Monday, December 21, 2009

सोयाबीनची महती

परिक्रमा : राजेंद्र येवलेकर
सोयाबीन हा आपल्या रोजच्या आहारातील सर्वात लाभदायी असा अन्नघटक आहे. त्यात प्रथिने भरपूर प्रमाणात असतात, हे अनेकांना माहीत असेल म्हणून वाढत्या वयाच्या मुलांना सोयाबीनचे पीठ रोजच्या पोळीत मिसळून दिल्यास त्याचा चांगला फायदा होतो. सोयाबीनवर आधारित काही पावडरीही बाजारात उपलब्ध आहेत पण त्यांचा वापर हा काळजीपूर्वक करायला हवा शिवाय त्या पावडरी फार महागडय़ा असल्याने नेहमीच्या गव्हाच्या दळणात दोन मुठी सोयाबीन घालून ते पीठ पोळ्यांसाठी वापरणे हाच योग्य पर्याय आहे. अलिकडच्या संशोधनानुसार सोयाबीनमध्ये अनेक संयुगे अशी आहेत की, जी आरोग्यास लाभकारी आहेत. त्यामुळेच त्याच्यापासून आपल्याला काही रोगांना प्रतिबंध करणारी उत्पादने बनवता येतात. सोयाबीनमध्ये जे टोकोफेरॉल असते व त्यात अँटीऑक्सिडंट गुण असतात. टोकोफेरॉल चार प्रकारचे असते त्यांना अल्फा, बीटा, गॅमा, लॅमडा अशी नावे दिली आहेत. त्यातील गॅमा टोकोफेरॉल हे सोयाबीनमध्ये मोठय़ा प्रमाणात सापडते. अल्फा टोकोफेरॉल हे शरीराला जास्त उपयुक्त असते तरीही इतर प्रकारांचे महत्वही आहे. अल्फा टोकोफेरॉलचे रूपांतर शरीरात इ जीवनसत्वात केले जाते. टोकोफेरॉल ह्रदयरोग व कर्करोगाची वाढ रोखण्यास मदत करतात असे दिसून आले आहे. आता सोयाबीनच्याही आंतरजनुकीय जाती तयार करण्यात आल्या आहेत. त्यांच्याबाबतीत मात्र फार संशोधन झालेले नव्हते पण आता ते काही प्रमाणात सुरू झाले आहे. जनुकीय जातींमध्ये बियाणांच्या परिपक्वतेचा व पर्यावरणाचा संबंध टोकोफेरॉलचे किती प्रमाण सोयाबीनमध्ये असेल याच्याशी आहे. जर हा संबंध अधिक स्पष्टपणे कळला तर आरोग्यास लाभदायी असे सोयाबीनचे पीक घेता येऊ शकते. मॅकगील विद्यापीठातील अन्नधान्य संशोधन केंद्र व क्युबेकमधील एका संस्थेने याबाबत संशोधन केले असून सोयाबीनमध्ये अल्फा टोकोफेरॉल किती प्रमाणात असते व त्याचा संबंध बियाणांच्या गुणधर्माशी आहे काय याचा विचार केला आहे. या संशोधनाचे निष्कर्ष अ‍ॅग्रोनॉमी जर्नलमध्ये प्रकाशित झाले आहेत. बीजिंग येथे ऑगस्ट २००९ मध्ये झालेल्या सोयाबीन संशोधन परिषदेतही ते मांडण्यात आले आहे. आंतरजनुकीय सोयाबीनच्या जातींमध्ये अल्फा टोकोफेरॉलचे प्रमाण वेगवेगळे असल्याचे दिसून आले आहे. फिलीप सेग्विन यांच्या मते सोयाबीनचे योग्य बियाणे वापरले तर त्यात अल्फा टोकोफेरॉलचे प्रमाण वाढवता येते व त्यामुळे उत्पादन हे आरोग्याला लाभदायी असे तयार होते. शरीराला परिपूर्ण अशी प्रथिने हवी असतात. परिपूर्ण प्रथिनांमध्ये मानवाला उपयुक्त अशी अमायनो अ‍ॅसिडस भरपूर असायला हवीत. इतर सर्व शाकाहारी पदार्थात सोयाबीन हा प्रथिनांचा एक सक्षम स्त्रोत आहे, असे अमेरिकी अन्न व औषध प्रशासनाने म्हटले आहे. सोयाबीनमुळे आतडय़ाच्या कर्करोगाचा धोकाही कमी होतो कारण त्यात स्फिंगोलिपिडस ही ओमेगा-३ मेदाम्ले असतात. शरीरातील अनेक क्रियांमध्ये लाभदायी ठरणारे अल्फा लिनोलेईक अ‍ॅसिडही सोयाबीनमध्ये असत, त्याचबरोबर जेनिस्टेन व डायडझेन ही आयसोफ्लॅव्होन गटातील अँटीऑक्सिडंटही असतात. सोयीबीनमुळे हानिकारक असलेले एलडीएल कोलेस्टेरॉल कमी होते असा दावा करण्यात येत असला तरी एचडीएल वाढत मात्र नाही असे न्यू इंग्लंड मेडिकल जर्नलने म्हटले आहे. सोयाबीनचा प्रमाणात वापर केल्यास त्याचा फायदा होतो हे निश्चित आहे पण सोयाबीनच्या तेलात ओमेगा सहा मेदाम्लांचे प्रमाण हे ओमेगा-३ मेदाम्लांपेक्षा खूपच जास्त असल्याने त्याचा कितपत फायदा होत असेल याबाबत साशंकता व्यक्त केली जात आहे.   
--
Ayurveda, healthy Food, Healthy Living, Abstract India, Shree Balaji Tambe, India, Yoga, Meditation, Life Style, Marathi Blog

No comments:

Post a Comment

ad