हादरा दिला आहे.
सिडनी शहराच्या दक्षिण-पश्चिमेला ऐंशी किमी अंतरावर बूंडानून नावाचे खेडेगाव आहे. गावची लोकवस्ती तीन हजारांचे आसपास आहे. बहुतेक गावकरी शेतकरी असून, गावात तीन-चार छोटी दुकाने आहेत. ह्य़ू किंगस्टन याचेही एक किराणामालाचे दुकान गावाच्या मध्यभागात आहे.
बूंडानून गावाजवळ गोडय़ा पाण्याची तळी, झरे असून २००६ पासून त्यातील पाणी गोळा करण्यासाठी वॉटर टँकर्स येऊ लागले. सुरुवातीला गावकऱ्यांच्या काहीही लक्षात आले नाही.
परंतु हळूहळू वॉटर टँकर्सची संख्या वाढू लागली. गावातील रस्त्यांवर वाहतूक वाढली. शांततेचा दिवस-रात्री भंग होऊ  लागला. एक-दोन लहान अपघाताही झाले. ह्य़ू किंगस्टनच्या दुकानाजवळ वॉटर टँकर्सचा तळ निर्माण झाला. किंगस्टनने त्या सर्व प्रकाराचा अभ्यास केला. टँकर्स भरभरून पाणी सिडनी शहराकडे रवाना केले जात असे. तेथे प्लॅस्टिकच्या सीलबंद बाटल्यांमध्ये पाणी भरून त्याची विक्री करण्यास सुरुवात झाली. बाटलीतील पाण्याची किंमत भरमसाठ होती.
गावातील वाढवणारे प्रदूषण पिण्याच्या पाण्याचा केलेला धंदा याविरुद्ध किंगस्टनने गावातील ग्रामपंचायतीसमोर अनेक प्रश्न उपस्थित केले. सर्व गावाने वॉटर टँकर्सनी गावातून पाणी उचलू नये असे एकमताने मान्य केले. वॉटर टँकर्सना शिरकाव करण्यास बंदी घालण्यात आली. मोठय़ा कंपन्यांच्या अधिकाऱ्यांनी प्रलोभने दाखविली. धाकदपटशाहीचे तंत्र अवलंबिले परंतु गावकरी एकजुटीने ठाम राहिले. निषेधाचा प्रकार म्हणजे गावात ठिकठिकाणी पाण्याचे ग्लासेस आणि पाणी भरून ठेवण्याची काचेची भांडी सर्वासाठी उपलब्ध करण्यात आली. वेगवेगळ्या घोषणांच्या पाटय़ा लावण्यात आल्या. गावातील हरतऱ्हेचे प्रदूषण कमी झाले. गावात पूर्ववत शांतता निर्माण झाली. पर्यावरणाचे संरक्षण सुरू झाले.सध्या जगात प्रतिवर्षी ६० कोटी डॉलर्सची उलाढाल कृत्रिम पाण्याने केली जात आहे. केवळ ऑस्ट्रेलियात ४०० लक्ष डॉलर्सचे पाणी विकले जात आहे. अशा निषेधामुळे मात्र बॉटलवॉटर लॉबीला हादरा बसला आहे.
--
Ayurveda, healthy Food, Healthy Living, Abstract India, Shree Balaji Tambe, India, Yoga, Meditation, Life Style, Marathi Blog

2 comments:

  1. कोन कहता है , आसमा को छेद नही हो सकता ,
    इक पत्थर तो तबियत से उछालो यारों .

    ReplyDelete

ad